कोल्हापूर / प्रतिनिधी
१५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा शासनाचा निर्णय आदेश ताबोडतोब रद्द करावा व ५ सप्टेंबर २०२४ चा कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द व्हावा यासह अनेक मागण्यांच्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने बुधवार दि.२५ सप्टेंबर २०२४ रोजी कोल्हापूर जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त सभेत घेण्यात आला. ही सभा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन सभागृहात संपन्न झाली.शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे,शिक्षक नेते दादा लाड यांच्या मार्ग दर्शनाखाली व व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
१५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा निर्णय रद्द करावा, २० किंवा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेंच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे १ पद बंद करण्याचा निर्णय आणि कंत्राटी पद्धतीने सेवा निवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय आदेश रद्द करावा, विद्यार्थी आधार कार्ड संबंधांने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारन धोरण रद्द करावे, सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व वरिष्ठ वेतन श्रेणी धारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्वांनाच १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, टप्पा अनुदान शाळांना पुढील अनुदानाचे टप्पे तात्काळ मिळावेत या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने बुधवार दि.२५ सप्टेंबर २०२४ रोजी सर्व शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता टाऊन हॉल येथे एकत्रित यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या सभेस सचिव आर वाय पाटील, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे,बाबा पाटील, राजाराम वरुटे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, उदय पाटील, के. के. पाटील,राजेश वरक, इरफान अन्सारी, विष्णू पाटील, महादेव डावरे, संजय पाथरे, राजेंद्र सुर्यवंशी, सतीश लोहार, शिवाजी कोरवी, एन. आर. भोसले, राजेंद्र बुवा, संजय पाटील आदी प्रमुख पदाधिकारीसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
कोल्हापूर: शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत बोलतांना
शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे,शिक्षक नेते दादा लाड व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड आदीसह अन्य मान्यवर.