Friday, 27 January 2023

सर्व शासकीय यंत्रणांनी पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परांत समन्वय ठेवावा - प्रधान सचिव प्रवीण दराडे


पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्याकडून सुमंगल पंचमहाभूत महोत्सव होणाऱ्या जागेची पाहणी

कोल्हापूर / प्रतिनिधी

 श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ संस्थान कडून पर्यावरण संवर्धनासाठी सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवात सर्व शासकीय विभागांच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती देणारे प्रदर्शन स्टॉल लावावेत. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवावा व प्रत्येक विभागाला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव तथा पंचमहाभूत महोत्सवाचे नोडल अधिकारी प्रवीण दराडे यांनी दिले.
          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव पूर्व तयारी आढावा बैठकीत श्री. दराडे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे,  पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मठाचे प्रतिनिधी संतोष पाटील, उदय सामंत, माणिक चुयेकर यांच्यासह मुंबई येथील पर्यावरण विभागाचे अन्य अधिकारी व जिल्हा प्रशासनाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

       प्रधान सचिव श्री. दराडे पुढे म्हणाले की, या पंचमहाभूत महोत्सवासाठी कणेरी मठ परिसर व महोत्सवाच्या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा संबंधित विभागांनी त्वरित उपलब्ध करुन देण्यात याव्यात. त्या भागात ग्रामीण रस्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते दुरुस्ती, मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा, भाविकांसाठी पाण्याची सुविधा, स्वच्छता, आरोग्य सुविधा याबाबत सर्व संबंधित विभागांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सुचित केले.

        कोल्हापूर महापालिकेने त्यांच्याकडील शहर वाहतूक बसेसची व्यवस्था महोत्सव कालावधीत किमान दहा दिवस दहा बसेस कणेरी मठ ते कोल्हापूर शहर लोकांचे दररोज ने-आण मोफत करण्यासाठी उपलब्ध करुन द्याव्यात. यासाठी आवश्यक असणारा निधी पर्यावरण विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याप्रमाणे परिवहन राज्य महामंडळाने त्यांच्याकडेही अशा पद्धतीने राखीव बसेस ठेवाव्यात व प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे त्या उपलब्ध करुन द्याव्यात, असेही त्यांनी सुचित केले.

      या महोत्सवाच्या कालावधीत किमान 20 ते 25 लाख लोक येण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी शासनाच्या किमान 24 विभागाचे विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती देणारे मोठे स्टॉल या ठिकाणी दर्शनी भागात लावावेत. या स्टॉलच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांची माहिती आकर्षक फ्लेक्सद्वारा तसेच ऑडिओ जिंगल्स, व्हिडिओच्या माध्यमातूनही लोकांना देण्याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना श्री. दराडे यांनी दिल्या.
       
 महोत्सव कालावधीत मोठ्या संख्येने लोक येणार असल्याने कोल्हापूर शहर तसेच अन्य पर्यटन ठिकाणीही पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत अधिक दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी. आरोग्य यंत्रणाही अलर्ट ठेवावी. महोत्सव परिसरात आपत्तीकालीन यंत्रणाही दक्ष ठेवावी. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, फिरते पथक आदी यंत्रणा अलर्ट ठेवाव्यात, अशा सूचना श्री. दराडे यांनी दिल्या.
कणेरी मठ, सुमंगलम पंचमहाभूत महोत्सवाच्या जागेची पाहणी
        
 पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सुमंगल पंचमहाभूत महोत्सवाच्या अनुषंगाने कणेरी मठ परिसरात होणाऱ्या या महोत्सवाच्या जागेची पाहणी तिथे प्रत्यक्ष भेट देऊन केली. यावेळी मठाकडून करण्यात येत असलेल्या विविध कामांची पाहणी केली. पूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी महोत्सवाच्या सुरु असलेल्या सर्व कामांची माहिती त्यांना दिली. यावेळी प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी ज्या विभागांची कामे अपूर्ण आहेत ती कामे त्वरित पूर्ण करण्याबाबतचे निर्देश शासकीय यंत्रणेला दिले. त्यानंतर दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी पंचगंगा नदी घाटावर महाआरती होणार असल्याने त्या ठिकाणची पाहणीही त्यांनी केली. यावेळी सर्व शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.

संविधान जपणारे आदर्श विद्यानिकेतन - डॉ .दीपक शेटे


हेरले /प्रतिनिधी

मिणचे हातकणंगले : समता, बंधुता  व धर्मनिरपेक्षाची शिकवण देणारे हे निवासी संकुल खऱ्या अर्थाने  संविधान जपणार आहे असे उद्गार स्वातंत्र्यसैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज मिणचे च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ दीपक शेटे यांनी काढले .
संविधानाचे विचार जपणं ही आता काळाची गरज बनली आहे आणि ती आपण जपावी हीच अपेक्षा आहे . असे विधान संस्थेचे संस्थापक प्राचार्य डी एस घुगरे यांनी आपल्या प्रस्ताविकात मांडले .
यावेळी शासकीय ग्रेड परीक्षेत ए श्रेणी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला .
याप्रसंगी संगीत विभागाने देशभक्तीपर गीते म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली .तसेच राजनील पाटील आणि हर्षल कदम या विद्यार्थ्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए बी चव्हाण यांनी केले .कार्यक्रमाचे नियोजन विभाग बी चे प्रमुख एस एस पाटील यांनी केले .
संस्थेचे सचिव व उपप्राचार्य एम ए परीट यांनी कार्यक्रमाचे आभार मानले .यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी पालक उपस्थित होते .

