Monday, 28 March 2022

शिक्षक संघ जिल्हा महिला आघाडी कडून जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिला शिक्षिकांचा यथोचित सन्मान


कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांनी विविध उपक्रमशिलता जपत, काळाची पावले ओळखत तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर आपल्या अध्यापणात करत समाजात जिल्हा परिषदेच्या शाळाविषयी सन्मान प्रस्तापित केला आहे .महिला शिक्षिका अत्यंत कष्टाने जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देत आहेत.त्यांचा हा सन्मान म्हणजे संपूर्ण नारिशक्तीचा सन्मान आहे असे प्रतिपादन लेखिका अभिनेत्री अंजली अत्रे यांनी केले. 
       जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे म्हणाल्या
कोल्हापूर जिल्हा परिषद शैक्षणिक गुणवत्तेमध्ये राज्यात अग्रेसर आहे. जिल्ह्यातील शिक्षकांनी राज्यात शिष्यवृत्ती परीक्षेत नावलौकिक मिळवून दिला आहे. जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक पुरस्कार देण्यात मर्यादा येतात पण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडीने जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या महिला शिक्षिकाना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानीत केले हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. 
    महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी यांच्या वतीने आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे व बालसाहित्यक,अभिनेत्री अंजली अत्रे उपस्थित होत्या.
    उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे म्हणाल्या, महिलांनी सर्वच क्षेत्रात पुढे येऊन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावीत. प्रथम स्त्री म्हणून स्वतःला सन्मान द्या मग तुम्हाला समाजात सर्वजण सन्मान देतील.
    जिल्हाध्यक्ष लक्ष्मी पाटील म्हणाल्या,
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अनमोल मोती घडविणाऱ्या पण कधीही प्रकाश झोतात न आलेल्या सावित्रीच्या लेकींचा सत्कार हा संपूर्ण जिल्ह्यातील महिला शिक्षिकांचा सत्कार आहे.
 महिला आघाडीच्या वतीने जिल्ह्यातील ७० महिला शिक्षिकाना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सन्मानपत्र,मानचिन्ह उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे,शिक्षणाधिकारी आशा उबाळे, अभिनेत्री अंजली अत्रे,जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी जिल्ह्याध्यक्ष लक्ष्मी पाटील, रवीकुमार पाटील, रोहिणी लोकरे, राज्यसंपर्क प्रमुख एस व्ही पाटील अभिनेत्री अंजली अत्रे यांनी मनोगत व्यक्त केले.
   अभिनेत्री अंजली अत्रे म्हणाला,जिल्हा परिषदेच्या शाळांच्या बाबत असलेली जागरूकता व उपक्रमशीलता चांगली असून शैक्षणिक साहित्यातील समृद्धी व तंत्रसेवी शिक्षक ही बाब गौरवास्पद आहे.
     कार्यक्रमास राज्य उपाध्यक्ष आनंदराव जाधव,बाळासाहेब निंबाळकर, संभाजी पाटील,सरचिटणीस सुनील पाटील,सुरेश कांबळे,जीवन मिठारी,राजेश वाघमारे,रावसाहेब पाटील,सुनील एडके,किरण पाटील, तानाजी सनगर, जयसिंग पाटील, शिवाजी रोडेपाटील ,किरण शिंदे,जयवंत पाटील, सुनील चौगुले,महेश शिंदे,संगीता खिलारे,वंदना दळवी,वैशाली कोंडेकर, नुतन सकट, सोनाली परीट, अरुणा कोठावळे यांचेसह महिला शिक्षिका व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन गीता खोत यांनी केले.प्रकाश मगदूम यांनी आभार मानले.
     फोटो 
 आरती कृष्णकुमार देसाई यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान प्रसंगी लेखिका अंजली अत्रे,शिक्षणाधिकारी आशा उबाळे ,डेप्युटी सीईओ प्रियदर्शनी मोरे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पाटील, जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील जिल्हा सरचिटणीस,सुनील पाटील,राज्य संपर्क प्रमुख एस. व्ही.पाटील,राज्य उपाध्यक्ष ,बाळासाहेब निंबाळकर,

Friday, 25 March 2022

घोडावत पॉलीटेक्नीकच्या प्रा. संदीप वाटेगावकर यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान

कोल्हापूर / प्रतिनिधी
संजय घोडावत पॉलीटेक्निकचे प्रा.संदीप राजाक्का भास्कर वाटेगावकर यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठाकडून रसायनशास्त्र विषयामध्ये पीएच.डी. ही मानाची पदवी प्राप्त झाली. ''स्टडीज ऑन सिंथेसिस, प्रॉपर्टीज अँड ऍप्लिकेशन्स ऑफ डाय सेन्सिटाईझ्ड मिक्सड ट्रान्झिशन मेटल ऑक्साईड थीन फिल्म्स'' हा त्यांचा पीएच.डी.चा मुख्य विषय होता. यासाठी त्यांना त्यांचे पीएच.डी. मार्गदर्शक केआरपी कन्या महाविद्यालय, इस्लामपूर चे रसायनशास्त्र विभागाचे प्रोफेसर व विभागप्रमुख डॉ.आर.के.माने व जयसिंगपूर कॉलेजचे प्रोफेसर व एमएस्सी रसायनशास्त्र विभागाचे मुख्य समन्वयक डॉ.बी.एम.सरगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
बाजारात मिळणाऱ्या सिलिकॉन सौर घटाची किंमत जास्त असून सध्या तो सामान्य माणसाला परवडणारा नाही म्हणून डॉ. वाटेगावकर यांनी रासायनिक अभिक्रिया विकसित करून अधिक कार्यक्षम रंगमिश्रित सौर घटाची निर्मिती केली आहे. हा सौर घट ढगाळ वातावरणात देखील प्रकाश शोषित करून आपली कार्यक्षमता दर्शवतो. तसेच हा सौर घट सामान्यांना परवडणारा असून दुर्गम ठिकाणी देखील याचा वापर केला जाऊ शकतो असे मत डॉ.संदीप वाटेगावकर यांनी व्यक्त केले. आधुनिक पद्धतीचा हा सौरघट बनविण्यासाठी दक्षिण कोरिया चे शास्त्रज्ञ डॉ.सावंता माळी व डॉ.विनायक पारळे यांचे विशेष सहकार्य लाभले. हे संशोधन त्यांनी एल्सविअर च्या नामांकित अशा सिरॅमिक इंटरनॅशनल या टॉप जर्नल्स मध्ये प्रसिद्ध केले आहे.
डॉ. वाटेगावकर यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये ९ हुन अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत तर आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेमध्ये २० हुन अधिक ठिकाणी आपले संशोधन सादर केले आहे. त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेऊन त्यांना आत्तापर्यंत अमेरिका, दक्षिण कोरिया, इंग्लंड, स्वित्झर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया व फ्रान्स या देशांनी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये वक्ता म्हणून निमंत्रित केले आहे.  
त्यांनी शालेय शिक्षण जि.प. शाळा व बोरगाव हायस्कुल, उच्च माध्यमिक-विद्यामंदिर हायस्कुल, इस्लामपूर तर बी.एस्सी शिक्षण के.बी.पी. कॉलेज, इस्लामपूर याठिकाणी पूर्ण केले. यानंतर त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून एम.एस्सी रसायनशास्त्र व शिवाजी विद्यापीठातून आपले पीएच.डी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
याबद्दल बोलताना डॉ.वाटेगावकर म्हणाले '' सिलिकॉन सौर घट हे अतिशय महागडे आहेत व त्यामुळे आम्ही रासायनिक अभिक्रिया विकसित करून अगदी कमी खर्चात टिटॅनियम डायऑक्साइड हे सेमीकंडक्टर नॅनोमटेरिअल बनविले व त्यावर रुदेनिअम-७१९ या प्रभावी रंगाचे लोडींग केले. खर्च आणि कार्यक्षमतेचा विचार केल्यास रंगमिश्रित सौर घट हे प्रभावी आहेत. माझ्या यशात माझे आई वडील, पत्नी, मुलगी, मार्गदर्शक, मित्र परिवार व घोडावत मॅनेजमेंट चे सहकार्य लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी डॉ.आर.के.माने, आदी मान्यवर उपस्थित होते.

