हेरले / वार्ताहर
दि.27/12/20
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्येंबाबत खासदार धैर्यशील माने यांनी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीला यश आले असून मंगळवार दि.२९ तारखेपासुन गावनिहाय भेटी देवून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत.या याबाबतचे परिपत्रक नुकतेच जिल्हा अधिकारी यांनी काढले आहे.
१० डिसेंबर राेजी खासदार धैर्यशील माने यांनी चांदोली अभयारण्य व वारणा प्रकल्प संघटनांतील पदाधिकारी व गौरव नायकवडी यांना सोबत घेऊन अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्याबरोबर बैठक घेतली होती.यामध्ये वसाहतींचे विविध प्रलंबित प्रश्न मांडले होते.प्रत्येकी सोळा वसाहतीमध्ये समक्ष जाऊन प्रश्न सोडवण्याबाबत सांगितले होते.
खासदारांच्या या बैठकीनंतर नुकतेच जिल्हा अधिकारी यांनी प्रत्यक्ष वसाहतींमध्ये जाण्यासाठी परिपत्रक काढले आहे.यामध्ये पुनर्वसन उपजिल्हाधिकारी वारणा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता,प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक,जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी,तसेच हातकणंगले,पन्हाळा व शाहूवाडी तालुक्याचे तहसीलदार यांचा समावेश असणार आहे.
वसाहतींनुसार जमीन व भूखंड वाटपाबाबत प्रलंबित कामकाजाचा आढावा घेऊन कारवाई करणे,वसाहतीमध्ये ज्या नागरी सुविधा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत त्या जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करणे,पूर्ण असलेल्या सुविधांमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास ती करणे, तसेच अपूर्ण असलेल्यां सुविधा पूर्ण करण्याच्या अनुषंगाने पाहणी करणे,वसाहतींमधील लोकसंख्ये प्रमाणे ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबतचे निकष तपासून वसाहतीमध्ये ग्रामपंचायती स्थापन करणे,वसाहतीनिहाय स्वतंत्र ७/१२ तयार करणे,ज्या वसाहतींना स्मशानभूमी नाही अशा वसाहतींना जमीन उपलब्ध करून देणे,प्रकल्पग्रस्तांच्या रस्त्यांबाबतच्या समस्यांवर कारवाई करणे अशा विविध अडचणी दूर करण्याचे काम या प्रत्यक्ष भेटी दरम्यान करण्यात येणार आहेत.यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आपापले प्रलंबित प्रश्न घेऊन आपल्या गावातील नियोजित दिवशी,बैठकी ठिकाणी उपस्थित राहावे असे खासदार माने यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.