कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार प्रशांत बंब यांनी २३ऑगस्ट २०२२ रोजी शिक्षका विरोधी केलेल्या वक्तव्य विषयी त्यांना समज देऊन त्यांनी शिक्षकांची क्षमा याचना केली नाही तर कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ त्यांच्या विरोधात आंदोलन करणार असा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड होते तर शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली.
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार प्रशांत बंब यांची शिक्षकांविरोधी वक्तव्य त्यांचे शासनाचे शैक्षणिक धोरण व प्रचलित आदेश याविषयी अज्ञान सिद्ध करणारी आहेत. शिक्षकांना मुख्यालयी ठिकाणी राहणे अनिवार्य करताना त्यांच्यासाठी शाळेजवळ निवास व्यवस्था करणे, शाळेतील मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारणे, आदी बाबी आरटी कायद्यानुसार शासनावर बंधनकारक आहेत. यासाठी शासन असमर्थ ठरले आहे. शासनाने दिनांक ७ ऑक्टोबर २०१६ रोजीच्या आदेशानुसार ग्रामीण विभागात शिक्षकांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे अनिवार्य नसल्याचा निर्णय घेतलेला आहे. शिवाय विद्यार्थ्यांची प्रगती कमी अधिक असण्यास केवळ शिक्षकांना जबाबदार धरण्याचा आमदार बंब यांचा जावई शोध त्यांच्या शैक्षणिक आकलन क्षमते विषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. तसेच सभागृहातील व व्हायरल ऑडिओ मधील त्यांची शिक्षका विषयी वक्तव्य आमदार या नात्याने सभ्यता व विषयाचे गांभीर्य या संबंधी त्यांची बेफिकिरी व सत्तेचा उन्माद दर्शवणारी आहे. तसेच प्रगतीशील महाराष्ट्रात असभ्य व बेमुर्वतखोर व अभ्यास न करता सवंग बकवास करणारे लोकप्रतिनिधी असणे हा महाराष्ट्राला लागलेला सांस्कृतिक कलंक असल्याने अशा वृत्तीचा व प्रवृत्तीचा निषेध होणे व त्यास प्रोत्साहन मिळणार नाही यासाठी कारवाई होणे सामाजिक दर्जेदारपणा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक आहे. अशी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची धारणा आहे म्हणून आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभा सभागृहात दिनांक २३ ऑगस्ट २०२२ रोजी शिक्षकविरोधी जी मुक्ताफळे उधळी याबद्दल कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आमदार प्रशांत बंब यांचा समस्त शिक्षकांच्या वतीने जाहीर निषेध करीत आहे. तसेच त्यांनी शिक्षकांची क्षमा याचना करावी अशी मागणी करीत आहोत.जर त्यांनी शिक्षकांची क्षमा याचना केली नाही तर त्या विरोधात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ तीव्र आंदोलन करणाच्या निर्णय घेण्यात आला.
तसेच महाराष्ट्र शासनाने शाळेतील प्रत्येक वर्गात वर्गशिक्षकांचे फोटो लावण्याचा जो निर्णय घेतला आहे तो शिक्षकांच्यावर अविश्वास निर्माण करणारा आहे. शाळेतील गुणवत्ता राखण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत असतात. फोटो लावल्याने गुणवत्ता राखली जाईल हे धोरण असंविधानात्मक आहे. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठांनी या विरोधात झालेल्या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही शाळेमध्ये शिक्षकांचे फोटो लावू नयेत असा निर्णय घेण्यात आला.
५ सप्टेंबर रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कायम विनाअनुदानित शाळातील प्रश्नांसाठी शिक्षक दिन काळा दिन म्हणून साजरा करण्याचा जो निर्णय कायम विनाअनुदानित संघटनांनी घेतलेल्या निर्णयास पाठिंबा देण्याचा शैक्षणिक व्यासपीठाने निर्णय घेतला.
या सभेस बी .जी. बोराडे, पी. एस. हेरवाडे, खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील, सुधाकर निर्मळे, उदय पाटील, शिवाजी माळकर, उमेश देसाई, सुधाकर सावंत, राजेंद्र कोरे, आदी मान्यवरांसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देतांना व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड यांच्यासह शिक्षक संघटनेंचे प्रमुख पदाधिकारी.