Thursday, 26 January 2023

हेरले येथे गणेश जयंती उत्साहात साजरी



हेरले /प्रतिनिधी


हेरले (ता हातकणंगले) सुर्यगंगा कला, क्रीडा व सांस्कृतीक मंडळ प्रणित  संकल्प सिद्धी गणेश मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांनी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्त झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये  ६३ जणांनी रक्तदान केले.गणेश जयंती निमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभ ५ हजार ग्रामस्थांनी घेतला.
          गणेश जयंती निमित्त 'श्री'ची नगरप्रदक्षिणा पालखी सोहळा व दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला.
        सकाळी गणेश जन्मकाळ सोहळा ,यज्ञ विधी,संस्कार व पूर्णाहुती काशीनाथ स्वामी यांच्या हस्ते करण्यात आली.महाआरती लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे व शिवाजी रुईकर यांच्या हस्ते करण्यात आली.  त्यांनतर महाप्रसादाचे वाटप आनंदा कुंभार व गुरुनाथ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

            यावेळी माजी आमदार डॉ सुजित मिणचेकर,माजी सभापती राजेश पाटील,सरचिटणीस मुनिर जमादार, युवा नेते रोहन पाटील, पोलीस पाटील नयन पाटील,उपसरपंच महंमदबख्तियार जमादार, ग्रा सदस्य अमित पाटील,पंचगंगा साखर संचालक लक्ष्मण निंबाळकर,अध्यक्ष शशिकांत पाटील,उपाध्यक्ष नारायण चौगुले व सदस्य ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

Wednesday, 25 January 2023

विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहावे -- मेजर रत्नाकर तिराळे.

कोल्हापूर प्रतिनिधी 

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती कडील म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11,कसबा बावडा,कोल्हापूर मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा प्रजासत्ताक दिन भारतीय सेना मेजर रत्नाकर तिराळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.प्रमुख उपस्थिती भारतवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक भोसले,सचिन चौगले,केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील,सामाजिक कार्यकर्ते अभिजित जाधव, जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचे स्वागत उत्तम कुंभार सर यांनी केले,प्रस्ताविक डॉ अजितकुमार पाटील केले.विद्यार्थी मनोगतात अस्मिता लोंढे,जान्हवी ताटे,स्वरा कासे,प्रणित पाटील,तनिष्का कुंभार, कांदबरी पाढरबळे,आर्य कासे,विराज दाभाडे,श्रावणी पोवार,अनन्या कुंभार, मनस्वी कदम,यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन सदस्य दिपाली चौगले,कोमल कासे, मिनाज मुल्ला,सुशील जाधव,उत्तम पाटील, आसमा तांबोळी, तमेजा मुजावर, विद्या पाटील,कल्पना पाटील, सावित्री काळे,हेमंतकुमार पाटोळे इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुशांत पाटील,यशवर्धन सोनूले,गणेश कासे यांनी विशेष प्रयत्न केले

कार्यक्रमाचे आभार आरव कोरवी यांनी मानले.

मौजे वडगाव येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

 हेरले / प्रतिनिधी 
 मौजे वडगाव (ता. हातकणगले ) येथील शिवसेना शाखा व ग्रामपंचायतींच्या वतीने  हिँदूहुदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्या ९७ व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस लोकनियुक्त सरपंच कस्तुरी पाटील व शाखाप्रमुख विद्यमान ग्रा. पं . सदस्य सुरेश कांबरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करूण अभिवादन करण्यात आले .
         यावेळी बोलतांना सुरेश कांबरे म्हणाले की, हिंदूहुदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या रोखठोक भुमिका आणि भल्याभल्या राजकारण्यांना घाम फोडणारे एक बिनधास्त व्यक्तीमत्व होते . एक पक्ष एक मैदान आणि एक नेता आशी ख्याती असलेले महाराष्ट्रातील ते एकमेव नेते होते . ते भाषण करित असतांना कोणाचीही भीडभाड ठेवत नसत त्यामुळे त्यांच्या स्पष्ट आणि जहाल भुमिकेमुळे ते हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखले जाऊ लागले .
         यावेळी सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच सुनिल खारेपाटणे, शाखाप्रमुख व विद्यमान ग्रा . पं .सदस्य सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड , स्पप्नील चौगुले, माजी ग्रा.पं. सदस्य अवधूत मुसळे , आनंदा थोरवत , अमोल झांबरे , दगडू मोरे , ज्ञानेश्वर सावंत, सविता  सावंत, सुनिता मोरे ,  सुवर्णा सुतार, दिपाली तराळ , यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

फोटो 
हिंदूहुदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त अभिवादन करतांना सरपंच उपसरपंच ग्रा.पं. सदस्य व शिवसैनिक

Sunday, 22 January 2023

शौमिका महाडिक यांचेकडून मौजे वडगाव उपकेंद्र दुरुस्ती साठी ५ लाख मंजूर : सरपंच कस्तुरी पाटील