- photo 
डॉ. वाटेगावकर यांचा सत्कार करताना विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी, डॉ.आर.के.माने

Wednesday, 23 March 2022

शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा तारीख लवकर जाहीर करून परीक्षा एप्रिल महिन्यातच घ्याव्यात: शिक्षक सेनेची शिक्षणसंचालक यांच्याकडे मागणी


हेरले प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून प्रतिवर्षी पाचवी व आठवी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते .पण यावर्षी या परीक्षेच्या  संदर्भात अजूनही परिषदेकडून निश्चित तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे राज्यातील सदर परीक्षेसाठी बसणारे सर्व विद्यार्थी, त्यांना शिकवणारे शिक्षक व पालक संभ्रमावस्थेत आहेत. या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपला शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण करून सरावावर लक्ष केंद्रित केले आहे .पण परीक्षा केव्हा होतील याविषयी सर्वजण साशंक आहेत. तेव्हा लवकरात लवकर तारीख जाहीर करून एप्रिल महिन्याच्या आतच सदर शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा पार पाडावी, सर्व विद्यार्थी शिक्षक व पालक यांना आश्वस्त करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने आज शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना निवेदनाद्वारे केली .सदर मागणीचे निवेदन शिक्षक सेनेचे मार्गदर्शक श्री शिवाजी पाटील यांनी दिले .यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष  टी. आर. पाटील, शहर अध्यक्ष  स्नेहल कुमार रेळेकर, शहर कार्याध्यक्ष  प्रदीप जानकर उपस्थित होते. सदर मागणीचे निवेदन तात्काळ शिक्षण परिषदेकडे पाठवले जाईल असे आश्वासन शिक्षण उपसंचालक  महेश चोथे यांनी शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळास दिले.

    फोटो
 शिक्षक सेनेच्या वतीने शिक्षणसंचालक यांच्याकडे लेखी  निवेदनाद्वारे विविध मागण्या केल्याचे निवेदन शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना देतांना पदाधिकारी

पर्यावरण संवर्धन काळाची गरज - डॉ.अजितकुमार पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी 

अवनीने सुजनतेला प्रथम जन्म दिला मनुष्यरूपात ! परमेश्वराला वाटलं की या वसुंधरेला फुलवणारं चैतन्य इथे उमलावे, देवांचे व दैत्यांचे समान अंकुर रुजून, एका नंदनवनाची निर्मिती व्हावी, ज्याने या सागरांबरेला औदार्य शिकवावे, या क्षमेला, प्रेम, दया, शांती या जीवनमूल्यांचे बाळकडू पाजावे. पृथ्वीवर नंदनवन निर्माण करावे, हिरव्यागार मखमली सदाहरित वनांचा प्रसार सर्वत्र व्हावा आणि यासाठीच तर मनुष्याने जन्म घेतला आहे.
कावळा करतो कावकाव म्हणतो; माणसा झाडे लाव, एक तरी झाड लाव, असे म्हणतच आपण मोठे झालो या बालगीतातील बोध मात्र तेथेच विसरून गेलो. पर्यावरण हा शब्द आपणासाठी नवीन नाही, अगदी साध्या शब्दांत पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभवतीच्या वातावरणाची गोळाबेरीज, पर्यावरणाचा समतोल टिकविण्याचे काम निसर्ग करतो. जेव्हा निसर्गाच्या कार्यात माणसाचा नको तेवढा हस्तक्षेप वाढतो. म्हणजे हवा, पाणी, जमिनीचा नको तेवढा व नको तसा वापर होऊ लागतो तेव्हा पर्यावरणाचा समतोल बिघडतो. मानवाचे स्वास्थ्य हे पर्यावरणाच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते पर्यावरणाचे स्वास्थ्य बिघडले की आपले स्वास्थ्य बिघडते. आपल्या स्वास्थ्याची पर्यायाने पर्यावरणाची काळजी आपण स्वतःच घ्यायला हवी नाही का ? पूर्वादीकालापासून संतांनी स्वतःच्या साहित्यातून व वर्तनातून हा आपल्या पर्यावरणाचा समतोल तर सांभाळला आहेच व मार्गदर्शनही केले आहे.
"वृक्षवाली आम्हां सोयरे वनचरे ।
पक्षी ही सुस्वरे आळविती ॥
तेणे सुखे रूचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत असे ॥ म्हणणाऱ्या तुकोबांनी वृक्ष-वेलींना आपले सगे-सोयरे संबोधले आहे. पण झाडे आपल्याला आरोग्यदायी जीवन देतात कारण 'काळी माती हिरवी सोने' प्राणवायूचे हे कारखाने आपण काटकसर करून सोने विकत घेऊ, प्रतिष्ठा वाढेल सर्व काही मिळेल केव्हा ? "शिर सलामत तो पगडी पचास' आपण आरोग्याची मूर्ती असू तेव्हा त्या सोन्याचे तेज वाढले ना
आज धूर ओकणारी वाहने व त्यातील कार्बन त्याबरोबर इतरही अपायकारक घटकद्रव्ये ही आरोग्याला मारक ठरत आहेत. श्वसनांच्या रोगाचे प्रमाण वाढत आहे. शहराच्या दगदगीच्या जीवनात शांती मिळते कुठे माणूस ती शोधायला निसर्गरम्य परिसराकडे वळतो. पण अशी वृंदावने, बागा आहेत तरी किती ? यांचे प्रमाण इतके कमी का ? याचा थोडा जरी विचार माणसाने केला तर आढळून येते की शहरवासीयांनी टुमदार इमारती, मोठमोठे कारखाने, बांधकामे यांकरिता वृक्षांचा नाश केला वृक्षतोडीमुळे डोंगर बोडके झाले, रखरख वाढली, पाऊस अनियमित झाला व पर्यायाने पर्यावरणाचा निसर्गाचा समतोल बिघडला स्वच्छ हवेऐवजी प्रदूषित हवा. याशिवाय पर्याय राहिला नाही. याची जाण आता होऊ लागली आहे. ही एक रोगराई विरुद्धची लढाई आहे. धुरीकरणामुळे सातत्याने छळणारा खोकला हा आपण मित्र बनू न देता वेळीच वृक्ष तोड रोखली पाहिजे. आत्तापर्यंत झालेल्या गोष्टीबद्दल चिंता करीत बसण्यापेक्षा नव्याने वृक्ष लागवड करणे यातच शहाणपणा आहे. वेळीच जागा होणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे असा हा एककलमी कार्यक्रम अमलात आणणे गरजेचे आहे.
'दुर राहे पाषाणात तया चारा कोण देतो' म्हणणाऱ्या संत सेना महाराजांनी आपणाला प्रश्न केला आहे की जर खडकाखाली राहणाऱ्या बेडकाला आपण चारा देत नाही तर आपल्याला त्याला नष्ट करण्याचा अधिकार काय ? पर्यावरण दूषित करणारे कृमी, कीटक खाऊन बेडूक पर्यावरणाला मदत करतो तो मानवाचा मित्र ठरतो. 
वृक्षतोड झाल्याने प्राणीजीवनदिवाळीत होऊन त्यांना निवाऱ्याची उणीव भासते व काहीवेळेस त्यांचा शिरकाव शहरांमध्ये झाल्यास त्यासारखे भयास्पद ते काय? पाणी, हवा, प्राणी, वृक्ष या सर्वाचा हितकारी संगम म्हणजेच पर्यावरणाचा समतोल वृक्ष मानवाचा खरा मित्र आहे तो त्याला लागवड करून सांभाळ करणाऱ्याला आणि त्याचे तोडून तुकडे करणाऱ्यालाही आपली थंड सावली, शुद्ध हवा, फळे, फुले देतो तो कुणाबरोबरही दुजाभाव करीत नाही. ऊन, वारा, पाऊस, धूळ, कार्बनडायऑक्साईड सर्व काही सहन करून मानवाला पर्यावरणाच्या समतोलाचा व समतेचा संदेश देणाऱ्या वृक्षाबद्दल बोलताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जो खांडावया घावो घाली की लावणी जयाने केली दोघा एकचि साऊली । वृक्ष हे जैसा वृक्षाकडून ॥ हा संदेश जरी आपण घेतला तरी दैनंदिन जीवनातले आपले प्रश्नही सुटतील यात शंका नाही. आपण स्वतःहून वृक्षलागवड करत नसू तर शासनाकडून किंवा सामुदायिकरीत्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडांचे संगोपन तरी आपण नक्कीच करू शकतो. वृक्षांचा गैरवापर केल्यास प्रदूषणासारख्या महाभयंकर संकटास तोड देण्याची वेळ आपल्यावर येईल, हे आपण जाणून आहोतच.
वृक्ष म्हणजे पृथ्वीने आशीर्वादासाठी उचललेले हात आहेत. ते आशीर्वाद नसतील तर मानवजीवन टिकणार नाही बालपणीच्या पाळण्यासाठी मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्याला सोबत करतात. या भूतलावर आधी वनस्पती व नंतर प्राणिसृष्टी जन्माला आली आहे, वनस्पती नष्ट झाल्या तर त्या मागोमाग मानवी जीवनही नष्ट होईल. शहरांतील सिमेंट-कॉक्रीटच्या उंच जंगलापेक्षा आपणांस जीवन ताळ्यावर आणण्यासाठी उंच उंच वृक्षराजींच्या वेसणीची गरज आहे मानवाला आज तनशांतीपेक्षा मनःशांतीसाठी जास्त भटकावे लागत आहे. बाजारात टाकला की खाण्यापिण्यातून, हिरव्याफिरण्यातून मनःशांती प्राप्त होत आहे. पण मनाच्या शांतीचा लळा बाजारात पुरविला जाऊ शकत नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेले मन बगीचा, उद्यान, अभयारण्य, वन, समुद्र, नदीकाठ, सरोवराच्या शोधात बाहेर पडते. निसर्गरम्य वातावरणासाठी खरी गरज आहे-वृक्षांची यासाठी का होईना आपण सामाजिक वनीकरण इ. माध्यमांतून केलेल्या वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. आपल्या स्वार्थी व नियोजनशून्य वृत्तीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. आजपर्यंत असे केले असले तरी आज सर्वांना अशी शपथ घेण्याची गरज आहे. 'झाडे लावू आणि झाडे जगवू.' या क्षेत्रात घोषणांना महत्त्व नही प्रत्यक्ष कृतीला महत्त्व आहे. "झाडांविन जीवन म्हणजे जीव नअसणे होय " आपल्याकडून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काही केले जात नसेल ते
किमान पर्यावरणाचा असमतोल होईल असे आपणाकडून काही होऊ नये याची तरी दक्षता आपण घ्यायलाच हवी.
आज एकविसाव्या शतकात वावरत असताना आपण सर्वांनी निसर्गाच्या बद्दल जागरूकता राखणे काळाची गरज आहे नाहीतर एक दिवस असा उजाडेल की माणूसच स्वतःला विसरून जाईल की आपण कोण आहे,व सैरभैर पळत सुटेल....

