हेरले / वार्ताहर
पाणी फौंडेशनचे संचालक व प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते आमिर खान यांनी नुकतीच संजय घोडावत विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री संजयजी घोडावत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमिर खान यांच्या पत्नी किरण खान, विश्वस्त सौ. नीता घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्रभारी कुलगुरू डॉ.एम टी.तेलसंग, कुलसचिव डॉ.एन.के.पाटील, संचालक व्ही.व्ही.कुलकर्णी व प्राचार्य विराट गिरी, डॉ. उत्तम मदने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुपरस्टार आमिर खान यांनी संजयजी घोडावत यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. अध्यक्ष संजयजी घोडावत यांनी प्रारंभी आमिर खान यांना ग्रुप बद्दल माहिती देत आजवरच्या प्रगती आलेखावर प्रकाशझोत टाकला. याचबरोबर संजय घोडावत फौंडेशन व मजले येथील पाणी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली तसेच संजय घोडावत विद्यापीठाचे शैक्षणिक कामकाज व संशोधनाबद्दल सविस्तर माहिती दिली गेली. यावेळी आमिर खान यांनी संजय घोडावत विद्यापीठाच्या कोव्हीड रुग्णालयातील रुग्णांची आवर्जून विचारपूस केली. यावेळी रुग्णालयाचे डॉ. उत्तम मदने यांनी २४००० रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी गेल्याचे सांगितले. यावेळी आमिर खान यांनी संजय घोडावत यांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल पाहिला.
संजयजी घोडावत यांनी आमिर खान यांना विद्यार्थ्यांच्या जीवनावरील 'तारे जमीन पर' फिल्म सारखा नवीन विषय घेऊन आपण एक नवीन चित्रपट निर्मित करावा यासाठी आमच्याकडून लागेल ती मदत देऊ करण्याचे आश्वासन दिले.
सुपरस्टार आमिर खान म्हणाले'' या जगात खूप असे लोक आहेत जे आपले देहभान हरपून सामाजिक कार्य करीत आहेत त्यापैकी संजयजी घोडावत हे आहेत. खरेतर यांच्या सामाजिक कार्याबद्दल आजवर ऐकून होतो पण आज प्रत्यक्षात अनुभव आला. कोरोना काळात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठया रुग्ण क्षमतेचे हॉस्पिटल उभे करून सामान्यांना आधार देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. घोडावत फौंडेशनच्या माध्यमातून केलेली मदत तसेच विद्यापीठाच्या माध्यमातून कित्येक विद्यार्थी आपले भविष्य येथे घडवीत आहेत.आपल्या भावी वाटचालीस खूप शुभेच्छा'.असे बोलून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
फोटो
संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत प्रसिध्द बॉलीवूड अभिनेते आमिर खान यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना शेजारी विश्वस्त विनायक भोसले प्राचार्य डॉ. विराट गिरी व अन्य मान्यवर