हेरले / प्रतिनिधी 
स्थानिक उद्‌भवणाऱ्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी गावातील अतिजवळचे उपचार करणारे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे २४ तास मोफत सेवा देत असते. त्यामुळे गावातील पुरुष , महिला , शालेय विद्याथी ,यांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे उद्‌गार लोकनियुक्त सरपंच कस्तुरी पाटील यांनी काढले . त्या मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील शौमिका महाडिक यांच्या निधीतून व आरोग्य विभाग विशेष दुरुस्ती अंतर्गत योजनेतून मंजूर कामाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या . तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सतिश चौगुले होते .
              यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील निवासी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी आरोग्याच्या बाबतीत सविस्तर माहिती दिली . या उपकेंद्रामध्ये चालू वर्षी ३५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली . त्यामध्ये १४२ ब्लडप्रेशर , मधुमेह तपासणी व इतर आजारांवर मोफत औषधे देण्यात आली. तर १२ रुग्णांचे एक्स रे काढण्यात आले 'सध्या शौमिका महाडिक यांच्या निधीतून मंजूर ५ लाख रुपये निधी मधून उपकेंद्राच्या आवारात बहुउद्देशीय आरोग्य भवन होणार असून रक्तदान शिबिरे ,  योगा शिबिरे , अशा विविध शिबिरासाठी लाभदायक ठरणार आहे .
        यावेळी उपसरपंच सुनिल खारेपाटणे , माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड, स्वप्नील चौगुले, सविता सावंत , ' सुनिता मोरे , सुवर्णा सुतार , दिपाली तराळ , माजी सरपंच रावसाहेब चौगुले , आजमुद्दीन हजारी , शपीक हजारी , अविनाश पाटील, प्रकाश चौगुले , महादेव जाधव ,दिलावर हजारी , यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते .


फोटो 
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे बहुउद्देशीय हॉलच्या शुभारंभ प्रसंगी सरपंच कस्तुरी पाटील उपसरपंच सुनिल खारेपाटणे सुरेश कांबरे व इतर मान्यवर

Thursday, 19 January 2023

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ताफा अडवण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस मुनिर जमादार यांचा इशारा


हेरले /प्रतिनिधी
सांगली - कोल्हापूर राज्य मार्गवरील
अतिग्रे ते शिरोली या दरम्यान  रस्त्यावरील स्पीड ब्रेकर महामार्ग रस्ते मंडळाने कोणताही गंभीर विचार न करता हटवले आहेत. हेरले ,चोकाक, अतिग्रे, हालोंडी , मौजे वडगाव फाटा या ठिकाणी पादचारी आणि शाळेतील मुलांना रस्ता ओलांडणे अत्यंत धोकादायक बनले आहे. अनेकांचे नाहक बळी जात आहेत, वाहने वेगाने येत असल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.याची दखल कोणीच घेत नाही.खासदार , आमदार ही याबाबतीत उदासीन आहेत. कोणततेही गांभीर्य नाही. दाद मागायची तर कोणाकडे असा प्रश्न या गावातील लोकांना पडला आहे.  
   यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून केंद्रिय मंत्री नितीन गडकरी  हे कोल्हापूरला येणार आहेत त्यांच्या वाहनांचा ताफा अडविणार आणि  आंदोलन करणार , त्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही
असा इशारा  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले तालुका सरचिटणीस मुनिर जमादार  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.

हेरले येथे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार

हेरले / प्रतिनिधी

हेरले (ता. हातकणंगले) येथील कन्या शाळा हेरले ,केंद्र शाळा हेरले, शाळा नंबर 2 हेरले, उर्दू शाळा हेरले, यांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच राहुल शेटे, उपसरपंच महंमदबख्तियार जमादार ग्रामपंचायत सदस्य अमित पाटीलसह सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार शाळेच्या संकुलात करण्यात आला. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष व शिक्षक बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील, शाळा नंबर दोन चे मुख्याध्यापक  विठ्ठल ढवळे, केंद्रशाळेचे मुख्याध्यापक  रावसो चोपडे, कन्या शाळेचे मुख्याध्यापक  प्रभाकर चौगुले, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका रिजवाना खान तसेच चारही शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
   यावेळी  सरपंच राहुल शेटे, उपसरपंच महंमदबख्तियार जमादार  व ग्रामपंचायत सदस्य  यांनी शाळेसाठी आम्ही कोणताही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.शाळा ही समाजाच्या विकासाचे माध्यम असून शाळेची प्रगती झाली तर आपोआप गावाची प्रगती होते. तसेच शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने नेहमी मदत व सहकार्य राहील अशा प्रकारचे आश्वासन सत्कार प्रसंगी दिले.
     फोटो 
हेरले येथे प्राथमिक शाळेत सरपंच राहुल शेटे, उपसरपंच महंमदबख्तियार जमादार
व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करतांना प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन शिक्षक नेते अर्जुन पाटील व अन्य मान्यवर.

Wednesday, 18 January 2023

सुमंगलम हा पंचमहाभूत लोकोत्सव माध्यमिक शिक्षण विभागामार्फत राज्यात आदर्श ठरेल असा साजरा करू : माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर.


