Sunday, 29 May 2022

प्रज्ञाशोध निवड परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुका पुन्हा एकदा अव्वल

कोल्हापूर / प्रतिनिधी

जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने एप्रिल 2022 मध्ये  घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी सातवी अंतिम प्रज्ञाशोध निवड परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुका पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे.गेली सलग चार वर्षे कागल तालुक्याने प्रथम स्थान टिकवून ठेवले आहे. अशी माहिती प्रसिध्दीस कागल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी 
डॉ. गणपती कमळकर यांनी दिली.
   इयत्ता चौथीमध्ये अंतिम परीक्षेत तालुक्या तून 244 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील 238 विद्यार्थी पात्र ठरले असून पात्रतेची टक्केवारी वा 97.54%0 असून एक विद्यार्थी पहिल्या 10 मध्ये असून जिल्ह्यातील सर्वसाधारण 100 विद्यार्थ्याच्या यादीत कागलचे 26 विद्यार्थी समाविष्ट आहेत. तर इयत्ता सातवी मध्ये 118 विद्यार्थी अंतिम परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यातील 114 विद्यार्थी पात्र झाले असून टक्केवारी 96.61% इतकी आहे. जिल्ह्याच्या सर्वसाधारण 100 च्या यादीत 19 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चौथी, सातवी एकत्रित निकालामध्ये कागल तालुका प्रथम स्थानावर असून एकूण 46 विद्यार्थी चमकले आहेत. 
  या यशामध्ये मार्गदर्शक शिक्षक यांचे मोठे योगदान असून समयदान उपक्रमातर्गत जादा वेळ देऊन मार्गदर्शन केले होते. प्रशासनाच्या वतीने देणगीदारांच्या मार्फत तालुका स्तरावर चार सराव चाचण्यांचे नियोजन करण्यात आले होते. या परीक्षेस जिल्ह्यातील चौथी सातवी च्या वर्गात शिकणारे जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी प्रविष्ठ
 होतात. या यशात केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक, पालक, विस्तार अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.

Wednesday, 25 May 2022

हेरवाड माणगाव व कोरोची नंतर आता 'माले' ग्रामपंचायतीचे मोठे पाऊल; विधवा प्रथेबाबत घेतला महत्वाचा निर्णय




   हेरले / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील हेरवाड व हातकणंगले तालुक्यातील माणगाव  कोरोची गावाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत माले ग्रामपंचायतीने आपल्या गावातही विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला. खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरातून पुन्हा एका परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. प्रथम कोल्हापूरमधील हेरवाड गावाने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त हा ऐतिहासिक निर्णय घेतला.

 हेरवाड माणगाव व कोरोची  पाठोपाठ आता कोल्हापुरातील माले( ता. हातकणंगले) या गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. मंगळवारी ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर केला.तसेच त्यांच्या वयाचा विचार करून पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सध्या परिसरात या गावाचे कौतुक केले जात आहे. 
  या गावात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. ग्रामपंचायत सरपंच प्रताप उर्फ बंटी पाटील, उपसरपंच अनिता सकटे तसेच इतर सदस्य नेहमीच निर्णयांना पाठिंबा देताना पाहायला मिळाले आहेत.पतीच्या निधनानंतर समाजामध्ये विधवा महिलेच्या कपाळावरील  कुंकू पुसणे, पायातील जोडव्या काढणे, हातातील बांगड्या फोडणे, गळयातील मंगळसूञ काढले जाते. शिवाय विधवा महिलांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी करून घेतले जात नाही. यामुळे गावासह देशात विधवा महिलेना सन्मानाने जगता  यावे याकरिता ही प्रथा बंद करणेचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या गावाने जिल्ह्यात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.यावेळी ग्रामसेवक सुनील खांडेकर व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.
   फोटो
माले : येथे ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदचा निर्णय घेतला या प्रसंगी सरपंच बंटी पाटीलसह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ

डॉक्टर केदार विजय साळूंखे यास सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय नवी दिल्ली व नेहरु युवा केंद्र संघटन पुरस्कृत अटल भारत स्पोर्ट्स ॲण्ड कल्चर असोसिएशन भारत यांचे वतीने देण्यात येणारा अटल नॅशनल युथ अवॉर्ड 2022

हेरले / प्रतिनिधी

   विश्वविक्रमवीर स्केटर व सायकलिस्ट भारतभूषण डॉक्टर केदार विजय साळूंखे यास सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय नवी दिल्ली व नेहरु युवा केंद्र संघटन पुरस्कृत अटल भारत स्पोर्ट्स ॲण्ड कल्चर असोसिएशन भारत  यांचे वतीने देण्यात येणारा  अटल नॅशनल युथ अवॉर्ड 2022 हा महाराष्ट्राचे  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांचे हस्ते राज्यभवन मुंबई येथे देण्यात आला.  तसेच राजभवन कार्यालयात ही डॉ. केदार याचा विशेष  सत्कार  करण्यात आला. 
     डाॅ.केदार साळुंखे यांने  अवघ्या सातव्या वर्षी सायकलिगमध्ये एकाच बुकमध्ये एका वेळी  चार रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला. आतापर्यंत   स्केटींग  व सायकलिंगमध्ये  18 विश्वविक्रम नोंदवले आहेत.डाॅ. केदार यास वयाच्या सातव्या वर्षी  'डॉक्टरेट इन ॲथलेटिक्स ' ही पदवी देऊन  द दायसेस ऑफ अशिया चेन्नई तामिळनाडू  सन्मानित केले असून मेजर ध्यानंचद राष्ट्रीय खेळाडू पुरस्कार ही मिळाला आहे.
 डाॅ.केदार साळुंखे याला विबग्याेर स्कुल च्या प्राचार्या स्नेहल नावेॅकर,   प्रशिक्षक सचिन इगंवले, स्वप्निल काेळी, वडिल विजय साळूंखे व आई स्वाती गायकवाड साळूंखे यांचे  मार्गदर्शन लाभले आहे.

राजकारणात विकासाची स्पर्धा असावी - - खासदार धैर्यशील माने


हेरले / प्रतिनिधी

राजकारण करत असताना राजकारणात विकासाची स्पर्धा असावी व मिळालेला निधी योग्य पद्धतीने वापरला तरच विकास दिसून येणार आहे.
 आपल्या मतदार संघातील गावांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विकासाचा रचनात्मक आराखडा प्रत्येक भागातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांसमोर एक प्लॅन ठेवला असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी रुकडी चे सरपंच रफिक कलावंत यांच्या कामाचे विशेष कौतुक केले.
यावेळी हातकणंगलेचे आमदार राजू बाबा आवळे यांनी हातकणगले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव हे काँग्रेस चे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याने त्यांच्या  मागणीवरून रुकडीतील सर्व विकासकामांना मदत केली असल्याचे सांगितले. कोणताही समाज विकासापासून वंचित राहणार नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले तसेच तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेतून १७ हजार लाभार्थ्यांना पेन्शन मिळवून दिल्याचे सांगितले. 
  ते रूकडी (ता. हातकणंगले) येथील त्यांच्या फंडातून १ कोटी ७२ लाख रुपये च्या विविध विकास कामाचा लोकार्पण व शुभारंभ सोहळ्यात बोलत होते. 
   प्रस्ताविक हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास गायकवड यांनी मानले. या प्रसंगी  सरपंच रफिक कलावंत ,उपसरपंच रणजित कदम सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
     
खासदार धैर्यशील माने यांनी रुकडीचे सरपंच रफिक कलावंत यांचे काम जिल्ह्यात कौतुकास्पद असून त्यांनी वेळ प्रसंगी गावातील स्वछतेसाठी व पाणी पुरवठ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केल्याचे कौतूक केले.

