कंदलगाव - प्रकाश पाटील
करवीर तालुक्यातील कोणताही रस्ता असो वरिष्ठांचा आदेश मिळताच त्या रस्त्यावरचा खड्डा भरणेसाठी तत्परसेवा देणारे पंचायत समिती बांधकाम विभागा कडील शिवराम मामा...
दिंडनेर्ली ता.करवीर येथील शिवराम भाऊ पाटील हे वयाच्या सतराव्या वर्षी करवीर पंचायत समितीकडील बांधकाम विभागाकडे मैल कामगार म्हणून १९७५ साली सेवेत रूजू झाले. तेंव्हापासून आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून तालुक्यातील अनेक गावच्या रस्त्याशी आपले नाते घट्ट करून रस्त्यावरचे खड्डे भरू लागले.
इंगळी, कोडोली, निगवे खा॥, कळंबा असो वा पाचगाव, कंदलगाव या सह इतर गावामध्ये सायकल वरून जाऊन रस्त्यावर पडलेले खड्डे व पावसाळ्यात साईट पट्टीवर चर मारून रस्त्यावर पाणी साचू न देणे असे त्यांचे काम असायचे. जिल्हा परिषद अखतारीतील सर्व रस्त्यांची देखभाल दुरुस्ती, गटर काढणे, झाडे झुडपे तोडणे, रस्ता सुस्थितीत ठेवणे, पावसाळ्यात पडलेली झाडे तोडून रस्ता वाहतूकीसाठी रिकामा करणे यासारख्या कामात मग्न राहून आपली सेवा इमानदारीने पार पाडल्याने सेवानिवृत्ती होऊनही एखादे काम आडले तर मामांना वरिष्ठांचा फोन जातोच.
त्रेचाळीस वर्षे सेवेच्या कारकिर्दीत विभागातील सर्व वरिष्ठांनी त्यांना कधीही एकेरी नावाने हाक मारली नाही. कामावरचे प्रेम आणि निष्ठा यामुळे शिवराम पाटील सर्वाचेच मामा बनले होते. घरची जेमतेम शेती त्यातच आशा कामामुळे धावपळ करून आपले काम पूर्ण करण्याची ओढ त्यांना लागलेली असायची. दिड वर्षापूर्वी सेवानिवृत्त होऊनसुद्धा आजही ते रस्त्यावरचा खड्डा विना मोबदला भरून वाहतूकीचा अडथळा दूर करतात.
बांधकाम विभागाकडून सन्मान..
वरिष्ठांचा आदेश मिळताच विलंभ न करता कामाच्या ठिकाणी हजर राहून आपले काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल पंचायत समितीकडून उत्कृष्ट कामगार म्हणून निवड, तसेच यशवंत अभियान पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
- मी २०१९ ला सेवानिवृत्त झालो. पण आज हि कुठल्या रस्त्यावर खड्डा पडला हे सांगू शकतो. वरिष्ठांच्या व सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांमुळे हे साध्य झाले असून निवृत्ती नंतरही काम करण्याची इच्छा आहे.
शिवराम पाटील.
फोटो -शिवराम पाटील .