कोल्हापूर / प्रतिनिधी
   सुमंगलम हा पंचमहाभूत लोकोत्सव या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत  माध्यमिक विभागातील सर्व संघटनांची संघटना प्रतिनिधींची बैठक  बुधवार  १८ रोजी मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथे आयोजित केली होती.माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली.
  या बैठकीस मार्गदर्शन करतांना माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर  म्हणाले  २० ते २६फेब्रवारी या सात दिनी सुमंगलम हा पंचमहाभूत लोकोत्सव  कार्यक्रम संपन्न होणार आहे. सुमंगलम हा पंचमहाभूत लोकोत्सव माध्यमिक शिक्षण विभागामार्फत राज्यात आदर्श ठरेल असा साजरा करण्यामध्ये सहभाग नोंदवू.या कार्यक्रमानिमित्य नियोजनासाठी सर्व संघटना उपस्थित आहेत. आपणा सर्वांचे योगदान महत्त्वाचे  आहे. यासाठी संदेशवाहक म्हणून काम करणे गरजेचे आहे.स्वइच्छेने कणेरीमठ परिसरातील स्वयंमसेवक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी कार्य केले पाहिजे,एनसीसी, एमसीसी ,आरएसपी, स्काऊट गाईड विद्यार्थी यांनी कर्तव्ये बजावे, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी १ किलो प्लास्टिक गोळा करणे,  तुरडाळ व मुग  मुठभर कडधान्ये गोळा करणे, जुन्या स्वच्छ इस्त्री केलेल्या साड्या गोळा करणे, वापरलेले सुस्थीतीत ताट वाटी ग्लास गोळा करणे, शहरामध्ये आठ ते दहा चित्ररथ तयार करावेत, लेझीमपथक, झांझपथक ,ढोलपथक व पथनाट्य यांचे आयोजन करावे , स्वइच्छेने सुशोभिकरणासाठी कला शिक्षकांनी योगदान द्यावे,१२ तालुके २ महानगरपालिकामधील शिक्षकांनी २० ते २६ फेब्रुवारी या सात दिवसामध्ये प्रत्येक दिवशी दोन तालुक्यातील शिक्षकासह विद्यार्थी सहभागी व्हावेत असे आवाहन केले.
  स्वागत मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी केले. प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी आर.व्ही. कांबळे यांनी केले. कणेरी मठाचे कार्यवाह प्रल्हाद जाधव यांनी लोकोत्सव सुमंगल कार्यक्रम विषयी सविस्तर माहिती सांगितली. आभार एस. डी. लाड यांनी मानले.
    या प्रसंगी शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड, मुख्याध्यापक संघ चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे, उपशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे, विस्तार अधिकारी अर्चना पाथरे, विस्तार अधिकारी रत्नप्रभा दबडे, बाबासाहेब पाटील, सुधाकर निर्मळे, अर्जुन होणगेकर, मिलींद पांगिरेकर, अजीत रणदिवे, इरफान अन्सारी, दिपक पाटील,अरुण मुजुमदार, जगदीश शिर्के, राजेश वरक, पी. डी. शिंदे ,लिपिक पुनम ठमके आदीसह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनाचे अध्यक्ष / सचिव उपस्थित होते.
       फोटो 
शिक्षक शिक्षेकेत्तर संघटनाच्या बैठकीस मार्गदर्शन करतांना माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर व अन्य मान्यवर

Monday, 16 January 2023

सुमंगलम हा पंचमहाभूत लोकोत्सव या कार्यक्रमानिमित्य नियोजनासाठी संघटना प्रतिनिधींची बैठक

कोल्हापूर /प्रतिनिधी
सुमंगलम हा पंचमहाभूत लोकोत्सव या कार्यक्रमानिमित्य नियोजनासाठी
संघटना प्रतिनिधींची बैठक  बुधवार दि. १८ जानेवारी २०२३ रोजी दु. ३.०० वाजता माध्यमिक विभागाकडील शिक्षक, शिक्षकेत्तर / मुख्याध्यापक सर्व संघटना (माध्यमिक) अध्यक्ष सचिव, जिल्हास्तर व तालुकास्तर व मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी यांची बैठक मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे आयोजित केली आहे.
   परमपूज्य स.स. श्री. काडसिध्देश्वर स्वामीजी सिध्दगिरी मठ कणेरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ कणेरी महासंस्थान कोल्हापूर येथे दि. २० ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सुमंगलम हा पंचमहाभूत महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. देशविदेशातून या महोत्सवात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रातील लाखो लोकांना आमंत्रित केले आहे. यामध्ये शिक्षण क्षेत्राचा मोठा सहभाग असणार आहे.
यासाठी लाखो विद्यार्थ्यासह शिक्षण क्षेत्रातील सर्वांचे महोत्सवात प्रत्यक्ष सहभागी असणे आवश्यक आहे. महोत्सवातील नियोजनासाठी बुधवार दि. १८ जानेवारी २०२३ रोजी दु. ३.०० वाजता माध्यमिक विभागाकडील शिक्षक, शिक्षकेत्तर / मुख्याध्यापक सर्व संघटना (माध्यमिक) अध्यक्ष सचिव, जिल्हास्तर व तालुकास्तर व मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी यांची बैठक मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे आयोजित केली आहे. तरी सदर बैठकीसाठी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी  उपस्थित रहावे असे आवाहन  जिल्हा परिषद कोल्हापूर  शिक्षण विभागाचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी  केले आहे. प्रसिद्धी पत्रक विस्तार अधिकारी आर.व्ही. कांबळे यांनी दिले आहे.

माले-मालेवाडी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा व आमदार फंडातून स्थानिक काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन….

