शिक्षण संचालकांसह अधिकारी देणार अचानक भेट..
शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर पाच व सहा डिसेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर
कोल्हापूर /प्रतिनिधी
राज्यस्तरावरून साक्षरता वर्गाची पाहणी करण्यासाठी शिक्षण संचालनालयातील अधिकारी हे क्षेत्रीय कार्यालय, जिल्हा, तालुका आणि निवडक शाळांना चालू डिसेंबर महिन्यात भेटी देऊन आढावा घेणार आहेत. याबाबत योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
त्या अनुषंगाने कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणीसाठी ऑनलाईन पद्धतीने बैठका घेतल्या जात आहे. या बैठकांमधून दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा, तालुका व शाळा स्तरावरील झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला घेतला जाईल. केंद्र पुरस्कृत उल्लास नव-भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा, तालुका व शाळा स्तरावर केलेली पूर्वतयारीचा, उल्लास मेळावा पूर्वतयारी व कार्यवाहीचा, तसेच शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी योजना संचालनालयातील अधिकारी जिल्हा, तालुका कार्यालयांना आणि निवडक शाळांना भेटी देणार आहेत.
भेटी दरम्यान संबंधित अधिकारी (योजना) कार्यालय, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, शाळा तसेच उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सुरू असलेले वर्ग यांना भेटी देवून असाक्षर व स्वयंसेवक यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच शाळांमधून विविध शासकीय योजनांची सुरू असलेल्या अंमलबजावणीची पाहणी करून त्याची माहिती घेणार आहेत.
विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संचालनालय स्तरावरून भेटी देण्यासाठी येणार्या अधिकार्यांसोबत जिल्ह्या कार्यालयातील वर्ग -१ किंवा वर्ग-२ दर्जाचे अधिकारी दौर्यात पूर्ण वेळ उपलब्ध असणार आहेत, असे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान शिक्षण सहसंचालक राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी राज्यातील सर्व विभागातील संचालक ते केंद्रप्रमुख या सर्व क्षेत्रीय स्तरावरील उल्लास कार्यक्रमाचा आढावा घेतला.प्रत्येक स्तरावर देण्यात आलेले नोंदणीचे उद्दिष्ट,असाक्षर आणि स्वयंसेवक जोडणी, साक्षरता वर्गांची अध्ययन-अध्यापन विषयक स्थिती, स्वयंसेवकांचे प्रशिक्षण, मागील वर्षीचे अपूर्ण कामकाज, जिल्हा व तालुका स्तरावरीय समित्यांच्या बैठका, उल्लास कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारासाठी सार्वजनिक उत्सवातून व अन्यप्रकारे केलेले प्रयत्न, येत्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या परीक्षेची पूर्वतयारी, समाजातील अधिकाधिक घटकांचा या योजनेच्या यशस्वीतेसाठी मिळणारा सक्रिय सहभाग अशा विविध पैलूंचा यानिमित्ताने आढावा होणार आहे. शिक्षण संचालकांसह राज्यस्तरीय अधिकाऱ्यांकडून होणारे या झाडाझडतीमुळे जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.