निजामपूर-जैताणे (ता.साक्री)
( प्रतिनिधी वैभव करवंदकर ) - ----------*
निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील अनुराग भगवान जगदाळे या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्याने १७ व्या वाढदिवसानिमित्त वर्षभरात साचवलेल्या, बचत केलेल्या १७००/- रुपयांचा धनादेश "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९" या नावाने निजामपूरचे मंडळाधिकारी विजय बावा यांच्याकडे सुपूर्द केला. येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे शिक्षक प्रा.भगवान जगदाळे यांचा कनिष्ठ सुपुत्र आहे. तहसीलदार प्रवीण चव्हाणके, नायब तहसीलदार अंगद आसटकर यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते ऍड.शरदचंद्र शहा, माजी सरपंच अजितचंद्र शहा आदींनी अनुरागचे विशेष कौतुक केले आहे.
धुळे येथील झेड.बी.पाटील महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेणाऱ्या निजामपूर येथील अनुराग भगवान जगदाळे या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्याने १७ व्या वाढदिवसानिमित्त वर्षभरात साचवलेल्या, बचत केलेल्या १७००/- रुपयांचा धनादेश "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९" या नावाने निजामपूरचे मंडळाधिकारी विजय बावा यांच्याकडे सुपूर्द केला. अनुराग भगवान जगदाळे याने सन २०१७ व २०१८ मध्ये स्वतःच्या शेतात वाढदिवसानिमित्त लावलेल्या अनुक्रमे तीन वर्षीय व दोन वर्षीय झाडांचेही वाढदिवस साजरे केले. वड व पिंपळ आदी उपयुक्त वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती अनुरागने दिली. केक कापून व दिवे विझवून वाढदिवस साजरा करून पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्यापेक्षा कोविडग्रस्तांना सुविधा मिळाव्यात व पर्यावरण संवर्धन व्हावे, म्हणून वाढदिवसानिमित्त मदतनिधीसह वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही अनुरागने सांगितले. यापुढेही वेळोवेळी असेच विधायक व अनुकरणीय सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही अनुरागने दिली. यावेळी निजामपूरचे तलाठी प्रशांत माळी, जैताणेचे तलाठी भूषण रोजेकर, वासखेडीचे तलाठी सुनील साळुंखे, धनंजय वाघ, आशुतोष जगदाळे, प्रा.भगवान जगदाळे यांच्यासह कोतवाल व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. प्रा.भगवान जगदाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.