उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल.
कोल्हापूर / प्रतिनिधी
राज्यात गाळप हंगाम सुरू केलेल्या साखर कारखान्याच्या परिसरातील फडात अ,आ,ई अक्षरे गिरवली जाणार.
राज्यात साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस तोडणीसाठी स्थलांतरित झालेल्या असाक्षर कामगारांचे शिक्षण अखंडित सुरू रहावे म्हणून कारखाना परिसरात त्यांच्यासाठी अध्ययन-अध्यापन वर्ग सुरू करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यात गाळप हंगाम सुरू केलेल्या ९६ सहकारी व ९३ खाजगी अशा एकूण १८९ साखर कारखाना परिसरातील फडात ऊसतोडणी बरोबरच अ,आ,इ.. अक्षरे गिरवली जाणार आहेत.
केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम राज्यात २०२२ ते २०२७ या कालावधीत सुरू आहे. १५ व त्यापुढील वयोगटातील असाक्षरांसाठी प्रौढ शिक्षण ऐवजी 'सर्वांसाठी शिक्षण' या नावाने हा कार्यक्रम सुरू असून चालू शैक्षणिक वर्षात २४ डिसेंबर अखेरपर्यंत ४ लाख ९२ हजार इतक्या असाक्षरांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे.
या योजनेत शाळा हे एकक असून असाक्षर व त्यांना शिकवणाऱ्या स्वयंसेवकांची ऑनलाईन नोंदणी उल्लास मोबाईल ॲपवर शाळांनी नेमलेल्या सर्वेक्षकांद्वारे करण्यात येते. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात गावोगावी असे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. साखर कारखान्यांच्या गाळप हंगामासाठी स्थलांतरित व्हावे लागल्यास अशा असाक्षरांचे शिक्षण अखंडित सुरू रहावे म्हणून राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाचे सचिव तथा योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी साखर आयुक्तांना याबाबत पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानुसार राज्याचे सहकार तथा साखर आयुक्त दीपक तावरे यांनी सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांना आदेशित केले आहे.
देशातील साक्षरतेचा दर १०० टक्के साध्य करण्याचा उद्देशाने सर्व राज्यांमध्ये सन २०२२-२७ या कालावधीपर्यंत अंमलबजावणी करण्यात येत आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि.१४.१०.२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार, राज्य शासनामार्फत केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरु आहे. त्यानुसार राज्य, जिल्हा, तालुकास्तरावर विविध समित्यांची स्थापना करण्यात येऊन त्यांचे मार्गदर्शन व निगराणीखाली सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
सध्या राज्यात ऊस लागवड क्षेत्रात ऊसतोडीचे काम तसेच साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू आहे. त्यासाठी राज्याच्या विविध भागांतून ऊसतोड कामगारांचे ऊस तोड क्षेत्रात स्थलांतर होते. साधारणपणे ३ ते ४ महिने हे काम सुरू असल्याने स्थलांतरित ऊसतोड कामगार त्या ठिकाणी वास्तव्य करतात. हे ऊसतोड कामगार ज्या क्षेत्रातून स्थलांतरीत झालेले आहेत, त्या ठिकाणी असणाऱ्या शाळांतील मुख्याध्यापक तसेच शिक्षकांमार्फत सदर ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करून आढळलेल्या असाक्षरांची उल्लास ॲपवर नोंदणी व स्वयंसेवकांबरोबर ऑनलाईन जोडणी करण्यात आलेली आहे. तसेच सदर असाक्षरांच्या सोईच्या (उपलब्ध) वेळेनुसार त्यांना स्वयंसेवकांमार्फत अध्ययन-अध्यापन करण्यात येत आहे. स्वयंसेवकांना शासनामार्फत कोणत्याही स्वरूपाचे मानधन देण्याची तरतूद नाही. स्वयंसेवकांमार्फत स्वयंप्रेरणेने काम करण्यात येते.
