कोल्हापूर / प्रतिनिधी
मिलींद बारवडे दि. १/९/१८
कोल्हापूर जिल्ह्यातील १२ वर्षे व२४ वर्षे सेवा कालावधी पूर्ण करणाऱ्या वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीस पात्र असणाऱ्या माध्यमिक शिक्षकांचे दहा दिवसाचे प्रशिक्षण शिक्षण विभागाने या साली तात्काळ आयोजित करावे अशी मागणी स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सेवाभावी संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे व संघाचे शिष्टमंडळ जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण विभागाचे प्राचार्य डॉ.आय.सी. शेख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळातील शिक्षकांचे १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीसाठी व २४ वर्ष पूर्ण झालेल्या व पदवीत्तर अहर्ता प्राप्त करणाऱ्या शिक्षकांसाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून दहा दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी प्रशिक्षण आयोजित केले जाते. ते प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना ज्या त्या शाळांचे संस्थाचालक संस्था पातळीवर त्या शिक्षकांना चोविस आणि बारा वर्षे पूर्ण झाल्याचा ठराव देऊन शाळेकडून शिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवतात .
मात्र शिक्षण विभागाकडून गेली दोन वर्षे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षणच आयोजित केलेले नाही. यामुळे या श्रेणीसाठी पात्र असणारे शिक्षक या वेतनश्रेणीपासून वंचित राहत आहेत . प्रशिक्षण न झालेमुळे संस्था पातळीवर संबधीत शिक्षकांचे नावे निवड श्रेणीसाठी पात्र म्हणून ठराव देता येत नाही. निवड श्रेणीसाठी २५ ते २८ वर्षे पूर्ण होऊनही प्रशिक्षण न झालेने अनेक शिक्षकांना वेतन श्रेणीचा लाभ मिळू शकलेला नाही . तसेच १२ वर्षे पूर्ण होऊन वरिष्ठ श्रेणीचे प्रशिक्षण न झालेने संबधीत शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीची मान्यता शिक्षण विभागाला देता आलेली नाही .
निवड श्रेणी प्राप्त शिक्षकांचा पगार मुख्याध्यापक पगाराशी समतूल्य होतो. मुख्याध्यापक न होता ही वेतनश्रेणीचा लाभ होतो म्हणून पात्र शिक्षकांना निवडश्रेणी मिळणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण आयोजित करून पात्र शिक्षकांना न्याय दयावा अशी मागणी करीत आहोत. या मागणीचे संघटनेचे लेखी निवेदन राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या बोर्ड विभाग,माध्यमिक शिक्षणाधिकारी, उपसंचालक शिक्षण विभाग कोल्हापूर, शिक्षण आयुक्त पुणे , शिक्षण सचिव मुंबई विभागाकडे तात्काळ पाठवून पाठपूरावा व्हावा. यावेळी शिक्षक नेते प्रा. भास्कर चंदनशिवे, अभिजीत गायकवाड, जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे, लक्ष्मण कांबरे,सरचिटणिस भाऊसाहेब सकट, कार्याध्यक्ष प्रा. रविंद्र पाटील, खजानिस नंदकुमार कांबळे, शहराध्यक्ष अॅन्थोंनी डिसोजा, उपशहराध्यक्ष राकेश चव्हाण,संघटक फूलसिंग जाधव,सचिन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
स्वाभिमानी शिक्षक संघाच्या वतीने शैक्षणिक डाएटचे प्राचार्य डॉ.आय.सी. शेख यांना निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे , प्रा. भास्कर चंदनशिवे, अभिजीत गायकवाड, मिलिंद बारवडे , भाऊसाहेब सकट, प्रा. रविंद्र पाटील आदीसह पदाधिकारी