ई-सेवा आयोजित रक्तदान शिबीरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान


कोल्हापूर / प्रतिनिधी
इलेक्ट्रिकल सेल्स एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूर (ई-सेवा) आयोजित आणि संजीवन ब्लड सेंटर यांच्या सौजन्याने  रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरामध्ये ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

या रक्तदान शिबीरासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष  संजय शेटे , सचिव  धनंजय दुगे , इलेक्ट्रिकल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष  अजित कोठारी साहेब, उपाध्यक्ष महेंद्रभाई पोरवाल, महालक्ष्मी फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष  अविनाश उरसाल यांनी उपस्थिती लावली होती. 

शिबीरामध्ये ई-सेवा सभासद, संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी आणि मित्र मंडळींनी रक्तदान केले. तसेच महीला रक्तदात्या ही उत्स्फूर्तपणे शिबीरामध्ये सहभागी झाल्या होत्या. 

इलेक्ट्रिकल सेल्स एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशन, (ई-सेवा) कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. यापूर्वी कोल्हापूर महापालिकेच्या आवाहनाला साद देत शेणी-दान हा सामाजिक उपक्रम राबविला होता. 

रक्तदान शिबीरासाठी ई-सेवा अध्यक्ष किरण दीक्षित, उपाध्यक्ष निखिल पोवार, सचिव किशोर गुरव, खजिनदार संदीप बनसोडे, संचालक संदीप पोवार, युवराज बोडके, विवेक चौगुले, विवेक जाधव, महादेव चौगुले, स्वप्निल चौगुले, अनिकेत भोसले, नामदेव कोळेकर, गुरुप्रसाद माळकर, अनिरुद्ध सोळांकुरकर, माजी संचालक सतीश चौगुले, राजाराम कांबळे, विजय भोपळे आणि सभासदांचे योगदान लाभले.

Tuesday, 22 March 2022

हेरले येथील चर्मकार समाजाच्या स्मशानभुमी साठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी, चर्मकार समाजाची मागणी


हेरले / प्रतिनिधी
येथील समस्त चर्मकार समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांना देण्यात आले.
      यामध्ये चर्मकार समाजासाठी स्मशान भूमीसाठी तातडीने जागा उपलब्ध करुन द्यावी. गावातील सर्व समाजासाठी ग्रामपंचायतने स्मशानभूमी साठी जागा दिली आहे.फक्त चर्मकार समाजाला स्मशानभुमी नसल्याने मयत व्यक्तीचे दहन करण्यात अडचणी येत आहेत.समाज मंदिराची दुरुस्ती करून मिळावी,१५% मागासवर्गीय निधीतुन चर्मकार समाजासाठी साऊंड सिस्टीम मिळावी. आदी मागण्या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
   
चर्मकार समाजाच्या सर्व मागण्या येत्या ग्रामपंचायत मासिक सभेत ठेवण्यात  येतील असे आश्वासन ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांनी दिले.
      यावेळी सचिन जाधव, संजय जाधव, विष्णू जाधव, नितीन जाधव,नेताजी कांबळे,राजू जाधव, विकी जाधव,मोहन जाधव, सुधीर जाधव,उत्तम पांडव यांचेसह चर्मकार समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो
 हेरले येथील समस्त चर्मकार समाजाच्या वतीने स्मशान भूमीसाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीचे निवेदन ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांना देतांना समाज बांधव.

Sunday, 20 March 2022

हेरले येथील मॅटवरील कबड्डी स्पर्धेत आरके वारीयर्स प्रथम


   हेरले / प्रतिनिधी
हेरले येथे मॅटवरील  कबड्डी स्पर्धेत आर. के. वारीयर्स संघाने प्रथम क्रमांक पटकविला. पद्मावती पेपर्स संघाने द्वितीय क्रमांक,  आरा स्पोर्ट्स या संघास तृतीय क्रमांक तर चतुर्थ क्रमांक युनिक चॅलेंजर्स यांना मिळाला.

        हेरले( ता. हातकणंगले)येथे संयुक्त गोटा गॅंग आयोजित हेरले कबड्डी प्रीमियर लीग २०२२यांच्या वतीने मॅटवरील कबड्डी स्पर्धा पार पडल्या.स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस समारंभ माजी सभापती राजेश पाटील,उपतालुका प्रमुख संदीप शेटे,   ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले,रणजित इनामदार,अमर वड्ड,बक्तियार जमादार यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आले.

               पहिला उपांत्य सामना पद्मावती पेपर्स विरुद्ध युनिक चॅलेंजर्स(२५-२३)२ गुणांनी पद्मावती पेपर्स विजयी.दुसरा अंतिम सामना आरा स्पोर्ट्स विरुद्ध आर के वारीयर्स (८-३०)२२ गुणांनी आर के वारीयर्स विजयी.अंतिम सामन्यांमध्ये आर के वारीयर्स संघाने पद्मावती पेपर्स संघावर(२८-१८) १० गुणांनी नमवून सहज विजय मिळवला.
      आर. के. वारीयर्स प्रथम क्रमांक रोख १५ हजार व चषक, पद्मावती पेपर्स द्वितीय क्रमांक रोख १० हजार व चषक ,तृतीय क्रमांक आरा स्पोर्ट्स ७ हजार व चषक,चतुर्थ क्रमांक युनिक चॅलेंजर्स ३ हजार व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
         पंच प्रमुख म्हणून कुबेर पाटील यांनी काम पहिले.तर पंच म्हणून, संतोष घाटगे,संभाजी गावडे,यूवराज गावडे व रमजान देसाई 

   यावेळी अध्यक्ष योगेश रुईकर,उपाध्यक्ष मयुरेश मिरजे, कोस्तुब मोरे,सूरज काटकर,निलेश कोळेकर,शिवराज निंबाळकर ,कृष्णात खांबे, मंदार गडकरी,संदीप मिरजे, अक्षय ढेरेआदी मान्यवरासह क्रीड़ा प्रेमी मोठ्या सख्येंने उपस्थित होते.


