हेरले / प्रतिनिधी
दि.25/12/20
हातकणंगले तालुक्यातील होणाऱ्या २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना स्थान देणाऱ्या स्थानिक गावविकास आघाडीमध्ये सहभागी होणार अशी भूमिका ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसंदर्भात हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील यांनी स्पष्ट केली आहे.
हातकणंगले तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ६२ गावांमध्ये संघटनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे. होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना स्थानिक आघाडीमध्ये स्थान देऊन त्यांनाही सत्तेच्या वाट्यात सहभाग करून घेतल्यास पूर्ण ताकदीनिशी स्थानिक आघाडीच्या पाठीशी राहून ग्रामपंचायतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी स्थानिक अघाडीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार माजी सभापती राजेश पाटील यांनी केला आहे.
हातकणंगले तालुक्यातील ६२ ग्रामपंचायती पैकी २१ गावांतील ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने २०२०ते २०२५या कालावधीसाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये हालोंडी, तासगाव, मिणचे ,नेज ,बिरदेववाडी, दुर्गेवाडी, किणी,मनपाडळे, माणगाववाडी, जंगमवाडी, वठार तर्फ वडगाव, कुंभोज, कबनूर,माणगाव,चंदुर, लाटवडे, पाडळी, खोची,रुई, वठार तर्फ उदगाव, तिळवणी आदी गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मजबूत संघटन आहे. आदी गावांमध्ये स्थानिक गाव विकास आघाडीमध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यांना संधी दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गावविकास आघाडीस स्वाभिमानीचा पूर्ण पाठींबा राहील असे पत्रक माजी सभापती राजेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिले आहे.