Tuesday, 30 April 2024

महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी श्री काकासाहेब भोकरे यांची निवड

हेरले / प्रतिनिधी
 महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीय संघटनेची राज्यकार्यकारिणीची सभा नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यकारणीच्या सभेत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष काकासाहेब हरिभाऊ भोकरे यांची  राज्य कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
 काकासाहेब भोकरे हे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून गेली पंधरा वर्षे जिल्ह्यात काम करत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हयासह पुणे विभागीय अध्यक्ष  दादासाहेब लाड यांच्या समवेत त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन नाशिक येथे मुंबईचे लोकप्रिय शिक्षक आमदार  कपिल पाटील, शिक्षक भारतीचे राज्य अध्यक्ष  अशोक बेलसरे, शिक्षक भरती कार्याध्यक्ष सुभाष मोरे, शिक्षक भारती प्राथमिकचे अध्यक्ष  नवनाथ गेंड यांच्या शुभहस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. या निवड कामी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे कौन्सिल सदस्य  दौलत देसाई, पुणे विभागीय अध्यक्ष  दादासाहेब लाड, तसेच कोजीमाशीचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक बाळ बेळेकर  यांचे सहकार्य लाभले.
    
       फोटो 
काकासाहेब भोकरे यांना मुंबईचे  शिक्षक आमदार  कपिल पाटील, शिक्षक भारतीचे राज्य अध्यक्ष  अशोक बेलसरे, शिक्षक भरती कार्याध्यक्ष सुभाष मोरे, शिक्षक भारती प्राथमिकचे अध्यक्ष  नवनाथ गेंड यांच्या शुभहस्ते त्यांना राज्य उपाध्यक्ष निवडीचे पत्र देण्यात आले.

Monday, 29 April 2024

शैक्षणिक धोरण म्हणजे काय ? - डॉ अजितकुमार पाटील, कोल्हापूर

प्रस्तावना: देशाच्या सर्वांगीण विकासात शिक्षणाची महत्वाची भूमिका असते. म्हणूनच शिक्षणाची गुणवत्ता आणि संख्यात्मक वाढ हया दोन्ही बाजूंचा समतोल साधणे महत्वाचे ठरते. 'सर्वासाठी शिक्षण' हे महत्वाचे आहेच परंतू त्याच बरोबर 'दर्जात्मक शिक्षण' असणे हेही तितकेच महत्वाचे ठरते. भारतातील उच्च शिक्षणाच्या संदर्भात काही संख्यात्मक बाबी इतर देशांच्या तुलनेत आणि काही भारतातील परिस्थितीचा विचार करून बदलांची गरज निश्चित भासते.
मागील दशकात भारतातील उच्च शिक्षणात काही महत्वपूर्ण बदल झाल्याचे आढळतात. काही आव्हाने निश्चितच लक्ष वेधून घेतात. जगातील दुसऱ्या स्थानावरची सगळ्यात मोठी शिक्षण पध्दती, शिक्षणक्षेत्र म्हणून भारत ओळखले जात असले तरी भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ 27 करोड लोक शिक्षण प्रवाहात असल्याचे सत्य नाकारता येत नाही.
 भारतात शिक्षणातील एकूण नोंद प्रमाण (Gross Enrolment Ratio-GER) केवळ 25.2% इतके आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण अतिशय कमी आहे. इंग्लड मध्ये (GER) हे प्रमाण 84%, रशिया 76%, जपान 55%, चीन मध्ये एकूण नोंद प्रमाण 28: इतके आणि जगातील सरासर शिक्षण नोंद प्रमाण 32% इतके आढळते. 2020-21 पर्यंत भारत सरकारने हे प्रमाण 30% पर्यंत वाढविण्याचा निर्धार केलेला आहे. हे साध्य करायचे असेल तर भारतात येत्या काही महिन्यात घेऊ घातलेल्या 'राष्ट्रीय शिक्षण धोरणात' काही महत्वाचे मुद्दे गांर्भियाने विचाराधीन असणे आणि त्यांच्या पूर्ततेकरीता ठोस उपायात्मक चौकट असणे अपेक्षित आहे.
भारत सरकारने उच्च शिक्षणातील विकासासाठी सन 2013 मध्ये राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षा अभियान (RVSA) राबविण्यास सुरवात केली आणि 2017 मध्ये के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नवीन 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' आखण्यासाठी समिती गठीत केली आहे.
येत्या काही महिन्यातच भारताच्या नव्या 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा' आराखडा तयार असेल. भारतातील जनतेच्या गरजा लक्षात घेता यात उच्च शिक्षणातील 20 महत्वाच्या विषयांना अनुसरून आराखडयात त्या अनुषंगाने योजना व उच्च शिक्षणातील बदल असणार आहेत. यात प्रामुख्याने शिक्षणाचा दर्जा नवीन संकल्पना, संशोधन, कौशल्य वर आधारित शिक्षण (Skill Based Education) इ. समावेश अपेक्षित आहे.
गरज : 2030 पर्यंत अर्थिक क्रमवारीत भारत जगातील तिसऱ्या स्थानावर असणे अपेक्षित केले जाते. यानुसार विचार करता असे लक्षात येते की 2030 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेत 90% पेक्षा जास्त भाग हा उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील असणार आहे. म्हणूनच उच्च शिक्षणाच्या धोरणात विविध औद्योगिक क्षेत्रात आणि सेंवामध्ये आवश्यक असणारे कौशल्य विकसित करणाऱ्या शिक्षणाला प्राध्यान्य देणे अपेक्षित आहे. सद्यः परिस्थितीत भारतात एकूण आवश्यक मनुष्यबळाच्या केवळ 5% मनुष्यबळ हे औपचारिक व्यावसयिक कौशल्य विकसित केलेले असते. इतर देशांच्या तुलनेने हे प्रमाण अतिशयच अल्प असल्याचे आढळते. भारतात 2020 पर्यंत नवीन औपचारिक व्यावसायिक कौशल्य असलेले मनुष्यबळ 300 मिलीयन पर्यंत वाढविण्याचे उदिष्ट आहे. हे उदिष्ट साध्य करण्यासाठी उच्च शिक्षणात स्थानिक पातळीवर आवश्यक असलेले तसेच जागतिक पातळीवर आवश्यक असलेल्या क्षेत्रात व्यावसायिक शिक्षण आणि प्राधान्य देणे अपेक्षित आहे.

सुरुवात : जानेवारी १९८५ मध्ये भारताचे त्यावेळचे पंतप्रधान श्री. राजीव गांधी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आखले जाईल, असे जाहीर केले. त्यानुसार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने "शिक्षणाचे आव्हान" ही पत्रिका काढली. त्यावर विविध परिषदा, चर्चासत्र, अभ्यास गट, इत्यादी पातळींवर देशभर चर्चा घडवून आणण्यात आली. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, १९८६" ही सुधारित पत्रिका प्रकाशित केली. राज्यांचे शिक्षणमंत्री, राष्ट्रीय विकास मंडळ व केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ यांच्या बैठकीत त्यावर चर्चा करण्यात आली. अशा प्रकारे वेगवेगळ्या स्तरांवर केल्या गेलेल्या सूचनांचा विचार करून तयार केलेला 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, १९८६' चा मसुदा संसदेपुढे मे १९८६ मध्ये ठेवण्यात आला आणि संसदेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास मान्यता दिली. शैक्षणिक धोरणाबद्दल 
 शैक्षणिक धोरण म्हणजे काय ?

शिक्षण हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम असून कोणत्याही राष्ट्रीय कार्यक्रमाचा तो कणा आहे. ज्या माध्यमातून शिक्षणाची विविध ध्येये व उद्दिष्टे आपण साकार करू पाहतो त्या शैक्षणिक धोरणाचा अर्थ आणि त्याच्या निर्मितीची तसेच अंमलबजावणीची प्रक्रिया समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
*शैक्षणिक धोरणाच्या व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात येतात.*

(अ) अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये पदनिर्देशित केल्या गेलेल्यांच्या कृतीवर बंधनकारक, मार्गदर्शक, उद्देशित स्पष्ट निवेदन;

(आ) अंमलात आणण्याजोगे आणि जो समाज त्याची निर्मिती करतो त्याच समाजात अंमलात आणले जाणारे शिक्षणासंबंधीचे सुस्पष्ट निवेदन;

(इ) प्रक्रियेच्या माध्यमातून निर्मित होणारे व स्वीकृत केले जाणारे शिक्षणासंबंधीचे स्पष्ट निवेदन. या प्रक्रियेत सहभागी होणारे, वास्तवता व परस्पर विरोधी हितसंबंध आणि इच्छा यांची वैधिकता यांचा अभिस्वीकार करतात.

शिक्षणाची ध्येये, उद्दिष्टे, दिशा, व्याप्ती, इत्यादींना मूर्त स्वरूप देणारे तसेच त्यांना खराखुरा अर्थ प्राप्त करून देणारे स्पष्ट निवेदन म्हणजेच शैक्षणिक धोरण. निश्चित केलेली शैक्षणिक ध्येये व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रमाणित मार्गदर्शन शैक्षणिक धोरणामुळे मिळते.

शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आशय हा निवड केला गेलेला असला पाहिजे. शिक्षण देण्याची निश्चित पद्धती ठरायला हवी. शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्यांनी अत्यंत विकसित विज्ञानाकडे सत्य काय आहे हे शोधण्यासाठी, प्रमुख कलांकडे गुणगौरव व रसग्रहण व अत्यंत गाढ धार्मिक आणि तत्त्वज्ञानात्मक परंपरांकडे सद्गुणांचे मानक शोधण्यासाठी पाहावयास हवे. सुस्पष्ट निर्मित हक्कांच्या कल्पना आणि व्यक्तींची परस्परांबद्दलची कर्तव्ये यांना आवाहन करावयास हवे.
राष्ट्रातील जास्तीत जास्त व्यक्तींना शिक्षण, गुणवत्तेचा विकास आणि शिक्षण घेण्याची पात्रता असूनही आर्थिक क्षमता नसलेल्या व्यक्तींसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारे स्पष्ट निवेदन हे खऱ्या अथर्थान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होईल. लोकशाही राज्यव्यवस्थेत शासनाने लादलेले शिक्षणविषयक धोरण खरे-खुरे शैक्षणिक धोरण होऊ शकत नाही.

जेव्हा समाजाच्या नवीन सदस्यांची शिक्षण ही बुद्धिपुरस्सर व चिकित्सक निवडीची बाब बनते तेव्हा शैक्षणिक धोरणाची गरज निर्माण होते. शैक्षणिक धोरण हे अनेकांच्या एकत्र प्रयत्नांचा परिणाम असतो. बदलती परिस्थिती, वातावरणातील बदल व बदलत्या शैक्षणिक उद्दिष्टांच्या संदर्भात शैक्षणिक धोरणात बदल आवश्यक वाटतात. शैक्षणिक निर्णयांना मार्गदर्शन करण्यासाठी जाणीवपूर्वक वर्तणूकीचे अभिस्वीकृत नियम म्हणजे शैक्षणिक धोरण, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
 शैक्षणिक धोरणाच्या निर्मितीची प्रक्रिया
देशाच्या राज्यघटनेच्या चौकटीत शैक्षणिक धोरणाला आकार दिला जातो. संघीय संसदीय शासन पद्धती; राज्यघटनेच्या प्रस्तावनेत उच्चारण केलेले सामाजिक, आर्थिक व राजकीय तत्त्वज्ञान आणि मूलभूत हक्क व राज्याच्या धोरणाची तत्त्वे हीच ती चौकट. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास संसदेने मान्यता देणे आवश्यक असते.

इ.स. १९७६ च्या घटनादुरुस्तीनंतर 'शिक्षण' हा विषय केंद्र व राज्ये यांचा समवर्ती विषय आहे. या घटनादुरुस्तीमुळे 'शिक्षण' हा विषय 'राज्यसूची' मधून 'समवर्ती सूची' मध्ये नेण्यात आला. त्यामुळे संसद व राज्य विधिमंडळ या दोघांनाही सर्वसाधारण स्थितीत शिक्षणविषयक कायदे तयार करता येतात. परंतु संघर्षमय परिस्थितीत संसदेने तयार केलेला कायदा राज्याने केलेल्या कायद्यावर मात करतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक राज्य आपले शैक्षणिक धोरण ठरवून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करते.
सामान्यतः प्रत्येक घटक राज्याचा शिक्षण विभाग शैक्षणिक धोरण ठरविण्याच्या प्रक्रियेत प्रामुख्याने भाग घेतो. शिक्षण विभागाने सूचित केलेल्या शैक्षणिक बाबींवर शिक्षणमंत्री निर्णय घेतात व त्या निर्णयावर मंत्रिमंडळात चर्चा होऊन शिक्कामोर्तब होते.
मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयावर सभागृहात चर्चा उपस्थित केली गेल्यास उपयुक्त सूचना विचारांती स्वीकारल्या जातात.
राज्य पातळीवर शैक्षणिक बाबींचा संबंध 'आर्थिक तरतुदी'शी असेल तर वित्त विभागाशी चर्चा- विनिमय करावा लागतो. शिक्षण प्रशासकीय विभाग, शैक्षणिक धोरण निर्मिती व धोरणाची अंमलबजावणी या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची कामगिरी पार पाडीत असतो. सामान्यतः शिक्षणमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाला सभागृहाची मान्यता मिळण्यास अडचण येत नाही. विशेषतः विधानपरिषदेत शिक्षणविषयक बाबींची चर्चा जास्त होण्याची शक्यता असते, कारण शिक्षक-प्रतिनिधीचे त्या सभागृहातील अस्तित्व.

कोणत्याही शैक्षणिक धोरणात्मक निर्णयावर' प्रात्यक्षिक मर्यादा' विशेषतः 'वित्त मर्यादा' प्रभाव पाडतात; उदाहरणार्थ, कनिष्ठ महाविद्यालय कुठे जोडावे, माध्यमिक शाळेला की पदवी महाविद्यालयाला याचा निर्णय 'वित्तमयदि' मुळे 'दोन्हीकडे' असा घ्यावा लागला.
 राष्ट्रीय शिक्षण निर्मितीची सर्वसाधारण पद्धती
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरविण्याची आजपर्यंतची सर्वसाधारण पद्धत अशी आहे -

भारत सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय (शिक्षण विभाग) आयोगाची स्थापना करते. आयोग देशातील शिक्षणाशी संबंधित सर्व प्रमुख घटकांना विचारात घेऊन आपला अहवाल संबंधित मंत्रालयाला सादर करतो.

शिक्षण मंत्रालय योग्य तो सोपस्कार पार पाडून अहवाल मंत्रिमंडळाला सादर करतो. आयोगाने अशा प्रकारे सादर केलेल्या अहवालावर केंद्रीय मंत्रिमंडळ विचार-विनिमय करून धोरणाचा मसुदा तयार करते. सदरहू मसुदा संसदेपुढे ठेवला जातो. त्यावर संसदेत चर्चा होते. संसदेत सभासदांनी केलेल्या उपयुक्त सूचना अंतर्भूत केल्या जातात. मसुद्याला संसदेने मान्यता देताच तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणून जाहीर केला जातो.
५.२.४ राष्ट्रीय शिक्षण धोरण निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी होणारे महत्त्वपूर्ण घटक

*राज्यघटना
*मूलभूत हक्क,
राज्य प्रार्गदर्शक तत्त्वे
 राज्यघटनेची प्रस्तावना यांच्याशी अनुरूप असे शैक्षणिक धोरण असावयास हवे.

*कायदेमंडळ*
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतिम स्वरूपास कायदेमंडळाची मान्यतां लागते. सामाजिक चालीरिती, संकेत, रुढी, धर्म, प्रथा, विधिमंडळे वगैरे कायद्याची उगमस्थाने म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निर्मितीच्या प्रक्रियेवर प्रभाव पाडू शकतात.

*मंत्रिमंडळ व निर्णय*

शैक्षणिक धोरणाची निर्मिती प्रामुख्याने मंत्रिमंडळात होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निर्मितीत पंतप्रधान, त्यांचे सल्लागार व कार्यालय, केंद्रीय शिक्षणमंत्री व शिक्षण सचिव यांचे मोठे योगदान असते. इ.स. १९८६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेने संमत केलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे पंतप्रधानांचे एकहाती काम होते, असे म्हणतात. प्रत्येक मंत्रालयाच्या धोरणाचे सूत्रपात करण्याचे काम संबंधित खात्याचे मंत्री करतात. मंत्रिमंडळात पंतप्रधान हे धोरण निर्मितीच्या 'केंद्रस्थानी' असतात.

*नियोजन आयोग*

नियोजन आयोग हे कायद्याच्या भाषेत केवळ सल्लागार मंडळ परंतु प्रत्यक्षात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत अत्यंत अर्थपूर्ण प्रभाव पाडते.

*राष्ट्रीय विकास परिषद*
राष्ट्रीय विकास परिषद ही नियोजन क्षेत्रातील धोरण निर्मितीचे अत्युच्च मंडळ होय.

*सार्वजनिक सेवा व योजना*
शैक्षणिक धोरण निर्मितीमध्ये सार्वजनिक सेवांची भूमिका तीन प्रकारची -

(१) निश्चित केलेली शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करणाऱ्या धोरणाचा विचार करणे,

(२) ते धोरण कायद्याच्या रूपात मांडणे व
(३) धोरणाचे कृतीमध्ये रूपांतर करणे.
*न्याय मंडळ*
न्यायमंडळे तीन प्रकारे सार्वजनिक धोरणांवर प्रभाव पाडतात
(१) न्यायिक आढावा शक्ती,
(२) सर्वोच्च न्यायालयाची सल्लागाराची भूमिका,
(३) न्यायालयीन निर्णय.
केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ
हे मंडळ राष्ट्रीय शिक्षण धोरण ठरविताना उपयुक्त ठरते.
*दबाव गट व व्यावसायिक संघटना*

विद्यार्थ्यांच्या संघटना, शिक्षकांच्या संघटना वगैरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरविताना आपले हितसंबंध
जपण्याचा प्रयत्न करतात.

*राजकीय पक्ष व त्यांचे मत*

राजकीय पक्ष आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात आपली शैक्षणिक ध्येय धोरणे जाहीर करीत असतात व सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या संदर्भात शैक्षणिक धोरणात फेरबदल करण्याचा प्रयत्न करतात.

*लोकमताचा विचार*
लोकमताला आकार देण्याचे व ते व्यक्त करण्याचे कार्य प्रचार करतात. धोरण निर्मितीवर प्रचार माध्यमे प्रचंड दबाव आणू शकतात.
शिक्षणविषयक समित्या, शिक्षणविषयक आयोग व शिक्षणविषयक परिषदा यांच्या शिफारशी राष्ट्रीय
शिक्षण धोरणाला आधारच देतात. लोकशाहीमध्ये टिका, प्रतिटिका व मतपरिवर्तन, इत्यादी मार्गांनी सार्वजनिक धोरण निर्मिती होते.

