पेठ वडगांव / वार्ताहर - शासनाच्या आरोग्य विभागातील कर्मचा-यांच्या प्रमाणेच नगरपालिका कर्मचा-यांचा जीवन विमा काढावा या मागणीसाठी आज वडगांव पालिका कर्मचा-यांचे वतीने काळया फिती लावून आंदोलन करण्यात आले.सकाळीअकरा वाजता सोशल डिस्टन्सिंग ठेवून पालिका कार्यालयासमोर जमून आपल्या मागणी कडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले.या आंदोलनानंतर सर्वच कर्मचारी पुन्हा कामावर लगेच रूजू झाले.
संपूर्ण जगामध्ये व देशामध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजविलेला आहे. सदर कोरोना विषाणूचा प्रसार रोखणेकामी राज्य शासनाने आरोग्य विभाग, पोलीस विभाग, ग्रामविकास यांच्याकडील कर्मचारी यांना कोरोनाचा कोणताही धोका होऊ नये म्हणून विविध रक्कमांचा जीवन विमा उतरविला आहे. परंतु नगरविकास विभाग, नगरपालिका, नगरपंचायत, मुख्याधिकारी व कर्मचारी यांचा जीवन विमा उतरविण्यास कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीमधील सर्व विभागातील अधिकारी/कर्मचारी तसेच दवाखानेकडील कर्मचारी व सफाई कर्मचारी हे स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना विषाणुचा सामना करीत आहेत. या कामांमध्ये नगरपरिषद कर्मचारी नागरीकांना विविध सेवा पुरवितांना दुदैवाने त्याला कोरोनाची बाधा होऊ शकते. त्यांचे सुरक्षेची जबाबदारी राज्य शासनाची असतांना शासन नगरपरिषद कर्मचारी यांचेकडे दुर्लक्ष करीत आहे. सर्व नगरपरिषद कर्मचारी यांचा विमा उतरविण्यात यावा तसेच शासनाच्या इतर सर्व विभागामधील कर्मचारी यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती देणेत येते. परंतु नगरपरिषद कर्मचारी यांना सदर वैद्यकीय प्रतिपुर्तीचा अद्यापपर्यंत लाभ दिला जात नाही. या मागणीसाठी वडगांव नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.