  फ़ोटो 
हेरले येथील मॅटवरील कबड्डी स्पर्धेचा विजेता संघ आर के वारीयर्स संघास प्रथम क्रमांकाचे बक्षिस व चषक प्रदान करत असताना मान्यवर

डॉ. सौ.अस्मिता प्रदीप ढवळे यांना सर्वोत्कृष्ट समुदाय आरोग्य अधिकारी पुरस्कार


हेरले / प्रतिनिधी

चोकाक (ता. हातकलंगले )येथील
 प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सौ. अस्मिता प्रदीप ढवळे यांना जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे वतीने तालुक्यातील सर्वोत्कृष्ट समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
    या प्रसंगी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिक्षण सभापती रसिका पाटील, वंदना जाधव, शिवानी भोसले आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
     या प्रसंगी बोलतांना रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून यापुढेही लोक कल्याणकारी कामे अविरत करण्याची ग्वाही समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सौ. अस्मिता प्रदीप ढवळे यांनी दिली. त्यांना हेरले  पीएचसीचे  वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख, एम पी डब्लू पठाण सर्व आशा वर्कर ,आरोग्य सेविका ,सरपंच  सौ. मनिषा सचिन पाटील व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामपंचायत  प्राथमिक आरोग्य केंद्र हेरले यांची सहकार्य लाभले.
       फोटो 
   समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सौ.अस्मिता प्रदीप ढवळे  जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे वतीने देण्यात आलेला तालुक्यातील सर्वोत्कृष्ट समुदाय आरोग्य अधिकारी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्विकारतांना.

Wednesday, 16 March 2022

राज्य अधिवेशनास शिक्षक बंधूसह महिला शिक्षिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे - महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पाटील

कोल्हापूर / प्रतिनिधी


   शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वात पनवेल येथील राज्य अधिवेशनामध्ये शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची होणार सोडवणूक शिक्षक बंधूसह महिला शिक्षिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन व राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे शुक्रवार दिनांक 18 मार्च रोजी सकाळी दहा वाजता कर्नाळा स्पोर्ट्स क्लब पनवेल जिल्हा रायगड येथे आयोजन केले आहे .
या भव्य दिव्य अधिवेशनाचे उद्घाटन *राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार* यांच्या हस्ते करण्यात येणार असून अध्यक्ष म्हणून *मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे* तर प्रमुख पाहुणे म्हणून *उपमुख्यमंत्री अजित पवार* नगर विकास मंत्री *एकनाथ शिंदे* शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार ,नगर विकास राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे, कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री  आदिती तटकरे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील  विद्यार्थी, शिक्षक व शाळेचे प्रलंबित प्रश्न मांडण्यात येणार आहेत त्यात प्रामुख्याने 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे . सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून खंड दोन प्रसिद्ध करणे .आंतरजिल्हा बदलीसाठी राज्य रोस्टर मंजूर करणे.शिक्षक बदली धोरणातील त्रुटी दुरुस्त करणे. वस्ती शाळेतील शिक्षकांची मूळ नेमणूक दिनांक ग्राह्य धरणे. वैद्यकीय उपचारासाठी शिक्षकांना कॅशलेस सुविधा मंजूर करणे. शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करणे. नगरपालिका व महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी शंभर टक्के आर्थिक तरतूद करणे. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करून प्रतिमहा तीस हजार रुपये करणे. विषय शिक्षकांना पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी लागू करणे. केंद्रप्रमुख यांची 100 टक्के पदे पदोन्नतीने त्वरित भरणे. प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी फी माफीची सवलत पूर्ववत देणे. 24 वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना विनाअट निवड श्रेणीचा लाभ देणे. शिक्षकांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे रजा रोखीकरण याचा लाभ देणे .स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळेत ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून देणे .इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देणे. कमी पटसंख्या मुळे शाळा बंद करू नये. शासनाने शाळेचे वीज बिल भरावे. विनंती बदलीस तीन वर्ष अट ठेवावी. शाळेला सादिल खर्च द्यावा. शाळेला सेवक व लिपिकाची पदे मान्य करावीत या मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. अधिवेशन व शिक्षण परिषदेला उपस्थित राहण्यासाठी राज्यातील शिक्षकांना 15 ते 18 मार्च अशी चार दिवसाची विशेष रजा ऑन ड्युटी शासनाने मंजूर केली आहे .तरी राज्यातील शिक्षक व शिक्षिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष एन .वाय. पाटील,मोहन भोसले,एस .व्ही. पाटील  कोल्हापूर जिल्ह्याच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मी पाटील, महिला सरचिटणीस संगीता खिलारे,जिल्हाद्यक्ष रविकुमार पाटील ,सुनील पाटील,रघुनाथ खोत, बाळकृष्ण हळदकर ,दुंडेश खामकर,किरण शिंदे यांनी केले आहे .

शिक्षण महर्षी कै. एम.आर. देसाई यांचा स्मृतीदिन वडगाव विद्यालयात इंग्रजी भाषा दिन म्हणून साजरा.


पेठवडगांव / प्रतिनिधी
      बुधवार दि.१६ रोजी वडगाव विद्यालय (ज्युनिकॉलेज/ तंत्रशाखा) पेठ वडगाव या विद्यालयात'बहुजन हिताय बहुजन सुखाय' या उद्देशाने स्थापन केलेल्या शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे संस्थापक, थोर शिक्षणतज्ञ, शिक्षण महर्षी कै. एम.आर. देसाई 
यांच्या स्मृतीदिनानिमित्त इंग्रजी भाषा दिन साजरा करण्यात आला. कु. भक्ती लाड, कु. आर्या गुरव, कु. दिशा पाटील या विद्यार्थिनींनी त्यांच्या विषयी आपले विचार मांडले.
   अध्यक्षीय मनोगत विद्यालयाचे प्राचार्य 
आर.आर. पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य एस. डी. माने , पर्यवेक्षक  डी.के. पाटील  , परीक्षा विभाग प्रमुख डी.ए. शेळके , तंत्र शाखा प्रमुख अविनाश आंबी , कार्यालयीन प्रमुख के.बी. वाघमोडे , जेष्ठ शिक्षक डी.एस. कुंभार , मिलींद बारवडे  , सौ. आर.आर. पाटील , सौ. एस एस चव्हाण, इंग्रजी विषयाचे सर्व शिक्षक, शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जे.एम. मणेर यांनी केले. छायाचित्रण  एस. आर. पाटील यांनी केले.

Tuesday, 15 March 2022

शिक्षकांच्या विविध मागण्या व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण परिषद व त्रैवार्षिक अधिवेशनाला शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन


हेरले/प्रतिनिधी.
       राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी  शुक्रवारी 18 तारखेला पनवेल जिल्हा रायगड येथे  होणार्‍या शिक्षण परिषद व त्रैवार्षिक अधिवेशनाला शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य  प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष  रविकुमार पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
       पत्रकार परिषदेत पाटील पुढे म्हणाले प्राथमिक शिक्षकांची जुनी पेंन्शन योजना, पदनिश्चिती (संच मान्यता), एम एस सी आय टी मुदतवाढ आंतरजिल्हा बदली असे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आणि गुणवत्तापुर्ण प्राथमिक शिक्षण देण्यासाठी कटिबध्द असणाऱ्या शिक्षकांनी मोट बांधून शिक्षणाच्या खाजगीकरणाचा बाजार उधळून लावण्यासाठी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करायचा आहे.
शिक्षणाच्या गुणवत्तेचा विचार करुन गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी विविध भौतिक सुविधांची संपन्नता आपल्या शाळांमध्ये आणण्यासाठी प्रयत्नपुर्वक कार्य करुन आपले क्षेत्र आबाधित ठेवण्यासाठी आपण नवी चळवळ उभारली पाहिजे त्यादृष्टीने या ऐतिहासिक अधिवेशनास जिल्ह्यातून हजारो शिक्षक उपस्थित राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
     पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष  रविकुमार पाटील म्हणाले राज्यातील नोव्हेंबर 2005 नंतर शिक्षक म्हणून रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना 10,20 व 39 वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी.केंद्रप्रमुख पदे 50 टक्के पदोन्नतीने व 50 टक्के शिक्षकातून  सरळसेवा परीक्षा घेऊन भरण्यात यावी. विस्थापित व संवर्ग-4 साठी विशेष संवर्ग तयार करावा,शिक्षकांना निवडणूक विभागासह आदी अशैक्षणिक कामातून वगळण्याच्या मागणीचा अधिवेशनात रेटा असणार आहे.यामागण्या मान्य होतील असे सांगितले. 
    यावेळी संघाचे एन वाय पाटील, मोहन भोसले, एस.व्ही पाटील, सुनील पाटील, लक्ष्मी पाटील, रघुआप्पा खोत, बाळकृष्ण हळदकर, दुंडेश खामकर, अरुण चाळके, किरण शिंदे आदी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यस्तरीय सब ज्युनिअर स्पर्धेत छत्रपती शिवाजी विद्यानिकेतनचे यश