हेरले येथे दि १ मे ५ मे अखेर पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव


हेरले/प्रतिनिधी
हेरले (ता.  हातकणंगले) येथे दि १मे ५मे अखेर श्री १००८भगवान चंद्रप्रभ  मानस्तंभ  द्विद्वादश वर्षपुर्ती निमित्त एवं नवनिर्मित श्रीमद्देवाधिदेव १००८ भगवान मुनिस्रुव्रतनाथ तिर्थंकर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव  संपन्न होत आहे.
हेरले येथील मंदिर ९०६ वर्षापूर्वी चे प्राचीन मंदिर आहे. पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव  अध्यात्मयोगी चर्याशिरोमणी प.पु.१०८आचार्य श्री विशुद्धसागरजी मुनिमहाराज व ससंघ (२९पिंच्छी) यांच्या पावन सानिध्यात व नांदणी मठाचे मठाधीपती प .पू .जगद्गुरू जगतपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक  पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या अधिनेतृवाखाली व प.पु स्वतिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ कोल्हापूर यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
 प्रतिष्ठाचार्य  संजय उपाध्ये व डॉ सम्मेद उपाध्ये हे या पूजेचे विधी करणार असून या पूजा महामहोत्सव साठी मुख्य इंद्र सौधर्म इंद्र इंद्रायणी म्हणून श्री.व सौ सुरेश चौगुले आणि तिर्थंकर माता पिता म्हणून श्री.व सौ. नेमगोंडा पाटील हे लाभले आहेत.
या पाच दिवसाच्या कालावधीत अनेक मंडप उदघाटन, धजारोहन, कळश स्थापना, अखंड दीप प्रज्वलन यासह अनेक धार्मिक विधी, विधान, मंगल प्रवचन, गर्भसंस्कार, मौजीबंधन, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहे तरी सर्वांनी उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा असे आवाहन श्री चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिर,
पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव समिती, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, समस्त दिगंबर जैन समाज, हेरले यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेसाठी मंदिर कमिटी अध्यक्ष ए.बी. चौगुले , सुरेश चौगुले ,अजित चौगुले, अमोल पाटील, अनिल आलमान,राजेंद्र चौगुले,बाळगोंड पाटील,नितीन परमाज, राहुल कनवाडे ,कुबेर पाटील यांच्यासह पूजा महामहोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.

Saturday, 27 April 2024

हातकणंगले लोकसभा निवडणूक उमेदवार राजू शेट्टी यांची हेरले ( ता. हातकणंगले) येथील जाहीर प्रचार सभा संपन्न

हेरले / प्रतिनिधी


२००९ मध्ये पहिला खासदार झालो. त्यावेळी संसदेत २०१० साली पहिला कायदा एफआरपी कायदा मंजूर होण्यासाठी देशातील सर्व शेतकरी संघटनांना एकत्रित करून तीन दिवस संसदीय कामकाज बंद पाडले. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा कायदा संमत केल्याने ऊसास योग्य दर मिळून ऊसतोड झाल्यानंतर १४ दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऊस बील जमा होऊ लागली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उन्नती झाली असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हातकणंगले लोकसभा निवडणूकीचे  उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते हेरले ( ता. हातकणंगले) येथील जाहीर प्रचार सभेत बोलत होते.
  माजी खासदार राजू शेट्टी पुढे म्हणाले २०१३ मध्ये दुसरा कायदा जमिन अधिग्रहनाचा होण्यासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर देशातील सर्व शेतकरी संघटने समवेत आंदोलन केले. तत्कालीन आघाडी प्रमुख सोनिया गांधी यांना हा कायदा संमत होण्यासाठी हकिकत सांगितली आणि सर्व शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांना यश येऊन हा कायदा संमत झाला. त्यामुळे केंद्र शासनाच्या महामार्ग रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीस योग्य किंमत मिळाल्याने शेतकरी करोडपती झाले आहेत.
   तिसरा कायदा निर्णय  २०१८ मध्ये शासन हमी भाव जाहीर करते मात्र गॅरंटी देत नाही. त्यामुळे व्यापारी कमी दराने माल खरेदी करतात त्यांच्यावर शासनाचे नियंत्रण राहत नाही. हा कायदा संमत झाला तर व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. यासाठी शासनाची गॅरंटी निर्णय होण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. मात्र तोपर्यंत माझ्या लोकसभा सदस्यपदाचा कार्यकाल संपला व पुढील निवडणूकीत यश न मिळाल्याने या कायदयाचा निर्णय झाला नाही व कोणी प्रयत्नही केले नाहीत.
    मी चौथ्यांदा या लोकसभेच्या निवडणूकीत उभा आहे. कारण या हमी भाव निर्णयातून दूधासही योग्य भाव मिळावा.कष्टकरी निराधार जनतेस मिळणार्‍या पेन्शनच्या रक्कमेत  मोठी वाढ व्हावी, सेवानिवृत्त कामगारांना पेन्शन मिळावी, तसेच शासन कारखानदारांच्या कर्जास हमी देते त्या प्रमाणे विद्यार्थी शिक्षण कर्जासही शासनाने हमी दयावी. आदीसह कष्टकरी व शेतकरी जनतेच्या विकासाच्या अन्य निर्णयासाठी प्रयत्नशील राहणार आहे.सत्ताधारी शासन चारशे पार म्हणत संविधान बदलण्याच्या प्रयत्नात आहे. संविधानाकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास डोळे काढल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दम दिला. संविधान संरक्षणासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे. माझ्या या कार्यास यशस्वी करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला मतदान करून विजयी करावे असे आवाहन केले.
           माजी सभापती राजेश पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणजे भक्कास आघाडी आहे. आजी माजी आमदार त्यांच्या आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात एकत्र फिरत आहेत. मात्र एक महिन्यानंतर ते एकमेकांच्या झिंज्या उफटण्याचे काम करणार आहेत.हेरले गावातील विकास करण्यासाठी १६ वर्षे ग्रामस्थांनी साथ दिली आहे.अशीच साथ देऊन या लोकसभा निवडणूकीमध्ये राजू शेट्टी यांना हेरलेसह परिसरामध्ये मोठी आघाडी देण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन केले.
   माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील म्हणाल्या की, सर्वसामान्यांसाठी लढणारे म्हणजे राजू शेट्टी. सत्ताधारी शासन संविधान बदलणारे व महागाई वाढविणारे सरकार आहे. या सरकार विरोधात लढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेस साथ द्यावी. माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी गेली ३० वर्षे चळवळीतून आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांना भरघोस मते देऊन विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.
   स्वागत व प्रास्ताविक अमोल पाटील यांनी केले. माजी उपसरपंच संदीप चौगुले,सरपंच राहूल शेटे, बाळगोंड पाटील,मुनीर जमादार, प्रा. राजगोंड पाटील, अशोक मुंडे आदींनी मनोगते व्यक्त केली.
     या प्रसंगी जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे,माजी सभापती राजेश पाटील,माजी सभापती डॉ.पद्माराणी पाटील,मुनिर जमादार,प्रा.राजगोंड पाटील, जयकुमार कोल्हे, अप्पासाहेब एडके,महेरनिगा जमादार,अशोक मुंडे, लक्ष्मण निंबाळकर, सरपंच राहुल शेटे, बाळगोंडा पाटील,संतोष जाधव, अरविंद चौगुले, स्वप्नील 
कोळेकर आदी मान्यवरांसह हेरले परिसरातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश चौगुले यांनी केले.
  फोटो 
हेरले: हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीच्या जाहीर प्रचार सभेत बोलतांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी शेजारी राजेश पाटील जयकुमार कोल्हे मुनिर जमादार व अन्य मान्यवर.

