हेरले / प्रतिनिधी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करत पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन हातकणंगले पोलिस ठाणे प्रमुख पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी केले आहे.
हेरले (ता. हातकणंगले) येथील सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते.
पोलीस निरीक्षक के एन पाटील म्हणाले, सामान्य नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने मिरवणूक न काढता पारंपरिक पद्धतीने साजेशी मिरवणूक काढावी, तसेच सामाजिक कार्यासह सजावटीकडे भर द्यावा, सर्व तरुण मंडळांनी एकत्र येऊन एक गाव एक गणपती संकल्पना राबवावी, प्रत्येक मंडळाने रितसर परवानगी घ्यावी, कोणत्याही गणेशोत्सव तरुण मंडळाने सक्तीने वर्गणी जमा करु नये, कोणत्याही मंडळाने मंडपची उभारणी रोडवरती करु नये, श्री. चे मूर्तीचे ठिकाणी मंडळाचे स्वयंसेवक -
अविरत ठेवावे, समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक बंधुतेचा संदेश द्यावा, जेणेकरून अन्य तरुण मंडळे त्यांचे अनुकरण करतील, यावर्षी महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करुया असे सांगितले होते त्या अनुषंगाने मंडळांनी साऊंड लावताना सर्वोच्च न्यायालयाच्या डॉल्बी नियमांस अधिन राहून साऊंड लावावे तसेच सामाजिक बांधिलकी किंवा सामाजिक जबाबदारी ओळखून हा गणेशोत्सव साजरा करावा, गणेश मूर्ती वरील सोन्याचे दागिन्यांची देखभाल करणे करिता मंडळातील स्वयंसेवक नेमावेत व जास्तीत जास्त C.C.TV कॅमेरे बसवावेत, विद्युत रोषणाई बाबत एम.एस. ई.बी. यांचेकडून योग्य ती रीतसर परवानगी घ्यावे असे त्यांनी आवाहन केले. यावेळी हेरले परिसरातील सर्व तरुण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष कार्यकर्ते, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.