हेरले / प्रतिनिधी

 आमदार राजुबाबा आवळे यांचे वतीने माले (ता.हातकणंगले) येथील नुतन ग्रामपंचायत सरपंच राहुल कुंभार उपसरपंच प्रताप ऊर्फ बंटी पाटीलसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार  व आमदारांच्या फंडातून क्रॅाक्रीट रस्ता शुभारंभ करणेत आला.
स्वागत सुनिल कांबळे यांनी केले तर डी.आर.माने  व उपसरपंच प्रताप उर्फ बंटी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
माले गावासाठी सदैव पाठीशी राहीन अशी ग्वाही राजुबाबा आवळे यांनी दिली. सुत्रसंचलन व आभार महेंद्र स्वामी यांनी केले.
याप्रसंगी गावातील विविध मान्यवर उपस्थित होते. शिरिष पाटील ,डी.आर.माने,आनंदराव पाटील,दिलीप पाटील,अभय पाटील,रविंद्र स्वामी,निलेश पाटील सुनिल कांबळे इ.मान्यवर व ग्रामस्थ माले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday, 15 January 2023

कायदे प्रिय नागरिक देशाचे आधारस्तंभ: न्यायाधीश बी.डी. गोरे


मुरगूड विद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर  संपन्न

कोल्हापूर / प्रतिनिधी

"कायदा मानणारे नागरिक बना.जबाबदारी खांद्यावर घ्यायला शिका.नैतिकतेच्या चौकटीत प्रगती करा.कुटुंबासह गाव देशाचे नाव उज्वल करा. व्यक्ती स्वतःच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो.कायदे प्रिय नागरिक देशाचे आधारस्तंभ असा मौलिक सल्ला कागल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व कागलचे दिवाणी न्यायाधीश बी.डी.गोरे यांनी दिला.
    कागल तालुका विधी सेवा समिती, कागल  वकील बार असोसिएशन आणि मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मुरगुड विद्यालय येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. याप्रसंगी न्यायमूर्ती गोरे अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
     राष्ट्रीय युवक दिन, बालिका दिवस,राष्ट्रीय मतदाता दिवस, राष्ट्रीय मानवी तस्करी विरोधी जाणीव जागृती दिवस या संयुक्त उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या प्रबोधन शिबिरात विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
     अँड. एस बी गुरव म्हणाले," व्यासंगी आणि बुद्धिमान व बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांनी आपले ज्ञान आणि विज्ञानवादी दृष्टी यामुळे भारताची प्रतिमा जगभरात उंचावली. भारताचे कायदे प्रिय आदर्श नागरिक बना. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला मतदार या नात्याने बळकट करा." असा संदेश त्यांनी दिला.
    अॅड. ए.एस.शितोळे म्हणाले," समाज माध्यम इंटरनेट जितके सोयीस्कर तितकेच घातक ही आहे.या समाज माध्यमांचा गैर उपयोग करून अल्पवयीन मुली आणि महिलांवर अत्याचार होतात.शालेय मुलींना 'गुड टच' आणि 'बॅड टच' याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. स्व ची जाणीव असणाऱ्या मुली आणि महिला स्वतःचे रक्षण करू शकतात.त्यांच्यापाठीशी कायदा आणि न्याय सदैव उभा राहतो
      सहायक पोलीस निरीक्षक सुनील मळवी यांनी "लहान मुलांनी वाहने चालवू नयेत अपघात ग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाला अनंत अडचणींना सामोरे जावे लागते.आदर्श नागरिक वाहतुकीचे नियम पाळतात.असे मार्गदर्शन केले.  
    स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.आर.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ए.एन.पाटील तर आभार उपप्राचार्य  प्रा.एस.पी.पाटील यांनी मानले.
     याप्रसंगी मुरगूडचे एपीआय विकास बडवे, उपमुख्याध्यापक एस.बी.सूर्यवंशी, पर्यवेक्षक एस.एच निर्मळे,  पी.बी.लोकरे,राहुल देसाई,कविता नाईक, अँड जीवन शिंदे,सुधीर सावर्डेकर,गणपती चौगुले आदी उपस्थित होते.

फोटो 
 मुरगुड .. येथील कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शन करताना कागल दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश बी.डी.गोरे, मुख्याध्यापक एस.आर.
पाटील एपीआय विकास बडवे,मार्गदर्शक  एस.बी.गुरव,ए.एस.शितोळे, सपोनी सुनील मळवी व अन्य मान्यवर

Saturday, 14 January 2023

सांगली कोल्हापूर मार्गावरील हेरले येथील देसाई मळ्या जवळचा पूल बनला मृत्यूचा सापळा.

हेरले / प्रतिनिधी
  सांगली - कोल्हापूर राज्य मार्गावरील  हेरले (ता.हातकणंगले)येथील देसाईमळ्या जवळच्या  ओढ्यावरील पुलाचे संरक्षण कटडे तुटलेले असल्यामुळे  वाहनधारकांना या ठिकाणाहून ओवर टेक करतांना मोठा धोका  निर्माण झाला आहे.  त्यातच या ठिकाणी  उगवलेल्या झाडवेलींच्या झुडपामुळे तर तुटलेला कटडा दिसतच नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करत असताना, वाहन धारकांना प्रवास करीत असतांना अपघात होण्याची  शक्यता निर्माण झाली आहे.  हे ठिकाण अपघात प्रवण बनल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम  विभागाने तात्काळ या ठिकाणी कटडा बांधावा किंवा पत्र्याचा तट तयार करावा अशी  वाहनधारकांच्यातून मागणी होत आहे. 
    
     तसेच या मार्गावरील  हेरले येथील माळभागावर समर्थ हॉटेल समोरील स्पीड ब्रेकर काढल्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू  आणण्यासाठी व शालेय विद्यार्थ्यांना शाळेसाठी ये जा करण्यासाठी रस्ता ओलांडावा लागतो. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक नागरिकांना, प्रवासी नागरिकांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे झाले आहे . तरी या ठिकाणी स्पीड ब्रेकर ची सोय व्हावी. अशी मागणी  स्थानिक नागरिकांतून होत आहे.

