अडुळसा औषधी उपयोग
अडुळसा वनस्पतीच्या पानात व्हॅसिसीन अल्कीलॉईज असते. क्षयरोग, कफ, दमा, अस्थमा, खोकला या विकारांसाठी अडुळसा रामबाण म्हणून वापरला जातो. कफावर ज्यात फार दिवस खोकला येतो, बारीक ताप येतो तेव्हा दहा ग्रॅम म्हणजे चार चमचे रस व तितकाच मध व चिमूटभर पिंपळीचे चूर्ण एकत्र करून हे चाटण वरचेवर घेत राहावे. कफ मोकळा होतो व बरे वाटते. धाप लागणे, दमा यावरदेखील अडुळसा वापरला जातो. नाकातून, तोंडातून रक्त येत असेल तर पानांचा रस समभाग खडीसाखर घालून देतात. अडुळशाच्या फुलांचा अवलेह रक्त पित्त कमी करण्यासाठी वापरतात. पानांचा रस किंवा काढा मधाबरोबर आवाज बसला असता उपयुक्त असतो. आम्लपित्त, तापामध्ये आणि त्वचारोगामध्ये पंचतिक्ताचा (अडुळसा, काटेरिंगणी, कडुनिंब साल, गुळवेल, कडूपडवळ) काढा आणि सिद्धघृत दोन वेळा देतात. घरगुती वापर होताना तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
हल्लीच्या धावपळीच्या युगात ज्यांना वरील क्रिया शक्य नाही त्यांनी अडुळसा कफ सायरप घेतले तरी चालते , अडुळसा कफ सायरप कोणत्याही औषधी दुकानात सहज मिळते आणि ऍलोपॅथी कफ सायरप च्या तुलनेत कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत ,लहान मोठ्यांना पूर्ण सुरक्षित आहे .