Wednesday, 24 April 2024

कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने पालक मंत्री ना.हसन मुश्रीफ यांना निवेदन

कोल्हापूर /प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने पालक मंत्री नाम.हसन मुश्रीफ  यांना निवेदन देऊन सध्या सुरू असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संच मान्यता शासन नियमाने होणे आवश्यक आहे . वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांना १०० एवढी विद्यार्थी संख्या तसेच हायस्कूल संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांना ६० एवढी विद्यार्थी संख्या ग्राह्य मानून संच मान्यता करावी 
आणि अनेक शिक्षकांना अतिरिक्त होण्या पासून वाचवावे आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाना दिलासा द्यावा. या मागणीसाठी लेखी निवेदन दिले.
    संच मान्यता करताना २००९ च्या शासनादेश स्थगित असताना त्याच आदेशाने अजून हि का केली जाते आहे अशी माहिती मंत्री महोदयांना दिली . मंत्री महोदयांनी तात्काळ शिक्षण उपसंचालक  महेश चोथे यांना फोनवरून याबाबत विचारणा केली आणि येत्या शुक्रवारी याबाबतचे बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
     यावेळी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. अभिजीत दुर्गी,सरचिटणीस प्रा.संजय मोरे , कार्याध्यक्ष प्रा. शिवाजीराव होडगे , सहसचिव प्रा. बी. के. मडीवाळ, प्रा. गोविंद भोसले ,प्रा. डॉ.अमित रेडेकर प्रा.संग्राम तोडकर,प्रा.संभाजी पाटील, प्रा.मनगुत्ती हे यावेळी उपस्थित होते.अशी माहिती प्रसिध्दीस अध्यक्ष प्रा. अभिजीत दुर्गी यांनी दिली.
     फोटो 
कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने पालक मंत्री ना.हसन मुश्रीफ  यांना लेखी निवेदन देतांना अध्यक्ष प्रा. अभिजीत दुर्गीसह संघटनेचे पदाधिकारी.

Tuesday, 23 April 2024

हेरले ( ता. हातकणंगले) येथे हनुमान जयंती थाटामाटात व भक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी

हेरले / प्रतिनिधी
हेरले ( ता. हातकणंगले) येथे  हनुमान जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी  थाटामाटात व भक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी हनुमान भक्तांची मंदिर परिसरात गर्दी झाली होती.
  सोमवारी रात्री श्री भजनी मंडळ यांच्या वतीने गुंडोपंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मंगळवारी पहाटे पाच वाजता           राजू गुरव व बंडू गुरव यांनी पूजा, मंत्रपठन, पुष्पाजंली व अभिषेक करून धार्मिक कार्यक्रम संपन्न  केला. सकाळी हनुमान जन्मोत्सोव सोहळा संपन्न झाला. फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये हनुमतांची मुर्ती व गदेची पूजा करून श्री हनुमान मंदिररास तीन प्रदक्षिणा घालण्यात आल्या. 'श्री रामभक्त हनुमान की जय' या जयघोषात  पालखी सोहळा संपन्न झाला. दुपारनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात हनुमान भक्तांनी सहभाग घेतला होता त्यामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. रांगेन जाऊन भक्तांनी दर्शन घेतले.
       या हनुमान जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे संयोजन विजय कारंडे, अप्पासो  कागले, वसंत जाधव,  नंदकुमार माने,संतोष भोसले, पांडुरंग शिंदे, शिवराज निंबाळकर, राहुल कराळे, बाबासो रुईकर, संदीप कागले, , जयसिंग गडकरी, कृष्णात खांबे,धनराज कारंडे,सौरभ भोसले, अमोल कारंडे, विजय पाटील, सुनिल कारंडे, पांडूरंग राबाडे, दौलत साळुंखे, दीपक जाधव, अदीक इनामदार, कपिल भोसले, विजय भोसले, ऋषिकेश लाड, नारायण खांडेकर आदींनी केले.
          फोटो 
हेरले : हनुमान जन्मोत्सोव सोहळा.

Friday, 19 April 2024

मोठ्या प्रमाणात मतदान करून हा लोकशाहीचा उत्सव लोकोत्सव करावा - - जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन

हेरले / प्रतिनिधी

भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदाराने मोठ्या प्रमाणात मतदान करून हा लोकशाहीचा उत्सव लोकोत्सव करावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले. ते  शिरोली हायस्कूलच्या पटांगणावरती आयोजित मतदार जनजागृती अंतर्गत स्विप कार्यक्रमात बोलत होते. निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपमुख्य निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
 ते म्हणाले भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही व संविधानावर चालणारा देश आहे. योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीपथावर नेता यावे यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.
 यावेळी मानवी साखळीच्या माध्यमातून स्विप, व्होट इंडिया,आय विल व्होट, तिरंगा आदींचे विद्यार्थ्यांनी प्रदर्शन केले. पथनाट्य,प्रभात फेरी,चित्रकला, रांगोळी स्पर्धा पालकांना पत्र लिहून मतदान करणे विषयी व त्यांच्या हक्काविषयी जागृती करणे यासाठी हातकणंगले लोकसभा मतदार संघात ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे शिरोली हायस्कूलचे मुख्याध्यापक एम एस स्वामी यांनी स्वागत प्रास्ताविकामध्ये सांगितले.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, शक्ती कदम यांनी आपल्या मनोगतातून मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करुन लोकशाही बळकट करावी असे आवाहन केले.
या कार्यक्रमास माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे, हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, तालुका गटशिक्षणाधिकारी जगन्नाथ पाटील, नोडल अधिकारी इम्तियाज म्हैशाळे, नागाव केंद्रप्रमुख कृष्णात पाटील आदी उपस्थित होते.
 या मतदार जनजागृती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस मारापुरे यांनी केले. आभार सौ एस एस गाडेकर यांनी मानले.
 या कार्यक्रमास शिरोली व नागाव केंद्रातील सर्व शाळांचे विद्यार्थी ,मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो.....
पुलाची शिरोलीत मतदार जनजागृती अभियानातंर्गत फुग्यांचा गुब्बारा हवेत सोडताना एस.कार्तिकेयन, संजय शिंदे, एकनाथ आंबोकर, कल्पना ढवळे, शबाना मोकाशी, एम.एस.स्वामी व इतर.

