Sunday, 30 May 2021

लिंगायत महासंघाच्या कोल्हापुर जिल्हासंघटकपदी चंद्रकांत पाटील यांची निवड.


हातकणंगले / प्रतिनिधी

      लिंंगायत महासंघाच्या कोल्हापुर जिल्हयाच्या जिल्हासंघटकपदी चंद्रकांत गजानन पाटील ( पेठ वडगाव ) यांची निवड करण्यात आली आहे.
 चंद्रकांत पाटील यांचे सामाजिक ,धार्मिक कार्य लिंगायत समाज बांधव व त्यांच्या प्रश्नाविषयी असलेली जाण  ते प्रश्न कसे सुटतील यासाठी  त्यांचे प्रामाणिक प्रयत्न
करण्याचे कल्पक व्यक्तिमत्व असलेले चंद्रकांत पाटील यांची  लिंगायत महासंघाच्या कोल्हापुर जिल्हासंघटकपदी निवड झाली आहे. लातूर येथे लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी निवड जाहीर केली.
   लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार महाराष्ट्रभर लिंगायत समाज बांधवाचे जोरदार संघटन करीत आहे.त्यामुळें महाराष्ट्रातील तरुणांचा ओढा लिंगायत महासंघ या प्रमाणिक संघटनेकडे वाढला आहे. या कार्याला पुढे नेण्यासाठी कोल्हापुर जिल्हयातील सर्व तालुक्यातील लिंगायत समाज बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी  चंद्रकांत पाटील यांची निवड प्रा.सुदर्शनराव बिरादारांनी केली आहे.अशी माहिती लिंगायत महासंघाचे सरचिटणीस चंद्रकांत काला पाटील यांनी  दिली.
     चंद्रकांत  गजानन पाटील यांची निवड झाल्याबद्दल लिंगायत महासंघाचे सर्व प्रदेश कार्यकारिणी पदाधिका-यांनी चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले आहे.मुंबई, लातुर ,सोलापुर,उस्मानाबाद, नांदेड,सातरा, परभणी औरंगाबाद पुणे 
 या जिल्हयाच्या जिल्हाध्यक्षांनीही अभिनंदन केले आहे.जिल्हा व  शहर कार्यकारिणी , तसेच  तालूका पदाधिका-यांच्याही लवकरच निवडी केल्या जाणार असल्याचे  सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.

Saturday, 29 May 2021

हेरलेत तीन दिवस कडकडीत लॉकडाऊन यशस्वी


हेरले / प्रतिनिधी
दि.29/5/21

हेरले ( ता. हातकणंगले ) येथे तीन दिवसाचा लॉकडाऊन ग्रामस्थ व्यापारी व तरूण वर्गाच्या सहकार्याने कडकडीत यशस्वी झाला.
      हेरले गावातील कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणून गाव कोरोना मुक्त करण्यासाठी उपाय योजना म्हणून  ग्रामपंचायत व कोरोना सनियंत्रण समितीच्या वतीने २७ मे ते २९ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर सनियंत्रण समितीने तीन दिवस खासगी सुरक्षा दलाच्या जवानांना पाचारण
 केले. त्यांनी पहिल्या दिवशी गावातील प्रमुख मार्गावरून  संचलन करीत ग्रामस्थांना घरी रहा सुरक्षित राहा असा संदेश देऊन प्रबोधन केले. तीन दिवस खासगी सुरक्षा दलाच्या जवानांनी  गस्त घालीत चोख बंदोबस्त बजाविला. गावातील व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार , तरूण मंडळाचे कार्यकर्ते यांनीही लॉकडाऊनास प्रतिसाद दिला. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. ग्रामस्थांनीही घरामध्ये राहून प्रतिसाद दिला. त्यामुळे तीन दिवस गावात वर्दळ  न होता शुकशुकाट होता.
        पोलिस पाटील नयन पाटील,  माजी उपसरपंच संदीप चौगुले, उपसरपंच सतिश काशिद, माजी उपसरपंच विजय भोसले, राहूल शेटे,ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सहभागी होत तीन दिवसात गावात प्रबोधन संदेश देत लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Thursday, 27 May 2021

शिक्षकांचे मुल्यमापन बाह्य संस्थेकडून करण्याच्या शासनाच्या निर्णयास शैक्षणिक व्यासपीठाचा तीव्र विरोध.



