हेरले / प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय हा मुख्य व्यवसाय समजून केल्यास अधिकाधिक उन्नती होऊ शकते. असे मत माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांनी व्यक्त केले ते हातकणंगले तालुक्यातील लाटवडे येथील श्री. हनुमान सहकारी दूध व्यवसायिक संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव व पेठवडगाव बाजार समितीचे संचालक शशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन ॲड. शहाजी पाटील होते.
डॉ. मिणचेकर पुढे म्हणाले, ग्रामीण भागामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जात होता. पण अलीकडील काळात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे ऊस पिक धोक्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठे आर्थिक नुकसान होत आहे. परिणामी दुग्ध व्यवसाय हाच सध्या सर्वसामान्य शेतकरी व दूध उत्पादकांना तारणहार ठरत आहे. त्यामुळे हा व्यवसाय मुख्य व्यवसाय म्हणून केल्यास अधिकाधिक आर्थिक उन्नती होऊ शकते. त्यासाठी संघाच्या विविध योजना व आधुनिक पद्धतीचा दुग्ध व्यवसायात विशेषतः जनावरांच्या संगोपनात बदल करणे अत्यंत गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
ॲड. पाटील यांनी म्हैस व गाय दूध दारातील प्रति पॉईंट सध्या समान दर आहे. त्यामध्ये बदल करून म्हैस दुधास प्रति पॉईंट दहा पैशाची वाढ करणे सद्यस्थितीत गरजेचे आहे. याकरीता संचालक मंडळाने गांभीर्याने विचार करावा. तसेच दूध उत्पादक हा केंद्रबिंदू मानून संस्थेने गावातील राजकीय परिस्थिती न पाहता येईल त्या दूध उत्पादकाला संस्थेच्या माध्यमातून सर्वोतोपरी आपण सतत सहकार्य करत असल्याचे सांगितले.
स. संकलन अधिकारी सुरेश पाटील यांनी गोकुळ दूध संघ, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या तिघांच्या माध्यमातून म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत कर्ज प्रकरणाबाबत मार्गदर्शन केले. तसेच संस्था व उत्पादक यांनी म्हैस दूध वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.
जिल्हा परिषद सदस्य प्रविण यादव यांचेही भाषण झाले.स्वागत प्रास्ताविक बाळासाहेब पाटील यांनी केले, आभार मोहन पाटील यांनी व्यक्त केले.सचिव युवराज पाटील यांनी संस्थेचा आढावा सांगितला.याप्रसंगी डॉ. देशमुख, अशोक पाटील, अशोक देसाई, रंगराव पाटील, बजरंग चव्हाण, सचिन पाटील, हणमंत पाटील आदी उपस्थित होते.
फोटो..
लाटवडे येथील हनुमान दूध संस्थेच्या वतीने माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शहाजी पाटील, प्रविण यादव, शशिकांत पाटील, सुरेश पाटील, युवराज पाटील आदी.