कोल्हापूर प्रतिनिधी दिनांक 11
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक, सेवक सहकारी पतसंस्थेने महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांच्या साठी स्कूल बॅग देण्याचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो. असे उद्गार अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी स्कूल बॅग वितरण प्रसंगी काढले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एस. के. यादव उपस्थित होते. श्रीयुत जाधव पुढे म्हणाले, महानगरपालिका शाळांच्या साठी आपण विशेष लक्ष देणार असून ज्या शाळांच्या काही अडचणी आहेत जिथे भौतिक सुविधा कमी आहेत. त्या पुऱ्या करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना विविध कला व कौशल्याच्या माध्यमातून सक्षम बनवण्याच्या दृष्टीने काही उपक्रम सुरू करण्याचा मानस असल्याचे विचार त्यांनी व्यक्त केले. पालक, शिक्षक आणि प्रशासन मिळून महानगरपालिका शाळांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न करूया. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हान या कार्यक्रम प्रसंगी केले. यावेळी प्रशासनाधिकारी श्री एस. के. यादव यांनी पतसंस्थेचे विविध उपक्रम हे विद्यार्थी, शाळा व समाज उपयोगी असल्याचे सांगितले. पतसंस्थेच्या माध्यमातून सभासद हितांच्यासाठी चालू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त करून कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये राज्यात तिसरा आल्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वर्षी प्रथम क्रमांकावर येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी महानगरपालिकेच्या 58 शाळातील जवळपास 1800 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती उमर जमादार होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पतसंस्थेच्या कार्याबद्दलची माहिती मानद चिटणीस सुधाकर सावंत यांनी दिली. त्यावेळी संजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच आभार कुलदीप जठार यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब कांबळे यांनी केले. यावेळी शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी संचालक सौ.भारती सूर्यवंशी, सौ. मनीषा पांचाळ, वसंत आडके, राजेंद्र गेजगे लक्ष्मण पवार ,नेताजी फराकटे ,विजय सुतार ,विलास पिंगळे ,प्रभाकर लोखंडे ,मनोहर सरगर, सुनील नाईक, शाळेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह निकम,डॉ अजितकुमार पाटील,उत्तम कुंभार शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई,संजय नार्वेकर ,महिला आघाडी प्रमुख आशालता कांजर,नयना बडकस सर्व शाळांचे मुख्याध्यापक व पालक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.