हातकणंगले / प्रतिनिधी
महिला व बालकल्याण सभापती डॉ.पद्याराणी पाटील यांनी ग्रामिण भागास वरदान ठरलेले अतिग्रे घोडावत कोव्हिड सेंटर व माले अतिग्रे गावास भेट देऊन कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आढावा बैठक घेतली आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य सेवेस लागणारी औषधे उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
हातकणंगले तालुक्यातीलअतिग्रे येथील घोडावत कोव्हिड सेंटरला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती डॉ.पद्माराणी पाटील यांनी भेट देऊन सेंटरचे प्रमुख नोडल ऑफिसर डॉ.उत्तम मदने यांच्याशी सेंटरमधील वैद्यकिय सेवा,भौतिक सोयी सुविधा,औषध पुरवठा व अन्य अडीअडचणी बद्दल चर्चा केली.
अतिग्रे येथील घोडावत कोव्हिड सेंटर काही दिवसापूर्वी सुरू झाले आहे. या सेंटरमध्ये ३८० नॉन ऑक्सिजन बेडपैकी ३३० रुग्ण उपचार घेत आहेत व २०ऑक्सिजन बेडचे रूग्ण उपचार घेत आहेत. या सेंटरमध्ये बारा डॉक्टर ,सोळा सिस्टर , चार हाऊस किपींग कर्मचारी व आठ वॉर्डबॉय सेवा बजावत आहेत. सेंटरमधील रुग्णांच्या संख्येचा विचार केला असता सात डॉक्टर, वीस हाऊसकिपींग कर्मचारी, वीस वॉर्ड बॉयची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रुग्णांच्या उपचारासाठी अधिकाधिक औषध पुरवठा होणे तसेच ऑक्सिजन मात्रा वाढवणे आवश्यक आहे. पुढील काही दिवसामध्ये शंभर ऑक्सिजन बेडची सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून लवकरच हा आरोग्य सेवा प्रकल्प पूर्णत्वास येईल. अशी माहिती डॉ. उत्तम मदने यांनी सभापती डॉ.पद्याराणी पाटील यांना दिली.
माले अतिग्रे येथील ग्रामपंचायत व कोरोना सनियंत्रण ग्रामसमितीस सभापती डॉ.पद्याराणी पाटील यांनी भेट देऊन गावातील कोरोना संसर्ग रोखून गावे कोरोना मुक्त होण्यासाठी उपाययोजना बद्दल मार्गदर्शन केले. तसेच गावपातळीवर आरोग्य सेवा यंत्रणा कार्यान्वीत करण्याचे आवाहन केले.
फोटो
अतिग्रे येथील घोडावत कोव्हिड सेंटरमध्ये
नोडल ऑफिसर डॉ. उत्तम मदने यांच्याशी चर्चा करून पाहणी करतांना महिला व बालकल्याण सभापती डॉ.पद्याराणी पाटील