Tuesday, 24 May 2022

कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालयात आढावा बैठक

कोल्हापूर / प्रतिनिधी

मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी जाणून-बुजुन शिक्षकांचे सेवा पुस्तक अद्ययावत केलेले नाही. काहींचे वेतन, बिले अदा केलेली नाहीत. तर काहींना कामावर रुजू करून घेतलेले नाही. दिवसात अशा तक्रारींचा पाढाच शिक्षकांनी आमदार प्रकाश आबिटकर आणि आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्यासमोर वाचला. यावर दोषी मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा आमदार आबिटकर आणि आमदार आसगावकर यांनी दिला.

शिक्षण विभागातील गैरकारभाराबद्दल आणि शिक्षकांच्या प्रश्नाबाबत २३ फेब्रुवारी रोजी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींगमध्ये घेतलेल्या बैठकीसंदर्भात सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. शिक्षण विभागाने केलेल्या चांगल्या कामाचेही दोन्ही आमदारांनी कौतुक केले. त्याचबरोबर प्रलंबित कामाचा आढावा घेत त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. 
   
   आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, शिक्षकांचे वेतन आणि त्यांना आवश्यक सोयी-सुविधा देण्यासाठीच शिक्षण विभाग असतो. मुख्याध्यापक संस्थाचालकांच्या दबावाखाली काम करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना सरकार पगार देत नाही. त्यामुळे त्यांनी सरकारच्या पगारावर शिक्षकांना न्याय धावा. अन्यथा धडक कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांना आबिटकर यांनी दिला. तसेच वेतन अधिक्षक प्राथमिक व माध्यमिक यांच्या विरोधात लेखी तक्रार आल्यास सरकारमार्फत चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले. शिक्षण विभागातील अधिकारी व लिपिकांबाबत वारंवार पैशाचा अपहार केल्याच्या तक्रारी येत आहेत. संबंधीतांवर कडक कारवाई करणार. 
  आमदार जयंत आसगावकर म्हणाले, पगाराच्या रक्कमेचा अपहार करणाऱ्या अधिका-यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शिक्षण विभागात एजंटगिरी वाढली असून ती थांबवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. शिक्षण विभागातील अधिकारी कोणाच्या दबावाखाली शिक्षकांना त्रास देत असतील तर कोणाचीही गैर केली जाणार नाही. दोषी संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्यावरही योग्य ती कारवाई केली जाईल.यावेळी शिक्षण उपसंचालक महेश चोथे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष
 एस.डी.लाड,दादासाहेब लाड,सुरेश संकपाळ, बाळासाहेब डेळेकर,बाबासाहेब पाटील,खंडेराव जगदाळे, व्हि.जी.पोवार,आर.वाय.पाटील
डी.एस.घुगरे, मिलिंद पांगिरेकर,भरत रसाळे,संतोषआयरे,सी.एम.गायकवाड, मनोहर जाधव,राजेंद्र कोरे,अशोक पाटील
चंद्रकांत लाड,बी.डी.पाटील
बी.एम.खामकर,राजू बर्गे
गजानन काटकर,वर्षा पाटील
सौ.व्हि.एम. सूर्यवंशी,ए. एम.पाटील, यांच्यासह सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

      फोटो
कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालयात आढावा बैठकीत शिक्षक : संघटना पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेताना आम. प्रकाश आबिटकर, शिक्षण उपसंचालक महेश चोथे, सुभाष चौगुले, एकनाथ आंबोकर, आशा उबाळे आदी मान्यवर.

घोडावत स्पर्धा परीक्षा अकॅडमी मधील आशिष माने यांची SPI भारतीय संरक्षण दलामधील परीक्षेमध्ये निवड.


हेरले / प्रतिनिधी

आशिष माने यांची SPI औरंगाबाद या संस्थेमध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखती द्वारे निवड झाली त्यास संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस जयसिंगपूर संस्थेमध्ये संपूर्ण मार्गदर्शन मिळाले.
हि परीक्षा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता असते, या परीक्षा करिता संपूर्ण महाराष्ट्र मधून जवळपास 40 हजार विद्यार्थी या परीक्षेस बसतात त्यातून आशिष माने यांचे अंतिम निवड झाली आहे. या विद्यार्थ्यास संजय घोडावत युनिव्हर्सिटी चे ट्रस्टी माननीय विनायक भोसले , संचालक विराट गिरी  शाखाप्रमुख सुर्यकांत कांबळे तसेच इतर मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन मिळाले.
संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस जयसिंगपुर मध्ये नवोदया, स्कॉलरशिप, NMMS,SPI,  NTSE, NDA इत्यादी सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी ही एकाच छताखाली करून घेतली जाते.

Monday, 23 May 2022

मौजे वडगांव येथे सद्गुरु विनयानंद महाराज यांच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

हेरले / प्रतिनिधी
मौजे वडगांव ( ता . हातकणंगले)येथे  सद्गुरु विनयानंद महाराज तथा के.डी. धनवडे यांच्या पंचधातूच्या मुर्तीची "प्राणप्रतिष्ठा " सोहळा श्री सदगुरु निरंजन महाराज आश्रमामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
   शनिवारी सायंकाळी पाच ते सात या वेळेत श्री सदगुरू विनयानंद महाराज यांच्या मुर्तिची नगर प्रदक्षिणा मौजे वडगाव गावातून श्री नारायण एकल महाराज यांच्या उपस्थितीत पूर्ण उरण्यात आली. या प्रसंगी नागांव, संभापूर ,हमिदवाडा, हेरले या गावातील टाळकरी व पट्टणकोडोली गावातील ढोल वादक व भक्तगण सहभागी झाले होते.
      रविवारी सकाळी साडे सहा वाजता आचार्य अरुण टोपकर यांच्या मार्गदर्शना - खाली श्री सदगुरू विनयानंद महाराज यांच्या मुर्तिची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी सौ व श्री विवेक धनवडे यांच्या हस्ते पूजा विधी करण्यात आला. सकाळी ९ ते ११ या वेळेत श्री भजनी मंडळ हेरले यांचे भजन संपन्न झाले. तदनंतर हरिभक्त पारायण लक्ष्मण कोकटे महाराज यांचे प्रवचन संपन्न झाले.
    या प्रसंगी  दीपक केळकर महाराज,   नंदू माणगावकर महाराज ,शामराव बत्ते महाराज, सागर महाराज शामसुंदर महाराज, अभिनव कल्मेश्वर महाराज, बसवप्रभू महाराज, अत्री महाराज, सुनंदा बहेनजी, आत्मदर्शनचे संजीव कुलकर्णी, सेवानंद महाराज आदी मान्यवरांचा सत्कार मठाधिपती आदीनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. महाप्रसाद वाटप झाले नंतर दुपारच्या सत्रात दत्ता कुंभार (घालवाड ) यांचे एकतारी भजन संपन्न झाले. सहा ते आठ ह.भ.प. लक्ष्मण कोकाटे ( बारामती) यांचे 'सदगुरू सारखा असता पाठिराखा' या अभंगावरती कीर्तन झाले. सदगुरू निरंजन महाराज चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आबासाहेब देसाई यांनी भक्तांच्या उपस्थिती बद्दल कृतज्ञता वक्त केली व कार्यक्रमाची सांगता झाली.
    या कार्यक्रमास शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, गोकूळ दूध संघाचे माजी चेअरमन अरुण नरके,शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव,
शिरोली एमआयडी पोलिस ठाणे प्रमुख सपोनि सागर पाटील, ह.भ.प. भाऊसाहेब पाटील, विरशैव बँकेचे माजी चेअरमन तथा विश्वप्रभा उद्योग समुहाचे प्रमुख राजेंद्र शेटे, कार्यकारी संचालक ए.वाय. पाटील, आदी प्रमुख मान्यवरांसह कोल्हापूर जिल्हयातील भक्तगण उपस्थित होते.
      फोटो 
मौजे वडगांव :आचार्य अरुण टोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदगुरू विनयानंद महाराज यांच्या मुर्तिची प्राणप्रतिष्ठा झाली. या प्रसंगी मठाधीपती आदीनाथ महाराजसह अन्य मान्यवर.

