ज्ञानराज पाटील.
म्यूचुअल फंड है सही च्या जाहिराती प्रसार माध्यमांतून झळकत आहेत, ज्यांना शेअर बाजार कशाशी खातात हे माहित नसणार्यांना म्युच्युअल फंड म्हणजे दूरची गोष्ट आहे. त्यासाठी हा खास लेख !
आवडला तर अवश्य शेअर कराच व मराठी माणसाला अर्थ साक्षर करायला हातभार लावा.
सर्वसामान्यांसाठी शेअर बाजारात स्वत: गुंतवणूक करण्यासाठी टेक्निकल अॅनेलेसीस व फंडामेंटल अॅनेलेसीस करता येणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे केव्हा व कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत ते केव्हा विकावेत यासाठी नियमित अभ्यासाची गरज असते, यामुळे सर्वसामान्य माणसाला यासाठी वेळ देणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी, शेअरबाजाराचा दीर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम आहे. कारण तज्ञ फंड व्यवस्थापक हे म्युचुअल फंडातील गुंतवणुकीचे व्यवस्थापन करत असतात. याव्यतिरिक्त आपण शेअरबाजारात व्यवहार करताना जो खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्च म्युचुअल फंडात येत असतो.
अनेक लोकाना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचेकडे पैसेही असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते अशांसाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे उत्तम माध्यम आहे.
तुम्ही केलेल्या गुंतवणूकीच्या बदल्यात तुम्हाला युनिटस मिळतात .
Units = म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यावर मिळणारा तुमच्या वाट्याचा भाग (शेअर), गुंतवणूकदार हा या युनिट्सचा मालक असतो.
NAV = Net Asset Value म्हणजे एका युनिटचे रोजच्या रोज बदलले जाणारे मूल्य.
Value = गुंतवणुकीचे मूल्य = Number of Units X NAV
शेअरबाजार वर गेला कि NAV वाढते व आपल्या गुंतवणुकीचे मुल्यांकनसुद्धा वाढते, याउलट जर शेअर बाजार खाली आला तर NAV कमी होते व आपल्या गुंतवणुकीचे मुल्यांकनसुद्धा कमी होते. हि अशी मूल्यवृद्धी किंवा मूल्य घट शेअरबाजाराच्या काळाप्रमाणे नियमितपणे होतच असते, मात्र दीर्घ मुदतीत शेअर बाजारात वृद्धी हि होतेच व त्यामुळेच दीर्घ मुदतीत गुंतवणूकदाराला फायदाच होत असतो.
म्युचुअल फंडात गुंतवणूक करताना ती किमान ५ वर्षांसाठी करावी व शक्य असेल व पैशांची अगदीच गरज नसेल तर ती गुंतवणूक जास्तीत जास्त काळ ठेवावी.