या सर्व बाबी विचारात घेता कामासाठी स्थलांतरीत झालेल्या व सध्या ऊसतोड व गाळप क्षेत्रातील सर्व कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या (अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत खंड पडलेल्या) असाक्षरांना साक्षर करण्यासाठी पुढाकार घेऊन कारखान्यांच्या परिसरात स्वयंसेवकांमार्फत साक्षरता वर्ग सुरू करण्यात यावे. जे असाक्षर अमराठी असतील त्यांच्यासाठी त्यांच्या मातृभाषेतून अध्यापनासाठी स्वयंसेवकांची स्थानिक स्तरावरून व्यवस्था करावी. अध्ययन-अध्यापनाबाबत अधिक मार्गदर्शनासाठी नजीकच्या शाळांशी संपर्क करण्यात यावा. तसेच कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू असेपर्यंत सदर असाक्षर ऊसतोड कामगारांसाठी सुरू असलेले अध्ययन-अध्यापन वर्ग सुरू ठेवण्यात यावा, जेणेकरून संबंधित असाक्षरांच्या अध्ययनात खंड न पडता, त्यांच्या शिक्षणात सातत्य टिकून राहील व काम संपल्यावर ते मूळ ठिकाणी परत गेल्यावर उल्लास परीक्षा देऊन उत्तीर्ण होतील.
तसेच ज्या ऊसतोड कामगारांची त्यांच्या मूळ गावी (जेथून ते ऊस तोडणीसाठी ते स्थलांतरित झाले आहेत) उल्लास मोबाईल ॲपवर नोंदणी झालेली नाही, अशांच्याही अध्ययन-अध्यापनाची व्यवस्था कारखाना परिसरात करावी व त्यांना मूळ गावी गेल्यानंतर तेथे नजिकच्या शाळेत जाऊन ऑनलाइन नोंदणी करून घेणेबाबत प्रवृत्त करावे.
सर्व साखर कारखान्यांनी साक्षरता वर्ग व्यवस्थित सुरू ठेवावे व यासाठी स्थानिक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी आवश्यक पाठपुरावा व समन्वय करावा, असे साखर आयुक्तांनी आदेशित केले आहे.
ठळक बाबी-
•राज्यात ९६ सहकारी तर ९३ खाजगी अशा १८९ साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू.
•साक्षरता वर्गातील असाक्षरांची यादी, उपक्रमाची माहिती,फोटो जतन करण्याचे निर्देश.
•नोंदणीकृत असाक्षरांचे शिक्षण अखंडित सुरू रहावे यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
•नोंदणी नसलेल्या असाक्षरांसाठीही वर्ग सुरू करण्याच्या सूचना, मूळ गावी परतल्यानंतर ऑनलाईन नोंदणी अपेक्षित.
•स्वयंसेवक म्हणून स्थानिक सुशिक्षित बेरोजगार, महाविद्यालयीन विद्यार्थी, सेवानिवृत्त व्यक्ती यांचा सहभाग अपेक्षित.
•ऑनलाइन/ऑफलाइन अध्ययन -अध्यापनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून साहित्य विकसित.
या योजनेत शिकवणाऱ्या स्वयंसेवकास मानधनाची तरतूद नाही. त्यामुळे लोकसहभाग व सामाजिक उत्तरदायित्व यावर या योजनेचे यश अवलंबून आहे. कामगारांसाठी निवारा, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा देण्याबरोबरच साखर कारखान्यांना असाक्षरांच्या शिक्षणासाठीही लक्ष द्यावे लागणार आहे. स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण सुरू रहावे म्हणून यापूर्वी साखर शाळा सुरू करण्यात येत असत. त्या बंद करून आता लगतच्या स्थानिक प्राथमिक, माध्यमिक शाळेत त्यांना दाखल करून घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
"मुलांबरोबर असाक्षर पालकांचेही शिक्षण सुरू रहावे, यासाठी राज्यस्तरावरून उचललेले हे प्रगतिशील पाऊल ठरेल, मात्र त्यात साखर कारखाने कितपत सक्रियपणे सहभाग देतात, यावर त्याचे यशापयश अवलंबून आहे.
-राजेश क्षीरसागर, राज्य समन्वयक 'उल्लास' तथा विभागीय अध्यक्ष,कोल्हापूर मंडळ
"अध्ययन-अध्यापन वर्ग कारखान्यांमार्फत सुरू झाल्यास लगतच्या स्थानिक शाळांकडून आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत क्षेत्रिय अधिकाऱ्यांमार्फत शाळांना सूचना देण्यात येत आहेत.
- डॉ. महेश पालकर, सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण,पुणे