Saturday, 27 July 2024

हेरलेत बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर यांचे प्रशिक्षण सुरु

     हेरले /प्रतिनिधी
 हेरले ( ता. हातकणंगले ) येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपुर तर्फे  प्रशिक्षणात महिला बांबू कारागिरांचे समुह संघटन, क्षमता बांधणी व कौशल्य विकास आदी कौशल्याची प्रशिक्षणामध्ये सुरुवात झाली.
     बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली,  चंद्रपुरचे संचालक अशोक खडसे यांनी हे प्रशिक्षण मंजुर केले आहे. १५ दिवसाचे प्रशिक्षण सत्र असून या प्रशिक्षणात आकाशकंदिल, टेबल लॅंप, भिंत्तीचित्रे, फुलदाणी, पेन होल्डर, राखी इत्यादी विविध बांबुच्या कलावस्तुचे प्रात्यक्षिक घेतले जाईल अशी माहिती अजित भोसले, समन्वयक , महाराष्ट्र बांबु विकास मंडळ, नागपूर यांनी दिली. या प्रशिक्षणासाठी सामुहिक सुविधा केंद्र ( बांबु ) भुईंज, ता. वाई, चे व्यवस्थापक व पर्यावरणीय सभ्यता विकास संस्था , वाईचे तज्ञ बांबु हस्तकला प्रशिक्षक, प्रवीण सोनवले या प्रशिक्षणार्थींना बांबु लहान आकाराच्या विविध रंगातील पट्ट्यांचे विणकाम करणे व त्यापासुन विविध हस्तकला वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणासाठी महिलांचे समुह संघटन यशस्वीरित्या 
हेरले येथील  अभिजीत सपाटे यांनी केले असुन एकूण ३२ महिलांची निवड प्रशिक्षणासाठी केली आहे. प्रशिक्षणानंतर या महिला कारागिरांना सामुहिक सुविधा केंद्र, भुईंज ( वाई) मार्फत बांबू पट्ट्या विविध आकाराच्या व रंगाच्या पुरवठा करण्याचे काम करेल तर कारागिरांनी तयार  केलेल्या बांबुच्या कला वस्तु विकत घेणे व त्याची विक्री करणे यासाठी पर्यावरणीय सभ्यता विकास संस्था वाई प्रयत्नशील राहील असे  प्रवीण सोनवले यांनी सांगितले. 
   हेरले येथे प्रथमच बांबू हस्तकला प्रशिक्षण मंजुर केल्याबद्दल सोनवले व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सरपंच  राहुल शेटे, उपसरपंच निलोफर खतीब यांनीही या प्रशिक्षणाच्या उद्घाटनानंतर सांगितले कि, हेरले येथे बांबू हस्तकला निर्मितीसाठी वाव असून या उपक्रमातुन स्थानिक रोजगार मिळेल अशी आशा व्यक्त केली. या प्रसंगी
कोल्हापूर बुरुड समाजाचे अध्यक्ष जयवंत सोनवले, समाजातील सदस्य शाम सपाटे, धनंजय सुर्यवंशी, तानाजी सुर्यवंशी,सूरज पाटील प्रशिक्षण सत्राच्या उदघाटनास उपस्थित होते. 


फोटो 

  हेरले: बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर यांचे
 प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी चर्चा करतांना मान्यवर.

हेरले येथे वंचित बहुजन आघाडी, मुस्लिम समाज व नाभिक समाजाच्या वतीने तसेच जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांचे जंगी स्वागत

हेरले /प्रतिनिधी

हेरले ( ता. हातकणंगले )
वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा कोल्हापूर येथून सांगली कडे रवाना होताना हेरले येथे वंचित बहुजन आघाडी, मुस्लिम समाजा व नाभिक समाजाच्या वतीने तसेच जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. 
ओबीसींचे आरक्षण वाचले पाहिजे,ओबीसी मध्ये होणारी घुसखोरी थांबली पाहिजे आणि एस.सी, एस.टी घटकाला शासकीय नोकरीत पदोन्नती मिळाली पाहिजे हे सर्व मुद्दे घेऊन ही यात्रा मुंबई येथून निघाली आहे. याचा समारोप औरंगाबाद येथे होणार आहे या यात्रेला हातकणंगले तालुक्यातील सर्व ओबीसी घटकांचा,एस.सी,एस.टी घटकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला हातकणंगले येथे कॉर्नर सभा घेऊन ही यात्रा सांगलीकडे रवाना झाली.
 या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले तालुकाध्यक्ष आशपाक देसाई उद्योजक सरदार आवळे ,माजी उपसरपंच बख्तियार जमादार,मुनीर जमादार, माजी सरपंच रियाज जमादार,माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश कदम नाभिक समाज व वंचित चे अध्यक्ष दादासो काशीद,मुस्लिम समाज माजी अध्यक्ष अल्लाउद्दीन खतीब, युवराज काशीद, तानाजी काशीद,अभिजीत काशीद,चंद्रकांत काशिद, डेविड लोखंडे,अमोल धुळे,राहुल धुळे संताजी खाबडे,बटूवेल कदम, निखिल कोले, सतीश करणे संजय शिंदे, प्रशांत खाबडे, सचिन कोले, रियाज जमादार (जाकी),इमाम जमादार,सलीम मुल्ला, राजू मुल्ला,रफिक तांबोळी यांच्यासह गौतम ज्येष्ठ नागरिक संघटना,नाभिक संघटना ,ओबीसी मुस्लिम संघटना व वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

ओंकार नलवडे याची कोल्हापूर पोलिस दलात निवड


हेरले (प्रतिनिधी ) हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील ओंकार नलवडे याची कोल्हापूर पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून १५० पैकी १४२ गुण मिळवित जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला . त्यांने जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. एका सामान्य कुटूंबातील ओंकारने आपले पोलिस खात्यात करिअर करायचे म्हणून अतिशय जिद्दीने प्रयत्न करित होता. त्यामध्ये त्याला यश मिळाले . मौजे वडगाव येथील तो एका सामान्य कुटूंबातील मुलगा असून त्याचे वडील जनावरे बाळगून एम .आय .डी . सी . येथील एका खाजगी कंपनीत काम करतात तर आई गृहीणी म्हणून घर सांभाळतात . त्याला पोलिस भरती होण्यासाठी आई वडिलाचे मोठे पाठबळ मिळाले त्याच्या या यशाबद्दल गावात हालगी वाजवून स्वागत करण्यात आले तर गावातील विविध सेवा संस्थाच्या वतीने  या निवडी बद्दल  त्याचा सत्कार करण्यात आला . तसेच गावातील मान्यवरांच्या कडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोजिमाशि पतसंस्था मर्यादित पेठवडगांव शाखा समिती सदस्य पदी जाविद मुसा

