मन करा रे प्रसन्न ।
सर्व सिद्धीचें कारण ।
मोक्ष अथवा बंधन ।
सुख समाधान इच्छा ते ॥१॥ संत जगतगुरु तुकाराम महाराज.
*जेव्हा विचार, प्रार्थना आणि हेतू सर्व सकारात्मक असतात, तेव्हा जीवन आपोआप सकारात्मक होते*
आपण आपल्या दैनंदिन जीवनात रोज कुणाला तरी प्रसन्न करण्याचा प्रयास करत असतो. प्रसन्न करणे म्हणजे आपलेसे करणे. त्याला काय हवे नको ते पहाणे. त्यासाठी कष्ट करणे, त्याच्या आवडीच्या गोष्टी करणे हे सर्व आपण ज्या व्यक्तीला प्रसन्न करावयाचे असते त्या व्यक्तीकडे पाहून करत असतो.
ज्या गोष्टींचा सततचा सहवास आहे अशा गोष्टी माणसाला आपणाकडे ओढून घेतात व मन ज्याकडे आपण कधीच लक्ष देत नाही, त्याचेवर बाह्य गोष्टी आकर्षित होत नाहीत.
त्या वस्तुंना मनाचा ठाव ठिकाणा माहित नसतो. हा मनाचा ठाव लागला म्हणून न दिसणारे आंत एकांतात असलेल्या मनाचे अवलोकन करणे गरजेचे आहे.
त्यासाठी योगा, मनन, चिंतन या गोष्टी गरजेच्या आहेत. यातून मनाची ठेवण माणसाच्या ध्यानात येते.
मन हा दोन अक्षरी शब्दाचा सर्व खेळ आहे. मन हे सर्व समस्यांचे व प्रश्नांचे मूळ उत्तर आहे. मन हेच सर्व समस्यांचे व प्रश्नांचे समाधान आहे. या मनाने काय करावे? त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे? सम स्थितीत कसे आणायचे?
महाभारतात युद्ध भूमीवर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला म्हटले, "हे कृष्णा! हे मन निश्चितच खूप चंचल आणि अतिशय हट्टी आणि बलवान आहे, मला या मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण वाटते, जसे की वाऱ्यावर नियंत्रण ठेवणे."
यावर भगवान श्रीकृष्णांनी समर्पक असे उत्तर दिले, "हे कुंतीपुत्र, चंचल मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण आहे यात शंका नाही, परंतु सर्व सांसारिक इच्छांचा (वैराग्य) त्याग करून आणि सतत ध्यान साधना करून ते नियंत्रित केले जाऊ शकते.
खरे तर यानंतर वेगळे काही लिहिण्याची गरज नाही. मी कोणतेही प्रवचन,उदाहरणे, दाखले देण्याचा प्रयत्न करत आहे असे समजू नका, परंतु मी प्रतिकूल परिस्थितीचा कसा सामना केला आणि आजही करत आहे हे तुम्हा सर्वांना सांगण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
आपण आपले स्वतःचे प्रतिबिंब उकळत्या पाण्यात पाहू शकतो का? अजिबात नाही. अस्वस्थ आणि क्षुब्ध मन आपल्याला शांती मिळवून देऊ शकते का? नाही. ज्याप्रमाणे प्रतिबिंब फक्त शांत पाण्यातच दिसते, त्याचप्रमाणे शांत आणि संतुलित मन आपल्याला संतुलित व्यक्ती बनण्यास मदत करते आणि केवळ शांत आणि संतुलित मनच आपला मित्र होऊ शकतो. तर संपूर्ण व्यायाम मनाला संतुलित स्थितीत कसे आणायचे याबद्दल आहे. जेव्हा परिस्थिती अनुकूल नसते, आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या विरोधात दिसते, तेव्हा आपल्याला संयम बाळगण्याची गरज वाटते. तो धीर कसा धरू शकतो? आम्ही ते उघडे ठेवले आहे. आपण आपले मन तसे प्रशिक्षित केलेले नाही. अनेक प्रश्न आहेत, उत्तर एकच आहे - ध्यान.
मन कधी गुरूप्रमाणे हिताच्या गोष्टी सांगते, कधी शिष्याप्रमाणे आज्ञाधारक होते. मन प्रसन्न असेल तर परमार्थात रमते आणि मोक्ष मिळतो. मन उदास असेल, तर अधोगतीला नेते.
मन हे एका बीजा प्रमाणे असते. ते जेव्हा प्रेमाने पेरले जाते तेंव्हा ते अधिकाधिक फुलते. त्याचप्रमाणे आत्मा विकासाच्या रोपट्याचं खतपाणी म्हणजे मन. काही ताडाची झाडे तीन वर्षात फळे द्यायला लागतात तर काहींना दहा वर्षे पण लागतात.