पालकांनी शैक्षणिक धोरणाचा लाभ घ्यावा- डॉ अजितकुमार पाटील


प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 मध्ये पहिले पाऊल हा उपक्रम अत्यंत उत्कृष्टपणे राबवण्यात आला  दिव्यांग विभाग प्रमुख मा. शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहवर्धक वातावरणात घेण्यात आला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य माननीय राजेंद्र भोई प्रशासनाधिकारी एस के यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राथमिक शिक्षण समिती समन्वयक राजेंद्र अप्पूगडे सर शाळेचे केंद्र मुख्याध्‌यापक डॉअजितकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्‌गाटन झाले. यांच्या हस्ते सदरच्या 22 विदयार्थी व पालक मध्ये  मेळाव्यासाठी १ ली पात्र एकूण उपस्थित होते सदरच्या कार्यक्रमा- नाव नोंदणी, शारिरीक विकास, बौध्दिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी समुपदेशन वरील प्रमाणे स्टॉल माउंले होते व सर्व स्टॉलवर प्रत्येक विद्यार्थी व पालक जाऊन माहिती घेतली अशा प्रकारे शाळेची सर्व माहिती पालकांना देणेत आली. 
  शाळा पूर्वतयारी मेळाव्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिपाली चौगुले अनुराधा गायकवाड स्नेहल दाभाडे आदिती बिरणगे उत्तम कुंभार, मिनाज मुल्ला  उत्तम पाटील, सुशिल जाधव, तमेजा मुजावर, आसमा तांबोळी, विद्या पाटील बालवाडी मुख्याध्यापिका सौ. कल्पना पाटील सावित्री काळे गौरी रणदिवे व सर्व पालक उपस्थित होते. शाळापूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन व नियोजन उत्कृष्टपणे करणेत आले होते.आभार साईराज दाभाडे यांनी मानले

Sunday, 14 April 2024

आदर्श गुरुकुल विद्यालयातील ५४ विद्यार्थ्यांना वीस लाख ९२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती


राष्ट्रीय स्तरावरील एन.एम.एम.एस् (NMMS )परीक्षेत घवघवीत यश
हेरले /प्रतिनिधी
पेठवडगाव  येथील आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनि.कॉलेज मधील इयत्ता आठवीतील ५४ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील घेण्यात येणाऱ्या एन.एम.एम.एस्  (NMMS) परीक्षेत   वीस लाख ९२ हजार रुपयांची शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.या परीक्षेत विद्यालयातील तब्बल १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.केंद्र स्तरावर वेदांत चव्हाण,स्वरित मोहिते,वीर महाजन, सौगंधिक वंजाळे या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८ हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख ९२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती पात्र झाली आहे. तसेच तब्बल ५० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३८ हजार याप्रमाणे एकूण १९ लाख  रुपयांच्या सारथी शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. अशी तब्बल वीस लाख ९२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केली आहे.यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.डी एस घुगरे सचिवा तथा मुख्याध्यापिका सौ एम डी घुगरे व पर्यवेक्षक एस जी जाधव ,प्रशासक एस ए पाटील यांची प्रेरणा लाभाली.तर एस डी पाटील,सौ ए व्ही पाटील, ए डी सिसाळ आणि सौ.बी के शेटे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Monday, 8 April 2024

छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्यु. कॉलेजची राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड स्पर्धेसाठी निवड

हेरले /प्रतिनिधी

      छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्यु. कॉलेज व दिशा इंग्लिश मेडियम स्कूल पेठ वडगाव या प्रशालेतील विद्यार्थी तन्मय राहुल साळुंखे या विद्यार्थ्यांने बनविलेल्या Easy Maintenance Street Lamp या उपकरणाची राज्यस्तरीय inspire award manak स्पर्धेसाठी निवड झाली.
     विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय,भारत सरकार यांच्यामार्फत राबवल्या जाणाऱ्या इन्स्पायर अवॉर्ड मानक जिल्हास्तरीय स्पर्धा संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जि.प. कोल्हपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.,माधमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सचिव सुभाष चौगुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, प्राचार्य विराट गिरी, उपशिक्षणाधिकारी गजानन  उकिर्डे,उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे,उपशिक्षणाधिकारी अजय पाटील,एनआयएफ प्रतिनिधी सचिन भास्कर
 विस्तार अधिकारी रत्नप्रभा दबडे,जयश्री जाधव, धनाजी पाटील, विश्वास सुतार, दगडू कुंभार,आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडल्या.
      या जिल्हास्तरीय स्पर्धेत एकूण 147 उपकरणे सहभागी झाली होती.यातून केवळ 15 उपकरणाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. यामध्ये प्रशालेच्या तन्मय साळुंखे या विद्यार्थ्यांने बनविलेल्या उपकरणाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
       सदर विद्यार्थ्यास प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माने,सचिवा सुवर्णा माने यांची प्रेरणा व  डोंगरे बी. ए. सर्व विज्ञान विभाग शिक्षक,अटल लॅब  शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मिलिटरी इन्स्ट्रक्टर राजेंद्र पाटील,सर्व विभाग प्रमुख,शिक्षक,प्रशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
     फोटो 
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यां सोबत
 जि. प. कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कार्तीकेयन एस. सचिव सुभाष चौगुले,माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, प्राचार्य विराट गिरी, उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे, उपशिक्षणाधिकारी अजय पाटील,एनआयएफ प्रतिनिधी सचिन भास्कर
 विस्तार अधिकारी रत्नप्रभा दबडे,जयश्री जाधव, धनाजी पाटील, विश्वास सुतार, दगडू कुंभार,

Saturday, 6 April 2024

संजय घोडावत विद्यापीठामध्ये हातकणंगले लोकसभा मतदार संघ अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण संपन्न

हेरले / प्रतिनिधी

प्रत्यक्ष मतदान केंद्रावर कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षण सत्रांमध्ये जे प्रशिक्षण दिले जात आहे. अगदी मनापासून व शांतपणे आत्मसात करावे जेने करून प्रत्यक्ष मतदाना दिवशी कोणत्याही अडचणी शिवाय मतदान प्रकिया सुरळीतपणे पार पाडता येईल. लोकशाही मजबूत करण्यासाठी शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन ४८ हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार कल्पना ढवळे यांनी केले.
      त्या संजय घोडावत विद्यापीठामध्ये आयोजित ४८ हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या २७८ हातकणंगले विधानसभा मतदार संघाच्या वतीने आयोजित पहिले प्रशिक्षण प्रसंगी बोलत होत्या.
      तहसिलदार ढवळे पुढे म्हणाल्या सर्व मतदान केंद्रावरती नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर प्रशासन प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन व सहकार्य करत राहिल. प्रशिक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी मनामध्ये किंतू-परंतू न ठेवता आपल्या शंकाचे निरसन  अधिकाऱ्यांकडून घ्यावे व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी.
      संजय घोडावत विद्यापीठामध्ये दोन सत्रामध्ये प्रशिक्षण संपन्न झाले.सकाळच्या सत्रांमध्ये - ४ ९२ मतदान अधिकारी प्रशिक्षणार्थी पैकी केंद्राध्यक्ष - १०६ व 1क्रमांक एक मतदान अधिकारी - ११९ व क्रमांक दोन मतदान अधिकारी व क्रमांक तीन मतदान अधिकारी - २६७ उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रांमध्ये -४९२ पैकी वरील प्रमाणेच मतदान अधिकारी उपस्थित होते.दोन्ही सत्रातील प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले.
   या प्रसंगी संजय घोडावत विद्यापीठामध्ये प्रशिक्षण केंद्रास निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. त्यांचा सत्कार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
   या प्रशिक्षण केंद्रास अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 
 उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, अतिरिक्त सहाय्यक निवडणून निर्णय अधिकारी तहसिलदार कल्पना
 ढवळे, नायब तहसिलदार दिगंबर सानप आदींचे मार्गदर्शन लाभले.