पेठवडगांव / प्रतिनिधी

           कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची
सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरच्या
पेठवडगांव शाखा समिती सदस्य पदी जाविद मुसा मणेर शाळा वडगांव विद्यालय व ज्युनि. कॉलेज वडगांव यांची निवड झाली.
     जाविद मणेर यांची संस्थेच्या पेठवडगांव शाखा समिती सदस्य पदी निवड होण्यास  सह. तज्ञ संचालक शिक्षक नेते दादासाहेब लाड, माजी चेअरमन तथा जेष्ठ संचालक बाळ डेळेकर,चेअरमन उत्तम पाटील,व्हा. चेअरमन श्रीकांत कदम,सी.ई.ओ जयवंत कुरडे व सर्व संचालक मंडळ यांचे सहकार्य लाभले.

Friday, 19 July 2024

शिक्षण प्रशासनचा कार्यभार आर. व्ही. कांबळे यांच्याकडे


कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर  महापालिका शिक्षण प्रशासन अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार गुरुवारी आर. व्ही. कांबळे यांनी एस. के. यादव यांच्याकडून स्वीकारला.
    एस. के. यादव यांच्याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडील उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारीपदाचा कार्यभार आहे. त्यामुळे यादव यांनी स्वतःहूनच महापालिका शिक्षण प्रशासन अधिकारीपदाचा कार्यभार सोडला. म्हणून त्यांच्याकडील शिक्षण प्रशासन अधिकारीपदाचा कार्यभार कांबळे यांच्याकडे देण्याचा आदेश शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी १ जुलै रोजी काढला. त्यानंतर नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर
कांबळे यांचा सत्कारही झाला. तातडीने रूजू होण्यासाठी ते महापालिकेत गेलेही होते; पण तब्बल १८ दिवसांनी त्यांना कार्यभार घेण्यात यश मिळाले.
वर्ष २०१२ पासून महापालिका शिक्षण प्रशासन अधिकारीपदावर पूर्णवेळ अधिकारी नाही. तेव्हापासून अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे ' अधिकारीच पदावर राहिले.
    यादव हे डिसेंबर २०२२ पासून या पदाचा कार्यभार सांभाळत होते; मात्र त्यांनी या पदाचा कार्यभार काढून घेण्याची विनंती केल्यानंतर कांबळे यांना संधी मिळाली आहे. पण कांबळे  यांनी ही जिल्हा परिषद शिक्षण  विभागाकडील विस्तार  अधिकारीपदाचा मूळ कार्यभार  सांभाळून अतिरिक्त कार्यभार शिक्षण  प्रशासन अधिकारीपदाचे कामकाज  करण्याचा आदेश उपसंचालकांनी दिला आहे.

मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथे रविवार दि. २१जुलै रोजी व्यासपूजा (गुरुपौर्णिमा) निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

हेरले / प्रतिनिधी

श्री सद्‌गुरु निरंजन महाराज आश्रम मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथे रविवार दि. २१जुलै रोजी व्यासपूजा (गुरुपौर्णिमा)निमित्त आश्रमामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
  सकाळी 'श्री' चे पादुकांना अभिषेक, नोंदणी व चहापान,सकाळी  भजन श्री भजनी मंडळ हेरले तबला साथ: शौकत गुरुजी, प्रवचन: परमार्थभूषण ह.भ.प.श्री. नारायण एकल महाराज, जोगेवाडी.दुपारी श्रींचे पादुकांना बेल व फुले अर्पण,प्रवचन: गुरुवर्य ह.भ.प. श्री. मधुकर पाटील महाराज, कावणे, सत्कार समारंभ व आशिर्वचन.दुपारी महाप्रसाद,भजन : श्री ज्ञानेश्वर माऊली महिला भजनी मंडळ, हमिदवाडा.सायंकाळी ६:०० ते ७:०० : प्रवचन: ह.भ.प.श्री. अरुण पोवार महाराज, तळाशी.सायंकाळी ७:१६ वा. : सुर्यास्त व आरती या सर्व कार्यक्रमास भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्‌गुरु निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मौजे वडगांव यांच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Wednesday, 17 July 2024

स्वरूप पाटीलने सलग १४ तास अभ्यास करत सि.ए परीक्षेत मिळविले यश

हेरले / प्रतिनिधी

    टोप ता.हातकणंगले येथील सर्वसामान्य  कुटुंबातील स्वरूप सुभाष पाटील याने महाकठीण असणाऱ्या चार्टड अकाउंटंटच्या परीक्षेत सलग १४ तास अभ्यास करत अथक प्रयत्नाने जिद्दीने यशाला गवसनी घातली आहे.
    स्वरूप पाटील चे शिवराज विद्या मंदिर ला प्राथमिक तर माध्यमिकचे शिक्षण बळवंतराव यादव हायस्कुल पेठवडगावला झाले. सर्वांनाच नको वाटणारा पण अवघड असणारा गणित विषय स्वरूप च्या आवडीचा होता.वडील सुभाष पाटील हे शेती सांभाळून सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करण्याचे काम पाहतात.त्याचे अनुकरण करत.
यातून आपले करीअर करण्याचे त्याने ठरविले.त्यानुसार स्वरूप पाटील ने कोल्हापूरच्या कॉमर्स कॉलेज येथून १२ वी उत्तीर्ण झाला. व सि.ए अभ्यासक्रमांची निवड केली. या परीक्षेत सुरवातीला फौंडेशन, इंटरमेडीट व अंतिम  परीक्षा असे स्वरूप असते. यासाठी स्वरूप पाटील यांनी विद्यालयातील  मार्गदर्शन  तसेच पुणे मुंबई येथील सि. ए परीक्षेचे ऑनलाईन  क्लासेस, यु ट्यूबच्या माध्यमातुन तसेच दररोजचा नियमित सलग बारा ते चौदा तास अभ्यास करत होता. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला.ही परीक्षा उत्तीर्ण व्हावयाचे असल्यास स्वतःमध्ये शिस्त बाणवावी लागते. अभ्यासात सातत्य असावे लागते. त्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करण्याची तयारी असावी लागते.आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करून वेळच्या वेळी अभ्यास करावाच लागतो. हे सर्व थोडे कठीण असले तरी त्यामुळे निश्चितपणे यश लाभते, असे स्वरूप पाटील यांनी सांगितले. यामध्ये वडील सुभाष पाटील आई वैशाली पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले.

