हेरले / प्रतिनिधी दि.२०/११/१८
कबड्डी खेळातून उत्कृष्ट खेळाडू बनल्यास सरकारी नोकरी मिळवता येतेच त्याचबरोबर प्रो कबड्डीच्या यशापर्यंत जाऊ शकतो . यासाठी जिद्द,चिकाटी, कष्ट करण्याची तयारी आवश्यक असते. खेळातून जीवनातील यश फलीती होऊ शकतो. असे मत कबड्डीपट्टू सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्लम खतीब यांनी व्यक्त केले. ते हेरले (ता. हातकणंगले) येथील हेरले क्रीडा मंडळाच्या वतीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहिर कुंतिनाथ करके होते.
सपोनि अस्लम खतीब पुढे म्हणाले की , हेरले क्रीडा मंडळाच्या माध्यमातून कबड्डीपटू बनलो. आर्थिक स्थिती हालाकीची, मार्गदर्शन अभाव यामुळे चार वेळा पोलीस भरतीमध्ये एक, दोन गुणामध्ये यश दूर राहिले. मात्र जिद्द चिकाटी वर्दी मिळविण्याची महत्त्वकांक्षा बाळगत पहिल्याच प्रयत्नात पीएसआय झालो. यासाठी मला प्रा.मुल्ला, इम्तियाज शेख यांचे मार्गदर्शन लाभले. हेरले परिसरातील खेळाडू, मुले मुली यांना पोलीस भरतीचे मार्गदर्शन मिळून निश्चित यश मिळावे. म्हणून पोलीस भरतीचे प्रशिक्षण केंद्र स्थापन केले आहे. क्रीडा मंडळाच्या वतीने पोलीस भरतीपर्यंत प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू इम्तियाज शेख व रुद्र पाटील आपणास शारिरीक चाचणीचे खेळ व लेखी परीक्षेची तयारी करून घेणार आहेत. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
शाहिर कुंतिनाथ करके म्हणाले की, तरुणाई ड्रिंक, ड्रग्ज, डान्स, ड्रायव्ह या चार डी मध्ये अडकली आहे. यातून बाहेर पडावे. सपोनि अस्लम खतीब यांनी पोलीस अधिकारी होऊन गावातील तरूणांना योग्य करिअरची दिशा देण्यासाठी या अॅकॅडमीची स्थापना जननी भूमीची कृतज्ञता व्यक्त करणेसाठी केली आहे. तुम्हीही जननी भूमीची सेवा करण्यासाठी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन जीवनात यशस्वी बनून गावाचे नाव लौकिक करा.
सामाजिक कार्यकर्त्या निलोफर खतीब म्हणाल्या आपण स्वप्न पाहत असतांना बंद डोळे करून न पाहता उघडया डोळ्यातून पहा नक्की स्वप्न सत्यात उतरेल. दुसऱ्याच्या हेटाळणीकडे लक्ष न देता कष्ट करण्याची जिद्द ठेवावी.आपल्या बुद्धीच्या जोरावर कर्तृत्वान बनू शकतो याची उदाहरणे म्हणजे भारतातील राष्ट्रपुरुष होय.
या प्रसंगी वेद अॅकॅडमिचे इम्तियाज शेख, रुद्र पाटील,प्रा. भाऊसाहेब वड्ड, मार्गदर्शक केशव मिरजे,अध्यक्ष विनोद वड्ड, उपाध्यक्ष प्रकाश खुपिरे, खजानिस जयकुमार करके, माजी सरपंच रियाज जमादार, डॉ.युवराज वड्ड, गोविद आवळे, ग्रा.पं. सदस्य राहुल शेटे, सतिश काशिद, रंजित इनामदार आदीसह मंडळाचे कार्यकर्ते , महाविद्यालयीन विद्यार्थी,तरुण मंडळाचे सदस्य, युवक उपस्थित होते.
फोटो
हेरले (ता. हातकणंगले ) येथे सपोनि अस्लम खतीब बोलतांना शेजारी इम्तियाज शेख, रुद्र पाटील,राहूल शेटे व अन्य मान्यवर.