कोल्हापूर / प्रतिनिधी
हेरले गावामध्ये जिल्हा परीषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाच वर्षात पंधरा कोटी रुपये पेक्षाही जास्त विकास निधी मंजूर करून विकास कामे पूर्ण केली आहेत. गावाचे रुपडे पालटून शहराचे रूप विकास कामांच्या माध्यमातून गावास प्राप्त झाले आहे. 'हे मी नाही बोलत माझे काम बोलते'. असे प्रतिपादन माजी सभापती राजेश पाटील यांनी केले. ते हेरले ( ता. हातकणंगले ) येथील ग्रामपंचायत समोर आयोजित स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारसभे प्रसंगी बोलत होते.
माजी सभापती राजेश पाटील पुढे म्हणाले,प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ७ कोटी ५० लाख , गाव तलाव सुशोभिकरणासाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी, वाढीव नळ पाणी पुरवठा योजनेसाठी २ कोटी रुपयांचा निधी
आदी विकास कामांचा निधी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. कन्या शाळेची ७ खोल्यांची ५० लाखाची इमारत पूर्णत्वास येत आहे. या विकास निधीसह अन्य विविध विकास कामाची ध्येय पूर्ती साध्य करायची आहे. ग्रामपंचायत १९२७ साली स्थापन झाली. स्थापनेपासून माझ्या पाटील घराण्यातील माझे पणजोबा, आजोबा , वडील यांनी सरपंच पदाच्या माध्यमातून गावाचा विकास केला आहे. त्यांचीच परंपरा आम्ही जपून गेली पंधरा वर्षे गावाचा विकास करीत आहोत. या निवडणूकीत जनतेने आम्हास लोकनियुक्त सरपंच पदासह १७ ग्रामपंचायत सदस्य उमेदवारांना निवडून देऊन सत्ता द्यावी. २०२२ ते २०२७ पर्यंत पाच वर्षात विकास कामाचा डोंगर रचून ग्रामपंचायतीचे शतक महोत्सवी वर्ष साजरे करूया असे आवाहन माजी सभापती राजेश पाटील यांनी हेरले गावातील मतदार बंधू भगिनींना केले. ते हेरले ( ता. हातकणंगले ) येथील ग्रामपंचायत समोर आयोजित स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारसभे प्रसंगी बोलत होते.
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील म्हणाल्या, माजी सभापती राजेश पाटील यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये ग्रामपंचायत इमारत,अंतर्गत रस्ते, गटर्स, नळपाणी पुरवठा योजना, नविन बालवाड्या इमारती, घरकुल योजना, ग्रामस्थांसाठी वैयक्तिक लाभार्थ योजना, शाळांच्या इमारती दुरुस्ती, समाज मंदिर दुरुस्ती व रंगरंगोटी,मागास वर्गिय समाजांना कार्यक्रमांसाठी भांडी व इतर वस्तू भेट योजना, आदी सार्वजनिक विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर करून आणला आणि गावची विकास कामे पूर्णत्वास आणली. म्हणून ' मी नाही बोलत माझे काम बोलते' हे घोषवाक्य आम्ही सिद्ध करून दाखविले आहे. म्हणून गावची जनता आमच्या आघाडीच्या पाठीशी असल्याने आमच्या आघाडीचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट केले.
या प्रचार सभेमध्ये स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास आघाडीचे लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार राहुल शेटे यांनी ई ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व नविन आधुनिक विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामस्थांना सर्व सोयी सुविधा घर बसल्या कशा प्राप्त होतील या कार्याचा संकल्प जाहिर करून विविध विकास कामे करण्याचे बळ देण्यासाठी बहुमोल मतदान करून आघाडीस निवडून देण्याचे आवाहन केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले तालुका सरचिटणीस मुनीर जमादार म्हणाले, पंचायत समितीच्या माध्यमातून गावातील पाणंद रस्त्यांच्या विकासासाठी लाखो रुपयांच्या निधी मंजूर करून आठ पाणंद रस्त्यांचे मुरुमीकरन केल्याने शेतकऱ्यांची वाहतूकीची व्यवस्था झाली आहे. गावातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आपली स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास आघाडी कशी प्रयत्नशील आहे ते स्पष्ट केले.
प्रा. राजगोंड पाटील व माजी उपसभापती अशोक मुंडे यांनी पुढील पाच वर्षात गावांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय करून गावातील मुलांना उत्तमोत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार केला. या प्रसंगी चेअरमन निलोफर खतीब, वंदना चौगुले,पोपट चौगुले,प्रा. प्रभूदास खाबडे, माजी सरपंच रियाज जमादार, माजी उपसरपंच विजय भोसले, संदीप चौगुले, माजी ग्रामपंचायत सदस्य मज्जिद लोखंडे, संजय खाबडे, आदींनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत स्वाभिमानी आघाडीस विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी ॲड. राजू पाटील, कपील भोसले, स्वप्नील कोळेकर आदी मान्यवरांसह १७ ग्रामपंचायत सदस्य उमेदवारसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश चौगुले यांनी केले.
फोटो
हेरले : स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या प्रचार सभेत बोलतांना माजी सभापती राजेश पाटील शेजारी अन्य मान्यवर.