कोल्हापूर / प्रतिनिधी

दि.27/5/21
शिक्षकांचे मुल्यमापन बाहय यंत्रणेमार्फत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने तीस कोटी रुपयांची निविदा मागविली आहे. त्याला कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथील झालेल्या सभेत तीव्र विरोध केला. सभेच्या अध्यक्षस्थानी एस.डी. लाड होते. शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली. 
        शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर म्हणाले की, बाह्य संस्थेकडून शिक्षकांच्या मुल्यमापनाला सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांचा तीव्र विरोध असून हा प्रकल्प रद्द करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेण्यात येईल. १९८१ च्या सेवा शर्ती नियमानुसार शिक्षकांचे मुल्यमापन झाले पाहिजे असे ठामपणे त्यांनी प्रतिपादन केले. महाराष्ट्रात सर्वात प्रथम कोल्हापूरातून या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरूवात झाली आहे. त्याचे लोन संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल परिणामी हा निर्णय शासनाला मागे घ्यावाच लागेल.
          हा निर्णय रद्द करण्यासाठी शैक्षणिक  व्यासपीठामार्फत पहिल्या टप्प्यात सोमवार दि.३१ मे रोजी व्यासपीठाचे शिष्टमंडळ शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक यांना या शासन निर्णयाविरोधात निवेदन देतील,दुसऱ्या टप्प्यात  लवकरच व्यासपीठाचे शिष्टमंडळ शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन देतील, तिसऱ्या टप्प्यात जिल्हा अधिकारी  कार्यालयासमोर शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येईल,चौथ्या टप्प्यात शासनाने हा आदेश रद्द न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केले जाईल.
     या सभेत शिक्षक आमदार प्रा.आसगावकर यांनी घोषीत केले की, जिल्ह्यात कोरोना बालक जनजागृती अभियान सुरू केले जाणार असून त्याद्वारे शिक्षक कोरोना विषाणू बद्दल विद्यार्थ्यांची व पालकांची जनजागृती करतील. रविवार दि. ३० मे रोजी बालरोग तज्ञ शिक्षकांना ऑनलाईन समुपदेशन करून प्रशिक्षित करतील. प्रास्ताविक मुख्याध्यापक  संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी केले. आभार उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर यांनी मानले.
     या सभेस शिक्षक नेते दादासाहेब लाड, चेअरमन सुरेश संकपाळ, बी.जी. बोराडे,राजाराम वरूटे, प्रा.सी एम गायकवाड, खंडेराव जगदाळे , बाबासाहेब पाटील,सुधाकर निर्मळे, के. के. पाटील, उदय पाटील, इरफान अन्सारी, मिलींद पांगिरेकर,संदिप पाटील, काकासाहेब भोकरे, सुधाकर सावंत,  गजानन काटकर, अरूण मुजुमदार, शिवाजी वरपे, शिवाजी भोसले, महादेव डावरे, अशोक पाटील, गजानन जाधव, जयसिंग देवकर, राजेश  वरक, प्रशांत पोवार, मनोहर जाधव, संजय ओमासे, अजित रणदिवे, जगदिश शिर्के आदी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
      फोटो 
शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत मार्गदर्शन करतांना शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर शेजारी अध्यक्ष एस डी लाड शिक्षक नेते दादासाहेब लाड बी जी बोराडे चेअरमन सुरेश संकपाळ व इतर मान्यवर.

Wednesday, 26 May 2021

हेरलेत तीन दिवस कडक लॉकडाऊन


हेरलेत तीन दिवस कडक लॉकडाऊन

हेरले / प्रतिनिधी
दि.26/5/21

हेरले ( ता. हातकणंगले ) येथे २७ मे ते २९ मे पर्यंत तीन दिवस कडक लॉक डाऊनचा निर्णय ग्रामपंचायत व कोरोना सनियंत्रण समितीच्या बैठकित घेण्यात आला. 
    हेरले गावातील  कोरोना बाधितांची संख्या १७० पेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे हेरले ग्रामपंचायत  व कोरोना सनियंत्रण समिती यांच्या वतीने २७ मे ते २९ मे रात्री बारा वाजेपर्यंत कडक लॉक डाऊन घोषित केला आहे.या तीन दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडल्यास अथवा फिरल्यास  दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. विनाकारण गाडीवरून फिरणाऱ्यांच्या गाड्या जप्त केल्या जाणार आहेत. गावात कट्टयावर बसणारे,चौका-चौकात चर्चा करत बसणाऱ्यांची अँटीजन  चाचणी करण्यात येणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
  या तीन दिवसामध्ये खासगी दवाखाना, औषध दुकाने, दूध संस्था,सहकारी संस्था व शेतीची औषधे दुकाने चालू राहतील किराणामाल, भाजीपाला व इतर व्यवसाय पूर्णत बंद राहतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी,असे आवाहन कोरोना सनियंत्रण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
      या बैठकिस महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील, मंडलाधिकारी भारत जाधव, तलाठी एस. ए. बरगाले, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, पोलिस पाटील नयन पाटील,  प्रा. राजगोड पाटील, माजी उपसरपंच संदिप चौगुले, राहूल शेटे, विजय भोसले, ग्रामपंचायत सदस्य आदिक इनामदार, फरीद नायकवडी, गुरूनाथ नाईक, दादासो कोळेकर, इब्राहिम खतीब, संजय पाटील, शिवराज घेवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Tuesday, 25 May 2021

गुरुवर्य भाऊसाहेब पाटील महाराज यांची कालिदास संस्कृत विद्यापीठ किर्तन शास्त्र विभाग सदस्यपदी निवड

हेरले / प्रतिनिधी
दि.25/5/21

  वारकरी संप्रदायातील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे गुरुवर्य भाऊसाहेब पाटील महाराज  यांची कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर महाराष्ट्र या विद्यापीठाच्या वतीने किर्तन शास्त्र विभाग सदस्यपदी निवड झाली आहे. 
                          स्वामी शिवानंद अध्यात्मिक केंद्र 
शेकिन हासुर बेळगाव या मठाचे ते सध्या मठाधिपती म्हणून कार्य करीत आहेत.कर्नाटक महाराष्ट्र गोवा या राज्याच्या वारकरी महासंघाचे ते अध्यक्ष म्हणून काम पहात आहेत. वारकरी साहित्य संमेलनाचे तिसरे  अध्यक्षपदीही त्यांनी भूषवलं होते.सध्या वारकरी साहित्य संमेलनाच्या विश्वस्त पदी ते काम करत आहेत. महाराष्ट्र कर्नाटक गोवा आधी राज्यांमध्ये गेली पन्नास वर्षापासून ते वारकरी संप्रदायासाठी किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम अहोरात्र करीत आहे. आत्तापर्यंत त्यांना अनेक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक,राजकीय स्तरातून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. कविकुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर यांच्या वतीने किर्तन शास्त्र या विभागांमध्ये सदस्य या पदावर त्यांची नियुक्ती झाल्यामुळे वारकरी संप्रदायातून फार मोठ्या प्रमाणात  समाधान व आनंद व्यक्त होत आहे.