    फोटो
संजय घोडावत विद्यापीठामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांचा सत्कार उपजिल्हाधिकारी शक्ती कदम करतांना शेजारी अन्य मान्यवर
(छाया सतिश खोत )

हेरले येथील मोबाईल टॉवर विरोधी कृती समितीचे जिल्हा परिषद सीईओ ना निवेदन

कोल्हापूर / प्रतिनिधी

इंडस टॉवर लिमीटेड कंपनीच्या मोबाईल टॉवर बांधकाम स्थगित करणे बाबतची तात्काळ कार्यवाही करुन केलेली कार्यवाही बाबत तक्रारदार यांना त्या बाबतचा अहवाल देऊन  कार्यालयासही अहवाल सादर  करण्यात यावा असे पत्र पंचायत समिती हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी यांनी हेरले
ग्रामपंचायतीस दिले.

     हातकणंगले तालुक्यातील हेरले गावाच्या हद्दीत गट नं ७ ब या ठिकाणी इंडस कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्याचं काम सुरू आहे . टॉवरच काम सुरु असलेल्या ठिकाणापासून शंभर मीटरवर शाळा आहे. शालेय विद्यार्थ्यांसह स्थानिकांच्या आरोग्यासाठी हा टॉवर घातक ठरणार असल्याचं सांगत स्थानिकांमधून या टॉवरला विरोध होतोय. स्थानिक ग्रामपंचायतीनं सुध्दा टॉवरच्या कामाला विरोध केलाय अस असताना जिल्हा परिषदेची कोणतीही परवानगी न घेता पोलीस बंदोबस्तात टॉवरचं काम सुरु असून हे काम तात्काळ थांबवावं, अशी मागणी करत मोबाईल टॉवर विरोधी कृती समितीचे निमंत्रक उत्तम पोवार यांच्या नेतृत्वाखाली हेरले ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन एस यांना लेखी निवेदन दिले. त्यांनी तात्काळ पंचायत समिती हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी यांना
टॉवर बांधकाम स्थगित करणे बाबतची तात्काळ कार्यवाही करण्याचे पत्र ग्रामपंचायतीस दयावे असे पत्र दिले.
      पंचायत समिती हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी यांनी हेरले ग्रामपंचायतीस दिलेल्या पत्राचा आशय असा की,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. कोल्हापूर व सलीम दस्तगीर पठाण वा इतर ग्रामस्थ हेरले ता. हातकणंगले यांचा दि.3 एप्रिलचा तक्रार अर्ज विषयास अनुसरून हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील गट नं 7 ब/7अ हा  सुरेश बाबूराव पाटील व माणीक बाबूराव पाटील यांनी आपले क्षेत्रातील शेतजमीन भाडेतत्वावर इंटस टॉवर लि. यांना मोबाईल टॉवर उभारणेसाठी शेजारील लोकांना विश्वासात न घेता दिली आहे. सदर बांधकामाचे ठिकाण लोकवस्तीपासून २०मिटर अंतरावर असून सदर परिसरात हायस्कूल, शाळा, लोकवस्ती असून या मोबाईल टॉवरचे दुष्परिणाम नागरीकांचे आरोग्यावर होणारअसून जीवीतास हानी होणार असल्याने सदर मोबाईल टॉवर या क्षेत्रात होऊ नये यासाठी स्थगिती मिळावी तसेच सदर कंपनीने लोकवस्ती शेजारी १००मिटर अंतरात बांधकाम सुरु केले असून सदर बांधकाम सुरुवातीचा गट क्रमांक बदलून कंपनीने दुस-या गट क्रमांकामध्ये बेकायदेशीररित्या बांधकाम सुरु केले असून त्यास स्थगिती मिळावी अशी स्थानिक नागरीकांनी  मागणी केली.
    इंडस टॉवर कंपनीस ग्रा.पं.हेरले मार्फत टॉवर बांधकाम स्थगीत करणे बाबत ग्रा.पं. ने पत्र दिले होते. तथापी सदरचे पत्र कंपनीने स्विकारले नाही. तसेच ग्रा.पं.चे पत्रावर काम थांबविले जाणार नाही असे उत्तर ग्रामपंचायतीस दिले. तसेच शासनाच्या वेब साईटवर टॉवर बांधकामासाठी अर्ज दिला होता सदर अर्जाचा क्रमांक Ep41347 हा असून सदर अर्ज जिल्हास्तरावर प्रलंबित ठेवणेत आलेला आहे.
 तरी हेर्ले येथील इंडस टॉवर कंपनीचे लोकवस्तीशेजारी  १०० मीटर अंतरावर बांधकाम सुरु असुन सदरच्या परवान्यात सुरुवातीचा गटक्रमांक बदलून सदरचे बांधकाम बेकायदेशीररित्या सुरु आहे. स्थानिक लोक, शाळा व ग्राम रयत यांचा विरोध यांचा विचार करता ग्रामपंचयतीच्या मागणी प्रमाणे व स्थानिक नागरीकांच्या तक्रारीचे अनुषंगाने या कार्यालयाकडील पुढील चौकशी पूर्ण होई पर्यंत पंचायत समिती हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी यांनी टॉवर बांधकाम स्थगित करणे बाबतची तात्काळ कार्यवाही करण्याचे पत्र ग्रामपंचायतीस दिले व केलेली कार्यवाही बाबत तक्रारदार यांना माहिती द्यावी असे पत्रात नमुद केले आहे.
   या प्रसंगी मोबाईल टॉवर विरोधी कृती समितीमध्ये सरपंच राहूल शेटे,उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पाटील, हिरालाल कुरणे, उर्मिला कुरणे, ग्रामविकास अधिकारी व्ही. व्ही.कांबळे, गोंविद आवळे, समीर पेंढारी, अमीर जमादार, अमीर पेंढारी, सलीम पठाण, अब्दुल पठाण, फिरोज नायकवडी, शहाजान पठाण आदीसह सिध्देश्वर नगर, राजीव गांधी नगर, हनुमान नगर मधील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. अशी माहिती प्रसिध्दीस गोविंद आवळे यांनी दिली.
    फोटो 
मोबाईल टॉवर विरोधी कृती समितीचे निमंत्रक उत्तम पोवार यांच्या नेतृत्वाखाली हेरले ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन एस यांना लेखी निवेदन देतांना सदस्य.