मुरगूड हायस्कूल व ज्युनि कॉलेज मुरगूड या विद्यालयास ज्ञानसमृद्धी पुरस्कार प्राप्त


कोल्हापूर प्रतिनिधी

    कोल्हापूर जिल्ह्यातील *मुरगूड हायस्कूल व ज्युनि कॉलेज मुरगूड* या विद्यालयामध्ये आय.आय.बी.एम. संस्था चिखली, पुणे यांनी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेअंतर्गत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज विद्यालयास ज्ञानसमृद्धी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदरचा पुरस्कार  स्विकारताना प्राचार्य श्री एस आर पाटील ,उपप्राचार्य श्री एस पी पाटील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते... *आय.आय.बी.एम. कॉलेजचे प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ* यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
तसेच विद्यालयामध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. 
यावेळी व्यासपीठावर आय.आय बी एम कॉलेजचे प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ, प्रेरणा कनावजे, संकेत रोडे, स्नेहल पाटील तसेच प्राचार्य श्री एस आर पाटील उपप्राचार्य श्री एस पी पाटील  शिक्षकवर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.
   आपल्या मनोगतातून आय आय बी एम कॉलेजच्या *प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ* यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासावर कसे करीयर घडवता येते, उच्च पदावर कसे पोहचावे तसेच विद्यार्थिनींनी आपल्या पायावर खंबीरपणे कसे उभे राहावे याविषयी व मॅनेजमेंटच्या शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले.   
      प्राचार्य श्री एस आर पाटील यांनी विद्यालयात राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व विद्यालयास मिळालेल्या पुरस्काराबद्दल विद्यार्थी विद्यालय व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच हा पुरस्कार माझा नसून तो संस्थेचा, माझ्या सर्व सहकारी शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा आहे असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन श्री एम बी टेपूगडे यांनी केले, कार्यक्रमाचे *प्रास्ताविक उपप्राचार्य श्री एस पी पाटील यांनी केले, तर आभार श्री ए एन पाटील यांनी मानले.

नॅशनल ड्रॅगन बोटिंगच्या स्पर्धेत मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या आरती जाधव, श्रृती चौगुले यशस्वी

कोल्हापूर / प्रतिनिधी

मध्यप्रदेशातील भोपाळ येथे झालेल्या दहाव्या नॅशनल ड्रॅगन बोटिंगच्या स्पर्धेत
येथील मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुड येथील आरती जाधव व श्रृती चौगले या दोघांनी चांगली कामगिरी करुन पदकांची लयलूट केली आहे. 
    कु.आरती प्रवीण जाधव हिने 2 सुवर्ण, 3 रजत, व 1 कास्य पदक पटकावले. तर श्रुती चौगुले ने 3 गोल्ड, 2 रजत, व एक कास्यपदक पटकावले. दोघींनी मिळून 12 पदके प्राप्त केले आहेत सदरची पदके 2  कि.मी‌. व 1  कि.मी. असे वेगवेगळे आंतर पार पाडत सदर चॅम्पियनशिप क्रिडा प्रकारात मिळवली आहेत. या दोघीही बारावी कला शाखेत शिक्षण घेत आहेत. 
      त्यांना या कामी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्ष श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, युवा नेते दौलतराव देसाई ,प्रशासन अधिकारी मंजिरीताई देसाई मोरे ,कोजिमाशी चे अध्यक्ष बाळ डेळेकर, प्राचार्य एस. आर. पाटील ,उपप्राचार्य एस .पी.पाटील उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी पर्यवेक्षक एस. एच. निर्मळे यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक व्ही .आर .गडकरी, पृथ्वीराज शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले

Wednesday, 18 May 2022

२२ मे रोजी सद्गुरु विनयानंद महाराज तथा के.डी. धनवडे यांच्या पंचधातूच्या मुर्तीची "प्राणप्रतिष्ठा " सोहळा



हेरले / प्रतिनिधी

  मौजे वडगांव ( ता . हातकणंगले)येथे रविवार दि . २२ मे रोजी सद्गुरु विनयानंद महाराज तथा के.डी. धनवडे यांच्या पंचधातूच्या मुर्तीची "प्राणप्रतिष्ठा " सोहळा श्री सदगुरु निरंजन महाराज आश्रम मौज वडगांवमध्ये आयोजित केला आहे . 
    २२ मे रोजीचे कार्यक्रम आयोजन सकाळी ७ ते ७.३० चहापाणी, ७.३० ते ९ भजन, ९ ते ११ प्राणप्रतिष्ठा सोहळा, ११ वा प्रवचन हभप श्री लक्ष्मण कोकाटे . (बारामती ),  दुपारी १२.30 महाप्रसाद दुपारी २ ते ४ दत्ता कुंभार (घालवाड)यांचे एकतारी भजन, ४ ते ६ किर्तन हभप- श्री लक्ष्मण कोकाटे ( बारामती ) यांचे होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील  सर्व भाविक भक्तानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सदगुरु निरंजन महाराज आश्रम ट्रस्ट मौजे वडगांव यांनी केले आहे.

Monday, 16 May 2022

शशिकांत गोरड यांचा मौजे वडगावकर यांच्या वतीने जाहीर सत्कार


हेरले / प्रतिनिधी

   राज्य परिवहन महामंडळातून  शशिकांत ऊर्फ राजू शामराव गोरड हे दिनांक 30 एप्रिल रोजी आस्थापना पर्यवेक्षक , अधिकारी वर्ग-२(क.) या पदातून सेवानिवृत्त झाल्यामुळे मौजे वडगावचे माजी सरपंच  रावसाहेब चौगुले यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  गावातील प्रतिष्ठित मान्यवर, युवा कार्यकर्ते व जेष्ठ वडीलधारी मंडळी उपस्थित होती.  
      यावेळी  मौजे वडगावचे सुपुत्र  शशिकांत उर्फ राजू गोरड यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व कामगार क्षेत्रातील योगदानाबद्दल मान्यवरांनी कौतुक केले. राजू यांनी मुंबईसारख्या ठिकाणी कामगार चळवळीचे नेतृत्व केले असून नाट्य क्षेत्रातही त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. त्याबद्दल त्यांना सामाजिक व नाट्यक्षेत्रातील विविध पुरस्कार मिळाले असल्याचे मान्यवरांनी सांगितले. त्यांच्या सोबत त्यांच्या धर्मपत्नी सौ मंगल शशिकांत गोरड याही  मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या असून शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनाही विविध पुरस्कार प्राप्त झाल्‍याचे
 डॉ.विजयकुमार गोरड यांनी सांगितले. 
  