Sunday, 23 May 2021

चार सायकलस्वार

             चार सायकलस्वार कसबा बावड्यात येतात काय अनं दौलत धाब्यात जेवतात कायं ? 
ही घटना काय आश्चर्य वाटण्यासारखी नक्कीच नाही, पण ही घटना जरा वेगळीच आहे. 

देशातील चार वेगवेगळ्या राज्यातले मित्र, कॉलेजात एकत्र होते पण शिक्षण पुर्ण झाल्यानंतर कोणी नोकरी करतो तरं कोणी स्वतःच्या व्यवसायात मग्न. अशा परिस्थीतीत देखिल हे मित्र एकमेकांशी नियमित संपर्क ठेऊन होते.
      एके दिवशी या मित्रांनी सायकलींग करत काश्मीर ते कन्याकुमारी दौरा करायचा बेत ठरवला; 
अन् प्रवासाला बाहेर निघाले.
सायकली सोबत घेऊन रेल्वेने जम्मुत पोहोचले आणि कटरा- वैष्णोदवीच्या पायथ्या पासुन सायकल वरुन प्रवास करण्यास सुरवात केली. दररोज १०० कि.मी. सायकलींग करणे, मिळेल त्या ठिकाणी वस्ती करणे आणि  दुस-या दिवशी  पुढच्या प्रवासाला सुरवात करणे. असे तब्बल बाविस दिवस प्रवासाचे सातत्य व नित्यक्रम संभाळत हि मंडळी सुमारे सव्वा दोन हजार कि.मी. सायकलिंग करतं कोल्हापूरच्या दिशेने कसबा बावडा मार्गे येऊ लागली, वेळ दुपारची रणरणत्या उन्हात जेवण्याची वेळ झाल्याने त्यांची नजर  रस्त्या कडच्या दौलत ढाब्याकडे गेली. 
कोल्हापूरी मटण भाकरी अन्  तांबडा पांढरा रस्सा या मेजवानीच्या बोर्ड वाचला तश्या सायकली हॉटेलच्या दारातच थांबल्या.
रस्त्या कडेलाच सायकली पार्क केल्या, धाब्यात प्रवेश केला, सायकलीवरचा काश्मीर ते कन्याकुमारी दौरा बोर्ड वाचून धाबा मालकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी चौघांची विचारपूस 
स्वागत केले, व आंत बसण्याची व्यवस्था केली, वाॅश घेऊन सर्वजण खुर्चीत स्थिरावले. जेवणाची आर्डर घेतली आणि मालक पुढच्या तयारीला  लागले.
                धाब्याचे मालक हे माझ्या भावाचे म्हणजे  दिलीपचे मित्र आहेत,  त्यांनी भावाला फोन केला; 

अरे... दिलीप ..
आपल्या धाब्यात चार सायकलस्वार जेवायला थांबल्यात अन् तु लगेच ये... काश्मीर वरनं ,सायकल चालवत आल्यात...ते ! 

घरापासुन धाबा जवळच असल्याने , तो सायकलने धाब्या कडे लगेचचं गेला. दिलीप हा प्रथितयश व्यावसायिक असला तरी त्याला सायकलिंगची आवड आहे हे धाबा मालकास माहित होते. दिलीप रोज न चुकता भरपूर सायकलिंग करतो. 

           दिलीपने चौघानां नमस्कार करुन त्यांची ओळख करुन घेतली व विचारपूस केली, दरम्यान जेवणाची ताटे टेबलावर आल्यावर.
तुम्ही आता निवांत जे़वा नंंतर बोलू  असे सांगून 
दिलीप त्यांना आग्रह करुन वाढत होता.सर्वांनी मस्तपैकी जेवणाचा मनसोक्त आस्वाद आणि कोल्हापूरी पाहुणचाराचा अनुभव घेतला !

सर्वांचे जेवण संपताच, दिलीपने त्यांना सांगितले की,
हे जेवण माझ्या मार्फत आहे! तूम्ही बिल देऊ नका.
असे बोलल्यावर ते सर्वजन स्तब्ध च झाले...! 
कृतज्ञतेचे भाव त्यांच्या चेह-यावर दिसत होते !
थोडे गंभीर झाले होते ... त्यांच्या डोळ्याचा कडा थोडया पाणावल्या होत्या ! 

एकाने बोलण्यास सुरवात की, 
दिलीपभाऊ निव्वळ आभार मानण्या इतपत हे तुम्ही दिलेलं जेवणं नाही तरं आयुष्यभर आम्ही स्मरणात ठेवणार ! 
त्यांचे कारणंही आम्ही आपल्याला सांगतो...आम्ही काश्मीर पासुन  इथे पर्यंत प्रवास केला परंतु कोणीही आम्हाला जेवणाबद्दल विचारले नाही फक्त कोल्हापूरातचं आणि इथे विचारले ! आपली आपुलकी आणि कोल्हापूरी पाहुणचार अविस्मरणीय आहे. 
आणि आम्ही जेवलो हे आमचं भाग्यचं❗

          दिलीपने स्वतः बनविलेली सायकल त्यांनी पाहिली, दिलीपचे कौतुक केले ! अभिनंदन केले !धाबा मालकांचे स्वादिष्ठ जेवण दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. 
कोल्हापूरात आपुलकीने केलेला पाहुणचार स्विकारताना समाधानी आणि तृप्त भावना मनात घेऊन चार सायकलस्वार कन्याकुमारीच्या दिशेने पुढच्या प्रवासास मार्गस्थ झाले!