हेरले / प्रतिनिधी

5 मार्च व 6 मार्च 2022 रोजी बालेवाडी (पुणे )क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनियर व ज्युनिअर स्पर्धेत पेटवडगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
      या स्पर्धेत खेळाडूंनी दोन सुवर्ण दोन रौप्य व दोन कास्य पदकांची कमाई केली .या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सचिव  शिरगावकर यांच्या हस्ते झाले. स्पर्धेसाठी दोनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता
  यशस्वी विद्यार्थ्यां खालील प्रमाणे:
विक्रांत सोपान थोरात ( सुवर्णपदक) सौजन्य बापूराव भोसले (सुवर्णपदक) जय दत्तात्रय डांगे (रौप्यपदक)
आकाश भिमदेव टेंगले (रौप्यपदक ) समर्थ संतोष अकीवाटे (कास्यपदक)
त्याचबरोबर कु.अलंकार ताकवणे ,सार्थक गायकवाड दुष्यांत शिंदे व किरण सोनवणे या खेळाडूंनी सहभाग नोंदवला.त्यापैकी विक्रांत थोरात व सौजन्य भोसले या दोन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
        वरील यशस्वी खेळाडूंना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक  राजेंद्र माने सर यांची प्रेरणा मिळाली. आनंद पाटील  यांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्रशालेचे विभाग प्रमुख  श्री एस. जे. सासणे,  बी .ए डोंगरे, व्ही. के. आळवेकर   एम. आर .पाटील, के. एम .इंगळे यांचे  सहकार्य लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचा संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Saturday, 12 March 2022

विद्यार्थ्यांनी शालेय वेळेचा सदुपयोग करावा - एकनाथ आंबोकर , डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न



हेरले / प्रतिनिधी

शालेय जीवन हे आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आव्हानात्मक कालखंड असतो. त्याचा योग्य वापर झाल्यास स्वत:चे व देशाचे भवितव्य बनण्यास मदत होते. हा काळ पुन्हा मिळत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील वेळेचा सदुपयोग केला पाहिजे असे मत कोल्हापूरच्या  माध्यमिक विभागाचे  शिक्षणाधिकारी श्री. एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केले. डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.  कार्यक्रमास श्री. सुशांत फडणीस , श्री.प्रवीण थोरात  हे सन्माननीय अतिथी म्हणून  उपस्थित होते. 

कोरोनामुळे गेल्या वर्षभरात ऑनलाईन वर्ग असताना देखील पुनावाला स्कुलने विद्यार्थ्यांमधील विविध कलागुण, क्रीडा नैपुण्य जपण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनेक वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधील विजेते, गुणवंत विद्यार्थी, टॅलेंट हंटचे विजेते, आदर्श पालक, आदर्श विद्यार्थी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभागातील विजेत्यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले . 

यावर्षी पूर्व प्राथमिक विभागात कु. मैथिली पटेल तर, प्राथमिक विभागात गार्गी कोळेकर हे आदर्श विद्यार्थी पुरस्काराचे मानकरी ठरले. माध्यमिक विभागात आयुष देवस्थळीने हा पुरस्कार पटकावला. साहिल साठे हा निवासी शाळा विभागातील आदर्श विद्यार्थी ठरला.
शाळेच्या मैदानात झालेल्या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले. यावेळी पालक, विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांचा फॅशन शो विशेष लक्षवेधी ठरला. 

बक्षीस वितरण सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष श्री. गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, सचिवा सौ. विद्या पोळ, प्राचार्य डॉ. सरदार जाधव, समुपदेशिका डॉ. माधवी सावंत, सागर फरांदे, मीनल पाटील, आश्लेषा पाटील, शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होते .  आभार प्रदर्शन भैरवी भोसले यांनी मानले.

*पालकांनाही पुरस्कार*

शाळेच्या वतीने पालकांना देखील आदर्श पालक पुरस्काराने गौरवण्यात आले. पुर्व प्राथमिक विभागात प्रभूंश पृथ्वीराजसिंग भोसलेचे पालक श्री व सौ. पृथ्वीराजसिंग भोसले, प्राथमिक विभागात सान्वी चौगुलेचे पालक श्री व सौ सीमा शांतीनाथ चौगुले, माध्यमिक विभागात मोहम्मद मोमीन यांचे पालक श्री व सौ. सफीना मोमीन हे आदर्श पालक ठरले. तर निवासी शाळा विभागात निलांकर भट्टाचार्यचे पालक श्री व सौ. दिपांकर भट्टाचार्य, तनिष्का कलंत्रेचे पालक श्री व सौ भारतेश कलंत्रे यांना आदर्श पालकाचा पुरस्कार पटकावला.

विद्यार्थी घडवणे हाच धर्म मानणाऱ्या शेटे बाईंचा सन्मान.


हेरले / प्रतिनिधी

   विद्यार्थी घडवणे हाच माझा धर्म मानून   चाळीस वर्ष ज्ञानाचे शिक्षणाचे काम करणाऱ्या  नागाव (ता. हातकणंगले) येथील श्रीमती रजनी मधुकर शेटे
 यांचा सुशितो ग्रुप कोल्हापूर व वावा मल्टी हॉल वडणगे यांच्यावतीने महिला दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला .
     रजनी शेटे बाई यांना नागाव व परिसरातील एकही व्यक्ती ओळखत नाही असा क्वचितच सापडेल . इंग्रजी गणित व मराठी या विषयावर प्रभुत्वने त्यांनी    गावातील  घडवलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर इंजिनिअर वकील शिक्षक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत .आज ही बाई भेटल्यानंतर त्यांची विद्यार्थी नतमस्तक झाल्याशिवाय राहात नाहीत. हीच त्याच्या शिक्षणातील योगदानाची पावती म्हणावी लागेल.
 त्यांचा  शिक्षण क्षेत्रातील वारसा          डॉ. दीपक , डॉ.विवेक ,मुलगी गीतांजली व सून सुजाता शेटे पुढे चालवत आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी इत्यादी पदे त्याकाळी नाकारले आहेत .
   "माझ्या विद्यार्थ्यांनी दिलेलं प्रेम व माझ्या कुटुंबाचे शिक्षण क्षेत्रातील योगदान पाहून मन समाधानी होतं .वयाच्या ७४ व्या वर्षी मिळालेला हा पुरस्कार मनाला सुखद आनंद देणारा आहे . सुशितो ग्रुप वर तोडकर परिवाराचे मनापासून आभार" अशी प्रतिक्रिया शेटे बाई यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
        फोटो 
नागाव येथील श्रीमती रजनी मधुकर शेटे
 यांचा सुशितो ग्रुप कोल्हापूर व वावा मल्टी हॉल वडणगे यांच्यावतीने महिला दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देऊन सन्मान करतांना पदाधिकारी.

