कोल्हापूर /प्रतिनिधी
विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर कागल चे नाव उंचवावे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे काम झाले म्हणजे शासनाचा उद्देश सफल होईल तसेच बुद्धिमान व कष्टकरी मुलांच्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. असे प्रतिपादन माजी आमदार संजय घाटगे यांनी केले.
पंचायत समिती शिक्षण विभाग कागल व मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुड यांच्या वतीने मुरगुड येथे आयोजित ५१ व्या कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे चेअरमन मंजिरीताई देसाई - मोरे होत्या.
अध्यक्ष भाषणात बोलताना मंजिरी ताई देसाई मोरे म्हणाल्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु असून, विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत अशी अपेक्षा आहे . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे शहरी भागातील सर्व सोयीनिमित्त शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पेक्षा ते कायमस्वरूपी अग्रभागी आहेत याची नोंद शिक्षकांनी घेऊन त्यांना घडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा.
गटशिक्षणाधिकारी डॉ . गणपती कमळकर यांनी प्रास्ताविक भाषणात कागल तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक क्षेत्रातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला.
या कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य एस.आर.पाटील यांनी केले. माजी आमदार संजय घाटगे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक 22 , उच्च प्राथमिक 115, माध्यमिक व उच्च माध्यमिक 79, शिक्षक , प्रयोगशाळा परिचर गटातून 21 अशी उपकरणांची मांडणी करण्यात आली. आहे. विज्ञान प्रदर्शनामध्ये आत्तापर्यंत सर्वोच्च उपकरण दाखल होण्याची ही पहिली वेळ आहे. दिवसभर तालुक्यातील विविध विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी आर .एस. गावडे, शामराव देसाई, उपमुख्याध्यापक एस.बी. सूर्यवंशी पर्यवेक्षक एस.डी.साठे अविनाश चौगले टी. ए. पवार ,जी .के. भोसले, सुरेश सोनगावकर, एकनाथराव देशमुख, बाळासाहेब निंबाळकर ,पाटील एन.पी.फराक्टे, जि.टी. निकम, के.वी पाटील, अमर रजपूत,आदींसह विज्ञानप्रेमी शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.आभार उपप्राचार्य एस.पी.पाटील यांनी तर अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.