शब्दांकन
✍️ पंडित सुतार,कोल्हापूर.

Friday, 21 May 2021

हेरलेचा मोफत आरोग्य सेवेचा पॅटर्न जिल्ह्यात आदर्श असेल : सभापती डॉ. प्रदीप पाटील


हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.21/5/21

हेरले गावात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी  उपकेंद्राच्या माध्यमातून केलेला मोफत आरोग्य सेवेचा हेरले पॅटर्न कोल्हापूर जिल्ह्यात आदर्श असेल असे मत हातकणंगले पंचायत समिती सभापती डॉ. प्रदीप पाटील यांनी मत व्यक्त केले. 
    हेरले येथील मेडिकल असोसिएशन, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मोफत उपचार केंद्र सुरू केले आहे. या केंद्रास भेटी प्रसंगी ते बोलत होते.यावेळी हेरले मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी डॉ.राजू पाटील यांनी होत असलेले उपचार व तपासणीची सविस्तर माहिती दिली.
        हेरले गावातील मोफत उपचार आरोग्य सेवेचा आदर्श तालुकातील इतर गावांनी घेऊन असा आरोग्य सेवा उपक्रम सर्वत्र राबविण्यात यावा असे मत गटविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी यांनी व्यक्त केले.
    या प्रसंगी पंचायत समितीच्या सदस्या महेरणीगा जमादार , पोलीस पाटील नयन पाटील , मुनिर जमादार, प्रा. राजगोंडा पाटील, माजी उपसरपंच संदिप चौगुले, उपसरपंच सतीश काशीद , माजी उपसरपंच राहुल शेटे,फरीद नाईकवडी, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण , गुरुनाथ नाईक ,रोहित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

     फोटो 
हेरले: मोफत उपचार केंद्राची पाहणी करतांना सभापती डॉ.प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी पंचायत समिती सदस्या महेरणीगा जमादार ,पोलिस पाटील नयन पाटील व  अन्य मान्यवर.

Thursday, 20 May 2021

अतिग्रेचे घोडावत कोव्हिड सेंटर ग्रामिण भागास वरदान : महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्याराणी पाटील


हातकणंगले / प्रतिनिधी

        महिला व बालकल्याण सभापती डॉ.पद्याराणी पाटील यांनी ग्रामिण भागास वरदान ठरलेले अतिग्रे घोडावत कोव्हिड सेंटर व माले अतिग्रे गावास भेट देऊन कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आढावा बैठक घेतली आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य सेवेस लागणारी औषधे उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
   हातकणंगले तालुक्यातीलअतिग्रे येथील घोडावत कोव्हिड सेंटरला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती डॉ.पद्माराणी पाटील यांनी भेट देऊन सेंटरचे प्रमुख नोडल ऑफिसर   डॉ.उत्तम मदने यांच्याशी सेंटरमधील वैद्यकिय सेवा,भौतिक सोयी सुविधा,औषध पुरवठा व अन्य अडीअडचणी बद्दल चर्चा केली. 
           अतिग्रे येथील घोडावत कोव्हिड सेंटर काही दिवसापूर्वी सुरू झाले आहे. या सेंटरमध्ये ३८० नॉन ऑक्सिजन बेडपैकी ३३० रुग्ण उपचार घेत आहेत  व २०ऑक्सिजन बेडचे रूग्ण उपचार घेत आहेत. या सेंटरमध्ये बारा डॉक्टर ,सोळा सिस्टर , चार हाऊस किपींग कर्मचारी व आठ वॉर्डबॉय सेवा बजावत आहेत. सेंटरमधील रुग्णांच्या संख्येचा विचार केला असता सात डॉक्टर, वीस हाऊसकिपींग कर्मचारी, वीस वॉर्ड बॉयची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रुग्णांच्या उपचारासाठी अधिकाधिक औषध पुरवठा होणे तसेच ऑक्सिजन मात्रा वाढवणे आवश्यक आहे. पुढील काही दिवसामध्ये शंभर ऑक्सिजन बेडची सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून लवकरच हा आरोग्य सेवा प्रकल्प पूर्णत्वास येईल. अशी माहिती  डॉ. उत्तम मदने यांनी सभापती डॉ.पद्याराणी पाटील यांना दिली.
         माले अतिग्रे येथील ग्रामपंचायत व कोरोना सनियंत्रण ग्रामसमितीस सभापती डॉ.पद्याराणी पाटील यांनी भेट देऊन गावातील कोरोना संसर्ग रोखून गावे कोरोना मुक्त होण्यासाठी उपाययोजना बद्दल मार्गदर्शन केले. तसेच गावपातळीवर आरोग्य सेवा यंत्रणा कार्यान्वीत करण्याचे आवाहन केले.