Friday, 11 March 2022

"गावातलं गावकरी" गाणं प्रेक्षकांच्या भेटीला. कोल्हापूर/ प्रतिनिधी


     कोल्हापूर प्रतिनिधी 

    कलेला माहेरपण करणाऱ्या राधेच्या नगरीत गीतराधाई या सांस्कृतीक कार्यक्रमाने प्रेक्षकाना भुरळ पाडून ह्रूदयात घर निर्माण केले. आता नव्या रूपात गीतराधाई म्युझीक घेऊन अस्संल ग्रामीण रांगड्या मातीतलं 'गावातलं गावकरी' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नक्कीच हे गाणं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस ऊतरून एक नवीन ऊंची प्राप्त करेल असेच आहे. 
         राधानगरी आणी परीसरामध्ये सांस्कृतीक, नाट्य, सोंगी भजन, ग्रामीण रंगमंचावरील तमाशा, शाहिरी व ईतर क्षेत्रात भरपूर कलाकार असलेने कलेचे माहेरघर संबोधले जाते. यामधील सुप्रसिद्ध असणारे राजमोहन शिंदे निर्मीत गीतराधाई हाऊस नव्या म्युझीक क्षेत्रात ऊतरले असून यामध्येही यशस्वी होतील याची खात्री आहे. 
               "गावातलं गावकरी" हे गाणे खेड्यातील जिवनावर आधारीत आहे. गाव आणी रान याचे चित्रण करताना नव्या उमेदीचा वेगळेपण जपणारा, म्युझीक कंपोझर व दिग्दर्शक मयुरेश शिंदे यानी आपल्या कल्पक आणी भन्नाट संकल्पना मांडून हे गीत तयार केले आहे. हे प्रेक्षकाना भावणारे असून कायमपणे चिरंतनकाळ ह्रूदयात घर करून टिकणारे आहे. यासाठी ते सर्वानी पाहिलेच पाहिजे असे निर्माण केले आहे. हे गाणे गीतराधाई म्युझीक सोशल मिडीया यु ट्युब वर पहायला मिळेल. 
            हे गाणे चार मार्च रोजी रिलीज होऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे राधानगरीचे संग्राम पाटील आणी मयूरेश शिंदे यानी लिहीले असून संगीतबद्ध केले आहे. टिव्ही मालीकांचे मराठी गायक मयूर सुकाळे आणी संज्योती प्रज्योत यानी गायीले आहे. निरमाता डाँ. अभिजीत कर्णीक. या गाण्याम़ध्ये कलाकार सिनेअभिनेता संजय मोहिते, यु ट्युब ईन्स्टारियल स्टार धनंजय पोवार (D.P.), सिने अभिनेत्री कृष्णा राजशेखर, या बरोबरच राधानगरी परिसरातील कलाकार देवेंद्र जाधव (रवी), मनोज सावंत, तुषार पाटील, रामचंद्र चौगले, किरण पाटील सर, मारूती सातपूते, ओंकार चव्हाण, कोरीओग्राफर जावेद सय्यद, महेश गुरव,व ईतर कलाकारानी जीव ओतून काम केले आहे. छायाचित्रण यशराज साळगावकर व टिन, प्रोडक्शन मँनेंजर ओंकार सुर्यवंशी आसिस्टंट मँनेंजर ओंकार सुर्यवंशी आसिस्टंट दिग्दर्शक युवराज चौगले (पि.टी.) हे आहेत. 
             यापुर्वी दिग्दर्शक मयुरेश शिंदे यानी 'ढीग प्रेम' व 'ये रे ये रे पावसा' हि गाणी प्रसिद्ध झालेली आहेत. 'गावातलं गावकरी' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल यात शंकाच नाही.

राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आक्रोश मोर्चा

कोल्हापूर / प्रतिनिधी

   महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समिती महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने
शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या कार्यालयावर 
आंदोलन ९ वा दिवस व आक्रोश मोर्चा
काढून मागण्यांचे लेखी निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक आर. जी. चौगले यांना देण्यात आले.
   सदरचा आक्रोश मोर्चास दुपारी १२.०० वाजता दसरा चौकातून सुरुवात होवून बिंदू चौक, शिवाजी पुतळा, माळकर तिकटी मार्गे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर काढण्यात आला.आक्रोश मोर्चा शिक्षण उपसंचालक कार्यालया जवळ आले नंतर मोर्चाचे सभेत रुपातंर झाले. या वेळी मनोगते एस. डी. लाड, खंडेराव जगदाळे, दादासाहेब लाड यांनी व्यक्त केले.
     लेखी निवेदनातील आशय असा की,महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित २०% ४०% अनुदान घेणाऱ्या त्रुटी पूर्वता केलेल्या तसेच अघोषित असणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक उच्चमाध्यमिक शाळांना मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सरसकट हा शब्द काढून पूर्वीच्या प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा, शिक्षक     शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण मिळावे याकरीता ३ मार्च २०२२ पासून शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर याठिकाणी आहोत. शासनाने दखल न घेतल्यामुळे आक्रोश मोर्चाद्वारे निवेदन सादर करीत आहे.
  उपरोक्त विषयास अनुसरून महाराष्ट्र शासनाने शिक्षक व कर्मचारी-यांचे अनेक प्रश्नांबाबत बैठक आयोजित केली असून यामध्ये प्राधान्याने महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित २०% व ४०% अनुदान येणा-या त्रुटी पुर्तता केलेल्या तसेच अघोषित असणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांना मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सरसकट हा शब्द काढून पूर्वीच्या प्रचलित नियमानुसार १०० अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा व यामधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण मिळावे.
   अनुदान पात्र असणाऱ्या व त्रूटी पूर्तता करून देखील प्रलंबित ठेवलेल्या व अघोषित असणाऱ्या सर्व शाळा, वर्ग तुकडया यांना घोषित करून प्रचलित नियमानुसार १००% अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा. याकरीता ३ मार्च २०२२ पासून संपूर्ण राज्यात शिक्षण उपसंचालक कार्यालय याठिकाणी व आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन व उपोषण चालू आहे. दररोज वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करून आमच्या मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरीही शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे आज शुक्रवार दि.११ मार्च २०२२ रोजी अनवानी पायाने कोल्हापूर विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आक्रोश मोर्चा काढत आहोत. या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्हयातील शैक्षणिक व्यासपीठाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळा पूर्णपणे बंद ठेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. शासनाने आमची वेठबिगारी बंद करून न्याय देण्यासाठी आमच्या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा. याबाबत आमच्या संघटनेच्यावतीने संपूर्ण राज्यामध्ये इ. १० वी व १२ वी च्या पेपर तपासणीवरती बहिष्कार कायम ठेवला आहे. कोणत्याही परिस्थितीत पेपर तपासले जाणार नाहीत. तरी आमच्या मागण्यांबाबत योग्य तो विचार व्हावा अशा 
मागण्या महाराष्ट्रातील अंशत: अनुदानित (२०% व ४०%) अघोषित त्रूटी पुर्तता केलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सरसकट हा शब्द काढून पूर्वीच्या प्रचलित नियमानुसार १०० टके अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा. २) अंशत: अनुदानित (२०% व ४०%) मधील काम करणाऱ्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सेवा संरक्षण मिळावे. या संदर्भात अशा आशयाचे लेखी निवेदन देण्यात आले.
   कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड, खंडेराव जगदाळे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, बाळासाहेब डेळेकर ,बाबासाहेब पाटील,सुरेश संकपाळ, दत्ता पाटील ,प्रा. सी एम गायकवाड, सुधाकर निर्मळे, संतोष आयरे, डी एस घुगरे, राजेद्र कोरे, उमेश देसाई, राजेंद्र माने, आर डी पाटील, प्रकाश पाटील, गजानन काटकर, सुधाकर सावंत, उदय पाटील, मिलींद पांगिरेकर ,इरफान अन्सारी ,संदीप पाटील ,के के पाटील, काकासाहेब भोकरे, मनोहर परीट,प्रा. हिंदूराव पाटील, मिलींद बारवडे, पंडीत पवार, एन. आर. भोसले,बाजीराव सुतार,एम. एन. पाटील, एस एम पाटील,अरुण मुजुमदार एस. के. पाटील डी पी कदम सौ एम डी घुगरे, सचिन चौगुले आदींनी नेतृत्व केले. या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्हयातील महिला शिक्षिका व शिक्षक मोठ्या प्रमाणात  सहभागी झाले होते.
       
      फोटो 
आक्रोश मोर्चा काढून मागण्यांचे लेखी निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक आर. जी. चौगले यांना देतांना एस डी लाड खंडेराव जगदाळे बाबासाहेब पाटील डी एस घुगरे आदीसह अन्य मान्यवर.

