विषय :- " शिक्षण प्रक्रियेत ताण-तणाव व्यवस्थापन शिक्षणाची गरज."
डॉ अजितकुमार भिमराव पाटील
केंद्रमुख्याध्यापक - राजर्षी शाहू विदयामंदिर शाळा क्र. ११, सेंट्रल स्कूल, कसबा बावडा,कोल्हापूर.
प्रस्तावना :- आधुनिक युगास "ज्ञानाच्या स्फोटाचे गुण असे संबोधले जाते. याचा अर्थ जगातील ज्ञानात प्रचंड प्रमाणात क्षणा क्षणाने वाढ होत आहे. ज्ञान संपादन करण्यासाठी औपचारिक व अनौपचारिक शिक्षण याची कौशल्ये आत्मसात करण्यास वेळ लागत आहे याचा परिणाम म्हणून विषयाची निवड करणे, विविध कौशल्ये आत्मसात करण्यासाठी कुवत व क्षमता, बलस्थाने कोणती याची जाणीव पालक व विद्यार्थ्यांना समजली पाहिजेत म्हणजे ताण-ताणाव येणार नाहीत.
ताण म्हणजे काय? "ज्याच्यामुळे शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेत विघटन घडून येते किंवा घडून येण्याचा धोका निर्माण होतो अशा घटनाद्वारा उद्भवनारी प्रक्रिया म्हणजे ताण होय."
- लाझाराम, फोकन व टेलर.
ताण नेहमीच वाईट असतो असे नाही तुम्ही तो कशा पध्दतीने घेता यावर तो अवलंबून आहे. कधी-कधी ताण हा नवनिर्मितीसाठी यशस्वी घटनांसाठी प्रेरणादायी ठरतो. पण अपयशाचा बाबतीत हाच ताण अपमानास्पद ठरतो आणि अपयशासोबत तो येतोच.
तणाव अशी प्रक्रिया आहे जी परिस्थितीनुसार किंवा प्रसंगानुसार निर्माण होते. जे प्रसंग घटना आपल्याला शारीरिक अथवा मानसिकदृष्टया निराश करतात अथवा तशी स्थिती निर्माण करतात. व्यवस्थापन तज्ञ हेन्री फेयॉल यांच्यामते व्यवस्थापन करणे म्हणजे भविष्याचा अंदाज व नियोजन करणे, संघटन करणे, समन्वयन करणे, नियंत्रण करणे होय. सततच्या ताण-तणावामधून स्वभाव चिडखोर बनतो न्यूनगंडपणा, मत्सर, महत्वकांक्षी चिंता, भिती, ईर्षा, राग येणे, आजारी पडणे, नकारात्मक भावना निर्माण होणे यासारखे प्रक्रिया वाढीस लागतात.
ताण-तणावाचे व्यवस्थापन-
१. सभोवतालची परिस्थिती बदलणे बाहय परिस्थिती ज्यावेळी अधिक उद्दिपकता असते त्यावेळी नविन समस्या निर्माण होऊ लागतात. व त्यातूनच ताण-तणाव निर्माण होतो. अशावेळी सभोवतालची परिस्थिती बदलताना निर्भिडपणा घेणे, तडजोड करणे, अनुरूपता, वाटाघाटी या विधायक मार्गाचा अवलंब करावा.
२. आधुनिक जीवनशैली आजकाल जे ताण-तणाव निर्माण होतात ते आपल्या जीवनशैलीशी संबंधित असतात. ताण-तणावमुक्त जीवन जगण्यासाठी स्वतःला जाणून घेण्याची क्षमता निर्माण करणे गरजेचे आहे. सहनशीलता अंगी बानवणे, जीवनशैलीचा प्रभाव न टाकता स्विकारावी, स्वतःमध्ये बदल करावेत. सकारात्मक विचार करावेत दूरदृष्टिकोन ठेवावा.
३. प्रार्थना म्हणणे - प्रार्थनेमुळे मनातील वाईट विचार कमी होण्यास मदत होते. मन शांत होते व मनाची एकाग्रता वाढते. एकाग्रतेमुळे स्मरणशक्ती वाढते व ताण-तणाव कमी होण्यास मदत होते.
४. विविध छंद जोपासने आपल्या अंगी वाचन, लेखन, संगीत, कला, पेंटींग, पोहणे, निसर्गात फिरणे, विविध वस्तूंचा संग्रह करणे अशाप्रकारचे छंदामधून सकारात्मकता वाढते व ताण-तणाव कमी होण्यास मदत होते.
५. योगा - उत्तम आणि आदर्श जीवन जगण्यासाठी "योग" हे एक प्रायोगिक शास्त्र आहे. योगाच्या माध्यमातून आपल्या मनावर चांगले विचार रुजण्यास मदत होते. शरीर, मन, इंद्रीय, आणि आत्मा यासर्व घटकामध्ये एकसूत्रीपणा, मानसिक संतूलन, सहकार्य, सामंजस्य याप्रकारचे वातावरण निर्माण करण्यास उपयोग होतो. योग, ध्यान, धारणा, प्रत्याहार यांनी ताण-तणाव मुक्त करता येतात.
