Tuesday, 17 December 2024

mh9 NEWS

दहावी बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांची गय नाही-राजेश क्षीरसागर


जिल्हाधिकारी सर्व विभाग प्रमुखांची भरारी पथके नेमणार 

कोल्हापूर /प्रतिनिधी

यावर्षी होणा-या इयत्ता १० वी, इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त घेण्याबरोबरच निकालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांसह परीक्षा संचलनातील सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले. प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी जिल्हास्तरावरून सर्व विभागांची भरारी भरारी पथके नेमून अचानक भेटी देण्याबाबत आदेश काढणार असल्याबाबत बैठकीत सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात गैरप्रकार मुक्त परीक्षा होण्यासाठी कटाक्षाने लक्ष देण्याची सूचना सर्व शाळा प्रमुखांना केली.
     कोल्हापूर विभागीय मंडळाच्यावतीने कोल्हापूर जिल्हयातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांची दोन टप्प्यात बैठक येथील विवेकानंद महाविद्यालयात गुरुवारी आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या कोणत्याही स्तरावरील व्यक्तीची गय केली जाणार नाही असा इशारा दिला. यावेळी विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे,विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले, सहसचिव बी.एम.किल्लेदार, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर,योजना शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे, बोर्डाचे अधिक्षक सुधीर हावळ, एस.वाय.दूधगावकर,एम.जी. दिवेकर,एच.के.शिंदे, आम्रपाल बनसोडे, प्रणाली जमदग्नी,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
            राजेश क्षीरसागर म्हणाले की, प्राचार्य व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी चांगली करून घ्यावी, शाळा स्तरावर उजळणी घेऊन पुरेसा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करून घ्यावा. केंद्रावर होणारे गैरप्रकार बंद करा. अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा नियमावलीतील तरतुदींसह दिला. विद्यार्थ्यांनाही शिक्षासूचीची माहिती दया. विद्यार्थ्यांचे उदबोधन वर्ग आयोजित करा. कॉपीमुक्तीची शपथ घ्या व भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना यथायोग्य मार्गदर्शन करा असे सांगून राज्य मंडळ व विभागीय मंडळाच्या संकेतस्थळाबाबत माहिती दिली. राज्य मंडळांने नव्याने विकसित केलेल्या  ॲपविषयी सविस्तर माहिती देऊन शाळाप्रमुख शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्याचा वेळोवेळी उपयोग करावा अशीही सूचना केली. मंडळातील इतर सुविधा व आवश्यक बाबीविषयी पीपीटीदवारे मार्गदर्शन केले. यावेळी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. प्रशासकीय तांत्रिक बाबींच्या मार्गदर्शनासाठी विभागीय मंडळाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
     विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी प्रास्ताविकात सर्वांना काळाबरोबर तुम्ही आपल्यात सुधारणा केली नाही तर बंद पडलेल्या कंपनी सारखी आपली  वाईट अवस्था होईल. नवीन गोष्टी आत्मसात करणे आपले काम आहे, आज याठिकाणी तुमची बोर्डाच्या कामासंबंधी उजळणी झाली आहे. पीपीटी मिळाल्यावर स्टाफ मिटींग घेवून सर्वांना अवगत करायचे आहे. पीपीटीसह शिक्षक पालक ,विद्यार्थी यांची बैठक घेवून त्याचे इतिवृत्त ठेवायचे, ते भेटीसाठी आलेल्या अधिका-यांना  दाखवायचे आहे, अशा सूचना दिल्या. 

यावेळी उपसंचालक महेश चोथे, माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनीही मार्गदर्शन केले. तर सहसचिव बी.एम.किल्लेदार, अधिक्षक सुधीर हावळ, एस.वाय.दुधगावकर, एच.के.शिंदे,एम.जी.दिवेकर यांनी बोर्डाच्या विविध कामाविषयी विषयी  माहिती दिली.
        परीक्षेबाबत इत्यंभूत माहिती देण्यासाठी केलेल्या सूक्ष्म नियोजनाची व यापुढे मानसिकता बदलावी लागणार याची चर्चा बैठकीनंतर मुख्याध्यापकांमध्ये होती.

वैशिष्ट्यपूर्ण बैठक-
•तब्बल सात वर्षानंतर पूर्णवेळ विभागीय अध्यक्षांच्या उपस्थितीत थेट जिल्हास्तरावर सभा. हटके व वैशिष्ट्यपूर्ण सभेमुळे शाळा प्रमुखांचा पालटला नूर.
•राज्य मंडळ व विभागीय मंडळ आणि मोबाईल ॲपबाबत सविस्तर मार्गदर्शन.
• मंडळ सातत्याने ऑनलाइन बैठका घेऊन परीक्षा कामकाजाचा आढावा घेणार.
•परीक्षा काळातील व परीक्षोत्तर गैरमार्ग बंद करणार.
•जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मदतीने कडक नियंत्रणात परिक्षा घेण्याचा निर्धार.
•चालू महिन्यात शाळास्तरावर आणि नंतर परीक्षेच्या पहिल्या दिवशी केंद्रावर कॉपीमुक्तीची विद्यार्थ्यांना शपथ देणार.
•भयमुक्त व निर्भयपणे विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन उद्बोधन कार्यक्रम घेणार.
•विद्यार्थी पालक व शिक्षकांची मानसिकता बदलण्यासाठी शाळास्तरावर बैठका घेण्याचे व इतिवृत्त ठेवण्याचे निर्देश. त्यात आवश्यक सूचनांचे प्रकट वाचन करण्याचेही निर्देश.
 •सामूहिक कॉपी व पेपरफुटी सारख्या गंभीर प्रकरणी केंद्र शाळेचे अनुदान बंद करणे,शाळा स्वयम् अर्थसहायित करण्यासाठी शिफारस, मंडळाकडून शाळांचे संकेतांक गोठवणे यासारखी गंभीर कारवाई करण्याचाही दिला इशारा.
•परीक्षेत नेमून दिलेले काम टाळल्यास होणार कारवाई. 
•शाळेकडे विभागीय मंडळाची कोणतीही थकबाकी असल्यास विद्यार्थी प्रवेशपत्रे रोखणार, पर्यायाने जबाबदारी शाळेवर निश्चित होणार.
•गैरहजर शाळा प्रमुखांना शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत नोटीसा.

   फोटो 
 इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेच्या पूर्वतयारी संदर्भात   उपस्थित प्राचार्य व मुख्याध्यापक. मार्गदर्शन करताना विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :