बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी,
कोल्हापुरात २११ परीक्षा केंद्रे.
कोल्हापूर / प्रतिनिधी
चालू शैक्षणिक वर्षात फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या सुरळीत संचालनासाठी कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्र असलेल्या शाळांमधील भौतिक सुविधांची पाहणी मोहीम सुरू केली आहे.
चालू वर्षाकरिता कोल्हापूर विभागीय मंडळाने इयत्ता दहावी परीक्षेसाठी ३५७,तर बारावी परीक्षेसाठी १७६ अशी एकूण ५३३ केंद्रे निश्चित केली आहेत. त्यात दहावीसाठी सातारा ११६, सांगली १०३, कोल्हापूर १३८ परीक्षा केंद्रे आहेत. बारावीसाठी सातारा ५२,सांगली ५१, कोल्हापूर ७३ अशी परीक्षा केंद्रे असणार आहेत.
परीक्षा केंद्र निश्चित करताना प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या, आवश्यक भौतिक सुविधांसह इतर परीक्षा केंद्रांवर परिणाम होणार नाही अशा बाबी यासह इतरही निकष विचारात घेतले जातात.
परीक्षेच्या सुलभ संचालनासाठी, सुयोग्य पद्धतीने परीक्षेचे कामकाज हाताळण्यासाठी परीक्षा केंद्र असलेल्या शाळेस संरक्षक भिंत, परीक्षार्थी संख्येच्या प्रमाणात वर्गखोल्या, बेंचेस, पिण्याच्या पाण्याची सुविधा, मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहे, पंखे, वीज दिवे, सुस्थितीतील दारे, जाळी लावलेल्या खिडक्या, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था, वीज गेल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जनरेटर अथवा इनव्हर्टर इत्यादी भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे.
यातील काही सुविधा नादुरुस्त अथवा अपूर्ण असू शकतात त्यामुळे परीक्षा संचालनात अडचणी येऊ शकतात. परीक्षा केंद्रास मान्यता मिळाल्यानंतर, काही कालावधी उलटल्यानंतर अशा सुविधांमध्ये कमतरता अथवा त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी १८ डिसेंबर रोजीच्या पत्रानुसार जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांमार्फत केंद्राची पाहणी करण्याबाबत लेखी निर्देश दिले आहेत.
"आवश्यक सुविधांची पाहणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण अधिकारी यांना १० जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परीक्षार्थी संख्येच्या प्रमाणात त्रुटी अथवा अपूर्णता आढळल्यास शाळांना या कालावधीत पूर्तता करावी लागणार आहे.
-राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर मंडळ.
•सीसीटीव्ही बाबत•
बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेकरता २१ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शाळा व परिसरात पर्याप्त संख्येत सीसीटीव्ही लावून वेळोवेळी त्यांचे फुटेज तपासण्याबाबत शाळांना निर्देश दिलेले आहेत. कोल्हापूर विभागीय मंडळाने कॉपीमुक्त व गैरप्रकार मुक्त परीक्षा आयोजन करण्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र असलेल्या शाळेत, शाळा परिसरात व ज्या शाळांना शक्य आहे, त्या शाळांनी प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच परीक्षा काळात वेळोवेळी बॅकअप घेण्याबाबतही सुचित केले आहे. शाळा व परिसरात सीसीटीव्ही असणे शासन निर्णयानुसार आवश्यक आहे, मात्र परीक्षेसाठी प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य (सक्तीचे) केलेले नाही, असे विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.