कागल /प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषद राज्यातील साडेतीनशे पेक्षा अधिक तालुक्यात पोहोचली आहे. संघटनेची जागृती वाढत असून ती सर्व समावेश व सक्षम बनली आहे. पत्रकारांनी नुसत्या बातम्या देण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नासाठी, त्यांच्यावरिल अन्याय दूर करण्यासाठी काम करावे. असे आवाहन करून मराठी पत्रकार परिषद महिला पत्रकारांचेही स्वतंत्र संघटन करणार आहे. भविष्यात संघटना पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी भक्कम पणे त्यांच्या पाठीशी उभा राहिल.असा विश्वास मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त व माजी अध्यक्ष एस. एम.देशमुख यांनी व्यक्त केला.
मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई येथील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेल्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी परिषदेचे नूतन अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, कार्याध्यक्ष गजानन नाईक, सरचिटणीस अनिल महाराज, किरण नाईक, विभागीय सचिव समीर देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशमुख पुढे म्हणाले मराठी पत्रकार परिषदेचे राज्यातील जिल्हा पत्रकार संघाचे कार्य चांगले आहे. संघटनेने गत वीस वर्षात अनेक पत्रकारांना मदत केली आहे. माझ्या अध्यक्ष पदाच्या काळात एकोणीस प्रश्नांची निर्गत केली आहे. पत्रकारांची ही चळवळ भविष्यात तळागाळापर्यंत पोहोचवायची आहे.कोल्हापुरच्या बारा तालुक्यात सुधाकर निर्मळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकारांना चांगले बळ दिले आहे. ते आमच्याशी संलग्न झाल्याने ताकद वाढली आहे.
मराठी पत्रकार परिषद हे एक कुटुंब आहे.सदस्य अडचणीत असल्यास सर्वांनी धावून गेले पाहिजे. सर्वांनी संघटीत होऊन काम करावे .कोण आपली बदनामी करत असेल, टिका करत असेल , त्याकडे दुर्लक्ष करून सकारात्मक काम करत रहावे.कोणीही स्वतःला एकटे समजू नये. संघटना ताकदीने तुमच्या पाठीशी आहे. आपली संघटना ताकदीने तुमच्या पाठीशी आहे. आपली संघटना सर्व समावेशक आहे. आपले नियम, तत्वे कोणी स्वीकारत असेल तर त्यांना आपण सामावून घेऊ.आपल्या संघटनेचा कारभार स्वच्छ व पारदर्शी आहे. खर्चाचा हिशोब ऑन लाईन देणारी राज्यातील आणि देशात ऑन लाईन पध्दतीने निवडणूक यशस्वी पणे राबविणारी एकमेव आपली एकमेव संघटना आहे.याची दखल अन्य जिल्ह्य़ानी घ्यावी.
ते म्हणाले भविष्यात संघटना पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबविणार आहे. याशिवाय महिला पत्रकारांचेही संघटन करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी परिषद भरीव काम करणार आहे.हे स्पष्ट करून मराठी पत्रकार परिषद व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या प्रयत्नातून वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या भूमीत त्यांच्या नावाने मोठे स्मारक होत आहे. 6 जानेवारी रोजी होणाऱ्या स्मारकाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सर्व पत्रकारांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे.असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नूतन अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा म्हणाले यापूर्वी मराठी पत्रकार परिषदेने पत्रकारांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने केली आहेत.शासनाने याची दखल घेतली आहे.पत्रकार संरक्षण कायदा लवकरच होत आहे. तसेच पत्रकारांना पेन्शन देण्याऐवजी बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना सुरू केली जाणार आहे. यास शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात त्याच्या
अंमलबजावणीस मान्यता मिळेल. असा विश्वास व्यक्त करून भविष्यात संघटना पत्रकारांचे प्रश्नासाठी सकारात्मक काम करेल. असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्याचा व इतर मान्यवरांचा
सत्कार करण्यात आला. तसेच कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रीपोर्टर वेल्फेअर असोसिएशन ही संघटना मराठी पत्रकार परिषदेस संलग्न झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे , संचालक नंदकुमार कांबळे, भास्कर चंदनशिवे, कागल तालुका अध्यक्ष नरेंद्र बोते यांचा एस.एम. देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध विभागातील प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्वागत व प्रास्ताविक किरण नाईक यांनी केले. बैठकीस मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी, विविध जिल्ह्य़ातील पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.