Thursday, 12 January 2023

शिरोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अविनाश कोळी यांची निवड

शिरोली/ प्रतिनिधी
येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाचे अविनाश अनिल कोळी यांची एकमताने निवड करण्यात आली.निवड सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ. पद्मजा कृष्णात करपे या होत्या. 
गुरुवारी सकाळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी अविनाश कोळी यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर सकाळी अकरा वाजता अविनाश कोळी यांनी उपसरपंच पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले. शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील यांनी सुचक म्हणून सही केली.
उपसरपंच निवडीपुर्वी महाडिक गटाने शिरोली फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यान भव्य मिरवणूक काढली. रस्त्याच्या दुतर्फा भव्य रांगोळी साकारण्यात आली होती. तसेच या मिरवणुकीत धनगरी ढोल, ताशा,लेझीम पथक सहभागी झाले होते. यावेळी पंचायत समिती माजी सभापती डॉ. सौ. सोनाली पाटील, सरपंच सौ. पद्मजा करपे, डॉ. सुभाष पाटील, कृष्णात करपे बाजीराव पाटील यांनी हालगीच्या तालावर लेझमीचा ठेका धरला. 
माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सरपंच व उपसरपंच कार्यालयाचे उद्घाटन करुन प्रवेश केला. तसेच शिवाजी महाराज सभागृहात भाजपचे पदाधिकारी सतिश पाटील यांनी भ्रष्ठाचारमुक्त कारभार करण्याची सर्व सदस्यांना शपथ घेतली.
यावेळी प्रकाश कौंदाडे, विजय जाधव, सौ. कमल कौंदाडे , सौ. मनिषा संकपाळ, सौ. सुजाता पाटील, सौ. धनश्री खवरे, सौ. कोमल समुद्रे, कु. हर्षदा यादव, धनाजी पाटील, दिपक यादव, सुरेश पाटील, राजेश पाटील, सदाशिव संकपाळ, श्रीकांत कांबळे यांच्या सह सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार डॉ. सुभाष पाटील यांनी मानले.

मौजे वडगाव उपसरपंचपदी सुनिल खारेपाटणे

  हेरले /प्रतिनिधी 
मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनिल खारेपाटणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली . सरपंच कस्तुरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच निवडणूकीत सुनिल खारेपाटणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली .
        या निवडणूकीत जय शिवराय ग्रामविकास आघाडीने सरपंचसह आठ जागेवर विजय मिळविला होता त्यामुळे जय शिवराय आघाडीचा उपसरंपच होणार हे निश्चित होते . यावेळी उपसरपंच निवडीचे निरिक्षक राहूल कुलकर्णी , ग्रामविकास अधिकारी एस.एम . कांबळे , राहूल सकटे , श्रीकांत सावंत ,रावसाहेब चौगुले , महादेव शिंदे ,बाळासो थोरवत , सतिश चौगुले , धोंडीराम चौगुले,  विजय चौगुले, सुरेश कांबरे , आनंदा पोवार, सतिश वाकरेकर , जयवंत चौगुले ,अमोल झांबरे , यांचेसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .

Wednesday, 11 January 2023

अनुर येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत हेरलेचा जय हनुमान संघ प्रथम

***
 
हेरले प्रतिनिधी

जय हनुमान कबड्डी क्लब आणूर  (ता. कागल ) येथे झालेल्या भव्य 60 किलो मॅटवरील कबड्डी स्पर्धेत 30 संघांनी सहभाग नोंदवला होता. त्या मध्ये आकर्षक चढाई आणि बचावाच्या जोरावर मात करत जय हनुमान व्यायाम मंडळ हेरले संघाने, फायनलमध्ये जयक्रांती हासुर संघासोबत, 20-5 अश्या गुण फरकाच्या आघाडीने, एकतर्फी पराभूत करून प्रथम क्रमांक पटकाविला. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक  काकासाहेब सावडकर याच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष- कृष्णात खांबे आणि प्रशिक्षक- अभिजित सुर्यवंशी उपस्थित होते .

फोटो 
हेरलेचा  जय हनुमान व्यायाम मंडळ विजेता कबड्डी संघ  खेळाडूसह मान्यवर

Sunday, 8 January 2023

महास्वच्छता अभियानात प्राथमिक शाळांचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्हापूर प्रतिनिधी - 
कोल्हापूर शहरात महापालिकेच्या वतीने महास्वच्छता अभियानात राबविण्यात आले. यात महापालिका अधिकारी- कर्मचाऱ्यांबरोबरच शाळा, स्वयंसेवी संस्थांनी उस्फूर्त भाग गेतला. मोहिमेत दोन टन कचरा व प्लास्टिक जमा करण्यात आले. शहरातील प्रेक्षणीय स्थळे, वारसास्थळे, मुख्य रस्ते, चौक आदी ठिकाणी ही मोहीम झाली.

