हेरले / प्रतिनिधी
डिझास्टर रेसिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर या थीमवर ब्रिटिश कौन्सिलच्या जागतिक सहभागी स्तरावर देण्यात येणाऱ्या अनुदानाचा भाग म्हणून टीसाईड विद्यापीठ युके, संजय घोडावत विद्यापीठ, एस.आर.एम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी तमिळनाडू आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घोडावत विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 17 ते 21 ऑक्टोबर दरम्यान 'प्रशिक्षकांना प्रशिक्षित करा' या उप विषयावर आधारित आहे.
आपत्ती व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्रशिक्षकांना उत्तम प्रशिक्षण मिळावे या हेतूने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून एम.एस.सी डीझास्टर ममॅनेजमेंट विषयाचा अभ्यासक्रम सहभागी विद्यापीठाच्या शिक्षकांकडून आणि विद्यार्थ्यांना आलेल्या अनुभवावर, प्रशिक्षकांच्या सल्ल्याने तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहभागी विद्यापीठाच्या निवडक विद्यार्थ्यांना टीसाईड विद्यापीठ युके आणि भारतात एम.एस.सी डीझास्टर ममॅनेजमेंट या विषयाचे शिक्षण घेण्याची आणि १२ आठवड्यांची इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. याचा सर्वतोपरी खर्च विद्यापीठाचा असणार आहे. ज्याच्यामध्ये प्रवास खर्च, राहण्याची सोय आहे. संजय घोडावत विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणासाठी निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना ब्रिटिश कौन्सिल कडून देण्यात येणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. यामुळे भारत आणि युके यांच्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची देवाणघेवाण सुरु होईल. हा अभ्याक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्र, राज्य, जिल्हा आपत्कालीन विभाग, स्वयंसेवी संस्था अशा ठिकाणी नोकरी करण्याची संधी प्राप्त होईल.
प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थी आणि प्रशिक्षक कोल्हापूर आणि परिसरातील ज्या भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते तिथे भेटी देणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापुरातील वारसा स्थळांना भेट देऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास काय करता येईल या विषयी, यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. देश विदेशातील 60 हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, प्रशिक्षक या कार्यशाळेत सहभाग घेणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी दिली आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता घोडावत विद्यापीठात होणार आहे. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राहुल रेखावार तर अध्यक्ष म्हणून विश्वस्त विनायक भोसले उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर टीसाईड विद्यापीठ चे आंतरराष्ट्रीय सहयोगी अधिव्याख्याते डॉ.सिमॉन लॅँच आणि डॉ.केविन थॉमस या उद्घाटन समारंभास अतिथी प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील, डिझाईन सल्लागार दीपंकर भट्टाचार्य, एस.आर.एम.विद्यापीठाचे डॉ.विघ्नेश के.एस.,महाराष्ट्र राज्याचे माजी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक आणि माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई, सायबर सिक्युरिटी विषयातील तज्ज्ञ आशुतोष कापसे, शास्त्रज्ञ एस.डी.पवार, व्हाईटवॉटर आर्किटेक्ट चे प्राचार्य आर्कि. दर्शन इंदानी, सी.डी.आर.आय व्यवस्थापन शाखेचे अविनाश व्यंकटा हे सर्व व्याख्याते सहभागीतांना प्रशिक्षण देणार आहेत. या कार्यशाळेस संस्थेचे चेअरमन संजय घोडावत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.