६. विपस्थना - मानवी सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही बाजूंनी बनलेले आहे. ज्याप्रमाणे एक रूपयाच्या नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे मानव कोणत्याही गोष्टीचा विचार करताना सकारात्मक व नकारात्मकदृष्टीने विचार करतो. ताण-तणाव वाढल्याने वर्तनात बदल घडतो. यासाठी ठराविक वर्षानंतर विपस्यना करावी. ताण-तणाव कमी करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
७. व्यायाम करणे शरीराला व मनाला योग्य वळण लावण्याचे सामर्थ्य व्यायामामध्ये आहे. व्यायामामुळे व मनाची प्रसन्नता वाढते. मनातील वाईट विचार, गैरसमज केवळ व्यायामामुळे कमी होण्यास मदत होते. नियमित व्यायाम करणे, चालणे यामुळे ताण-तणाव कमी होतात. सर्व वयातील व्यक्तींनी दरारोज व्यायाम करावा.
८. विरंगुळा - विरंगुळा व्यक्तिसापेक्ष असतो. विरंगुळा मिळवण्यासाठी नाना-नानी पार्क, हास्य क्लब, चिल्ड्रन पार्क, भजनी मंडळ, संस्कार केंद्रे यासारख्या ठिकाणी नियमितपणे ये-जा करावी. निसर्ग सहली, भटकंती, दुर्गभ्रमण याचा आनंद घ्यावा. आपल्या समवयस्कर वयाच्या व्यक्तींबरोबर ग्रुप करावेत म्हणजे एकटेपणा कमी होतो व विरंगुळ्याचा दैनंदिन जीवनात चांगला फायदा होईल.
९. खेळ खेळणे - मन प्रसन्न ठेवणे व खिलाडू वृत्ती बनवणे हे दोन उद्देश खेळामुळे साध्य होतात. खेळामुळे शरीरातील नकारात्मकता नाहीशी होऊन सकारात्मकता येते. व्यायामामुळे ताण-तणावाला, मोकळी वाट करून देता येते. रक्तातील साखर व कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
१०. हास्ययोग - सततच्या चिंता व काळजी यामध्ये गुरफटल्यामुळे मानवाच्या चेहऱ्यावरील हास्य निघून गेले आहे. वेगवेगळया उपक्रमाच्या वेळी विनोदाच्या प्रसंगातून हास्ययोग घडवून आणला पाहिजे. "मन करा प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण" याप्रमाणे आनंदी रहावे यामुळे ताण-तणाव कमी होण्यास मदत होते.
११. व्यवस्थापन तंत्र व्यवस्थापन तंत्र हा नवीन शब्द नाही पण याचा अर्थ साधा असा आहे तो म्हणजे नियोजनबध्द रहाणे. व्यवस्थापन करणे म्हणजे उद्याचे किंवा भविष्यकालीन जीवनाचे नियोजन करणे होय. उद्या किंवा भविष्यात कोण-कोणती कामे, व्यवहार, आर्थिक नियोजन, घराचे नियोजन, अभ्यासाचे नियोजन, कार्यक्रमाचे नियोजन यासारख्या नियोजनामुळे आपल्या जीवनाला एक चांगले वळण व शिस्त लागते यामुळे आपल्या मनातील कल्पना व विचार यांना एक प्रकारची शिस्त लागते यामुळे ताण-तणाव कमी होण्यास मदत होते.
१२. मनसिक तणाव कमी करावा प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक काही शारीरिक, मानसिक व बौध्दिक गरजा असतात. इच्छा-आकांक्षा असतात, आवडी निवडी असतात, त्यांची तृप्ती करण्यासाठी व्यक्ती धडपडत असतात. जर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर व्यक्तीला दडपण येते व खोटे बोलणे अशा सवयी लागतात म्हणजेच मानसिक तणाव निर्माण होतो. समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांच्या मते अशा व्यक्तींच्या अभिव्यक्तींचा विचार जर नाही केला तर त्या वैफल्यग्रस्त होतात, चिडखोर बनतात, वाईट कृत्य करतात. त्यामुळे त्यांना चांगले व वाईट काय याचा विचारसुध्दा त्यांच्या मनात येत नसतो. म्हणून ताण-तणाव कमी करण्यासाठी आपल्या कुवतीनुसार ध्येय, इच्छा, आकांक्षा, नियोजन मर्यादित करावे यामुळे आपले आयुष्य सुंदर व संस्कारीत बनेल.
कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीस योग्य तो निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. आजच्या जीवन पध्दतीमध्ये झपाटयाने बदल होत आहेत. वेगवेगळया प्रश्नांवर चर्चा होत आहे. या सर्व बदलांना सामोरे जाण्यासाठी आपण स्वतः "अपडेट" असले पाहिजे नाहीतर आपण या प्रवाहातून बाजूला राहू शकाल. त्यासाठी सवयी बदला चांगल्या सवयी अंगी येण्यासाठी सतत प्रयत्न करा. कारण सवय म्हणजे शिक्षण होय. ताण-तणाव मुक्त राहून आपणास व्यक्तिविकास, समाजविकास, राष्ट्रविकास, विश्वविकास करायचा आहे. संत ज्ञानेश्वरांनी सुवचनाप्रमाणे "हे विश्वची माझे घर" अशा वचनास पूर्णत्वाकडे नेण्याचा विचार फक्त मानवच करू शकतो तो म्हणजे "आदर्श व्यक्ती" होय. म्हणून "जगा आणि जगू द्या" ताण-तणाव मुक्त जीवन जगा आणि इतरांना सुध्दा आपल्या सोबत घेवून चला. जीवन खूप सुंदर आहे याचा अनुभव घ्या.
डॉ श्री अजितकुमार भिमराव पाटील (केंद्रमुख्याध्यापक) (एम.ए, बी.एड्, एम.एड) मो. नं. ९८२३९९६९११ राजर्षि शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ कसबा बावडा, कोल्हापूर - ४१६००६