फोटो 
स्वरूप पाटील

हेरले येथे कौतुक विद्यालयाच्या कार्तिक एकादशी निमित्त दिंडी सोहळा पार पडला



हेरले /प्रतिनिधी

      हेरले:-हेरले (ता हातकणंगले) येथे कार्तिक एकादशी निमित्त  कौतुक विद्यालय यांच्या वतीने आदर्श नगर माळभाग हेरले , नुतन विठ्ठल मंदीर,गावभाग  पर्यत दिंडी सोहळा पार पडला.
         याचेच औचित्य साधून येथील कौतुक विद्यालय या शाळेने विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन केले होते. विठ्ठल, रुक्मिणी, विविध संतांची मांदियाळी, हातात टाळ घेतलेले वारकरी, यांच्या सुंदर वेशभूषा करून विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते.या दिंडीला सामाजिक आशय देत ग्रंथदिंडी आणि वृक्षदिंडीची जोड देण्यात आली.
                 टाळांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या या दिंडीचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. गावातील झेंडा चौकात मुलींनी विठ्ठल नामाच्या जयघोषात फुगड्या घालून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.पारंपारिक वेशभूषा आणि टाळांच्या गजरात निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
      मुख्याध्यापक रेखा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी
शुभांगी ढवळे, अक्षिता कोळेकर,ज्योती पाटील,करिश्मा खतीब, शीतल कोळी, प्रतिक्षा पाटील,नीता माळी, श्वेता पाटील रुपाली घुघरे  यांनी विशेष परिश्रम घेतले. 

फोटो :-हेरले (ता हातकणंगले)येथे कार्तिक एकादशी निमित्त काढण्यात आलेल्या दिंडीतील सहभागी विद्यार्थी . 

Saturday, 13 July 2024

भविष्यकालीन शिक्षण मार्गदर्शनासाठी प्रभावी अध्यापनाच्या दिशा -डॉ अजितकुमार पाटील, कोल्हापूर.


एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक ही आंतरक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आजचे युग हे विज्ञान युग,संगणक युग म्हटले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी कोणत्याही विषयात,कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रत्येक विद्यार्थी व पालकांसाठी योग्य तो निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. शालेय स्तरावरती विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्गदर्शनाची खूप गरज असते. पण अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांनी योग्य प्रशिक्षण घेतलेले पाहिजे. म्हणूनच शिक्षक प्रशिक्षकांना भविष्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शनासाठी अध्यापन कार्यनितीचा ( पद्धतींचा ) समावेश केला पाहिजे. व्यक्तिची अभिरूची व त्यानुसार होणारे वर्तन यावर प्रभाव पाडणारी गतिमान परस्परसंबंधाची प्रक्रिया म्हणजे मार्गदर्शन होय व अध्ययनाचा योग्य कार्यक्रम निवडण्यास व त्यात प्रगती करण्यास मदत करण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन असते. प्रस्तुत पेपरमध्ये शैक्षणिक मार्गदर्शनाची व्याप्ती स्पष्ट केली आहे. अभ्यासक्रम निवडणे, शाळेशी समायोजन साधणे, व्यक्तिमत्व विकास करणे, व्यावसायिक माहिती देणे, स्वतःच्या क्षमतांचा विकास करणे, विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करणे इ. शैक्षणिक मार्गदर्शनाची व्याप्ती आहे. शिक्षक-शिक्षणामध्ये भविष्यकालीन मार्गदर्शनासाठी अनेक अध्यापनाच्या कार्यनिती आहेत. यामध्ये गट-चर्चा, जीवन कौशल्य प्रशिक्षण,शिबिरे, कार्यशाळा, सहकार्यात्मक अध्ययन, तोंडी सादरीकरण, कथा पुर्ण करणे, भुमिका पालन, बहुमाध्यम सादरीकरण, आंतरक्रियात्मक अध्यापन, क्षेत्रीय भेट व प्रकल्प इत्यादी अध्यापन कार्यनितीचे प्रस्तुत पेपरमध्ये स्पष्टीकरण करण्यात आले आहे. आजच्या शिक्षणप्रणालीमध्ये झपाट्याने नवनवीन बदल होत आहेत. आजची शिक्षण प्रणाली ही वेगवेगळ्या मुदद्यांचा सविस्तर अभ्यास करून बनवली जात आहे. या बदलांना सामोरे जाण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचा समावेश असला पाहिजे.
कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीस योग्य तो निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्गदर्शनाची खुप गरज असते. पण अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांनी योग्य प्रशिक्षण घेतलेले पाहिजे. म्हणूनच शिक्षक प्रशिक्षकांना भविष्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शनासाठी अध्यापन कार्यनितीचा समावेश केला पाहिजे. त्यासाठी प्रथम मार्गदर्शनाची संकल्पना पाहू मार्गदर्शन :

Guidance is process of helping every "
individual, through his own effort to discover and develop this potentialities." - Ruth Strange.
 
म्हणजेच, प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या प्रयत्नांनी आपल्या अंगभूत क्षमता शोधून काढणे व त्यांचा विकास करणे यासाठी मार्गदर्शन ही प्रक्रिया मदत करते.

"Guidance is a process of dynamic interpersonal relationships designed to influence the attitudes and subsequent behaviour of a person."
- Good.

म्हणजेच, व्यक्तीची अभिवृत्ती व त्यानुसार होणारे वर्तन यावर प्रभाव पाडणारी गतिमान परस्परसंबंधाची प्रक्रिया म्हणजे मार्गदर्शन होय. "Guidance should be used whenever an important activity is to be learnt and assistance is needed by the individual to learn that activity and adjust himself whether that activity is the choice of leisure time activity habit of eating or behaviour towards the opposite sex."
- Brewer.
"एखादी महत्वपूर्ण कृती शिकावयाची असेल आणि ती कृती शिकताना व समायोजन साधताना सहकार्याची गरज असेल, अशावेळी मार्गदर्शन करणे हा शब्द वापरला जावा, मग ती कृती फुरसतीच्या वेळेची कृती असो किंवा खाण्याच्या सवयीबाबत किंवा भिन्न लिंगी व्यक्तीबरोबर असलेल्या वर्तणुकीबाबत असो.
शैक्षणिक मार्गदर्शन "Educational guidance is intended to aid
the individual in choosing an approciate programme and in making progress in if." 
- Jones.
1. अभ्यासक्रम निवडणे :-

विद्यार्थ्यांना 10 वी झाल्यानंतर कोणता अभ्यासक्रम निवडायचा यासाठी मार्गदर्शनाची मदत होते. तसेच त्यांची आवड, त्यांच्या गरजा व क्षमता ओळखून अभ्यासक्रम निवडण्यासाठी मार्गदर्शनाची मदत होते.

