कोल्हापूर /प्रतिनिधी
कागल चे गटशिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर(रा मळगे बुद्रुक) यांच्या ऑनलाइन शिक्षण पद्धती या पुस्तकाला यावर्षीचा डॉ कुमुद बन्सल उत्कृष्ठ शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे.यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई मध्ये चार डिसेंबर ला होणाऱ्या शिक्षण परिषदेत हा पुरस्कार वितरीत होणार आहे.रोख रु पाच हजार सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई च्या वतीने दरवर्षी शैक्षणिक विषयावरील लेखनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी डॉ कुमुद बन्सल उत्कृष्ठ शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार दिला जातो.यावेळी महाराष्ट्रातील पाच पुस्तकांना पुरस्कार जाहीर झाला आहे.यामध्ये डॉ कमळकर यांच्या ऑनलाइन शिक्षण पद्धती या पुस्तकाचा समावेश आहे.कोरोना काळापासून ऑनलाइन शिक्षण पद्धती किती महत्वाची आहे याची जाणीव सर्वच क्षेत्राला झाली आहे.या ऑनलाइन शिक्षण पद्धतीने शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करता येतात यावर सुंदर विवेचन कमळकर यांनी या पुस्तकात केले आहे.या पुस्तकाचे शिक्षण क्षेत्रात जोरदार स्वागत झाले होते.या पुरस्काराने या पुस्तकाचे महत्व अधोरेखित झाले आहे.