       
 फोटो 
अतिग्रे येथील घोडावत कोव्हिड सेंटरमध्ये
नोडल ऑफिसर डॉ. उत्तम मदने यांच्याशी चर्चा करून पाहणी करतांना  महिला व बालकल्याण सभापती डॉ.पद्याराणी पाटील

Wednesday, 19 May 2021

हेरले गाव संपूर्णपणे कोरोना मुक्त करावे - तहसीलदार प्रदीप उबाळे

हेरले / प्रतिनिधी
दि.19/5/21

हेरले प्राथमिक आरोग्य केंद्र व मेडिकल असोसिएशन यांच्या विद्यमाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गावात उपचार केंद्र सुरू केले आहे. निश्चितच हे कार्य अतुलनीय आहे. गावातील सर्वच घटकांनी आरोग्य सेवेस सहकार्य करून गावातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशिल राहून गाव पूर्णपणे कोरोना मुक्त करावे असे आवाहन हातकणंगले तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी केले.
        हेरले गावामध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने तो रोखण्यासाठी परिस्थितीची पाहणी करून मार्गदर्शनाने आरोग्य सेवा कार्यान्वित करण्यासाठी कोरोना सनियंत्रण ग्राम समितीस भेटी प्रसंगी ते बोलत होते.
    तहसिलदार प्रदीप उबाळे पुढे म्हणाले की,गावातील  दुकानदार, व्यापारी ,व्यावसायिक, पालेभाज्या फळभाज्या विक्रेते आदी सुपरस्प्रेडर यांची शंभर टक्के आरटीपीसीआर  व अँटिंजेन चाचणी करावी, गावामध्ये विनाकारण फिरणारे, मास्क न लावणारे , सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी,पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांची कोरोना चाचणी करावी, होम आयसोलेशन न करता फर्स्ट संपर्कातील लोकांना शाळेमध्ये अलगीकरण करावे,  आजारी लोकांना तात्काळ उपचार घेण्यासाठी समुपदेशन करावे, घर टू घर सर्व्हे करून कुटुंबांतील सदस्यांचे तापमान व ऑक्सिजनची पाहणी करावी आदी महत्त्वाच्या सूचना त्यांनी कोरोना सनियंत्रण ग्राम समितीस व सामाजिक सेवा संस्थांना दिल्या. प्राथमिक शाळेतील प्राथमिक आरोग्य केंद्र व मेडिकल असोसिएशनच्या वतीने सुरू असलेल्या उपचार केंद्राची पाहणी करून खासगी वैद्यकिय व्यावसायिकांचे अभिनंदन केले.
    या प्रसंगी हातकणंगले तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुहास कोरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल देशमुख,मंडलाधिकारी भारत जाधव , तलाठी एस. ए. बरगाले, ग्राम विकास अधिकारी संतोष चव्हाण,पोलीस पाटील नयन पाटील, मुनीर जमादार, प्रा.राजगोंड पाटील,अमित पाटील, प्रशांत तोडकर ,सलीम खतीब, सुदर्शन पाटील विनोद शेटे,कोतवाल मंहम्मद जमादार,माजी उपसरपंच संदीप चौगुले, विजय भोसले, राहुल शेटे, उपसरपंच सतीश काशीद आदी मान्यवर उपस्थित होते.

हेरले येथे शेतमजुर व कष्टकरी कुटुंबांना सामाजिक बांधिलकीतून मोफत रेशन कीटचे वाटप

हेरले / प्रतिनिधी
दि.19/5/21

हेरले( ता. हातकणंगले) येथील कमॉन इंडिया मित्र मंडळ व अमर वड्ड युवा मंच  यांच्या संयुक्त विद्यमाने शेतमजुर व कष्टकरी कुटुंबांना मोफत अंडी व रेशनचे किट वाटप करण्यात आले.
    कमॉन इंडिया मंडळ व अमर वड्ड युवामंच यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून रोजंदारीवर काम करणा-या कुटुंबांना लॉकडाऊनच्या काळात एक मदतीचा हात या उद्देशाने एक किलो गोडे तेल, एक किलो साखर, अर्धा किलो प्रमाणे तीन डाळी,  कांदे, बटाटे आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. पाचशे कटुंबांना या ग्रुपच्या वतीने मदत दिली जात आहे. या त्यांच्या सामाजिक मदत कार्याच्या उपक्रमामुळे त्यांचे परिसरातून कौतूक होत आहे.
     या सामाजिक कार्यात अमर वड्, रंजीत इनामदार, सचिन जाधव, सुकुमार लोखंडे, विजय वड्ड ,मोहन जाधव, मनोहर कलकुटकी व मंडळाच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.
        फोटो 
हेरले : येथे कुटुंबांना साहित्य वाटप करतांना अमर वड्ड, रंजीत इनामदार, सचिन जाधव, सुकुमार लोखंडे, विजय वड्ड ,मोहन जाधव, मनोहर कलकुटकी व मंडळाचे कार्यकर्ते

Tuesday, 18 May 2021

हेरले येथे वैद्यकिय सेवा गटाच्या माध्यमातून आरोग्य उपचार केंद्र सुरू

हातकणंगले / प्रतिनिधी
दि.18/5/21

   हेरले (ता.हातकणंगले ) येथे प्राथमिक शाळेमध्ये वैश्विक साथ रोखण्यासाठी सकारात्मक मोहिम म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र , मेडिकल असोसिएशन,  एम आर असोसिएशन आणि केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने  मोफत रुग्णवाहिका सुविधा ताप उपचार केंद्र, आरटीपीसीआर चाचणी व रॅपिड अँटिजन टेस्ट सुविधा या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. रुग्णवाहिकेचा शुभारंभ जेष्ठ पत्रकार प्रा. राजगोंड पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
         या प्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील म्हणाल्या की, वैद्यकिय सेवेत असणारे खासगी वैद्यकिय व्यावसायिक,  एमआर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन  यांनी स्वंयम स्फुर्तीने सामाजिक भावनेतून ही आरोग्य सेवा मोहिम सुरू  केली आहे हा उपक्रम स्तुत्य आहे. जिल्हा परिषदेच्या फंडातून यथाशक्ती आरोग्य सेवेस मदत देण्यासाठी तत्पर आहे अशी त्यांनी ग्वाही दिली.                                                 

