हेरले / प्रतिनिधी दि. १४/१/१८
मौजे वडगांव ( ता.हातकणंगले ) येथील मध्यवस्तीतील जुनी गाव चावडीची इमारत शेवटची घटिका मोजत असून ही इमारत कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने मोठी दुर्घटना घडू शक्यते. हा अनर्थ घडू नये यासाठी जि.प. सदस्य व आमदार यांनी या जुन्या वास्तूसाठी विकास निधी उपलब्ध करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
मौजे वडगांवमध्ये मध्यवस्तीत स्वातंत्र्यपूर्व काळातील गावचावडी ही जूनी इमारत आहे. या इमारती मध्ये १९५६ ते २००२पर्यंत गावचावडी म्हणून गावकारभार चालत होता. ग्रामपंचायत, गावचावडी ही दोन्ही एकत्र कार्यालय या इमारतीमध्ये होते. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी , कोतवाल आदी प्रशासन घटक याच कार्यालयातून आपल्या गावचा कारभार पाहत होते. तब्बल ४६ वर्ष इमारतीमध्येे गावकारभार चालला.
२oo२ साली शासनाकडून ग्रामपंचायत बांधकामासाठी निधी मिळाला. या निधीतून आरसीसी ग्रामपंचायत इमारत बांधली गेली. त्यामुळे जुन्या गावचावडी इमारतीतून सर्व प्रशासकिय दप्तर नव्या इमारतीमध्ये हलवण्यात आले. तदनंतर गेली १५ वर्षापासून जुन्या इमारतीचा वापर झाला नाही. त्यामुळे भिंतीचे बांधकाम सुटले आहे, कौले फुटली आहेत त्यामुळे पावसाळ्यात पाणी गळाल्याने भिंतीची पडझड होऊन लाकडी छत कुजले आहे. ही इमारत मुख्य रस्त्यालगत असून शेजारी वस्ती आहे. या भग्नाअवस्थेतील ही इमारत कधीही कोसळू शकते. त्यामुळे रस्त्यावरील येणारे जाणारे लोक, शेजारील घरांची वस्ती यांचे जिवीत व वित्त धोक्यात आले आहे.
प्रशासनाने या इमारतीची दुरूस्ती करावी किंवा बांधकाम उतरावे, तसेच या ठिकाणी विकास निधी लावून ग्रंथालय, अभ्यासिका यासाठी नूतन वास्तू उभारावी. चोरट्याकडून दोन वेळा येथील पेटाऱ्यातील तलवारी लंपास करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तो अयशस्वी झाला. त्यावेळी पोलीस पाटील अमिर हजारी यांनी या इमारतीमधील मोठ्या पेटारामध्ये असणाऱ्या पाच तलवारी, एक दानपट्टा व मोठी पितळी घंटीआदी ऐतिहासीक वस्तू ग्रामपंचायतमध्ये जमा करून त्याचे जतन करण्याचे कार्य केले आहे.
प्रतिक्रिया
शिवसेना शाखा प्रमुख सुरेश कांबरे
गावचावडी इमारतीमध्ये गेली ४६ वर्षे गावचा कारभार झाला आहे. स्वातंत्र्यपूर्व वास्तूची देखभाल दुरूस्ती करणे प्रशासनाचे कार्य होते. मात्र ते काही झाले नाही. या वास्तूच्या पडझडीमुळे इमारत खिळखिळी बनली आहे,कधीही पडण्याची शक्यता असल्याने शेजारील ग्रामस्थांचे जिवीत धोक्यात आले आहे. तरी या इमारतीची दुरूस्ती अथवा इमारत उतरून घेऊन धोका टाळावा आणि नागरिकांचे जिवीत व वित्ताचे संरक्षण प्रशासनाने करावे. अन्यथा आंदोलन केले जाईल.
प्रतिक्रिया
ग्रा.पं. सदस्य. अवधूत मुसळे
महसूल विभागाची ही इमारत दुरूस्ती व्हावी आणि त्याचे गतवैभव प्राप्त करून देणेसाठी चौदाव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून देणेसाठी प्रयत्न शील आहे. तसेच महसूल विभाग,जि.प. सदस्य, आमदार आदी लोकप्रतिनिधीकडून विकास निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करून ही इमारत सुसज्ज करणेसाठी क्रियाशील राहणार असे मत त्यांनी व्यक्त केले.
फोटो - मौजे वडगावची जुनी गावचावडी इमारतीची दुर्दशा