शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया आहे.तो सतत शिक्षण घेणारा विद्यार्थीच असतो. प्राथमिक शाळा तसंच कॉलेजमधून औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर बाहेरच्या जगात खऱ्या अर्थाने आपली शिकवणी चालू होते, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एखादं काम अधिक चांगल्या पद्धतीने कसं करायचं, अत्याधुनिक व्यवस्थापन व कुशल नेतृत्व कसे हाताळायची, एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचायचं असल्यास नेमका कोणता रस्ता निवडायचा, एखादी चूक टाळण्यासाठी भविष्यात कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची अशा छोट्या गोष्टींमधून आपण बरंच काही शिकत असतो.
एखादी नवीन गोष्ट शिकायची म्हटली की अनेकांच्या काय शिकायचे याचे प्रश्न पडतात. आजकाल मोबाइलचा वापर हा केवळ संवादाचं साधन म्हणून केला जात नाही. त्यात अनेक नवनवीन गोष्टींची भर पडली आहे. पण केवळ शिकायचा कंटाळा म्हणून त्याकडे कानाडोळा केला जातो. आपल्याला यातलं काही येत नाही, जमत नाही हे सांगण्याचा मोठेपणाही त्यांच्याकडे नसतो. आपल्याला यावली बरीच माहिती आहे, असं सांगत ते आपल्या अज्ञानावर पांघरूण घालतात. ही वृत्ती घर, कॉलेज, ऑफिस सगळीकडे पाहायला मिळते. एकदा कॉलेजची डिग्री हातात पडली की नवीन शिकायचं नुसतं म्हटले तरी ते नकोसं होतं. अभ्यास करावा लागेल म्हणून प्रमोशन लाथाडणारे महाभागही असतात,तंत्रज्ञानाची सत्ता असलेल्या आजच्या जगात दररोज बदल होत असताना ज्ञानात सातत्य राहत नाही. ज्याची आज चलती आहे, त्याला उद्या मागणी असेलच असं नाही. आपल्या ज्ञानाला बाहेर खप नाही आणि नवीन लोकांसमोर आपला टिकाव लागणार नाही या भीतीपोटी अनेकांना काम आवडत नसतानाही नोकरी करावी लागते. एखादी समस्या सोडवण्यासाठी माणसं नवीन गोष्टी शिकत असतात. ज्याप्रमाणे समस्या कधीच संपत नाहीत त्याप्रमाणे शिकणंही कमी होऊ शकत नाही. अवकाशयानाच्या शोधामुळेच मानव चंद्रापर्यंत पोहोचू शकला. कॅन्सरसारख्या दुर्धर रोगांवर आजही संशोधन चालूच आहे. शिकणं हे केवळ सार्वत्रिक पातळीवर नाही तर वैयक्तिक पातळीवरही चालू असतं. म्हणूनच आजकाल स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जातो. सतत शिकत राहिल्यामुळे आपला मेंदू तरुण आणि कार्यरत राहतो, असं एका निरीक्षणातून समोर आलं आहे. शिकण्याची ही प्रक्रिया अनेकदा आपल्या नकळत चालू असते.
वाचणं आणि अभ्यास करणं म्हणजे शिक्षण नव्हे. तर शिकलेल्या गोष्ठी प्रत्यक्षात वापरणं महत्त्वाचं आहे. माणसाला गाडी म्हणजे काय हे वाचून समजू शकतं, पण ती चालवणं म्हणजे काय हे प्रत्यक्ष अनुभवातूनच समजू शकेल. अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही, पण त्या अनुभवाचा आपण कसा वापर करतो, हे महत्त्वाचं असतं. कठीण प्रसंगात माणसाची कसोटी लागते. प्रत्येक समस्येतून बाहेर निघण्याचा मार्ग असतोच, गरज असते तो शोधण्याची, ही उत्तरे शोधत असताना आपण कसे आहोत, आपली तत्त्वं, ध्येयं, आयुष्यात काय महत्त्वाचं आहे हे आपल्याला कळत जातं. हे शिकणं आयुष्यभर कामी येत या शिकवणीमुळे मिळणारा आत्मविश्वासही महत्त्वाचा असतो.
जे जमतं त्यातून जास्त शिकता येतं, पण चुकांमधूनही बरंच शिकता देते. मात्र चूक झाल्यास, ती आपली जबाबदारी नव्हती असं म्हणत त्यापासून पळणं बरोबर नाही. त्यापेक्षा त्यातून काही शिकता येतं का हे पाहावं. इतरांच्या चुकांमधूनही बोध मिळतो. मात्र त्यासाठी प्रत्येक वेळा स्वतःकडून चूक व्हायलाच पाहिजे, असे नाही. दुसऱ्यांना शिकताना आपलं शिकणं होतंच पण त्याचबरोबर आपल्या विचारांना दिशाही मिळते.
आपले जवळचे मित्र आपल्यातले दोष दाखवत असतात त्याबाबत चिडण्यापेक्षा नीट विचार केला तर दोष घालवता येतात. यातून स्वतःमध्ये बदल घडवून स्वतःच्या विचारला,मनाला
स्वयंशिस्त, जवाबदारी,नाविन्यपूर्ण विषय,सामाजिक विद्यायक कार्य असे बदल घडवता येतात.