     सत्काराला उत्तर देताना राजू गोरड म्हणाले, गाववाल्यांकडून मिळालेला हा सन्मान मर्मबंधातील ठेव समजून आयुष्यभर हृदयात साठवून ठेवीन. मित्र वर्गाकडून झालेलं कौतुक आणि उपस्थित वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद माहेरची शिदोरी समजून सदैव स्मरणात ठेवीन. यापुढेही सामाजिक कार्यासाठी आजच्या सत्कारामुळे एक नवी ऊर्जा मिळेल आणि मौजे वडगावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करीन. आई - वडिलांचे आशिर्वाद आणि वाढवडिलांच्या पुण्याईमुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
    यावेळी माजी सरपंच रावसाहेब चौगुले, श्रीकांत सावंत, विजय चौगुले, सतीश चौगुले, सुरेश कांबरे,अवधूत मुसळे, रामचंद्र चौगुले,महेश कांबरे, हसीम मुलांनी, रमेश लोंढे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून राजू गोरड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आण्‍णासो तोरसकर, नारायण संकपाळ, धनपाल मुसळे, सुनील खारेपाटणे, रांझा पटेल, नारायण हराळे, बापूसाहेब शेंडगे , संतोष लोंढे, नितीन घोरपडे, मारुती शेंडगे, विनायक शेंडगे, अमोल झांबरे, गौतम तराळ , कृष्णात सावंत, संजय सावंत, संजय ढेरे , बाळासो बारगीर, हसन बारगीर, शशिकांत सावंत इत्यादींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. भगवान कांबळे यांनी  आभार मानले.

Friday, 13 May 2022

मौजे वडगाव येथे बिरोबा देवालयाच्या शिखर बांधकामाचा शुभारंभ


मौजे वडगाव / प्रतिनिधी
   अमर थोरवत

 मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री बिरोबा देवालयाच्या शिखर बांधकामाचा शुभारंभ श्री संत बाळूमामा संतुबाई देवालय रूकडी माणगाव चे प. पू.  देबाजे मामा हेरवाडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
       समस्त धनगर समाज तसेच गावातील दानशूर व्यक्तींच्या लोकवर्गणीतून बिरोबा देवालयाच्या शिखराचे बांधकाम करणार असून समाजातील दानशूर व्यक्तींनी या शिखर बांधकामासाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले. गुरुवारी या शिखर बांधकाम  कामाचा शुभारंभ करून दही भात, आंबील, घुगऱ्या, केळी, सुहासिनी, मंदिरातील पुजारी, तसेच महालिंग जंगम यांच्या मंत्र उच्चाराने " "बिरोबाच्या नावानं चांगभलं'' "काशी लिंगाच्या नावानं चांगभलं "च्या गजरात या विधीचे शास्त्रोक्त पूजन करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
         यावेळी देबाजे मामा हेरवाडकर, डॉ. विजय गोरड महालिंग जंगम, रघुनाथ गोरड ,बाळासो थोरवत, बाबासो लांडगे, समाधान भेंडेकर, हिंदुराव गोरड, बाबासो थोरवत ,अभिजीत थोरवत, अनिल भेंडेकर, आनंदा गोरड, संदीप गोरड, संतोष शेंडगे, गणपती भेंडेकर, बापू शेंडगे ,सुनील खारेपाटणे, सुरेश कांबरे, यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.

 फोटो 
  बिरोबा देवालयाच्या शिखर बांधकामाचा शुभारंभ करताना देबाजे मामा हेरवाडकर, महालिंग जंगम, बाळासो थोरवत, रघुनाथ गोरड ,बाबासो लांडगे ,व इतर मान्यवर.

Thursday, 12 May 2022

जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत वडगाव विद्यालय द्वितीय


पेठवडगांव / प्रतिनिधी

 लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व-2022 निमित्त बुधवारदि.११ मे रोजी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत १४संघामध्ये वडगाव विद्यालय (ज्युनि. कॉलेज / तंत्र शाखा) पेठवडगाव या विद्यालयाच्या कु. आर्या गुरव, कु. श्रध्दा पाटील व कु. प्राची पोवार यांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला.
    
     श्री शाहू मिल  राजारामपुरी कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ.डी.टी. शिर्के , नाबार्डचे माजी अध्यक्ष  यशवंत थोरात , आरबीआयच्या माजी डे. डायरेक्टर  डॉ. उषा थोरात, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी  एकनाथ आंबोकर यांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले.
  या यशस्वी विद्यार्थींना विद्यालयाचे प्राचार्य  आर. आर. पाटील  उपमुख्याध्यापक  एस. डी. माने , पर्यवेक्षक  डी. के. पाटील  , परीक्षा विभाग प्रमुख डी. ए. शेळके , तंत्रविभाग प्रमुख ए. एस. आंबी , कार्यालयीन प्रमुख के. बी. वाघमोडे  या सर्वांची प्रेरणा मिळाली. या विद्यार्थीनींनी
 डी.एस. कुंभार,सौ एस. एस. चव्हाण ,  ए. ए.पन्हाळकर, अजित लाड, संदीप नायकवडी , रवि वासुदेव सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशस्वी विद्यार्थीनींचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
       फोटो 
पेठ वडगांव : वडगांव विद्यालय वडगाव मधील जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविलेल्या  विद्यार्थीनींनी कु.आर्या गुरव कु.श्रद्धा पाटील कु. प्राची पोवार समवेत प्राचार्य आर.आर.पाटील व मार्गदर्शक शिक्षक वृंद

Wednesday, 11 May 2022

मौजे वडगावची श्री दत्त विकास संस्था बिनविरोध



 हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील श्रीदत्त विविध कार्यकारी सहकारी विकास संस्था मर्यादित मौजे वडगाव या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. केडीसी बँकेचे संचालक व माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली १३ जागेसाठी सत्ताधारी गटाला १० तर विरोधी गटाला ३ जागा देण्यात आल्या .सत्ताधारी गटातून ४ विद्यमान संचालकांना संधी देण्यात आली .तर ९ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे: सर्वसाधारण कर्जदार गटातून  अ‍ॅड. विजय चौगुले, विलास सावंत, शिवाजी जाधव, मधुकर आकिवाटे, दिपक थोरवत, रामचंद्र चौगुले, जमीर पटेल ,बापू शेटे, महिला राखीव मधून: नीता वाकरेकर ,दिपा सावंत, इतर मागास  प्रवर्गातून: महालिंग जंगम, अनुसूचित जातीमधून प्रकाश कांबळे ,भटक्या जाती जमाती मधून : अंबाजी कोळेकर, असे उमेदवार बिनविरोध निवडून आले .
       केडीसी बँकेचे संचालक माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची निवडणूक बिनविरोध करणेकामी सत्ताधारी गटाकडून रावसो चौगुले ,माजी सरपंच सतीशकुमार चौगुले, शिवसेनेचे सुरेश कांबरे,  अ‍ॅड. विजय चौगुले, सामाजिक कार्यकर्ते सुनील खारेपाटणे, सतीश वाकरेकर, अविनाश पाटील ,आनंदा थोरवत, महादेव शिंदे, अमोल झांबरे, स्वप्नील चौगुले, तर विरोधी गटाकडून श्रीकांत सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक सहकारी संस्था हातकलंगलेच्या डॉ. सौ. प्रगती बागल यांनी काम पाहिले. त्यांना सचिव पोपट बेडेकर यांनी सहकार्य केले. यावेळी नूतन संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले.