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्यासह अधिकान्यांनी शाहू समाधी स्थळ व पंचगंगा नदी घाट परिसरात फिरती करून शालेय विद्यार्थ्यांसमवेत स्वच्छता केली.
 कसबा बावड्यामध्ये म न पा राजर्षी शाहू विद्यालय, भाऊसो महागावकर विद्यामंदिर मुलींची शाळा, राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11,, प्रिन्स शिवाजी विद्यालय, भाई माधवराव बागल प्रशाला, बलभीम विद्यालय, यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय या शाळांमार्फत राजाराम बंधारा घाट परिसरात स्वच्छता करण्यात आली. शाळेचे विद्यार्थी, शिक्षक,
 महास्वच्छता अभियानात सहभागी उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. 
मोहिमेअंतर्गत आयटीआय कॉलेजच्या भिंतीवर वॉल पेंटिंग मोहीम घेण्यात आली. यात कलानिकेतन महाविद्यालयाचे 250 विद्यार्थी व शिक्षक यांनी आझादी का अमृत महोत्सव, स्वच्छ कोल्हापूर व सुंदर कोल्हापूर अशा वेगवेगळ्या थीमवर अंतर्गत रंगकाम केले. प्रशासक डॉ. बलकवडे, अतिरिक्त आयुक्त देसाई, उपायुक्त आडसूळ यांनीही विद्यार्थ्यांबरोबर वॉल पेंटिंग केले. प्राचार्य सुनील पवार उपस्थित होते.
मुख्याध्यापक, डॉ अजितकुमार पाटील मुख्याध्यापिका अनिता नवाळे छाया पवार छाया हिरुगडे गौतमी पाटील दत्तात्रय डांगरे विजय माळी शिवराज नलवडे व आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, राजेंद्र आपुगडे उपस्थित होते. कोटीतीर्थ तलाव परिसरात सहा. आयुक्त औंधकर, कोटीतीर्थ शाळेचे विद्यार्थी, शिक्षक,आरोग्य निरीक्षक श्रीराज होळकर, मुकादम प्रभुदास दाभाडे शिक्षक जोतिबा बामणे सुशील जाधव अनिल सरक वंदना खोत उज्वला पाटील तमेजा मुजावर सुशील जाधव उत्तमराव कुंभार उत्तम पाटील संदीप सुतार श्रीकांत पाटील अजमेर शेख सुरेंद्र वडद मुख्याध्यापिका कांबळे मॅडम उज्वला पाटील वसुंधरा पाटील व कर्मचान्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता नारायण भोसले आदी उपस्थित होते. राजर्षी शाहू विद्यामंदिरची विद्यार्थिनी कल्पना मैलारी या विद्यार्थिनीने ओला कचरा सुका कचरा इलेक्ट्रॉनिक कचरा याची विभाजन कसे करावे याचे दोन मिनिटाच्या तडफदार भाषण केले व आभार प्रकाश गावडे यांनी मानले

Tuesday, 3 January 2023

आजच्या मुली उद्याच्या भारताच्या शिल्पकार - मा. नगरसेविका माधुरी लाड


 *मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र .11 येथे बालिका दिन मोठ्या उत्साहात  आणि आनंदमय वातावरणात साजरा*
मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र .11 कसबा बावडा , कोल्हापूर येथे मंगळवार दि . 3 जानेवारी 2023 रोजी बालिका दिन आणि  मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला .
सदर कार्यक्रमास प्रभागाच्या माजी नगरसेविका माधुरी लाड मॅडम, शाळा व्यव स्थापन समिती सदस्य  निलम पाटोळे,दिपाली चौगले  शितल लोंढे उपस्थिती संपन्न झाला.
 केंद्रमुख्याध्यापक श्री . डॉ. अजितकुमार भिमराव पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाबद्दल त्यांनी कशाप्रकारे आपले आयुष्य शिक्षण साठी योगदान दिले  हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले एक स्त्री शिकली तर संपूर्ण घर सुधारते .शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. अज्ञानाची मूळ कारणे शिक्षणआहे ज्ञानानेच समाज सुसंस्कृत बनणार आहे अज्ञान हे दारिद्र्याचे मुख्य कारण आहे त्यासाठी सर्व मुलींनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे शिक्षणातूनच त्यांचे आरोग्य सुद्धा सुधारणार आहे व यामधून  21व्या शतकाला कणखर असे महिला मिळणार आहेत असे मनोगत व्यक्त केले.
ज्येष्ठ शिक्षक श्री.उत्तम कुंभार , सुशील जाधव, , तांबोळी मॅडम ,विद्या पाटील, तमेजा मुजावर ,बालवाडी मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सेवक  हेमंतकुमार पाटोळे 1 ते 7 चे सर्व  विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  मिनाज मुल्ला यांनी केले
प्रास्ताविक डॉ.अजितकुमार पाटील यांनी केले,  शाळा व्यवस्थापन समिती  सदस्य यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. मिनाज मुल्ला यांनी नगरसेविका लाड मॅडम यांचे स्वागत केले,विद्या पाटील यांनी दीपाली चौगले,निलम पाटोळे यांचे स्वागत केले,  आसमा तांबोळी यांनी शितल लोंढे यांचे स्वागत केले. 1ते 7 काही मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. बालवाडी पासून सातवीपर्यंतच्या काही विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर, त्यांच्या सामाजिक कार्यावर भाषण केले. आसमा तांबोळी यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

मित्राच्या अकाली निधनानंतर कुटूंबाला वर्गमित्रांनी दिला आर्थिक मदतीचा हात

हेरले / प्रतिनिधी

 रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं श्रेष्ठ असतं असं आपण अनेकदा ऐकतो. पण ते सार्थ ठरवणारी मैत्री पेठवडगाव शहरातील वडगाव विद्यालयाच्या सन १९९४ च्या इयत्ता दहावीच्या वर्ग मित्रांनी मनोभावे जपली असून नुकतेच अकाली निधन झालेल्या वर्गमित्र मौजे तासगांव (ता.हातकणंगले) येथील बाबासो सुतार या मित्राच्या कुंटुंबीयांना व्हाट्सअप ग्रूपच्या माध्यमातून आवाहन करून ९० हजाराची आर्थिक मदत करुन मित्रत्वाचे नाते जपण्याचे काम केले.