Thursday, 10 March 2022

हेरले हायस्कूल हेरले मधील विद्यार्थ्यांची उदगिरी येथे दोन दिवसाची पदभ्रमंती संपन्न


हेरले / प्रतिनिधी

श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित हेरले हायस्कूल हेरले* मधली इयत्ता नववी एम. सी. सी.विषय अंतर्गत एक रात्री मुक्कामी पदभ्रमंती शनिवार दिनांक ५ मार्च ते ६  रोजी उदगिरी,चांदोली वन्यपरिसरात पार पाडली.
  यामध्ये बावीस विद्यार्थी, दहा विद्यार्थ्यींनी, असे एकूण बत्तीस विद्यार्थ्यांच्या सह मुख्याध्यापक  पाच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेत उदगिरी मधील स्वराज्य संघटनेचे स्वयंसेवक यांनी सहभाग घेतला.
ट्रेकिंग अंतर्गत खालील कार्यक्रम घेण्यात आले दोन टप्प्यात २२ कि.मी. पायी जंगलातून भ्रमंती,विविध औषधी वनस्पती माहिती, विविध प्राणी पक्षी निवास,आवाज निरिक्षण,रात्री चे जेवण स्वतः बनवणे,शेकोटी व सांस्कृतिक कार्यक्रम,अवकाशातील तारे व दिशा यांची माहिती, रात्री ड्युटी ,सकाळी भूपाळी,चहा नाष्टा,गुरवाडी येथील काळंम्मा देवी परिसर स्वच्छता,एम सी सी कवायात व डेमो उपस्थित भाविकांची वाह..वाह.. मिळवून गेला.
    पदभ्रमंती यशस्वी होण्यासाठी श्री. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक अंबप अध्यक्ष विजयसिंह माने, कार्याध्यक्ष  विकासराव माने,जिल्हा परिषद सदस्या सौ.मनिषा विजयसिंह माने, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग, कोल्हापूर जिल्हा एम.सी.सी. समादेशक  कुमार पाटील साहेब, हेरले हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक काळे 
एम.सी. सी. प्रमुख हरिश्चंद्र गायकवाड , बबन हुजरे,सर्व पदभ्रमंती व निवास सोय स्वराज्य संघटनेचे संस्थापक सुनिल पाटील व बंधू अंकुश पाटील तसेच समीर पुजारी,सखा पाटील, सागर पाटील शिक्षक  काशिलिंग माने, किरण गायकवाड हेरले हायस्कूलमधील सर्व शिक्षक शिक्षिका,शिक्षकेत्तर,पालक, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Tuesday, 8 March 2022

११ मार्चच्या आक्रोश मोर्चात शाळा बंद ठेवून शैक्षणिक व्यासपीठ सहभागी होणार

दि. ११ मार्च रोजी जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चात शाळा बंद ठेवून शैक्षणिक व्यासपीठ सहभागी होणार.

कोल्हापूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार १००% अनुदान दिले जात नाही. तसेच घोषित शाळा पात्र असूनसुध्दा त्यांना अनुदान दिले जात नाही व दि. ०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नेमलेल्या काही सेवकांना अजुनही जुनी पेन्शन योजना दिली जात नाही म्हणून कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने आयोजित केलेल्या शुकवार दि. ११ मार्च, २०२२ रोजीच्या आक्रोश मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवून कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ सहभागी होणार असल्याचा निर्णय आज मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन, येथील कार्यालयात झालेल्या सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभाध्यक्ष एस.डी.लाड होते.

    प्रचलित नियमानुसार राज्यातील कायम विनाअनुदान शाळांना १००% अनुदान मिळालेच पाहिजे. तसेच घोषित पण अद्यापि, अनुदान न मिळालेल्या शाळांना अनुदान मिळावे यासाठी आजपर्यंत विविध प्रकारची आंदोलने करून शासनाकडे सातत्याने मागणी केली. परंतु अजुनही या शाळांना शासन पुरेपूर न्याय देत नाही. या शाळांचा प्रश्न कायमपणे शासनाने सोडवावा ही मागणी घेवून कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. सदरचा आक्रोश मोर्चास दुपारी १२.०० वाजता दसरा चौकातून सुरुवात होवून बिंदू चौक, शिवाजी पुतळा, माळकर तिकटी मार्गे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर जाईल. विभागीय उपसंचालकांना निवदेन दिले जाईल. दि. ११ मार्च रोजीचे शालेय शैक्षणिक कामकाज  रविवार दि. १३मार्च रोजी शाळा सुरु ठेवून  भरून काढले जाईल.

 या सभेस मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, शिक्षक नेते दादासाहेब लाड, मिलिंद पांगिरेकर, बी. जी. बोराडे, इरफान अन्सारी, खंडेराव जगदाळे, डी. पी.कदम, सुदेश जाधव, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, राजाराम बरगे, आर. डी. पाटील, प्रा.सी. एम. गायकवाड, अरूण मुजुमदार, संतोष आयरे, गजानन काटकर, कैलास सुतार, अशोक पाटील, शिवाजी यल्लाप्पा कोरवी आदी प्रमुख मान्यवरांसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

रक्तदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद, 60 रक्तदात्यांनी केले रक्तदान

कोल्हापूर प्रतिनिधी 

: वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन या संघटनेच्या वतीने मुदाळतिट्टा येथे के पी पाटील पॉलिटेक्निक हॉलमध्ये रविवारी ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

 जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा तसेच रुग्णांना तातडीने लागणारी रक्ताची गरज लक्षात घेऊन वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन या संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील रक्तदान शिबिर हे मुदाळतिट्टा येथे घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि रक्तदान करण्यासाठी आलेल्या पहिल्या महिला रक्तदात्या सौ माया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रवीण पिसाळ, कार्याध्यक्ष अवधूत सूर्यवंशी, दिनेश कदम, सचिन खेतले, शिरीष देवरे, देव मोरे, विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.या शिबिरात 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले.. अर्पण ब्लड बँकेचे सहकार्य लाभले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनायक देसाई यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनिकेत गायकवाड व विजय देसाई यांनी परिश्रम घेतले

Monday, 7 March 2022

कासारवाडी हायस्कूलचा पारितोषिक वितरण समारंभ


हेरले / प्रतिनिधी

        कासारवाडी हायस्कूल कासारवाडीमध्ये चालू शैक्षणिक वर्षाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये विज्ञान प्रदर्शन, गणितीय उपक्रम त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा, शाळेचे आदर्श विद्यार्थी, विद्यार्थिनी व मागील शैक्षणिक वर्षातील एस. एस. सी. परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. क्रीडा स्पर्धेमधील खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.किरण चौगुले, प्रा. उत्तम वडिंगेकर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक व वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रा.पी.एन. तोडकर होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. एन.घाटगे यांनी केले.  सूत्रसंचालन एम. एस.पाटील यांनी केले. यावेळी व्ही. बी. डोंबाळे, एस.ए .आडुरकर, एस. डी. तोडकर, एस .टी. भांगरे के. जे. घाटगे, व्ही. एस.जाधव सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 5 March 2022

शाळा महाविद्यालयातील ग्रंथालये समृद्ध करून विद्यार्थ्यांना वाचते करा - ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचे आवाहन.

"



हेरले / प्रतिनिधी
वाचन संस्कृती वाढण्यासाठी आणि ग्रंथप्रसार होण्यासाठी केवळ मराठी भाषा गौरव दिन किंवा राजभाषा दिन साजरे करून काही फारसे साध्य होणार नाही. त्याकरिता  शाळा-महाविद्यालयातून ग्रंथदानासारखे  उपक्रम राबवून  विद्यार्थी  "वाचते" होण्यासाठी  सातत्याने  प्रयत्न केले पाहिजेत. कोणत्याही शाळा-महाविद्यालयाचे ग्रंथालय हे त्या-त्या संस्थेचे वैभव ठरावे." अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक आणि ग्रंथदाते प्राचार्य जीवन साळोखे यांनी व्यक्त केली.

      ते  न्यू एज्युकेशन सोसायटीच्या डी.एड.कॉलेज, पेटाळा येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य आर.जी.कुंभार होते.यावेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी-विदयार्थीनीनी  मराठी भाषेचे महत्त्व सांगणारे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात सादर केले.तसेच थोर मराठी साहित्यिकांची माहिती मनोगतातून सांगितली. 
     आपल्या भाषणात जीवन साळोखे यांनी वाचनाचे महत्त्व विशद करून, वाचनातूनच अभ्यासू  वृत्ती ,व्यासंग वाढून वैचारिक बैठक भक्कम होते, हे स्पष्ट केले. वाचनाचा "कंटाळा " म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाला "टाळा", हे कटू सत्य असल्याचेही ते म्हणाले. 
     यावेळी प्राचार्य साळोखे यांनी तीन हजार रु.किंमतीची दहा पुस्तके ग्रंथालयासाठी प्राचार्यांकडे भेट दिली.
  आपल्या भाषणात प्राचार्य कुंभार यांनी डीएड कॉलेजच्या परंपरेचा आढावा घेऊन, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नाही, ती रोजगाराची भाषा नाही याबद्दल खंत व्यक्त केली. वाचा, वाचत राहा,आणि इतरांना वाचू द्या यासाठी विद्यार्थ्यांनी आग्रही राहण्याचे त्यांनी आवाहन केले. मराठी विभाग प्रमुख प्रा.एस.एस.रावळ यांनी विद्यार्थ्यांकडून कार्यक्रमाचे संयोजन केले.