हेरले येथील श्रीचंद्रप्रभा वि.का.स सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये छ.राजर्षी शाहू स्वाभिमानी सत्ताधारी आघाडीचे वर्चस्व कायम

हेरले /प्रतिनिधी

   हेरले येथील श्रीचंद्रप्रभा वि.का.स. (विकास) सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये  छत्रपती राजर्षी शाहू स्वाभिमानी सत्ताधारी आघाडीने १३ पैकी १३ जागा जिंकून सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले. या पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच बालेचाँद जमादार जवाहर साखर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्य अमरसिंह वडु यांनी केले.
    सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक कालावधीची निवडणूक श्रीचंद्रप्रभा वि.का.स. (विकास) सेवा संस्था हेरलेची पार पडली. या निवडणूकीमध्ये छत्रपती राजर्षी शाहू स्वाभिमानी सत्ताधारी आघाडी विरुद्ध  श्री चंद्रप्रभा शेतकरी विकास आघाडी यांच्यामध्ये १३ जागेसाठी दुरंगी लढत  झाली. यामध्ये छत्रपती राजर्षी शाहू स्वाभिमानी सत्ताधारी आघाडी पॅनेलने १३ जागा पैकी १३ जागा जिंकून सत्ता स्थापन केली. 
    विजयी उमेदवार इंगळे कुमार बाळू, 
निंबाळकर अंजनादेवी रामचंद्र,
खतीब दस्तगीर धोंडीलाल,मुल्लाणी आयेशाबी हुसेन,गडकरी जयसिंग दिनकर,पाटील सुरेश बाबुराव,चौगुले सुरेश बाळासो,जमादार बालेचाँद कुतुबुद्दीन,देसाई शरफुद्दीन अमिन,
कदम वसंत बापू,भोसले मानसिंग गोविंदराव,वड्ड अमरसिंह गजानन ,कोळेकर रंगराव गणपती आदींनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर विजय संपादन केला.
 छ. राजर्षी शाहू स्वाभिमानी सत्ताधारी पॅनेल विजयी झालेनंतर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्याची अतिशबाजी केली.

Monday, 9 May 2022

मुलांना तुमच्या इच्छा आकांक्षा चे गुलाम बनवू नका.. उपप्राचार्य एस. पी. पाटील मुरगुड विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न.



कोल्हापूर / प्रतिनिधी
तुमच्या मुलांवर प्रेम करा. त्यांची काळजी घ्या. त्यांना हवे असेल ते द्या. तुमच्या मुलांची खूप काळजी करू नका. त्यांना स्वतःचा मार्ग निवडू द्या. त्यांच्या इच्छा-आकांक्षा यांचे तुम्ही गुलाम होऊ नका. स्वभाव खेळकर बनवा. जे उत्तम आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा. मित्र मैत्रिणीला कधीही विसरू नका. रोज एकमेकाच्या संपर्कात रहा आयुष्य आनंददायी बनवा असे प्रतिपादन उपप्राचार्य एस. पी. पाटील यांनी केले. 
    ते शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड येते सन 2000 ते 2002 च्या बारावी विज्ञान शाखेच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळावा प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलत होते
    यावेळी बोलताना उपप्राचार्य एस. पी. पाटील म्हणाले आयुष्य खूप कमी आहे. आनंदात जगा. संकटे ही क्षणभंगुर आहेत. सामना करा. डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो पण मातीआड गेलेला जिवलग कधीच परत दिसणार नाही. मित्र जपा. मैत्री जपा. जमेल तसे जमतील तितके घेऊन गेट टूगेदर करा. संपर्कात जरूर राहा. गेट-टुगेदर वर पैसे, वेळ खर्च करा. आयुष्य मर्यादित आहे. आनंदात जगा .आरोग्याची हेळसांड करू नका. काळजी घ्या. दिवस आनंदात घालवा. सुखी जीवन हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. यशस्वी जीवनासाठी माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिळावे उपयुक्त ठरतील असा आशावाद त्यांनी शेवटी व्यक्त केला. 
    कार्यक्रमात प्रसंगी मातृदिनानिमित्त क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यार्थिनींच्या हस्ते, तर दिपप्रज्वलन उपप्राचार्य एस. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तब्बल 22 वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणी आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी कथन केल्या. आपल्या वर्गात बसून पुन्हा एकदा पंचेचाळीस मिनिटांचा तास घेऊन बालपणीचा काळ सुखाचा चा सुखद अनुभव घेतला. प्रसंगी प्रा. व्ही. बी. आलदर,प्रा.व्ही.बी.शिरोळकर,प्रा.टी.आर.शेळके प्रा.ए.एस.मांगोरे प्रा. पी एल रेगडे यांची भाषणे झाली.
स्वागत सुनील घाटगे यांनी तर
प्रास्ताविक राहुल कुभार यांनी केले यावेळी शितल राऊत, आशा घाटगे, प्राजक्ता मगदूम, सुवर्णा बरगे, वैशाली चौगले, अश्विनी वंडकर, संदीप शिरगावे, सिताराम कांबळे, प्रशांत सागर, प्रताप इंगळे, तुषार साळोखे, दिग्विजय गुजुटे, दिग्विजय पाटील, सतिश पार्टी, राहुल कुभार, विजय भोई,उपस्थित होते. 
 फोटो
मुरगुड.. येथील मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुड येथे मार्गदर्शक शिक्षकांसमवेत माजी विद्यार्थी

Saturday, 7 May 2022

लोकराजा छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता सोहळ्या निमीत्त स्केटींग करून आदरांजली

कोल्हापूर / प्रतिनिधी

  सचिन टीम टॉपर्स रोलर स्केटिंग अकॅडमी आणि संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल रंकाळा यांच्या वतीने दिनांक  ६ मे रोजी रोजी लोकराजा छत्रपती शाहू महाराज स्मृती  शताब्दी कृतज्ञता सोहळ्या निमीत्त  सायंकाळी  सहा ते सात सलग एक तास स्केटींग करून सचिन टीम टाॅपर्स च्या स्केटरनी आदरांजली वाहिली. 

  याउपक्रमा मध्ये विश्वविक्रमवीर भारतभूषण डॉ. केदार विजय साळूंखे यांने शाहू महाराज यांचे वेशभूषेमध्ये सलग एक तास स्केटींग  केले.

    लोकराजा  छत्रपती राजर्षी  शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे  शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  मेघराज खराडे, संजीवनी शिक्षण समूहाचे अध्यक्ष  अमर सरनाईक,  शिवतेज खराडे, पोलीस उपअधिक्षक स्वाती गायकवाड , यांचे हस्ते पूजन करून उपक्रमाची सुरवात केली. 
    या  उपक्रमामध्ये मुडशिंगी स्केटींग ॲकॅडमी, तिळवणी स्केटींग ॲकॅडमी  व सचिन टीम टाॅपर्सची ९५मुले सहभागी झाली होती. सर्व  सहभागी मुलांना जितेंद्र यशवंत यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.  सदरचा उपक्रम हा सचिन टॉपर्स सचिन इंगवले यांच्या मार्गदर्शना खाली  प्रशिक्षक शिवाजी मोरे ,गोरख कोळी, शुभांगी कांबळे यांनी पार पाडला. या  उपक्रमास सर्व पालकाचे सहकार्य  लाभले 
      फोटो 
याउपक्रमा मध्ये विश्वविक्रमवीर भारतभूषण डॉ. केदार विजय साळूंखे यांने शाहू महाराज यांचे वेशभूषेमध्ये सलग एक तास स्केटींग करतांना.

