हातकणंगले / प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक मार्चपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू झाली असून ९८० लोकांनी लस घेतली.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये डॉक्टर, नर्स ,पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, आशा कर्मचारी ,अंगणवाडी सेविका, खाजगी डॉक्टर व त्यांचे कर्मचारी आदींना कोरोना प्रतिबंध लसी दिल्या गेल्या. दुसऱ्या टप्यामध्ये राज्य शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, कोरोना योध्दे, महसूल कर्मचारी, केंद्र शासन कर्मचारी ,स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधी,पदाधिकारी आदींना लसी देण्यात आल्या.
तिसऱ्या टप्प्यामध्ये ६०वर्षावरील सर्व वयोवृद्ध व ४५ ते ५९ वयातील व्याधीग्रस्त लोकांना कोरणा प्रतिबंध लस देण्याचे सत्र सुरू आहे. दररोज २०० लोकांना लसीकरण देण्याचे उद्दिष्ट सुरू असून दिवसास १२०पर्यंत लोकांचा प्रतिसाद दिसत आहे.हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रूकडी उपकेंद्रामध्ये दहा दिवसापूर्वी लसीकरण मोहिम सुरु केली आहे तरी ५ लसीकरण सत्र पूर्ण झाले आहेत. येत्या काही दिवसात चोकाक व अतिग्रे या गावांमध्ये लसीकरण केंद्र सुरू होणार आहे.लस देण्यासाठी चार कक्षाचे नियोजन केले आहे. नोंदणी कक्ष, ऑनलाईन नोंदणी कोवीन अॅप कक्ष, लसीकरण कक्ष, निरिक्षण कक्ष,लसीकरणासाठी आशा कर्मचारी यांना प्रत्येकी एक हजार लोकसंख्या सर्वेक्षणाचे कार्य दिले आहे. यातून ६०वर्षावरील वयोवृद्धांना लसीकरण घेण्यासाठी आवाहन केले जाते. तसेच ४५ ते ५९ वयोगटातील व्याधीग्रस्त लोकांनाही प्रतिबंध लस दिली जात आहे.मतदान यादी प्रमाणे सर्वेक्षण सुरू आहे.
आजपर्यंत हेरले २८५, माले ३८, चोकाक ६७, अतिग्रे ४०, रुकडी स्पेशल ४७७ असे एकूण ९८० लोकांनी लस घेतली आहे. दररोज दोनशे लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे मात्र १२५पर्यंत लोकांचा प्रतिसाद मिळत असून लोकांनी न घाबरता स्वयंम स्फूर्तीने लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रात जाणे महत्त्वाचे ठरत आहे.
वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख म्हणाले की आरोग्य केंद्रांमध्ये येताना स्वतःचे आधारकार्ड घेऊन येणे गरजेचे आहे.तसेच आपल्या शेजारील गल्लीतील किंवा गावातील ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी सर्व सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण अत्यंत नीटनेटकेपणाने आयोजित केले असून सर्व नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र सिरिंज व योग्य शीतसाखळी मध्ये साठवलेली लस तसेच कोणताही दुष्परिणाम होऊ नये म्हणून लसीकरण झालेल्या व्यक्तींना अर्धा तास देखरेखीखाली ठेवण्यात येते. चुकून एखादा दुष्परिणाम झाल्यास लसीकरण सत्राच्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केलेले आहे व अत्यावश्यक सर्व साधनसामुग्री इंजेक्शन्स उपलब्ध करून ठेवले आहेत. तरी नागरिकांनी न घाबरता स्वताला कोरोणापासून संरक्षण देणारी कोव्हीशील्ड ही लस घ्यावी असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी केले आहे.