हेरले /प्रतिनिधी
हेरले (तालुका हातकणंगले) येथे सकल हिंदू समाज व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने गेले १३ वर्ष अखंडपणे दुर्गा माता दौड चे आयोजन केले जाते.हेरले शिवप्रतिष्ठान संघटना ही लोकांमध्ये देश प्रेमाची, राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करत असते. दसऱ्या दिवशी दुर्गा माता महादौड मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाली.
घटस्थापनेपासून पहाटे ५.३० ते ७ वाजेपर्यंत दुर्गामाता दौड सुरू होती. पहिल्यांदा अतिशय कमी लोकांना घेऊन सुरू केलेल्या ह्या दुर्गा माता दौडचे दसऱ्या दिवशी विराट अशा संख्येमध्ये रूपांतर झाले. यात मोठ्या संख्येने स्वइच्छेने महिलावर्ग, व लहान मुले, मुली, वडीलधारी पुरुष, तरुणवर्ग, तसेच सर्व बारा बलुतेदार हिंदूनी, हा दुर्गा माता महा दौडीचा उपक्रम अतिशय आनंदी व जल्लोषी वातावरणात पार पडला.
यावेळी स्त्रीशक्तीच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.दौड निघालेल्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून पुष्पवृष्टी करून दौडचे स्वागत करण्यात आले. यावेळी आतषबाजीही करण्यात आली. एकीचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दौडमध्ये युवक वर्ग व महिला वर्ग मोठया संख्येने उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. हातात भगवा ध्वज घेऊन स्फूर्ती गीत गात दौड काढण्यात आली. गावातील मुख्य मार्गावरून प्रदक्षिणा घालून, मुख्य चौकात दौडीची सांगता करण्यात आली. दौडचे नियोजन सकल हिंदू समाज यांच्यावतीने करण्यात आले होते.