2. शाळेशी समायोजन साधणे-

जेव्हा विद्यार्थी शाळेत प्रवेश करतो तेव्हा त्याला तेथील वातावरण हे नवीन असते. त्यामुळे त्या शाळेशी वर्गातील मित्र, शिक्षक, मुख्याध्यापक, तेथील वातावरण इत्यादींशी समायोजन साधण्यासाठी मार्गदर्शन मदत करते.

३. व्यक्तिमत्व विकास करणे :-
विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या क्षमता, कौशल्ये विकसित करून त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन मदत करते.

4. व्यावसायिक माहिती देणे :-

 10, 12 वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये भविष्याच्या दृष्टीकोनातून कोणता व्यवसाय निवडायचा याबद्दल प्रश्न निर्माण होतात. अशावेळी विद्यार्थ्यांच्या क्षमता, कुवत, अभिवृत्ती, आवड पाहून व्यवसाय निवडण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.

5. स्वतःच्या क्षमतांचा विकास करणे :-
विद्यार्थ्यांमध्ये उपजतच असलेल्या अनेक क्षमतांचा विकास करण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन महत्वाचे ठरते.

6. विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करणे :-
विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयामध्ये किती यश मिळविले किंवा त्यांना त्या विषयाचे किती ज्ञान प्राप्त झाले हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या, नोंदपत्रिका, शोधिका यांचा वापर करून विद्यार्थ्यांचे मुल्यमापन केले जाते. यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन मदत करते.
शिक्षक शिक्षणामध्ये भविष्यकालीन मार्गदर्शनाची व गरज योग्य शैक्षणिक निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन
गरजेचे आहे.

2. शैक्षणिक समायोजन साधण्यासाठी

3. योग्य व्यवसायाची निवड करण्यासाठी

4. विविध कौशल्यक्षमता विकसित करण्यासाठी

5. विद्यार्थ्यांमधील बलस्थाने ओळखण्यासाठी

6. जीवनातील विविध समस्या सोडविण्यासाठी

7. वर्गातील कमकुवत विद्यार्थ्यांना ओळखून त्यांचा
विकास करण्यासाठी.

8. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी

9. विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी

10. विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण देण्यासाठी
शिक्षक शिक्षणामध्ये भविष्यकालीन मार्गदर्शनासाठी

अध्यापनाच्या पध्दती -
शिक्षक शिक्षणामध्ये भविष्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शनासाठी अनेक अध्यापन कार्यनिती आहेत. शिक्षक , प्रशिक्षणार्थ्यांनी या अध्यापन कार्यनितीचा त्यांच्या सेवांतर्गत कार्यामध्ये अवलंब केल्यास, विद्यार्थ्यांना अचूक व नेमके मार्गदर्शन करू शकतील. या अध्यापनाच्या कार्यनिती म्हणजेच  पुढीलप्रमाणे :-

1. गट-चर्चा: (Group Discussion)
गट चर्चेतून विद्यार्थ्यांना विविध विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन करता येते. विद्यार्थ्यांना गटामध्ये चर्चेच्या माध्यमातून कोणत्याही विषयातील एका घटकावर किंवा उपघटकावर अध्ययन करण्यास सांगणे गट-चर्चेमध्ये 5 ते 8 विद्यार्थ्यांचा समावेश असतो. यामध्ये विद्यार्थ्यांच्या गटामध्ये दिलेल्या घटकावर चर्चा करून निष्कर्षाप्रत जातात. या कार्यनितीच्या अवलंबनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य, समायोजन क्षमता, निर्णय क्षमता विकसित होण्यास मदत होते.

2. जीवन कौशल्य प्रशिक्षण (Life skill Training)
विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये शैक्षणिक प्रगती करण्यासाठी तसेच इतरांशी समायोजन साधण्यासाठी त्यांना विविध जीवन कौशल्याचे प्रशिक्षण देवून मार्गदर्शन केले जाते. यामध्ये स्व-निर्णय क्षमता, समयोजन क्षमता, तार्किक विचार, आंतरक्रियात्मक संभाषण, वाचन कौशल्य इत्यादी अनेक जीवन कौशल्याचे मार्गदर्शन करणे.

3. सहकार्यात्मक अध्ययन : (Co-operative Learning)
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निवडलेल्या विषयावरती गटामध्ये दिलेल्या वेळेत चर्चेच्या माध्यमातून सहकार्यात्मक अध्ययन केले जाते. अभ्यासक्रमातील अनेक विषयाशी संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून गटामध्ये सहकार्यात्मक अध्ययन करण्यास सांगणे. सहकार्यात्मक अध्ययनामधून विद्यार्थी गटामध्ये आपआपसात चर्चा करतात व योग्य समायोजन साधतात. या अध्यापन कार्यनितीच्या अवलंबामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक कौशल्य विकसित करता येतात.

4. तोंडी सादरीकरण: (Oral Presentation)
विद्यार्थ्यांना एखाद्या विषयातील घटक देवून, त्या घटकावर आधारित तोंडी सादरीकरण करण्यास सांगणे. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वासाची पातळी वाढते.या अध्यापन कार्यनितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये धाडसी वृत्ती निर्माण होते. तसेच त्यांच्या कलागुणांचा विकास होतो.

5. कथा पुर्ण करणे: (Completing Stories)
प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयातील घटकावर आधारित कथा देवून त्यातील रिकाम्या जागा भरण्यास सांगितले जाते व यातून दिलेली कथा पूर्ण करण्यास सांगितले जाते. या अध्यापनाच्या कार्यनितीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या कक्षा रुंदावतात. तसेच वेगवेगळ्या दृष्टीकोनातून तार्किक विचार करतात. त्यामुळे त्यांच्या विचारांची प्रगल्भता वाढते.
 
