कोल्हापूर प्रतिनिधी संदिप पोवार :- मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न ठेवणाऱ्या कारणासाठी किराणा दुकानदार, मेडिकल,बेकरी स्वीट मार्ट, भाजीपाला विक्रेते आणि नागरिक अशा एकूण ८७ जणांवर आज कारवाई करुन २६ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि मास्कचा सक्तीने वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डाॕ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.
याबाबत उल्लंघन करणाऱ्या मंगळवार पेठ, महाद्वार रोड, रंकाळा परिसर, मुक्त सैनिक वसाहत, संभाजीनगर, फोर्ड काॕर्नर, लक्ष्मीपुरी परिसरात कारवाई करत ८७ जणांना २६ हजार ६०० रुपयांचा दंड केला.
सर्वांनी सक्तीने मास्क वापरले पाहिजे, असे आवाहन करुन आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, भाजी विक्रेत्यांनी मास्कसह हातमोजेही वापरले पाहिजेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. विक्रेते, नागरिकांनी नियमांची गंभीर दखल घ्यावी. उद्यापासून आणखी पथके वाढवून ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी दिला आहे.