मौजे तासगांव येथील सुतार कुंटुंबातील बाबासो हा घरातील एकुलता कर्ता होता. त्याच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. परंतु मैत्रीचे नात संवेदनशील असतं, निस्वार्थ आणी त्यागाचं असे म्हणतात… पण अशीच मैत्री जपणारे पेठवडगाव येथील वडगाव  विद्यालयाच्या सन १९९४ साली दहावी मध्ये एकाच वर्गात शिक्षण घेतलेल्या सर्व मित्रांनी व्हाट्सअप ग्रूपच्या माध्यमातून बाबासो सुतार यांच्या कुंटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आणि त्याला प्रतिसाद देत वर्ग मित्रांनी एकत्रित येत त्यांच्या कुटुंबास ९००००/- एवढी आर्थिक मदत करुन सामाजिक बांधिलकी जपली.
रविवार (दि १) रोजी बाबासो सुतार यांच्या मौजे वडगाव  येथील निवासस्थानी वर्गमित्राने जावून त्यांच्या पत्नी  गिताजंली सुतार  यांच्या कडे ठेवपावती  देण्यात आली. यावेळी आई सावित्री , वडिल रामदास,मुलगा नितिन, मुलगी सिध्दी,भाऊ दिपक तसेच चुलतभाऊ प्रदिप सुतार,कृष्णात पाटील, वर्गमित्र दै.पुण्यनगरीचे पत्रकार सचिन पाटील,म्हाडाचे अभियंता विक्रम निंबाळकर,प्रा.अमित बेलेकर,मोहन बेलेकर,जीवन नायकवडी,उत्तम पाटील,लाटवडे ग्रामपंचायत सदस्या स्वाती पाटील,निलम शहा आदी उपस्थित होते.


 समाजोपयोगी कामे करुन सामाजिक बांधिलकी जोपासली : सचिन पाटील 
सन १९९४ च्या दहावीच्या वर्गमित्रांनी  महापुरात वडगाव परिसरातील पुरग्रस्त गांवात शुध्द पाणी,अन्नधान्यांची किट, जनावरांना चारा देणेत आला.याचबरोबर कोरोना काळात नगरपालिकेस पीपीई किट देण्यात आले.तसेच वडगाव विद्यालयाच्या शौचालय बांधकामाकरिता भरिव निधी देत अशी विविध समाजोपयोगी  कामे करुन या ग्रुपने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे.


फोटो :  मौजे तासगाव येथे कै.बाबासो सुतार या वर्गमित्राच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी गीताजंली यांच्याकडे ठेवपावती देताना  सचिन पाटील, विक्रम निंबाळकर,प्रा.अमित बेलेकर,मोहन बेलेकर,जीवन नायकवडी,उत्तम पाटील,स्वाती पाटील,निलम शहा आदी.(छाया तनिष्का पाटील,वडगाव)

Monday, 2 January 2023

डॉ दीपक शेटे यांना सावित्रीबाई फुले राज्य गौरव पुरस्कार जाहीर

हेरले / प्रतिनिधी
 महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सन -२०२१/२२ चे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य गौरव शिक्षक पुरस्कार स्वातंत्र्यसैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन मिणचेचे शिक्षक डॉ.दिपक शेटे (सर) यांना जाहीर झाला .

  डॉ . दीपक शेटे हे नागाव तालुका हातकणंगले या गावचे रहिवाशी असून गेली बावीस वर्षे गणित विषयाचे अध्यापन करत आहेत .मुलांना गणित सोपं जावं यासाठी ते सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम शालेय स्तरावर  राबवत असतात .यासाठी त्यांनी त्यांच्या घरी 35 लाख रुपयाची महाराष्ट्रातील अनोखी गणित मोजमापनाची लॅब तयार केले आहे .ती पाहण्यासाठी गणित अभ्यासक, गणितज्ञ, शिक्षक, पालक व विद्यार्थी सातत्याने येत असतात . विद्यार्थ्यांना गोडी लागावी व गणिताचा प्रचार व्हावा यासाठी ते विनामूल्य शाळेच्या कामकाजा व्यतिरिक्त माहिती  सांगत  असतात .त्यांनी आतापर्यंत सात पुस्तकांचे लेखन केले असून तंत्रज्ञानाचा वापर करून दहावीचे पुस्तक एका पानात बनवण्याची किमया केली आहे .स्टार अकॅडमीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान ही त्यांच्या संस्थेमार्फत सातत्याने केला जातो .सत्य पूर्ण दहावीचा शंभर टक्के निकालाची परंपरा त्यांनी आज अखेर राखली आहे .त्यांचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदावर काम करत आहेत .त्यांच्या शैक्षणिक कालावधीमध्ये तज्ञ मार्गदर्शक ,गणित व्याख्याते ,सहशालेय उपक्रमात सक्रिय सहभाग ,विज्ञान प्रदर्शन परीक्षक इ.भूमिका पार पडले आहेत .त्यांच्या  नावीन्यपूर्ण उपक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डिंग घेतली आहे .
  महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक गौरव पुरस्कार त्यांना जाहीर झाल्याबद्दल राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींचा अभिनंदनचा वर्षाव होत आहे .