      फोटो 
न्यू एज्युकेशन सोसायटीच्या डी.एड.कॉलेज, पेटाळा येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जेष्ठ साहित्यिक प्राचार्य जीवन साळोखे बोलतांना प्रमुख पाहुणे शेजारी कॉलेजचे प्राचार्य आर.जी.कुंभार व अन्य मान्यवर

Thursday, 3 March 2022

दूध उत्पादन वाढविण्यासाठी गोकुळचे सर्वोतोपरी सहकार्य - गोकुळ संचालक अजित नरके

हेरले / प्रतिनिधी

सुधारीत पशुधनाबरोबरच दूध उत्पादन वाढविण्यासाठी दूध उत्पादक शेतक-यांना गोकुळ दूध संघ सर्वोतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. असे मत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळचे) संचालक अजित नरके यांनी व्यक्त केले. ते म्हैस दूधवाढ व गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमातंर्गत कुंभोज येथे आयोजीत गोठा भेट प्रसंगी बोलत होते. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. यु.व्ही.मोगले, वैरण विकास अधिकारी भरत मोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुंभोज येथील दूध उत्पादक शेतकरी सुनिल भोकरे यांचा जातीवंत मुऱ्हा म्हैशींचा गोठा व कुंतिनाथ चौगले यांचा जर्शी (एच.एफ), गीर, साहिवाल, खिलारी (साधी) व कपीला आदी गाईंच्या मुक्त गोठ्यांना पन्हाळा तालुक्यातील सुमारे शंभर दूध उत्पादक शेतकरी सभासदांना घेवून भेट दिली. यावेळी त्यांना प्रगतशील पशुधन शेतकरी सुनील भोकरे व कुंतीनाथ चौगले यांनी जातीवंत जनावरांचे व्यवस्थापन, संगोपन, ओला, वाळलेल्या चाऱ्याची लागवड, उपलब्धता, सायलेज, मुक्त गोठा पशुखाद्य, मिनर्लस आदी बाबींवर उपस्थित महिला व पुरुष दूध उत्पादक  शेतकऱ्यांना सविस्तर माहिती सांगितली. तसेच संवाद- प्रतिसंवाद पार पडला.
याप्रसंगी डॉ. दळवी, डॉ.‌बारवे,  संकलन अधिकारी आनंद चौगुले, धनंजय यादव, संजय पाटील, संग्राम गायकवाड, एलआरपी सौ‌. नम्रता पोवार, अमोल पोवार यांच्यासह पन्हाळा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     फोटो
पुलाची शिरोली, कुंभोज येथील भोकरे यांच्या गोठ्यातील जातीवंत जनावरांची संगोपनाबाबत माहिती घेताना गोकुळचे संचालक अजित नरके. प्रसंगी डॉ. यु.व्ही. मोगले, डॉ. दळवी आदी.

Wednesday, 2 March 2022

निराधारांना आधार हेच खरं समाजकार्य.,-डॉ. विजय गोरड

  हेरले / प्रतिनिधी

    गरजू आणि गरिबांना मदत करणे व निराधारांना आधार देणे हेच खरं समाजकार्य असल्याचे मत संजय गांधी कमिटीचे सदस्य डॉ. विजय गोरड यांनी  हेरले (ता. हातकणंगले) येथे झालेल्या संजय गांधी  मंजूर आदेश पत्राचे वाटप करताना व्यक्त केले.
    संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष व के. डी. सी बँकेचे उपाध्यक्ष  आमदार        राजूबाबा आवळे  यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी हेरले व मौजे वडगाव येथील संजय गांधी विधवा, श्रावण बाळ,अपंग,मूकबधिर, कर्णबधिर लाभार्थ्यांना आदेश वाटप करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक तलाठी श एस. ए बरगाले  यांनी केले व आभार बाळासाहेब भोसले यांनी मानले.याप्रसंगी हेरले व मौजे वडगाव येथील लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        फोटो कॅप्शन
हेरले येथे झालेल्या संजय गांधी मंजूर आदेश पत्राचे वाटप करताना संजय गांधी कमिटी हातकणंगले चे सदस्य डॉ. विजय गोरड सोबत तलाठी एस.ए. बरगाले  व बाळासाहेब भोसले.

तळंदगे येथे मोठ्या उत्साहात महिलांचा स्नेहमेळावा संपन्न; हजारो महिलांचा सहभाग...


हातकणंगले / प्रतिनिधी

 हातकणंगले तालुक्यातील तळंदगे या गावामध्ये सौ. माधुरी अण्णासो जाधव आणि आण्‍णासो जाधव यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, महिलांचा आत्मसन्मान वाढण्यासाठी येथे महिला स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. गावात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे गावातील बचत गटाच्या आणि गावातील महिलांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती .यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्या पत्नी वेदांतिका माने आणि माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांच्या पत्नी लेखा मिणचेकर याही उपस्थित होत्या.
    या स्नेहमेळाव्यात विवाध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.यामध्ये  वृद्धमहीलांनीही मोठा सहभाग नोंदवला .कार्यक्रमात ॲडव्होकेट सुप्रीया सुर्वे यांनी महीलांचे प्रबोधनपर व्याख्यान दिले.तर मोनीका जाजु यांनी महीलांना खुप हसवत फनीगेम्स घेतल्या.
 गावात पहील्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महीलांसाठी स्नेहमेळावा घेण्यात आला.त्यामुळे हजारो महीलांनी सौ.माधुरी जाधव आणि आण्णासो जाधव यांना शुभेच्छाही दिल्या.
   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोनिका जाजु यांनी तर प्रास्ताविक माधुरी जाधव यांनी केले.सौ.वेदांतिका माने,सौ.सुलेखा मिनचेकर ,तळंदगे गावच्या सरपंच जयश्री भोजकर, सामाजिक कार्यकर्त्या शोभा भोजे आदींनी मनोगत व्यक्त केले .सामाजिक कार्यकर्त्या जयश्री शिरोळे यांचेसह हजारो महीलांनी या कार्यक्रमास उत्स्फुर्त हजेरी लावली.

Tuesday, 1 March 2022

रस्त्याचे काम सुरू केल्याने सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित

       हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगाव( ता. हातकणंगले) येथील गावठाण ते पाझर तलाव रस्ता गावठाण पासून सुरु करावा अन्यथा २ मार्चला सामूहिक आत्मदहन करण्याचे निवेदन कोल्हापूर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर यांना देण्यात आले होते.
            मौजे वडगाव येथील गावठाण ते पाझर तलाव रस्त्याची सुधारणा गेल इंडिया कंपनीचा सीएसआर फंडातून होत आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा ठरावानुसार या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर गावठाण पासून पाझर तलाव पर्यंत अशी आहे. परंतु सुरुवातीचे अंतर सोडून काम सुरू केल्याने गावतील शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले. दरम्यानच्या काळात खासदार धैर्यशील माने व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडीक यांनी  गावठाण पासून रस्ता सुरू करावा असे लेखी पत्र जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्यांना दिले. त्यानंतर बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीला गावठाण पासून हद्द निश्चित करावी असे लेखी पत्र दिले होते. परंतु पत्र येऊन  महीना होऊन गेला तरीही ग्रामपंचायतीकडून कोणतीही हालचाल झाली नसल्यामुळे गावातील शेतकरी व पदाधिकारी मनोहर चौगले, गुणधर परमाज, बाळासो थोरवत, मधुकर अकीवाटे, शिवसेनेचे  सुरेश कांबरे, सुनील खारेपाटणे, स्वप्नील चौगुले, यांनी आत्मदहन करण्याचे लेखी निवेदन जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिले होते. परंतु निवेदन दिलेल्या दिवशीच  ग्रामपंचायतीने रस्त्याचे हद्द निश्चितीचे काम गावठाण पासून सुरू केल्यामुळे २ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या कडून होणारे आत्मदहन स्थगित करण्यात आले आहे.

फोटो 
मौजे वडगांव: येथे आत्मदहन चा इशारा दिल्यामुळे गावठाण ते पाझर तलाव रस्ता ग्रामपंचायतीच्या वतीने गावठाण पासून हद्द निश्चित करण्यात आला.