कोल्हापूर / प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवीनगर करावे यासाठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा.शंकर पुजारी यांनी तत्कालीन प्रभारी मा.जिल्हाधिकारी व सध्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, डॉ. संदीप वाटेगावकर व आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.शंकर पुजारी म्हणाले ''पुण्यश्लोक अहिल्यादेवी एक उत्तम शासक व संघटक होत्या. आपल्या असामान्य कर्तृत्वाने त्यांनी रयतेचे मन जिंकले. त्यांना जीवनकाळात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला. त्या उत्तम राज्यकर्त्या तसेच उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, त्यांचा जीर्णोद्धार केला; त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा यासाठी आम्ही मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री यांनाही यासंदर्भात निवेदन दिले असून त्याचा पाठपुरावा शासनदरबारी करीत आहोत.
डॉ.संदीप वाटेगावकर म्हणाले ''अहिल्यादेवी यांचा जन्म हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी याठिकाणी शिंदे घराण्यात झाला. त्यांच्या कर्तृत्वाने या जिल्ह्याचे नाव भारतभर नव्हे तर संबंध जगभर पोहचले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची जन्मभूमी असलेल्या या अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यादेवीनगर करण्यात यावे अशी महाराष्ट्रातील सर्वच जातीधर्मातील लोकांची सद्भावना आहे.''