Friday, 6 May 2022

हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रात अमेरिकेअर्स इंडिया- अबॉट इंडिया यांचेतर्फे उपकरणे व औषधे स्वरूपात मदतीचा लोकार्पण सोहळा संपन्न

हेरले / प्रतिनिधी

हेरले (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अमेरिकेअर्स इंडिया- अबॉट इंडिया यांचेतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र अपग्रेडेशन तसेच सर्व कर्मचारी स्किल डेव्हलपमेंट साठी उपकरणे व औषधे स्वरूपात मदत करण्यात आली होती त्याचा लोकार्पण सोहळा  प्रसंगी महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री  राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थित संपन्न झाला. 
     लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व  निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये  शंभर सेकंद स्तब्धता पाळण्यात आली. याप्रसंगी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे  तसेच अमेरिकेअर्स  व अबॉट इंडिया चे डायरेक्टर तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दातार  ,ॲडिशनल डी.एच. ओ. डॉ. उत्तम मदने  हातकणंगले पंचायत समिती माजी सभापती राजेश पाटील ,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख, मुनिर जमादार,माजी पंचायत समिती सदस्य मेहरनिगा जमादार ,हेरले गावच्या सरपंच अश्विनी चौगुले,उपसरपंच फरीद नायकवडी ,सर्व ग्रामपंचायत सदस्य आरकेएस कमिटी सदस्य, डॉ. रेंदाळकर  ,डॉ. रेवडेकर   आरोग्य सहाय्यक-सहाय्यका औषध निर्माण अधिकारी ,आशा सेविका ,आरोग्य सेवक- सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.
   यावेळी सर्व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कायापालट झाल्याबद्दल  आरोग्य राज्यमंत्री व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी समाधान व्यक्त केले.अबोट कंपनीतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रास भरघोस मदत केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे सर यांनी अमेरिकेअर्स -अबोट कंपनीच्या  सर्व डायरेक्टर यांचे विशेष आभार मानले व भविष्यात इतरही प्राथमिक आरोग्य केंद्रांना अशीच भरघोस मदत करावी अशी आशा व्यक्त केली.  आभार डॉ. राहूल देशमुख  यांनी मानले.

       फोटो 
हेरले : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर  वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांना प्रमाणपत्र प्रदान करतांना शेजारी डी एच ओ डॉ. योगेश साळे  टीएचओ डॉ. दातार  ,ॲडिशनल डी.एच.ओ. डॉ. उत्तम मदने माजी सभापती राजेश पाटील व अन्य मान्यवर.

Thursday, 5 May 2022

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ जाहीर आवाहन १०० सेकंद आपल्या राजा साठी

कोल्हापूर /प्रतिनिधी
आपल्या राज्यातील प्रजेसाठी आपल सार आयुष्य खर्ची घातलेला लोकराजा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेला लोक राजा, बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध कायदे करणारा लोक राजा, कोल्हापूरला रेल्वे आणून व्यापाराला , शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देणारा लोक राजा, राधानगरी धरण बांधून जिल्ह्यात हरित क्रांती घडवून आणणारा लोक राजा, सामान्य जनता सुखी तर आपण सुखी माणणारा लोक राजा, माझा राजा, छत्रपती शाहू महाराज यांचे उद्या स्मृती शताब्दी वर्ष ! 
माझ्या या राजाला  उद्या शुक्रवार दिनांक ६ मे २२ रोजी सकाळी १० वाजता  १०० सेकंद असेल त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून वंदन करुया असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

Wednesday, 4 May 2022

राजर्षी शाहू मध्ये शाहू संस्कार शिबीर उत्साहात

कोल्हापूर प्रतिनिधी 

प्राथमिक शिक्षण समिती संचलित म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11 कसबा बावडा, कोल्हापूर मध्ये शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासनाधिकरी डी सी कुंभार यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी मोफत शाहू संस्कार व्यक्तिमत्त्व विकास शिबीर 1 मे पासून सुरू आहे.यामध्ये इयत्ता 1 ली ते 7 वी मधील विद्यार्थ्यांना मोफत शिबिर मध्ये ध्यानधारणा, योगासने, एरोबिक्स,झांज पथक,कवायत,कागद काम,तायक्वांदो,इंग्रजी प्रभुत्व,प्रभावी वक्तृत्व,नाटयीकरण,सुदंर हस्ताक्षर,संस्कारक्षम बोधकथा, गणितीय गमती जमती,सर्प आपले मित्र,इत्यादी विषयावर सकाळी 8 ते 11 यावेळेत विविध मार्गदर्शक तज्ञ प्रदीप पाटील,राजेंद्र पाटील,द्वारकानाथ भोसले,संतोष कसबे,तमेजा मुजावर,सुभाष मराठे,सातप्पा पाटील,स्वाती रेळेकर,अरुण सूनगार,तानाजी इंदुलकर,या तज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी,बाळासाहेब कांबळे, उषा सरदेसाई यांनी विशेष सहकार्य केले.

सदर शिबिरातील विद्यार्थ्यांना  शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील,दिलीप माने,विलास पिंगळे,संजय पाटील,बजरंग रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते संजय लाड,भारतवीर मित्र चे सचिन चौगले, राहुल भोसले, यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांना खाऊ व बिस्किटे दिली.

शिबीर यशस्वी होणेसाठी उत्तम कुंभार,सुशील जाधव,तमेजा मुजावर, शिवशंभू गाटे,जोतिबा बामणे,यांनी सहकार्य केले.
आभार व नियोजन शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी नियोजन केले आहे याचा परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

Tuesday, 3 May 2022

छत्रपती राजाराम कारखान्याकडून ओढा पुनरुज्जीवनचे काम सुरू: माजी आमदार अमल महाडिक


 हेरले /प्रतिनिधी
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना व महाडिक उद्योगसमूहातर्फे ओढा पुनरुज्जीवन अंतर्गत कामाचा शुभारंभ श्री गणेश पाणी पुरवठा सहकारी संस्थेचे चेअरमन धोंडीराम चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
          छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना व महाडिक उद्योग समूहाच्या वतीने कारखान्याचे संचालक अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनानुसार ओढा पुनरुज्जीवन कार्यक्रम २०२२ अंतर्गत राजाराम महाराज जलसेवा अभियानाने सुरू आहे. या कार्यक्रमाला मौजे वडगाव येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत या योजनेचा लाभ घेतला .गावांमधील ओढ्याचे काम निवडलेल्या ठिकाणी सुरू असून जेसीबी आणि इतर मशनरी च्या साह्याने ओढ्याची सफाई करणे, पात्र रुदवणे ,ओढ्यातील साठलेला गाळ काढणे, अशा आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
        यावेळी धोंडीराम चौगुले ,आनंदा जाधव, बाळासो थोरवत, सुनील खारेपाटणे ,अशोक जाधव, स्वप्नील चौगुले ,शिवाजी काकडे ,राजाराम जाधव, सुरेश कांबरे, बटू सावंत, कारखान्याचे स्लीप बॉय धनवडे साहेब, यांच्यासह शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

फोटो 
 जेसीबीच्या साह्याने ओढ्याचे पात्र रुंदीकरण करताना शेतकरी वर्ग

मोहन शिंदे यांना युथ आयकाँन पुरस्कार

हेरले /प्रतिनिधी 
पेठ वडगांव(ता.हातकणगंले) येथील  मोहन शिंदे यांना  बंडखोर सेनापक्ष व बंडखोर मिडिया ग्रूप आयोजित बंडखोर सेना पक्षाचा 9 वा तर लढवय्या महाराष्ट्र न्युजचा दुसऱ्या  वर्धापणदिन निमित्त "युथ आयकाँन हा "पुरस्कार देण्यात आला.
 जिवनात विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक  , शैक्षणिक, वा इतर सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमठविणाऱ्या अनेक  युवक युवतींना  2022 चा "युथ आयकाँन" हा मानाचा पुरस्कार आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. 
 जिल्हाध्यक्ष मोहन शिंदे यांनी भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून  आजपर्यंत केलेल्या सामाजिक व उल्लेखनीय कामगिरी बद्दल याची दखल घेऊन त्यांना  बंडखोर मिडिया ग्रूप वतीने  2022 चा "युथ आयकाँन" हा मानाचा  पुरस्कार त्यांना गुरुवार दि. 01 मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन या दिवशी  हातकणगंले विधानसभेचे  आमदार राजूबाबा आवळे यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
           यावेळी भटका समाज मुक्ती आंदोलन अध्यक्ष भिमराव साठे बापू , कुमारी स्वराली शिंदे , बंडखोर मिडिया ग्रूप अध्यक्ष  शिवाजीराव आवळे, नगरसेविका नम्रता ताइगडे, मा.उपनगराध्यक्षा प्रविता सालपे , शिवानी आवळे , अभिनेत्री श्री मेसवाल मँडम आणि  अश्विनी इरोळे, 
 एनएसजी कमांडो मुकूंद वासुदेव, प्रसिद्ध निवेदक , कवी कृष्णात बसागरे (सर) बंडखोर सेना पक्षाचे व  मिडिया ग्रूपचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुळकुड गावचे प्रगतशील शेतकरी मलगोंडा सातगोंडा टेळे यांनी कृषी विभागातर्फे भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक


कोल्हापूर / प्रतिनिधी

  सुळकुड (ता. कागल) येथील प्रगतशील शेतकरी  मलगोंडा सातगोंडा टेळे यांनी
कृषी विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या भात पीक स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी  स्पर्धेत आपले सातत्य कायम ठेवून भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे.   
    सुधारित संकरित वाणांचा वापर, सुयोग्य व्यवस्थापन यामधून सुळकुड येथील प्रगतशील शेतकरी   मलगोंडा सातगोंडा टेळे यांनी दहा गुंठ्यांमध्ये ११५० किलो इतके प्रचंड उत्पादन घेऊन  २०२० चा भात पीक स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या अगोदर २०१५ मध्ये राज्यस्तरीय दुसरा २०१८  मध्ये राज्यस्तरीय तृतीय २०१९ मध्ये राज्यस्तरीय तृतीय क्रमांक ही मिळवलेला आहे.
   २०२० चे  कृषी विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा नाशिक येथे नुकताच पार पडला. भात पीक स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेतेपद राज्याचे  राज्याचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारीजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, यांच्या हस्ते मलगोंडा सातगोंडा टेळे यांना प्रदान करण्यात आला. 
या सोहळ्याच्या प्रसंगी राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार, विधानसभा उपाध्यक्ष  झिरवळ ,  मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यांचे कृषी मंत्री  दादासाहेब भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले , मंत्री छगन भुजबळ यांच्यसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला.

निधन वार्ता

पेठवडगाव, ता. ३ : येथील गणेश केशव माळी यांचे निधन झाले. स्मॅक आयटीआय मध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांनी दीर्घ काळ सेवा बजावली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील असा परिवार आहे. 
रक्षाविसर्जन गुरुवारी ( ता. ५ ) सकाळी साडेआठ वाजता पेठवडगाव येथे आहे.

Monday, 2 May 2022

हेरलेत शिवजयंती महोत्सवास प्रारंभविविध कार्यक्रमाचे आयोजनाने गाव शिवमय.


हेरले /प्रतिनिधी
  हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे संयुक्त शिवजयंती समितीच्या वतीने आयोजित शिवजयंती महोत्सवास १ मे रोजी पासून सुरुवात झाली आहे.१ मे ते ६ मे पर्यंत शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ५ मे रोजी ख्यातनाम व्याख्याते प्रा.नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान सायंकाळी ७ वाजता झेंडा चौकात आयोजित केले आहे.
    हेरले गावांमध्ये शिवसेना, जयहिंद तरुण मंडळ, सूर्यगंगा तरुण मंडळ, जयकिर्ती तरुण मंडळ, शिवप्रेमी तरुण मंडळ, जयविजय तरुण मंडळ, संग्राम तरुण मंडळ, रत्नदिप तरुण मंडळ, रवी पाटील वसाहत, ओन्ली यू तरुण मंडळ,चौगुले ग्रुप तळ्याची गल्ली, कॉर्नर बॉइज तरुण मंडळ,जय विजय मित्र मंडळ माळभाग, हावलदार ग्रुप चौगुले गल्ली, भगवा रक्षक माळभाग, कोरवी ग्रुप आदीसह अन्य तरुण मंडळांनी आपआपल्या कॉलनीच्या चौकात आरास करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. परिसरात रांगोळी घालून, भगव्या पताका, भगवे ध्वज, स्फूर्तिदायी पोवाडे लावून वातावरणनिर्मिती केली. 
     सोमवारी सकाळी ८.३० वाजता गावातील सर्व उपनगरांमध्ये  तरुण मंडळांच्या वतीने पन्हाळा येथून आणलेल्या शिवज्योतीचे पूजन करून मोटर सायकल रॅली काढली. 
सायंकाळी शिवजन्मकाळ सोहळा व पालखी सोहळा पाळणागीतांसह शिवशाहिरांचे पोवाडे, रणहालगीचा ठेका, दांडपट्टा, पारंपरिक वेशभूषेतील बालचमूंचा,महिला, तरुण,वृद्धासह उत्साह आणि शिवछत्रपतींचा अखंड जयघोष अशा उत्साही वातावरणात संपन्न झाली. या प्रसंगी पोलिस पाटील नयन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
   शिवजयंतीची पारंपारिक मिरवणूकीत महालक्ष्मी  ढोल कोल्हापूर व गावातील महिला व पुरुष यांनी झांजपथकामध्ये उत्साहात सहभाग घेतल्याने मिरवणूक शिवमय संपन्न झाली.कॉर्नर बॉइज तरुण मंडळ याच्या वतीने माळभागावर महाप्रसादाचे आयोजन केले. रुषीकेश लाड यांनी सकाळी सर्व शिवभक्तांना झेंडा चौकामध्ये अल्पोहार वाटप केला. अशा उत्साही वातावरणात सोमवारी पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
   १ मे रोजी सकाळी आकाशदीप  नेत्रालय मिरज यांचा वतीने नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबीरात १०० रुग्णांनी लाभ घेतला. सांयकाळी  शिवचरित्र विषयावर व्याख्यान सुनिल लाड कौलापूर सांगली यांचे संपन्न झाले.
५ मे रोजी ख्यातनाम  व्याख्याते प्रा.नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान सायंकाळी ७ वाजता झेंडा चौकात आयोजित केले आहे.६ मे रोजी सायंकाळी शिवजयंती भव्य मिरवणूक होणार आहे.
   या संयुक्त शिवजंयती महोत्सवाचे
आयोजन नंदकुमार माने, कपिल भोसले, विजय भोसले, संदीप शेटे, रविराज माने, उदय भोसले, विनोद वडु, अमर वडु, राहूल काटकर, प्रकाश वडु ,सोमनाथ भोसले,चेतन खांडेकर, सचिन डोर्ले, मंदार गडकरी, शरद माने, सुनिल मोहिते, महेश सावंत, निरंजन खांडेकर, विनोद माने,संदिप थोरात,विजय कारंडे, संतोष भोसले,सग्राम रुईकर, रुषीकेश लाड, मंदार मिरजे, सचिन जाधव, मनोज जाधव, विश्वेश्वर रुईकर, विश्वजीत भोसले आदींसह गावातील सर्व तरुण मंडळांच्या शिवभक्तांनी संयोजन केले आहे.
    फोटो 

हेरले : सोमवारी शिवजयंती दिनी सायंकाळी शिवजन्मकाळ सोहळा प्रसंगी महिला पाळणागीत म्हणतांना.