      हेरले मेडिकल असोसिएशन,मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने मराठी शाळेमध्ये रुग्णांना येण्या-जाण्यासाठी मोफत रुग्णवाहिका , ताप उपचार केंद्र, आरटिपिसीआर चाचणी, रॅपिड अँटिजेन चाचणी  केंद्र सुरू करण्यात आले आहे.या केंद्रामध्ये रुग्णांचा ताप व अन्य आजाराची तपासणी केली जात आहे यामध्ये संशयित रुग्ण आढळला त्यांचे आरटीपिसीआर किंवा रॅपिड अँटिजेन चाचणी याच केंद्रात केली जात आहे. यामध्ये रुग्णाची पॉझिटिव्ह चाचणी आल्यास  त्यांना अतिग्रे येथील कोविड  सेंटर मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व विराचार्य संस्थेच्या दोन रुग्ण वाहिकेच्या माध्यमातून  भरती करण्यात येणार आहे. ही मोहिम ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेमुळे गावातील कोरोना संसर्ग आटोक्यात येऊन गाव निश्चित कोरोना मुक्त होण्यासाठी मदत होणार आहे.
        याप्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ.पद्माराणी राजेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल देशमुख, प्रा. राजगोंड पाटील, पोलीस पाटील नयन पाटील, मुनीर जमादार तलाठी एस ए बरगाले, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, माजी उपसरपंच संदीप चौगुले, विजय भोसले, राहुल शेटे ,उपसरपंच सतीश काशीद, ग्राम. सदस्य बतुवेल कदम, दादासो कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
        याप्रसंगी मेडिकल असोसिएशनचे डॉ. महावीर पाटील, डॉ. अमोल चौगुले, डॉ.प्रविण चौगुले, डॉ. राजगोंड पाटील,डॉ. सुरेखा आलमान,डॉ. इमरान देसाई, डॉ. प्रवीण चौगुले,डॉ. नितीन चौगुले आदी उपस्थित होते.
       याप्रसंगी हेरले  मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे रजत मुल्ला, विशाल परमाज, श्रेनिक राजोबा, राहुल कराळे, सुरज भोसले, किरण चौगुले, मृणाल पाटील, उमेश पाटील, रोहित मुंडे, पंकज मिरजे, प्रवीण सुतार ,सोमनाथ माने, अमोल शेटे,ओंकार मुंडे ,सौरभ कोरे, प्रकाश कुरणे, स्वप्नील जाधव, वेदू किराणे,संदीप मिरजे, राहुल कारंडे ,सचिन पाटील, राहुल कटकोळे,अश्फाक देसाई, आकाश तिवडे, अनिकेत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
       केमिस्ट असोसिएशनचे शीतल पाटील, अभिषेक मोहिते,अविनाश चौगुले, अनिल पाटील, संदीप हनमंत,संदीप चौगुले, लतिफ नायकवडी आदी उपस्थित होते.
फोटो 
हेरले येथे वैद्यकिय सेवा गटाच्या माध्यमातून सुरू केलेले उपचार केंद्र प्रसंगी महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील वैद्यकिय अधिकारी डॉ.राहूल देशमुख पोलिस पाटील नयन पाटील प्रा. राजगोंड पाटील मुनिर जमादार व अन्य मान्यवर

Saturday, 15 May 2021

हेरलेतील अमित पाटील यांची सामाजिक बांधिलकी; गावातील सहा प्रभागामध्ये करत आहेत सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी.


हातकणंगले / प्रतिनिधी
दि.15/5/21

हेरले ( ता. हातकणंगले ) येथे सामाजिक बांधिलकीतून अमित पाटील गावातील  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्या मित्रांच्या सहकार्याने सहा प्रभागातील परिसरामध्ये सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी करीत गावातील परिसर निर्जंतुकीकरण करीत आहेत.
        हेरले गावामध्ये कोरोना संसर्ग वाढून रुग्णांची संख्या वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी व आटोक्यात आणण्यासाठी युवा नेते अमित पाटील यांनी स्वतःच्या आर्थिक मदतीसह सहकारी मित्रांच्या वर्गणीतून गावातील सहा प्रभागातील घरांच्या अंगणात व परिसरात सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी करून  गावातील परिसर निर्जंतुकीकरण करीत सामाजिक बांधिलकी जपत आहेत.  त्यांना बखतीयार  जमादार,विशाल परमाज,संदीप कोले ,  बतुवेल कदम,तेजस कटकोळे, उमेश पाटील, आशपाक देसाई आदी मित्रांचे सहकार्य लाभत आहे.

      फोटो
हेरले : येथे सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी करतांना अमित पाटील बतुवेल कदम विशाल परमाज व अन्य मान्यवर.

इलेक्ट्रिकल सेल्स एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन, (ई-सेवा) च्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीस दहा हजार शेणी दान

हातकणंगले / प्रतिनिधी
दि.15/5/21

कोल्हापूर महानगरपालिकेच्या शेणी दान आवाहनास प्रतिसाद देत पश्चिम महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल सेल्स एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन, (ई-सेवा) कोल्हापूर यांनी दहा हजार शेणी महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस दान केल्या.
   कोल्हापूर  महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमी, बापट कँम्प, कसबा बावडा तसेच कदमवाडी येथे मृतदेहांवर महापालिकेच्यावतीने मोफत अंत्यविधी करण्यात येतो. सध्या कोविड -१९ चा प्रार्दुभाव वाढलेने मृत्युंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना बाधीतांची मृत्यूसंख्या वाढत असलेने त्यांच्यावर कराव्या लागणाऱ्या अंत्यविधीसाठी शेणी व लाकूड भविष्यात कमी पडू नये म्हणून महापालिकेच्या स्मशानभूमीस शेणी दान करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते.
     या आवाहनास पश्चिम महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल सेल्स एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन, (ई-सेवा) कोल्हापूर यांनी प्रतिसाद देऊन  दहा हजार शेणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस दान केल्या आहेत. या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष  किरण दीक्षित, उपाध्यक्ष सतीश चौगुले, सचिव  विनय कुंभार, खजिनदार  संदीप बनसोडे, संचालक संतोष देसाई, सभासद  निखिल पोवार, स्वप्निल चौगुले तसेच असोसिएशन संचालक आणि सभासद उपस्थित होते. अशी माहिती प्रसिध्दीस सतीश चौगुले यांनी दिली.

       फोटो
कोल्हापूर महानगरपालिकेस शेणी दान करतांना इलेक्ट्रीक सेल्स एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष किरण दिक्षित उपाध्यक्ष सतीश चौगुले स्वप्नील चौगुले आदीसह अन्य संचालक व सभासद.

Thursday, 13 May 2021

हेरले मेडिकल असोसिएशनची गावास मदत.




हेरले / प्रतिनिधी
दि.13/5/21

हेरले ( ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना प्रतिबंध उपाययोजना विषयी आरोग्य कर्मचारी  हेरले मेडिकल असोसिएशनचे खासगी वैद्यकीय व्यावसायिक व कोरोना ग्राम दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित सभा होऊन विविध उपचार विषयावर चर्चा झाली.
    या सभेमध्ये पुढील विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.गृह विल - गीकरनात असणारे लक्षणे विरहीत रुग्णांना खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांचे मार्फत उपचार सुरु करणेत येणार असून हे उपचार माफक बाराशे रुपयामध्ये केले जाणार आहेत. तसेच त्यांना आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका या दररोज भेट देतील.
    खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांचे ओपीडीमध्ये  आढळणारे संशयीत ताप, इली व सारी रुग्णाची माहिती आरोग्य कर्मचारी तसेच ग्राम दक्षता समितीला कळवणेत येणार आहे.त्यानुसार या रुग्णांना मराठी शाळेत विलगीकरण करुन त्यांचे रॅपिड अँटिजेन टेस्ट करणेत येणार आहे.ही टेस्ट घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याचे मानधन हे हेरले मेडिकल असोसिएशन मार्फत देण्यात येणार आहे.
गृह विलगीकरनात असणाऱ्या रुग्णांना घरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी  ५० बोटल सोडियम हाइपोक्लोराइड हे  मेडिकल असोसिएशन मार्फत देण्यात येणार आहे. त्यांच्या मार्फत मराठी शाळेत फेवर क्लिनिक  सुरु करण्यात येणार आहे.तसेच ज्यांचे स्वॅब टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव्ह येतील त्यांना घोडावत कोविड सेंटरमध्ये  उपचारासाठी भरती करण्यात येणार आहे.
       या प्रसंगी मुनिर जमादार, तलाठी एस. ए. बरगाले, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, हेरले मेडिकल असोसिएशनचे डॉ. इमरान देसाई ,डॉ. महावीर पाटील , डॉ.प्रवीण चौगुले, डॉ. अमोल चौगुले, डॉ. आलमान, डॉ.आर. डी.पाटील, डॉ.अमित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती प्रसिध्दीस वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी दिली.

Tuesday, 11 May 2021

हेरलेत पंधरा ते वीस मे पर्यंत पाच दिवसाचा कडक लॉकडाऊनचा सर्व पक्षीय समितीचा निर्णय.



हातकणंगले / प्रतिनिधी
   प्रशांत तोडकर

   हेरले (ता. हातकणंगले) येथे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व गाव कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती राजेश पाटील होते. या सभेत पंधरा ते वीस मे गावामध्ये पाच दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये औषध दुकाने, दूधसंस्था, खाजगी दवाखाने या अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
        कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गावातील  प्रत्येक वार्डात तीन ग्रामपंचायत सदस्य, एक आशा स्वयंसेविका, एक अंगणवाडी सेविका, तीन शिक्षक, एक ग्रामपंचायत कर्मचारी, दोन मेडिकल असोसिएशनचे कार्यकर्ते,चार सामाजिक कार्यकर्ते, असा आरोग्य सेवा गट तयार करण्यात आला आहे. या गटास ऑक्सिमिटर, थर्मलगन, हँडग्लोज, मास्क, सॅनिटायझर ही वैद्यकिय साधने दिली जाणार आहेत. असे सहा वार्डामध्ये आरोग्य सेवा गट कार्यरत होऊन गावांमध्ये तीन दिवसांमध्ये प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करतील व यामधील आजारी व संशयित आढळणाऱ्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये समुपदेशन करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. या सर्वेक्षणामध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णास अतिग्रे येथील कोवीड सेंटरमध्ये उपचारास भरती केले जाईल.
      सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांना गावातील मराठी शाळेमध्ये दोनशे क्षमतेचे अलगीकरण करून त्यांच्यावर त्या वॉर्डातील खाजगी डॉक्टर व प्राथमिक आरोग्य केंद्र उपचार करणार आहे. या उपक्रमाद्वारे गावामधील सर्वपक्षीय समिती कोराना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी  प्रयत्नशील आहे.
   या प्रसंगी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल देशमुख, पोलीस पाटील नयन पाटील, प्रा. राजगोंड पाटील आदींनी विविध उपचार व उपक्रमाचे मार्गदर्शन केले.
       या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, मुनीर जमादार, माजी उपसभापती अशोक मुंडे,माजी उपसरपंच संदीप चौगुले, उपसरपंच सतीश काशीद, माजी उपसरपंच विजय भोसले, राहुल शेटे, माजी सरपंच रियाज जमादार, माजी उपसरपंच कपिल भोसले, गुरुनाथ नाईक, ग्रामपंचायत सदस्य मज्जीद लोखंडे, डॉ. शरद आलमान, आदिक इनामदार, निलोफर खतीब, श्रीकांत पाटील, विशाल परमाज, अश्फाक देसाई, सलीम खतीब, संजय पाटील, प्रशांत तोडकर, दादोसो कोळेकर, डॉ. प्रविण चौगुले, अरविंद चौगुले, बाजीराव कटकोळे, शिवराज घेवारी आदी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक मुनिर जमादार यांनी केले. आभार माजी उपसरपंच विजय भोसले यांनी मानले.


       फोटो 
हेरले : येथील सर्वपक्षीय समिती बैठकीत
माजी सभापती राजेश पाटील,महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील, पोलीस पाटील नयन पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख व अन्य मान्यवर.

Friday, 7 May 2021

ग्रामपंचायत हेरले येथे कोविड-१९ नियंत्रण संदर्भात सभा

हेरले / प्रतिनिधी
दि.7/5/21

हेरले ( ता. हातकणंगले) येथे पाच दिवस कडकडीत लॉकडाऊन संपल्यानंतर गावातील कोरोना संसर्ग संपुष्टात येई पर्यंत कडक नियमांची अंमलबजावणी - साठी ग्रामपंचायतीच्या वतीने सभाचे आयोजन करण्यात आले होते.
    ग्रामपंचायत हेरले कोविड-१९ नियंत्रण संदर्भात सभा आयोजित केली होती. या सभेस , वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख ,जि.प. महिला व बालकल्याण सभापती डॉ.पद्माराणी पाटील, पंचायत समिती सदस्या मेहरनिगा जमादार,पोलिस पाटील श्रीमती नयन पाटील,सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच सतीश काशीद, तलाठी एस. ए. बरगाले ,ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, बीट आंमलदार मोहिते, मुनिर जमादार , माजी उपसरपंच विजय भोसले, राहूल शेटे व  सर्व ग्रामपंचायत सदस्य आदींच्या उपस्थित सभा संपन्न झाली . 
   या सभेमध्ये पुढील विषयावरती चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. गावातील कोणतीही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्यांचा परिसर  कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येईल.तसेच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या वीस व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात येईल,कोरोना संसर्ग संपेपर्यंत गावातील आठवडा बाजार भरवला जाणार नाही, सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत  भाजीपाला व फळे विक्रेत्यांनी फिरून विक्री करणेस परवानगी राहील,  किराणा दुकाने,गिरण,बेकरी दुकानेही सकाळी याच वेळेत चालू राहतील,विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दोनशे रुपये दंड करण्यात येईल,मेडिकल, खाजगी दवाखाने,दूध डेअरी सुरू राहतील, गावातील इतर सर्व व्यवसाय बंद राहतील याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे.

Thursday, 6 May 2021

रस्त्यालगत टाकलेल्या साहित्याचा वाहतूकीस अडथळा

हातकणंगले/ प्रतिनिधी

कोल्हापूर - सांगली राज्यमार्गावर मौजे वडगाव व हेरले फाट्यावरती रस्त्याच्या लगत फळयांच्या डेपोतील फळयांचा ढिग रस्त्यालगतच टाकल्याने त्यातील खिळे मोळ्यामुळे वाहने पंक्चर होत असून वाहतुकीस अडथळा व धोकादायक ठरत असलेल्या या  डेपोतील रस्त्याच्या लगतचा फळयांचा ढिग काढून घ्यावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
      कोल्हापूर सांगली राज्यमार्गावर मौजे वडगाव  व हेरले गावभाग फाट्यावरती फळ्यांचा डेपो आहे.  त्यातील  काही  फळ्या ,बडोदे, लाकडी चक्र रस्त्यापर्यंत टाकले असल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहे. तसेच या फळ्यांना मोठे खिळे - मोळे असल्याने  वाहने पंक्चर होत आहेत. रस्त्यालगतच फळ्यांचे ढिग असल्याने वाहनांना ओव्हरटेक करताना  साईड पट्टीवरती खाली घ्यायला अडचण ठरत आहे.हेरले फाट्यानजीकही असाच लाकडी फळ्यांचा डेपो आहे त्याही फळ्या रस्त्या लगतच टाकले असल्याने वाहतुकीस अडथळा ठरून या फळ्यांतील खिळ्या मोळ्यामुळे अनेक वाहने पंक्चर होत आहेत.
    तरी सार्वजनिक बांधकाम विभाग, हातकणंगले पोलीस ठाणे,एमआयडीसी पोलीस ठाणे प्रशासनाने या दोन्ही फळ्यांच्या डेपो मालकास रस्त्यापासून दहा फूट दूर फळ्यांचा डेपो करण्यासाठी सूचना देऊन वाहतूकीस धोकादायक व अडथळा ठरणाऱ्या  समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

        फोटो 
कोल्हापूर -सांगली राज्य मार्गावरील मौजे वडगाव फाटा येथील वाहतुकीस अडथळा व धोकादायक ठरत असलेला फळयांचा ढिग.