हेरले / प्रतिनिधी
हेरले ते मौजे वडगांव रस्त्यावरील कासार मळा येथील विहीरीचा भाग खचल्याने संरक्षक भिंत पडून रस्त्याचाही काही भाग खचला आहे. त्यामुळे हा रस्ता अवजड वाहनांच्या वाहतूकीस बंद झाला असून सर्वच वाहनांच्या वाहतूकीस धोकादायक बनला आहे. तरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तात्काळ विहिरीच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करून खचलेल्या रस्त्याचा भराव करून या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववतपणे सुरळीत करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
मागच्या आठवडयात शुक्रवारी अतिवृष्टीने मौजे वडगाव - हेरले रस्त्यावरील कासार मळा येथील विहिरीची संरक्षक भिंत पडून रस्ता खचला आहे. त्यावेळी पासून हा रस्ता अवजड वाहने, चारचाकी, तीनचाकी वाहनांसाठी वाहतूक बंद केली आहे. हा रस्ता नागाव, मौजे वडगाव, एमआयडीसी शिरोली ,पेठवडगांव आदी गावाकडे जाण्याचा सोयीचा मार्ग असल्याने या रस्त्यावरून मोठया प्रमाणात वाहतुक होत असते. मात्र सद्या अवजड वाहनांना हा रस्ता बंद असल्याने गौरसोय होत आहे.
या रस्त्यावरील उजव्या बाजूच्या दोन विहिरी व डाव्या बाजूच्या दोन विहिरीवर संरक्षक भिंती नसल्याने हा रस्ता वाहतूकिस धोकादायक बनला आहे. तरी या रस्त्यावरील चारही विहिरीच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागाने करून हा रस्ता वाहतूकिस सुरक्षित पूर्ववत करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
फोटो
हेरले ते मौजे वडगांव रस्त्यावरील कासार मळा येथील विहिरीची संरक्षक भिंत खचून रस्ताही खचल्याने हे ठिकाण वाहतूकीस धोकादायक बनले आहे.