हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील सार्वजनिक स्मशान शेडचे वादळी वाऱ्यात उडालेले पत्रे ग्रामपंचायतीने बसविले नसल्याने प्रेत दहन करण्यास अडचणीचे होत आहे. पावसाचे पाणी थेट शवदाहिनी वरच पडत असून प्रेताला अग्नी द्यायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२८ एप्रिलला झालेल्या वादळी पावसामुळे मौजे वडगाव येथील सार्वजनिक स्मशानशेडच्या पत्र्याचे छत उडून वरील पत्रे अस्ताव्यस्त विस्कटलेले असून काही पत्रे उडून गेले आहेत. मात्र दीड महिना होऊन गेले तरीही ग्रामपंचायतीने अद्यापही या शेडची दुरूस्ती केली नाही. सध्यास्थितीत स्मशान शेड उघडेच असल्याने प्रेताला अग्नी देणे अडचणीचे होणार आहे. कारण वरून पडणारे पावसाचे पाणी थेट शवदायिनी वरच पडत आहे. त्यामुळे मोठा पाऊस पडण्या अगोदर या स्मशान शेडची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे .
प्रतिक्रिया
१)पावसाळ्याच्या तोंडावर स्मशान शेडचे पत्रे बसवलेले नाहीत ही फार लाजिरवाली गोष्ट आहे. मृत व्यक्तीचा शेवट तरी त्याची हेळसांड न करता व्हावा.
सुरेश कांबरे
शिवसेना शहरप्रमुख
२)मी वेळोवेळी प्रशासनाला स्मशान शेड संदर्भात सूचना देऊन सुद्धा त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणारी लोकांची गैरसोय ग्रामपंचायतीने थांबवावी.
अवधूत मुसळे
ग्रामपंचायत सदस्य
फोटो
मौजे वडगाव येथील स्मशान शेड ची झालेली दुरावस्था