Thursday, 4 April 2024

समाजाच्या उन्नतीसाठी रोटरी क्लब सदैव कार्यरत : डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसतवाला


कागल / प्रतिनिधी
    शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित  श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कागल  येथे  रोटरी क्लब कोल्हापूर मिडटाऊन व नायजेरियन क्लब यांच्यामार्फत रोटरी क्लब वर्धापनदिनाचे  औचित्य साधून  मुलींच्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यात आले.
समाजात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांना आधाराची आवश्यकता असते. त्यांच्यासाठी कुणीतरी पुढे येऊन हात देण्याची आवश्यकता असते. अशा व्यक्तींच्या उन्नतीसाठी रोटरी क्लब सदैव अग्रेसर असतो. अनेक व्यक्तींना मदत करून सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न क्लबच्या माध्यमातून केला जातो. या ठिकाणीही मुलींच्या आरोग्यविषयक अडचणी दूर करण्यासाठी सर्व सोयी सुविधांनी युक्त असे स्वच्छतागृह निर्माण करण्यात आले आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब कोल्हापूर मिडटाउनचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसतवाला यांनी केले. ते श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कागल येथे स्वच्छतागृह उद्घाटन समारंभ प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होते.
     रोटरी क्लब कोल्हापूर मिडटाउन यांचे वतीने विद्यालयातील मुलींसाठी स्वच्छतागृह बांधून देण्यात आले. त्यांनी केलेले हे कार्य नक्कीच उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन प्रशालेचे  प्राचार्य टी ए पोवार यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रस्ताविकेत केले. 
 यामध्ये सॅनिटरी व्हेंडिंग मशीन व आधुनिक विद्युत सुविधासह मुलींसाठी आरोग्यविषयक सेवा सुविधा पुरविण्यात आल्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासीर बोरसतवाला यांनी रोटरी क्लबच्या कार्याचा आढावा घेतला.  याकामी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री जयकुमार देसाई , चेअरमन डॉ.मंजिरी मोरे देसाई व पेट्रन कौन्सिल सदस्य श्री .दौलत देसाई यांचे  प्रोत्साहन  व मार्गदर्शन लाभले . प्रमुख पाहुणे विद्यमान प्रेसिडेंट रोटरीयन शरद पाटील यांनी रोटरी क्लब कोल्हापूर व आंतरराष्ट्रीय नायजेरियन क्लब यांनी या कामासाठी केलेली मदत यांचा प्रमुख उल्लेख केला तसेच माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील यांनीही या प्रकल्पाचा हेतू सांगत भारतामध्ये मुलींच्या आरोग्याच्या तक्रारीच्या दरम्यान असणाऱ्या अपुऱ्या सोयी सुविधामुळे  मुलींचे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यांना योग्य सोयी सुविधा मिळाल्या तर मुलींचाही शिक्षणाकडे कल मोठ्या प्रमाणात वाढेल असे मत व्यक्त केले. रोटरियन अनिकेत अष्टेकर यांनी क्लबचे पदाधिकारी व त्यांचे कार्य यांचा परिचय करून दिला. प्रोजेक्ट चेअररमन सौ. उत्कर्षा पाटील यांनी रोटरी क्लब कोल्हापूर मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याचा आढावा घेतला. तसेच मुलींना आधुनिक आरोग्य विषयक सुविधा वापरण्या संदर्भात मार्गदर्शन केले. व यावेळी प्रशालेस मोफत 1000 सॅनेटरी नॅपकिन प्रदान केल्या. या कार्यक्रमास सौ. रितू वायचळ, अरविंद कृष्णन, प्रशांत मेहता, बी. एस. शिपुगडे, माजी प्राचार्य जे. डी. पाटील, उपप्राचार्या सौ. एस. व्ही. कुडतरकर, पर्यवेक्षक एम. व्ही. बारवडे, तंत्र विभाग प्रमुख एस. यू. देशमुख यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार उपमुख्याध्यापिका सौ. एस. एस. पाटील व सूत्रसंचालन सौ. टी. ए. पाटील यांनी केले.

हेरलेत धोकादायक विहिरीला संरक्षक कठड्याची गरज


     हेरले / प्रतिनिधी
हेरले (ता: हातकणंगले ) येथील हेरले ते मौजे वडगाव दरम्यान सुरेश पाटील यांच्या मळ्या शेजारी रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीला संरक्षक कठडाच अस्तित्वात नाही तेथे केवळ पत्र्याची साधी पाने आडवी लावून सार्वजनिक बांधकाम विभागाने तसदी घेतली आहे त्यामुळे विहीर असल्याचे निदर्शनास येत नाही तसेच या ठिकाणचा रस्ता खचला आहे त्यामुळे येथील रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून वाहनधारकांना कसरत करीत आपली वाहने चालवावी लागतात.
     सन २०२१ जुलै  महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अती वृष्टी झाली होती. त्यावेळी या रस्त्यालगत असणाऱ्या विहीरीचा भाग खचला त्यामुळे रस्त्याचा निम्मा भाग विहीरीत कोसळला. गेली तीन वर्षे होत आहेत. मात्र सार्वजनिक  बांधकाम विभाग अथवा लोकप्रतिनिधींनी  या समेस्यावर उपाय योजना केली नाही. कित्येक वेळा अधिकारी व
लोकप्रतिनिधी यांनी या रस्तावरून प्रवास केला आहे. मात्र त्यांना रस्त्याचा हा मृत्यूचा सापळा असणारी समस्या दिसत नसेल का? हा संशोधनाचा मुद्दा ठरत आहे.
   या रस्त्यावरून रोज शाळेच्या बसेस व इतर वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे या विहिरीला संरक्षक कठडा बांधणे आवश्यक आहे. या प्रकरणी  एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद,कोल्हापूर यांनी या प्रकरणी लक्ष घालावे व तात्काळ या ठिकाणी संरक्षक कठडा बांधून ही समस्या सोडवावी अशी जनतेतून मागणी होत आहे.
     फोटो 
हेरले ते मौजे वडगाव दरम्यान सुरेश पाटील यांच्या मळ्या शेजारी रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीला संरक्षक कठडाच अस्तित्वात नसल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.