हेरले / प्रतिनिधी
कोरोनाचा समुह संसर्ग होऊ नये तो रोखण्यासाठी खबरदारी म्हणून आगामी होणाऱ्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या १२ गावां पैकी सहा गावांमध्ये ' एक गाव एक गणपती' गणेश उत्सव करण्यासाठी तरुण मंडळांची बैठक घेऊन संकल्पना यशस्वी केली आहे. उर्वरीत सहा गावांमध्ये काही दिवसातच बैठक घेऊन ही संकल्पना पूर्णत्वास आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असून या गावांमध्येही सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमाद्वारे दिली.
शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचा प्रभार स.पो.नि राजेश खांडवे यांनी नुकताच स्विकारला आहे. पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या सादळे ,मादळे, कासारवाडी, टोपे, हालोंडी, मौजे वडगांव या सहा गावांमध्ये गणेश उत्सव साजरा करण्याबद्दल सर्व तरुण मंडळांची मिटींग बोलवून या सभेमध्ये गेली दिड वर्षा पासून कोरोनाच्या संसर्गाची आपत्ती, कोरोनाची नियमावली, कोरोनाच्या डेल्टा विषाणूच्या संसर्गाचा संभाव्य धोका, येणारी कोरोनाची तिसरी लाट यामुळे आपल्या सर्वांना संसर्गाचा संभाव्य धोका ओळखून कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून गणेश उत्सव व विविध उत्सव जल्लोषाने गर्दी न करता साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला. सण, उत्सव साद्या पद्धत्तीने साजरे करुन आपल्या जिविताचे रक्षण करणे या विश्व आपत्ती परिस्थितीत महत्त्वाचे आहे. असे भावनिक आवाहन करीत या गावातील सर्व मंडळांना 'एक गाव एक गणपती ' उत्सव करण्यासाठी आवाहन केले. या सहा गावांतील तरुण मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
पुलाची शिरोली,शिये ,भुये, संभापूर, जठारवाडी, नांगाव या गावांमध्ये लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तरुण मंडळे यांच्याशी संवाद साधून एक गाव एक गणपती गणेश उत्सव करण्यासाठी बैठकीचे आयोजन करणार आहोत. या गावातही नक्की सकारात्मक प्रतिसाद मिळेल. एमआयडीसी पोलिस ठाण्यातंर्गत येणा-या बारा गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना साकार होईल असा अशावाद त्यानी व्यक्त केला.
सपोनि राजेश खांडवे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या बारा गावांमध्ये तसेच एमआयडीसी औद्योगिक वसाहतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू राहणार नाहीत याची खबरदारी घेण्याची सूचना सर्व बिट अंमलदार यांना देऊन अवैध धंदा सुरु असल्याचे आढळल्यास अवैध धंदेवाल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.