6. बहुमाध्यम सादरीकरण (Multimedia Presentation)
शिक्षकांनी त्यांच्या अध्यापनामध्ये बहुमाध्यम संचाचा वापर करावा. यामुळे अध्ययनातील क्लिष्ट संकल्पना विद्यार्थ्यांना पटकन आत्मसात होण्यास मदत होते. तसेच या कार्यनितीमुळे विद्यार्थ्यांना नेमके मार्गदर्शन करता येते.
7. आंतरक्रियात्मक अध्यापन (Interactive Teaching) : 
आंतरक्रियात्मक अध्यापनामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांच्या आंतरक्रिया घडून येते. त्यामुळे शिक्षकांना मार्गदर्शन करण्यास सोपे जाते. या कार्यनितीमध्ये विद्यार्थी क्रियाशील राहतात. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे योग्य निरसन केले जाते.

8. क्षेत्रीय भेट (Visit to work place)
भूगोल, इतिहास, मराठी यासारख्या विषयांचे अध्ययन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटीतून दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्याची त्या विषयातील अभिरूची वाढते. या कार्यनितीचा अवलंब केल्याने विद्यार्थ्यांनी केलेले अध्ययन त्यांच्या दीर्घकाल स्मरणात राहते. क्षेत्र भेटीतून योग्य ते मार्गदर्शन होवून प्रत्यक्ष अनुभव मिळतो.

9. प्रकल्प: (Projection)
विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाशी संबंधित प्रकल्प करण्यास सांगणे. यामधून विद्यार्थी गट कार्य करतात व त्यातून त्यांच्यामध्ये एकजुटीची भावना निर्माण होवून समायोजन क्षमता वाढते. तसेच या कार्यनितीच्या अवलंबाने विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांची वाढ होते. विद्यार्थी क्रियाशील बनतो व त्याचा वैयक्तिक विकास होण्यास मदत होते.

10. भुमिकापालन : (Role play) व्यवसाय, आरोग्य व अभ्यासक्रमाशी संबंधित विविध घटकावर आधारित भुमिकापालन या कार्यनितीचा वापर केला जातो. भुमिकापालन या कार्यनितीमध्ये विद्यार्थी दिलेल्या भुमिका पार पाडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयाशी संबंधित योग्य ते मार्गदर्शन मिळते. या अध्यापनाच्या कार्यनितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाविषयी अभिरूची निर्माण होते.
अशाप्रकारे वरील स्पष्टीकरणावरून असे दिसून येते की, शिक्षक शिक्षणामध्ये भविष्यकाळाच्या दृष्टीकोनातून अनेक अध्यापनाच्या कार्यनितीचा अवलंब केला जातो व विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार, गरजेनुसार योग्य ते मार्गदर्शन केले जाते.

Monday, 8 July 2024

मौजे वडगांव येथून पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

हेरले (प्रतिनिधी ) 

मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथून ह. भ . प. प्रकाश वाकरेकर (महाराज ) व ह.भ.प. अरविंद जाधव (महाराज ) यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त मौजे वडगांव व संभापूर येथील वारकरी सांप्रदयातील बांधवानी श्रीक्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान केले. गावातील मुख्य रस्त्यावरून टाळ व मृदंगाच्या गजरात विठ्ठल रखुमाई मारुती मंदिरात एकत्र जमा होऊन गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच, सदस्य तसेच भविकांच्या कडून निरोप देण्यात आला. यावेळी ह. भ. प. प्रकाश वाकरेकर( महाराज ) म्हणाले की, मौजे वडगांव व संभापूर या दोन्ही गावातील मिळून शंभरहून अधिक वारकरी या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला आहे. या दिंडी सोहळ्याचे यंदाचे १० वे वर्ष असून प्रत्येक वर्षी दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
        यावेळी दिंडी चालक हभप प्रकाश वाकरेकर ( महाराज ), अरविंद जाधव ( महाराज ), प्रभाकर पाटील , आण्णासो थोरवत, तुकाराम झांबरे, बाळासो चौगुले, भिमराव कांबरे,मालन गरड, संगिता तेली, कल्पना लोखंडे , तर संभापूर येथील नितिन मोहिते , प्रविण मेथे, पोपट पाटील, अशोक झिरंगे , सुरेखा पाटील, वर्षा झिरंगे, यांच्यासह वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ व भक्त मंडळी उपस्थित होते.

Friday, 5 July 2024

शाळा हे सरस्वतीचे मंदिर आहे ."- माधुरी लाड -मा नगरसेविका.


प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 मध्ये माजी नगरसेविका माधुरी लाड सुभाष बुचडे संदीप नेजदार,सचिन चौगले, सुनील पोवार,अशोक जाधव ,अनिकेत चौगले,सद्दाम मुजावर, निशिकांत कांबळे व केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त च्या वह्या वाटप करण्यात आल्या .

प्रसंगी शाळा हे सरस्वतीचे मंदिर आहे.मंदिरामध्ये मनोभावे ज्ञानसाधना करावी .आपले आईवडील आपल्यासाठी कष्ट करतात त्यांचे विचार संस्कार चांगले शिकून मोठे व्हावे व देशाची सेवा करावी असे आवाहन विद्यार्थ्यांना नगरसेविका माधुरी लाड यांनी केले.
शिक्षक हेच खरे समाजाचे शिल्पकार आहेत त्यांच्या गुणवत्तेचा फायदा पालक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले .

महाराष्ट्र राज्य शासकीय स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये शिवम शिवतेज बाजारी हा जिल्ह्यात पंचविसावा आल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते वर्ग शिक्षिका आसमा तांबोळी ,प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय विद्यार्थी आल्याबद्दल वर्गशिक्षिका विद्या पाटील, तमेजा मुजावर, मिनाज मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला तसेच कोल्हापूर टॅलेंट सर्च परीक्षेत विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्याबद्दल वर्गशिक्षक उत्तम पाटील, सुशील जाधव, उत्तमराव कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.

 शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉक्टर अजितकुमार पाटील यांनी शैक्षणिक धोरणाला न्याय द्यायचं काम आमचे शिक्षक अहोरात्र करत आहेत त्यासाठी पालक व शिक्षक एकमेकांच्या जुटीने सहकार्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहेत यांचे श्रेय संपूर्ण पालक व शिक्षक यांना आहे कारण शिक्षक व पालक यांच्या समन्वयनातूनच एकविसाव्या  शतकाला न्याय देणारा जो उद्याचाआदर्श नागरिक आहे तो विद्यार्थी सक्षम बळकट आणि कार्य कुशल बनणार आहे असे मनोगत व्यक्त केले.
 शाळेच्या विद्यार्थ्यांनी माझी वसुंधरा उपक्रम अंतर्गत झाडांचे वृक्ष संवर्धन करण्याची शपथ घेतली त्यासाठी दिपाली यादव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार, दीपाली चौगले, अनुराधा गायकवाड, शितल पाटील, राहुल भोसले, अभिजित जाधव,आनंदा करपे,मयूर दाभाडे,बजरंग रणदिवे, नीलम पाटोळे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील उपमुख्याध्यापिका सावित्री काळे, हेमंतकुमार पाटोळे माता पालक संघाचे सदस्य यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रम यशस्वी  झाल्याबद्दल आभार सुनील पोवार यांनी मांनले.

Wednesday, 3 July 2024

दि.६ जुलै २०२४ चा शैक्षणिक व्यासपीठाचा मोर्चा स्थगित



    कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक १५ मार्च २०२४ रोजी घेतलेला संचमान्यतेचा निर्णय चुकीचा व शिक्षण क्षेत्रावर अन्याय करणारा आहे . हा आदेश संपूर्ण शिक्षण क्षेत्रच उध्वस्त करणारा असल्याने त्या विरोधात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शनिवार दिनांक  ६ जुलै २४ रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर जिल्ह्यातील सर्व  प्राथमिक, माध्यमिक, खाजगी व महापालिका  प्राथमिक शिक्षक ,सेवक , मुख्याध्यापक, संस्थाचालक यांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु   जिल्हा दंडाधिकारी यांनी दिनांक १४ जुलै २०२४ पर्यंत मोर्चा व आंदोलनास बंदी आदेश जाहीर केल्यामुळे आपल्या मोर्चास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.त्यामुळे कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने काढण्यात येणारा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने हा आदेश रद्द केला नाही तर  त्या विरोधात  यथावकाश मोर्चा काढला जाईल.आपणास त्या बाबत योग्य वेळी निश्चित कळवले जाईल .आपण सर्वांनी मोर्चा संदर्भात जी सहकार्याची भूमिका घेतली होती त्याच पद्धतीने भविष्यात सहकार्य मिळावे ही अपेक्षा.अशी माहिती प्रसिध्दीस शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूरचे अध्यक्ष एस.डी.लाड व मुख्याध्यापक संघ कोल्हापूरचे चेअरमन राहुल पवार यांनी दिली.

Tuesday, 2 July 2024

आपला आहार आणि आपला परिसर - - डॉ अजितकुमार पाटील,कोल्हापूर.


आपण आपल्या आहारात काय जेवतो हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच कसे जेवतो, केव्हा जेवतो, हे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. केवळ समतोल आहार घेण्याने आपल्या आहाराचे सगळे प्रश्न सुटले असे होत नाही. यातला एक महत्त्वाचा प्रश्न आपण कोठे जेवतो, तो परिसर कसा आहे याचा विचार आपल्या खाण्यापिण्याशी, तसेच पचनाशी व इतर आरोग्याशीही संबंधित आहे.
" स्वच्छ हवा पाणी,आरोग्याची गुरुकिल्ली "असे आपण म्हणतो हे खरे पण आपण जो आहार घेतो तो परिसर स्वच्छ हवा, हे काही मुद्दाम सांगण्याची गरज नसते. तथापि, अनेक वेळा माणसे आपल्या घराबाहेर अन्नपदार्थांचे सेवन करतात. काही वेळा तशी गरज असते. बहुतेक वेळा काही बदल म्हणून तर कधी कधी केवळ जिभेचे चोचले पुरविण्याकरिता, तर कधी केवळ तसे करणे म्हणजे आपल्या मित्र-मैत्रिणींत बोलण्याचा विषय असावा म्हणून बाहेरचे खाणे होते. 'परान्नम् प्राप्य दुर्बुद्धे मा प्राणांसि दया कुरू। दुर्लभानि परान्नानि प्राणाः जन्मनि जन्मनि ।।' याचा अर्थ परान्न (घरी न शिजवलेले, बाजारचे किंवा मिळेल तिथले चवदार अन्न) खावयास मिळाले तर हे मंदमतीच्या माणसा, सोडू नकोस. हे करताना तुझ्या प्राणावर बेतले तरी चालेल. कारण प्राण तर काय दर जन्माला मिळणार आहेच, पण असे (फुकटचे, चवदार) परान्न मिळणे मोठे कठीण असते बाबा!

 या सुभाषिताचा आधार घेणारी माणसे जागोजागी रस्त्यावर, चौकात,वेगवेगळ्या चौपाटीवर,विविध सार्वजनिक बागांच्या बाजूला,भाजीपाला मार्केट, रेल्वे स्थानकांच्या बाजूला, पर्यटनस्थळी, एसटी बस थांब्याच्या बाजूला मिळेल त्या आहाराचा उपभोग घेताना दिसतात. हे अन्न शिजवण्यापूर्वी तरी चांगले ताजे सकस होते का? त्यात वापरलेले तेल आधी किती वेळा उकळलेले असेल ? अन्न ज्या भांड्यात शिजवले गेले असेल ती भांडी स्वच्छ होती ना? स्वयंपाक करणाऱ्याने आपले हात स्वच्छ धुतले असण्याची किती शक्यता आहे? ज्या ठिकाणी आपण हे अन्न घेत आहोत तेथे कचरापेटी, उघड्या नलिका, प्राणी व क्वचित मानवाच्या मलविसर्जनाच्या जागा आहेत का? तेथून या अन्नावर येणाऱ्या माश्या,मच्छर व आसपास झुरळे असतील का? आपल्याला ज्या बशीतून  अन्न देतात किंवा  हे अन्न घेतो आहोत ती तरी स्वच्छ आहे, का एका बादलीतल्या पाण्यात बुचकळून काढलेली आहे? अन्न देणाऱ्याचे हात कसे असतील? आपले स्वतःचे तरी हात स्वच्छ आहेत ना? असे अनेक प्रश्न खाणाऱ्यांच्या मनात येतात किंवा कसे हे कळण्यास मार्ग नाही.
एवढे मात्र खरे, की अशा अन्नसेवनातून होणारे आजार पाहिले म्हणजे हे प्रश्न पडत नसावेत, असे वाटते. साधे पोट बिघडणे किंवा अपचनापासून विषमज्वर, कावीळ, अमिबिक, डिसेंट्री, बॅसिलरी डिसेंट्री, पोलिओ मायलायटिस, पॅराटाय- फॉइड, लहान मुलांना व्हायरसमुळे होणारे जुलाब, जियार्डियासिस, पोटातील विविध प्रकारचे जंत - राउंड वर्क्स, व्हिप वर्क्स, थ्रेड वर्क्स आणि हायडाटिड डिसीज (जो सहसा यकृतात होतो) असे अनेकविध जीव घेणारे रोगजंतू अशा अस्वच्छ खाण्यातून व पाण्यातून आपल्या शरीरात जातात. विषमज्वर, पॅराटायफॉइड या आजारांवरून आपल्याला सामाजिक स्वच्छतेची कल्पना येऊ शकते. युनायटेड किंग्डममध्ये दर दहा लाख लाकसंख्येत प्रतिवर्षी विषमज्वराची एक केस आढळते. ती देखील परदेशांतून तेथे स्थायिक होण्यात आलेल्यातच बहुतेक वेळा असते. भारतीय आरोग्य सर्वेक्षणात असे आढळून आले आहे, की वेगवेगळ्या भागांत विषमज्वराची लागण कमी-जास्त प्रमाणात होते. हा आजार केवळ माणसाच्याच मलाने प्रदूषित झालेले पाणी प्यायल्याने होतो, हे पाहिल्यावर ज्या लोकांना घराबाहेर खाण्यावाचून गत्यंतर नाही, त्यांनी शक्यतो स्वच्छ परिसर निवडून आपल्यासमोर भाजलेले (पोळी, भाकरी) अन्न घ्यावे. ज्या फळांची साल आपण स्वतः काढून खाऊ शकतो, अशी फळे निवडून घ्यावीत. पाण्यात बर्फ घालून घेऊ नये. ज्यांना असे खाणे आवश्यक नाही त्यांनी बाहेर खाऊन आजाराला आमंत्रण दयावे किंवा देऊ नये याचा विचार करावा.आपल्या घरामधील आपली जेवणाखाण्याची जागा व परिसर महत्त्वाचा असतो. टीव्ही पाहण्याची जागा व खाण्याची जागा एकच नसावी. विशेषतः शाळा-कॉलेजमधील मुलांना याची जाणीव करून देणे आवश्यक वाटते. वेळी-अवेळी टीव्ही पाहणे, तो पाहत असताना विविध पदार्थ भले घरी केलेले आणि स्वच्छ असले, तरी ते रोज खाणे प्रकृतीला हानिकारकच असते. ऑफिसमधून दमून घरी आल्यावर टीव्ही पाहत चहा व सोबत असले पदार्थ खाल्ले तर रात्रीचे जेवण कसे जाईल ? दिवसभर शाळेत पाणी न पिण्यामुळे तहानलेली मुले घरी आल्यावर समोर दिसेल ते पेय गटागट पिऊन टाकतात. मग सकस अन्न घेण्यास भूक शिल्लक राहत नाही. शाळेतून मूल घरी येण्यापूर्वीच त्याचे खाणे व जमल्यास दूध तयार असेल तर हा प्रश्न येणार नाही. चहा-कॉफी, टीव्ही समोर खाणे खात राहण्याने आरोग्याचे नुकसान होते. टीव्ही पाहत असताना आपण काय खातो आहोत? किती पाणी पितो आहोत याचे भान राहणे कठीणच. अशा बेताल खाण्याने व केवळ बसून राहण्याने मेदवृद्धी न झाली तर नवलच. हृदयविकार व रक्तदाबाला हे आमंत्रणच आहे. मधुमेह ताब्यात येणे कठीणच होणार. त्यातून गुडघे दुखणे, पाठीच्या मणक्यांचे आजार, पित्ताशयातील खडे, हायटस हार्निया असे विकार वाढणार. हे सगळे टाळायचे तर टी. व्ही. समोर बसून खाणे-पिणे,मालिका पाहणे,क्रिकेट पाहणे हे थांबवले पाहिजे. तशी शिस्त कुटुंबप्रमुखाला स्वतःला हवी. इतर कुटुंबातील घटकांना ती लावण्याची जबाबदारी पालकांनी पार पाडली पाहिजे.

" मन करा प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण , तुका म्हणे " 

जेवणघरातील वातावरण फार महत्त्वाचे असते. जेवताना मन प्रसन्न राहील असे वातावरण असणे आवश्यक असते. स्वच्छ परिसरात शांतता असणे जरुरीचे असते, मोठा रेडिओ किंवा टीव्ही लावला आहे, माणसे एकमेकांशी उगाचच मोठ्या आवाजात बोलत आहेत, भांडीकुंडी आपटल्याचे कपबश्या फुटण्याचे आवाज येत आहेत, रस्त्यावर रहदारीचे आवाज येत आहे. अशा वेळी आपल्या स्वतःच्या घरी शांत बसून जेवणे दुरापास्तच होते. जेवताना बोलायचा विषय माणसाचे मन प्रसन्न राहील असा असावा. नर्म विनोदी संभाषण असावे. जेवणाची सुरवात सहनाववतु। सहनौभुनक्तु।। सहवीर्यंकरवावहै। तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम् शांतिः शांतिः शांतिः ।। असा कठोपनिषदातील श्लोक म्हणण्याने मनातले इतर ऐहिक विचार जाण्यास मदत होते. 'वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरचे । सहज हवन होते नाम घेता फुकाचे। जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह। उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।।' असा साधा श्लोकदेखील हेच काम करतो. अशा प्रसन्न वातावरणात, शांत परिसरात केलेले जेवण हेच खरे यज्ञकर्म असते, असा आशय यातून आपल्या मनात येतो. जेवताना सावकाश जेवावे. कारण अन्न नीट चावल्या शिवाय लाळेतील टायलिन नावाचा पाचक रस आपल्या घासात पूर्णपणे मिसळला जात नाही. तो मिसळल्याखेरीज अन्नातील पिष्टमय पदार्थांच्या पचनास सुरवात होत नाही. शिवाय अन्नाची गोडी नीट समजत नाही. जेवताना किंवा जेवणापूर्वी मन अस्वस्थ झाले तर केवळ लाळच नव्हे, तर जठर व लहान आतड्यातील पाचक रस तयार होण्यात मोठा अडसर निर्माण होतो. लाळ न आल्यामुळे तोंड कोरडे पडते. घास पाण्याबरोबर ढकलला जातो. पाण्याने पोट भरते. पोट फुगते. अन्नाची चव न कळताच घेतलेले अन्न कसेबसे दोन-चार घासच सेवले जाते. जे जेवले जाते ते पचत नाही. जेवणापूर्वीच खूप पाणी प्याले असेल, त्याचबरोबर इतर चमचमीत, खारवलेले, तळलेले खादयपदार्थ यथेच्छ खाण्यात आलेले असतील किंवा सोबत काही खाणे होत असेल, तर जेवण हा एक उरकून टाकण्याचा विधीच होतो. जेवताना स्वयंपाकाचे गुणगान करणे हे केवळ पाहुण्यांचे नव्हे, तर कुटुंबीयांचे महत्त्वाचे कर्तव्य असते, याचा विसर पडून एखाद्या पदार्थातील क्षुल्लक अभाव हाच चर्चेचा विषय बनतो. हे कटाक्षाने टाळणे आहारगृहातील वातावरण चांगले ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.

आहारातील अन्नघटकांचा स्वाद चांगला यावा याकरिता ते गरम वाढण्याचा, गरम असताना खाण्याचा प्रघात आहे. हे स्वाददेखील पाचक रस तयार होण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. ताजे व गरम अन्न घेणे या दृष्टीने आदर्श आहे. ते केवळ सकाळी केलेले आहे म्हणून संध्याकाळी त्याज्य होत नाही. आता शीतपेट्या व मायक्रोवेव्ह, ओव्हन घरोघरी आहेत. तेव्हा तसा शिळेपणा अन्नाला नसतो. बाहेरच्या अन्नात शिळे अन्न असू नये. कारण अन्नावर जिवाणू व बुरशी वाढली असली तरी अपायकारक असते. ते सेवण्यापूर्वी पुन्हा तेवढेच गरम केले तर हा धोका जातो. त्यातल्या त्यात उकळण्यापेक्षा तव्यावर भाजण्याने तापमान अधिक होऊ शकते.

कारण उकळताना १०० अंश सेल्सिअस एवढेच तापमान वाढू शकते. प्रेशरकुकरने तापमान वाढू शकते. तेलात तळताना त्यापेक्षाही जास्त मिळते. तव्यावर भाजताना लोखंडी तवा २५० अंश सेल्सियसपर्यंत सहज तापतो, तर प्रत्यक्ष विस्तवावर किंवा ज्वाळेत खूपच जास्त (६०० अंश सेल्सियसपेक्षा जास्त) तापमान मिळते. इतक्या तापमानात विषाणू-जिवाणू किंवा बुरशी जगू शकत नाहीत. कच्चे अन्न कोशिंबिरीसारख्या पदार्थांतून घेणे जरुरीचे असते, त्याच्याबद्दल स्वच्छतेचा विचार आपण प्रथम केलेला आहेच. शिवाय बऱ्याच कच्च्या पदार्थांत पाचक द्रव्ये परिणामकारक न होण्याचे गुणधर्म असतात, याचाही जाणीव ठेवणे जरुरीचे असते.
पावसाळ्यात यामधील महत्त्वाचे विषय म्हणजे याबद्दल जागरुकता आपण ठेवली पाहिजे हे महत्वाचे आहे.

( लेखक मराठी विज्ञान साहित्याचे पीएच डी आहेत.) डॉ अजितकुमार पाटील, केंद्रमुख्याध्यापक,कोल्हापूर.

Monday, 1 July 2024

कोजिमाशि पतसंस्थेस ४ कोटी ८७ लाखांचा नफा तरठेवीचा सहाशे कोटीचा टप्पा पूर्ण


कोल्हापूर / प्रतिनिधी
 कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कोजिमाशि पतसंस्थेस ३१ मार्च २०२४ अखेर निव्वळ नफा ४ कोटी ८७ लाख व मार्च अखेर संस्थेने ठेवीचा ६०० कोटीचा टप्पा पूर्ण केला आहे. या आर्थिक वर्षात सभासदांना  उच्चांकी लाभांश दिला जाणार आहे.अशी माहिती संस्थेच्या प्रधानकार्यालय येथे पतसंस्थेचे चेअरमन श्री उत्तम पाटील सर व तज्ञ संचालक श्री दादा लाड सर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. ते पुढे म्हणाले पतसंस्थेवरील सभासद व ठेवीदारांच्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे. 
                      कोजिमाशि पतसंस्थेस ३१ मार्च अखेरचा लेखाजोखा नुकताच सादर करण्यात आला. शिक्षक नेते व संस्थेचे तज्ञ संचालक श्री दादासाहेब लाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची अर्थिक घोडदौड सुरू असून वाढती कर्ज मागणी व ठेवीचा तेवढाच ओघ हे सभासद व ठेवीदार यांच्या विश्र्वासाचे प्रतिक आहे. ३१ मार्च २०२४ अखेरीस संस्थेने ४८४ कोटी १३ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. गुंतवणूक २२८ कोटी २ लाख, निधी ४४ कोटी ३२ लाख, शेअर्स २८ कोटी  ४३  लाख . तसेच मयत सभासदांची कर्जमाफी १४ कोटी ६ लाख रुपयांची करण्यात आली आहे. एकूण कर्ज मर्यादा ४२ लाख असून सभासद कर्ज १० टक्के दराने आहे. त्याचबरोबर १ जुलै २०२४ पासून ९ टक्के व्याजदराने तातडीचे २ लाख रुपये कर्ज वाटप सुरू केले आहे. 
             दरवर्षी सभासदांच्या यशवंत व गुणवंत पाल्यांचा सत्कार , कन्यादान साडीसाठी व कन्याजन्म स्वागतासाठी संस्थेमार्फत धनादेश व ठेवपावती तसेच सभासद कल्याण निधीतून वैद्यकीय कारणासाठी सभासदांना आर्थिक मदत केली जाते. 
             संस्थेकडे प्रधान कार्यालयासह ११ शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत. सर्व शाखामध्ये संगणीकृत,सीसी टिव्ही कक्षेत व एस. एम.एस.सुविधा आहेत. संस्थेमध्ये लवकरच कोअर बॅकिंग सेवा सुरू होत आहे. 
                      आपत्ती ग्रस्त सभासद  व शाळांना आधार भेट वाटप करण्यात आले आहे . संस्था सुवर्ण महोत्सव प्रसंगी सभासदांना प्रवासी बॅग व शाळांना वॉल क्लॉक भेट दिलेली आहे. यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन श्रीकांत कदम ,सीईओ जयवंत कुरडे व सर्व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.