हेरले / प्रतिनिधी
२००९ मध्ये पहिला खासदार झालो. त्यावेळी संसदेत २०१० साली पहिला कायदा एफआरपी कायदा मंजूर होण्यासाठी देशातील सर्व शेतकरी संघटनांना एकत्रित करून तीन दिवस संसदीय कामकाज बंद पाडले. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा कायदा संमत केल्याने ऊसास योग्य दर मिळून ऊसतोड झाल्यानंतर १४ दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऊस बील जमा होऊ लागली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उन्नती झाली असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हातकणंगले लोकसभा निवडणूकीचे उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते हेरले ( ता. हातकणंगले) येथील जाहीर प्रचार सभेत बोलत होते.
माजी खासदार राजू शेट्टी पुढे म्हणाले २०१३ मध्ये दुसरा कायदा जमिन अधिग्रहनाचा होण्यासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर देशातील सर्व शेतकरी संघटने समवेत आंदोलन केले. तत्कालीन आघाडी प्रमुख सोनिया गांधी यांना हा कायदा संमत होण्यासाठी हकिकत सांगितली आणि सर्व शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांना यश येऊन हा कायदा संमत झाला. त्यामुळे केंद्र शासनाच्या महामार्ग रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीस योग्य किंमत मिळाल्याने शेतकरी करोडपती झाले आहेत.
तिसरा कायदा निर्णय २०१८ मध्ये शासन हमी भाव जाहीर करते मात्र गॅरंटी देत नाही. त्यामुळे व्यापारी कमी दराने माल खरेदी करतात त्यांच्यावर शासनाचे नियंत्रण राहत नाही. हा कायदा संमत झाला तर व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. यासाठी शासनाची गॅरंटी निर्णय होण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. मात्र तोपर्यंत माझ्या लोकसभा सदस्यपदाचा कार्यकाल संपला व पुढील निवडणूकीत यश न मिळाल्याने या कायदयाचा निर्णय झाला नाही व कोणी प्रयत्नही केले नाहीत.
मी चौथ्यांदा या लोकसभेच्या निवडणूकीत उभा आहे. कारण या हमी भाव निर्णयातून दूधासही योग्य भाव मिळावा.कष्टकरी निराधार जनतेस मिळणार्या पेन्शनच्या रक्कमेत मोठी वाढ व्हावी, सेवानिवृत्त कामगारांना पेन्शन मिळावी, तसेच शासन कारखानदारांच्या कर्जास हमी देते त्या प्रमाणे विद्यार्थी शिक्षण कर्जासही शासनाने हमी दयावी. आदीसह कष्टकरी व शेतकरी जनतेच्या विकासाच्या अन्य निर्णयासाठी प्रयत्नशील राहणार आहे.सत्ताधारी शासन चारशे पार म्हणत संविधान बदलण्याच्या प्रयत्नात आहे. संविधानाकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास डोळे काढल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दम दिला. संविधान संरक्षणासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे. माझ्या या कार्यास यशस्वी करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला मतदान करून विजयी करावे असे आवाहन केले.
माजी सभापती राजेश पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणजे भक्कास आघाडी आहे. आजी माजी आमदार त्यांच्या आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात एकत्र फिरत आहेत. मात्र एक महिन्यानंतर ते एकमेकांच्या झिंज्या उफटण्याचे काम करणार आहेत.हेरले गावातील विकास करण्यासाठी १६ वर्षे ग्रामस्थांनी साथ दिली आहे.अशीच साथ देऊन या लोकसभा निवडणूकीमध्ये राजू शेट्टी यांना हेरलेसह परिसरामध्ये मोठी आघाडी देण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन केले.
माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील म्हणाल्या की, सर्वसामान्यांसाठी लढणारे म्हणजे राजू शेट्टी. सत्ताधारी शासन संविधान बदलणारे व महागाई वाढविणारे सरकार आहे. या सरकार विरोधात लढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेस साथ द्यावी. माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी गेली ३० वर्षे चळवळीतून आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांना भरघोस मते देऊन विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.
स्वागत व प्रास्ताविक अमोल पाटील यांनी केले. माजी उपसरपंच संदीप चौगुले,सरपंच राहूल शेटे, बाळगोंड पाटील,मुनीर जमादार, प्रा. राजगोंड पाटील, अशोक मुंडे आदींनी मनोगते व्यक्त केली.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे,माजी सभापती राजेश पाटील,माजी सभापती डॉ.पद्माराणी पाटील,मुनिर जमादार,प्रा.राजगोंड पाटील, जयकुमार कोल्हे, अप्पासाहेब एडके,महेरनिगा जमादार,अशोक मुंडे, लक्ष्मण निंबाळकर, सरपंच राहुल शेटे, बाळगोंडा पाटील,संतोष जाधव, अरविंद चौगुले, स्वप्नील
कोळेकर आदी मान्यवरांसह हेरले परिसरातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश चौगुले यांनी केले.
फोटो
हेरले: हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीच्या जाहीर प्रचार सभेत बोलतांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी शेजारी राजेश पाटील जयकुमार कोल्हे मुनिर जमादार व अन्य मान्यवर.