कोल्हापूर / प्रतिनिधी
इंडस टॉवर लिमीटेड कंपनीच्या मोबाईल टॉवर बांधकाम स्थगित करणे बाबतची तात्काळ कार्यवाही करुन केलेली कार्यवाही बाबत तक्रारदार यांना त्या बाबतचा अहवाल देऊन कार्यालयासही अहवाल सादर करण्यात यावा असे पत्र पंचायत समिती हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी यांनी हेरले
ग्रामपंचायतीस दिले.
हातकणंगले तालुक्यातील हेरले गावाच्या हद्दीत गट नं ७ ब या ठिकाणी इंडस कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्याचं काम सुरू आहे . टॉवरच काम सुरु असलेल्या ठिकाणापासून शंभर मीटरवर शाळा आहे. शालेय विद्यार्थ्यांसह स्थानिकांच्या आरोग्यासाठी हा टॉवर घातक ठरणार असल्याचं सांगत स्थानिकांमधून या टॉवरला विरोध होतोय. स्थानिक ग्रामपंचायतीनं सुध्दा टॉवरच्या कामाला विरोध केलाय अस असताना जिल्हा परिषदेची कोणतीही परवानगी न घेता पोलीस बंदोबस्तात टॉवरचं काम सुरु असून हे काम तात्काळ थांबवावं, अशी मागणी करत मोबाईल टॉवर विरोधी कृती समितीचे निमंत्रक उत्तम पोवार यांच्या नेतृत्वाखाली हेरले ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन एस यांना लेखी निवेदन दिले. त्यांनी तात्काळ पंचायत समिती हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी यांना
टॉवर बांधकाम स्थगित करणे बाबतची तात्काळ कार्यवाही करण्याचे पत्र ग्रामपंचायतीस दयावे असे पत्र दिले.
पंचायत समिती हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी यांनी हेरले ग्रामपंचायतीस दिलेल्या पत्राचा आशय असा की,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. कोल्हापूर व सलीम दस्तगीर पठाण वा इतर ग्रामस्थ हेरले ता. हातकणंगले यांचा दि.3 एप्रिलचा तक्रार अर्ज विषयास अनुसरून हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील गट नं 7 ब/7अ हा सुरेश बाबूराव पाटील व माणीक बाबूराव पाटील यांनी आपले क्षेत्रातील शेतजमीन भाडेतत्वावर इंटस टॉवर लि. यांना मोबाईल टॉवर उभारणेसाठी शेजारील लोकांना विश्वासात न घेता दिली आहे. सदर बांधकामाचे ठिकाण लोकवस्तीपासून २०मिटर अंतरावर असून सदर परिसरात हायस्कूल, शाळा, लोकवस्ती असून या मोबाईल टॉवरचे दुष्परिणाम नागरीकांचे आरोग्यावर होणारअसून जीवीतास हानी होणार असल्याने सदर मोबाईल टॉवर या क्षेत्रात होऊ नये यासाठी स्थगिती मिळावी तसेच सदर कंपनीने लोकवस्ती शेजारी १००मिटर अंतरात बांधकाम सुरु केले असून सदर बांधकाम सुरुवातीचा गट क्रमांक बदलून कंपनीने दुस-या गट क्रमांकामध्ये बेकायदेशीररित्या बांधकाम सुरु केले असून त्यास स्थगिती मिळावी अशी स्थानिक नागरीकांनी मागणी केली.
इंडस टॉवर कंपनीस ग्रा.पं.हेरले मार्फत टॉवर बांधकाम स्थगीत करणे बाबत ग्रा.पं. ने पत्र दिले होते. तथापी सदरचे पत्र कंपनीने स्विकारले नाही. तसेच ग्रा.पं.चे पत्रावर काम थांबविले जाणार नाही असे उत्तर ग्रामपंचायतीस दिले. तसेच शासनाच्या वेब साईटवर टॉवर बांधकामासाठी अर्ज दिला होता सदर अर्जाचा क्रमांक Ep41347 हा असून सदर अर्ज जिल्हास्तरावर प्रलंबित ठेवणेत आलेला आहे.
तरी हेर्ले येथील इंडस टॉवर कंपनीचे लोकवस्तीशेजारी १०० मीटर अंतरावर बांधकाम सुरु असुन सदरच्या परवान्यात सुरुवातीचा गटक्रमांक बदलून सदरचे बांधकाम बेकायदेशीररित्या सुरु आहे. स्थानिक लोक, शाळा व ग्राम रयत यांचा विरोध यांचा विचार करता ग्रामपंचयतीच्या मागणी प्रमाणे व स्थानिक नागरीकांच्या तक्रारीचे अनुषंगाने या कार्यालयाकडील पुढील चौकशी पूर्ण होई पर्यंत पंचायत समिती हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी यांनी टॉवर बांधकाम स्थगित करणे बाबतची तात्काळ कार्यवाही करण्याचे पत्र ग्रामपंचायतीस दिले व केलेली कार्यवाही बाबत तक्रारदार यांना माहिती द्यावी असे पत्रात नमुद केले आहे.
या प्रसंगी मोबाईल टॉवर विरोधी कृती समितीमध्ये सरपंच राहूल शेटे,उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पाटील, हिरालाल कुरणे, उर्मिला कुरणे, ग्रामविकास अधिकारी व्ही. व्ही.कांबळे, गोंविद आवळे, समीर पेंढारी, अमीर जमादार, अमीर पेंढारी, सलीम पठाण, अब्दुल पठाण, फिरोज नायकवडी, शहाजान पठाण आदीसह सिध्देश्वर नगर, राजीव गांधी नगर, हनुमान नगर मधील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. अशी माहिती प्रसिध्दीस गोविंद आवळे यांनी दिली.
फोटो
मोबाईल टॉवर विरोधी कृती समितीचे निमंत्रक उत्तम पोवार यांच्या नेतृत्वाखाली हेरले ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन एस यांना लेखी निवेदन देतांना सदस्य.