सायकल चालवा आरोग्य मिळवा : गटशिक्षणाधिकारी डॉ.जी. बी. कमळकर


मुरगूड विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात.

   कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र दिन,जागतिक कामगार दिन आणि मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज वर्धापन दिन संयुक्त कार्यक्रम शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय मध्ये उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण कागलचे गटशिक्षणाधिकारी डॉ जी बी कमळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस आर पाटील होते.
 राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता पर्व विविध उपक्रमाने राबवला जात आहे. मुरगूड शहरातील प्राथमिक माध्यमिक शाळातील विद्यार्थी शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी डॉ.कमळकर यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅलीचे आयोजन केले. जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळा क्रमांक एक पासून बाजारपेठ नाका क्रमांक एक जवाहर रोड बस स्थानक हुतात्मा तुकाराम चौक अंबाबाई मंदिर विठ्ठल मंदिर अशी ही रॅली बुरुड विद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाली येथे डॉक्टर कमळकर यांनी मार्गदर्शन केले आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले सायकल चालवणे हा जगातील प्रगत देशांमध्ये प्रेस्टिज स्टेटस मानला जातो भारतातील पेट्रोल डिझेल वर चालणाऱ्या महागड्या गाडया गरज नसताना रस्त्यावर फिरून श्रीमंतीचे प्रदर्शन केले जाते   सायकल चालवून प्रदूषण टाळावे. पृथ्वीचे आयुर्मान वाढवावे. आरोग्यदायी जीवन जगावे." असा संदेश त्यांनी याप्रसंगी दिला.
  यावेळी प्रशालेच्या वतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर.पाटील यांनी.  डॉ.कमळकर यांचा सत्कार केला. उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी, उपप्राचार्य एस. पी.पाटील, पर्यवेक्षक सुधाकर निर्मळे, तंत्र विभाग प्रमुख पी. बी. लोकरे, कार्यालय प्रमुख एम. एस. कांबळे, एस.बी.बोरवडेकर, एस.एस.कळंत्रे,आर. जी. पाटील, ए. एच. भोई, एस.डी. कुंभार,एन. एन.गुरव,
प्रा.शशांक कोंडेकर,पी. एस. पाटील टी. आर. शेळके उपस्थित होते.स्वागत ए. एन. पाटील, प्रास्ताविक एम. एच. खराडे ,अभार एस एस कळंत्रे यांनी मानले.

Sunday, 1 May 2022

हेरलेच्या शेतकरी दादासो कोळेकर यांच्या शेतीचे वादळी पावसाने केले प्रचंड नुकसान.


     हेरले / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकरी दादासो  कोळेकर यांच्या केळीच्या बागेचे ग्रीन हाऊसचे व ढब्बू मिरची पिकाचे असे पंधरा लाखा पर्यंतचे प्रचंड नुकसान झाले.
     हेरलेतील दादासो कोळेकर यांचे ग्रीन हाऊस आहे.या ग्रीन हाऊसमध्ये रंगीत ढोबळी ( colour capsicum) मिरची हे पिक आहे. गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामध्ये पिकाचे व ग्रीन हाऊस चे प्रचंड नुकसान झाले आहे.
   रंगीत ढोबळी मिरची साठी लावणी पासून आतापर्यंत १ लाख २५ हजार रुपये खर्च आला आहे. या पिकाचे उत्पादन सुरु झाले होते. अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पादन झाले असते. मात्र वादळी पावसामुळे  मिरची पिकाच्या येणाऱ्या ४ ते ५ लाख उत्पादनावर आवकाळी पावसाने पाणी फिरवले.
   तसेच ग्रीन हाऊस शेडचे संपूर्ण प्लास्टिक आच्छादन फाटले व मेटल स्ट्रक्टचर बेंड झाले असून त्यामुळे आंदाजे ५ ते ६ लाखाचे नुकसान झाले आहे. ढोबळी मिरची व ग्रीन हाऊस     शेडचे मिळून १० ते १२ लाखाचे नुकसान आहे. तसेच केळीची बागेचे व ग्रीन हाऊसचे मिळून आडीच लाख ते तीन लाखाचे नुकसान झाले आहे. असे एकूण अंदाजे पंधरा लाखाचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी दादासो कोळेकर यांनी पत्रकारांना सांगितले.
     हेरलेचे तलाठी एस.ए. बरगाले, कोतवाल महंमद जमादार यांनी  गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने केलेल्या नुकसानीचा पंचनामा शुक्रवारी करून शासनाकडून  शेतकऱ्यास नुकसान भरपाई  मिळणेसाठी पुढील कार्यवाहीसाठी अहवाल पाठविला आहे.

चंद्रप्रभा शेतकरी विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ प्रचंड सभासदांच्या उपस्थित उत्साहात.


हेरले प्रतिनिधी

 हेरले (ता. हातकणंगले) येथील श्री चंद्रप्रभा शेतकरी विकास सेवा संस्थेची सन २०२२-२०२७ या पंचवार्षिक कालावधीची निवडणूक लागली असून या निवडणूकीतील चंद्रप्रभा शेतकरी विकास आघाडीचा प्रचार शभारंभ हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
   याप्रसंगी माजी सभापती राजेश पाटील म्हणाले आम्ही चंद्रप्रभा शेतकरी विकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्वांनी चंद्रप्रभा शेतकरी विकास आघाडीलाच बहुमोल सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी संस्थेच्या मतदारांना केले.
   यावेळी  निलोफर खतीब, गणी देसाई , उत्तम माळी , डाॅ. युवराज वड्ड , माजी सरपंच रियाज जमादार, कृष्णा हावलदार , प्रा.प्रभुदास खाबडे,
 यांनी आपले मनोगत व्यक्त करून आघाडीला पाठिंबा जाहीर केला
    कै.बाबासो दत्तु खांबे ( अण्णा ) यांना श्रद्धांजली वाहुन प्रचार शुभारंभ कार्यक्रमास सुरुवात झाली. या प्रसंगी बहुसंख्येने सभासद बंधु भगिनीं व  ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविक डाॅ. युवराज वड्ड यांनी केले. उत्तम माळी यांनी आभार मानले. 
    यावेळी हाजी बादशाह देसाई,केशव मिरजे, बशीर बारगीर , अशोक इंगळे , भरत कराळे , बबलू पाटील , आमगोंडा पाटील , गजानन कोळेकर , उपसरपंच 
फरीद नायकवडी , संदिप चौगुले , मजीद लोखंडे , विनोद वड्ड , विजय वड्ड , सलीम खतीब,जावेद खतीब ,जुबेर बारगीर , तोफिक खतीब , अमीर पेंढारी , इश्वर वड्ड , कुमार वड्ड , संताजी वड्ड , साजीद नायकवडी , सुरज पाटील , वसंत खाबडे , स्मिता किसन जाधव , जयश्री आप्पासो रयत , अबु जमादार , अशोक मुंडे  , शशिकांत पाटील , नितीन चौगुले , अमीर खतीब , हजरत खतीब , आयुब खतीब , बाबू बारगीर , गुरू नाईक , ईसुब पेंढारी , अण्णासाहेब परमाज , माणिक बाबुराव पाटील , अनिल पाटील वाडीकर , शकिल देसाई , सतीश काशीद , तानाजी सावंत,  अण्णा कोळेकर , किरण स्वामी , संपद काटकर , विजय भोसले , श्रीपाल खोत , जयसिंग हावलदार , रावसाहेब हावलदार , शौकत मुल्ला , शशुपाल कुरणे , संजय खाबडे , जालंधर उलसार , इम्तियाज खतीब , पोपट शिंदे , गुंडू रूईकर , आदी मान्यवरासह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते .