कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ज्या लोकांचे रेशन कार्ड नाही अशा 10 हजार कुटुंबांना आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून धान्य वाटप करण्यात येणार आहे. यातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी ५ किलो गहू आणि ५ किलो तांदूळ देण्यात येत आहे. दक्षिणच्या शहरी भागात धान्य वाटप सुरू केले असून येत्या आठवड्यात मतदारसंघात हा उपक्रम पूर्ण करणार आहे, असे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटकाळात आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नगरसेवक, सरपंच ,प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी सतत संपर्क ठेवला आहे.लोकांच्या नेमक्या अडचणी जाणून घेत त्यावर शासन स्तरावर तसेच वैयक्तीक स्तरासर आ.पाटील उपाय करत आहेत.मतदारसंघात अंत्योदय , प्राधान्य गट तसेच बीपीएल रेशन कार्डधारकांना नेहमीप्रमाणे गहू , तांदूळ मिळाले आहेत.त्याचप्रमाणे केंद्राकडून या कार्डधारकांना मोफत तांदूळ मिळाला आहे. केशरी कार्डधारकांना या महिन्याच्या अखेरीस मे महिन्याच्या कोट्यातील धान्य द्यायचे नियोजन पुरवठा विभागाने केले आहे.पण मोलमजुरी,रोजंदारी तसेच हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबाकडे रेशन कार्ड नसल्याने त्यांना धान्य मिळणार नाही. या लोकांना आधार देणे गरजेचे होते.
या सर्व गोष्टींचा विचार करून आमदार ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील आणि डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील,सौ.प्रतिमा पाटील यांच्याशी चर्चा करून धान्यवाटप उपक्रम राबविला आहे.सध्या दक्षिणच्या शहरी भागात नगरसेवक तसेच भागातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हे धान्य या गरजूंना देण्यात येत आहे.त्यानंतर ग्रामीण भागातही रेशनकार्ड नसलेल्या लोकांना धान्य वाटपाचे नियोजन केले आहे.
याबाबत आ.ऋतुराज पाटील यांनी सांगितले की, दक्षिण मतदारसंघातील खाजगी डॉक्टरना एक हजार पीपीई किट दिली आहेत.यामुळे आरोग्यसेवा सुरळीत सुरू झाली आहे. त्याचा फायदा डॉक्टर तसेच रुग्णांना होत आहे.व्हाईट आर्मी, आयसोलेशन मधील कम्युनिटी क्लिनिकमधील डॉक्टर यांनासुद्धा किट दिली आहेत. आता रेशन कार्ड नसलेल्या लोकांना धान्य दिल्याने या लोकांना दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या संकटात सामाजिक बांधिलकी ठेऊन दक्षिण मधील जनतेला मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही आ.पाटील यांनी सांगितले.