हेरले प्रतिनिधी
आपत्तीच्या काळात लोक सहभागाचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. याबद्दलची जाणीव जागृती नागरिकांमध्ये करून क्षमता बांधणी केली तर नागरिक कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज राहतील. आपत्ती काळात जीवित हानी टाळायची असेल तर लोकसहभाग महत्त्वाचा आहे आणि तो आपत्ती व्यवस्थापनाचा आत्मा आहे, असे उद्गार माजी जिल्हाधिकारी व महाराष्ट्र शासनाचे माजी आपत्ती व्यवस्थापन संचालक दौलत देसाई यांनी संजय घोडावत विद्यापीठातील आपत्ती व्यवस्थापन या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत काढले. त्याचबरोबर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना आलेल्या महापूर व कोव्हिडं 19 आपत्तीच्यावेळी जनतेने केलेल्या सहकार्यामुळे या आपत्तीचा चांगल्या प्रकारे आपण सामना करू शकलो असे नमूद करून कोल्हापूरच्या नागरिकांचे त्यांनी यावेळी आभारही मानले.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते म्हणाले, की नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असते. अशावेळी शासन आणि जनता यांनी एकत्र येऊन सुयोग्य व्यवस्थापन केले तर त्यातून जीवित हानी टाळता येऊ शकते. कोल्हापुरातील महापूर आणि कोविड काळात कार्य करत असताना शासकीय अधिकारी म्हणून कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले, त्यातून कशाप्रकारे मार्ग काढला याबद्दल त्यांनी कार्यशाळेत उहापोह केला. आपल्या अनुभवाचा फायदा कार्यशाळेतील सहभागीतांना व्हावा यासाठी अनेक उदाहरणातून त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले. यासाठी त्यांनी भारत सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याविषयीची माहिती दिली.
संजय घोडावत समूह आणि विद्यापीठाच्याद्वारे महापूर व कोविड काळात कोल्हापूर जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यासाठी समूहाचे चेअरमन संजय घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांच्या बद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. अन्नधान्याचे वाटप असो, रुग्णांची सेवा असो या काळात घोडावत समूह सामाजिक कार्यात अग्रेसर राहिला आहे. त्यांनी केलेले हे कार्य इतर संस्थांसाठी मार्गदर्शक आहे. सर्वांनी अशा कार्यासाठी तत्पर असायला हवे तरच आपत्तीच्या काळात शासन, सामाजिक संस्था, आणि लोकसहभागातून उत्तम व्यवस्थापकीय कार्य घडू शकेल.
डिझास्टर रेसिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर या थीमवर ब्रिटिश कौन्सिलच्या जागतिक सहभागी स्तरावर देण्यात येणाऱ्या अनुदानाचा भाग म्हणून टीसाईड विद्यापीठ युके, संजय घोडावत विद्यापीठ,एस.आर.एम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी तमिळनाडू आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घोडावत विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन या विषयावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन संजय घोडावत विद्यापीठात करण्यात आले आहे. यावेळी दौलत देसाई यांचा सत्कार स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील आणि टीसाईड विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय सहयोगी अधिव्याख्याते डॉ.सायमन लिंच यांनी केले.तर हि कार्यशाळा २१ ओक्टोबर पर्यंत चालणार असल्याची माहिती समन्वयक प्रा. इंगळे यांनी दिली