हेरले / वार्ताहर
हेरले ( ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडिकल असोसिएशन,केमिस्ट असोसिएशन, एमआर असोसिएशन, सर्व पक्षिय समिती व सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने सुरू असलेले अलगीकरण केद्र व उपचार केंद्र गावातील सर्वसामान्य रूग्णांना आधारवड ठरत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कोल्हापूर जिल्ह्यात थैमान घातल्यानंतर हेरले गाव यातून कसे वाचणार? त्यामुळे गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झालाच. पण याला वेळीच आळा घालण्यासाठी व गावातच गोरगरीब रुग्णांना उपचार मोफत होण्यासाठी वैद्यकिय अधिकारी डॉ.राहुल देशमुख यांनी सर्वांना आवाहन केले. त्याला योग्य प्रतिसाद देऊन ग्रामपंचायत व गावातील खाजगी डॉक्टर्स असोसिएशन व शासकीय मार्गदर्शका प्रमाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील,माजी सभापती राजेश पाटील,पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार,पोलिस पाटील नयन पाटील, प्रा.राजगोंड पाटील,सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच सतीश काशिद, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, तलाठी एस. ए.बरगाले,सर्व ग्रामपंचायत सदस्य आदींच्या पुढाकाराने व मेडिकल असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, एमआर असोसिएशन, सर्वपक्षिय समिती,सामाजिक सेवा संस्था यांचे सहकार्याने गावांमध्ये कोव्हिड १९ अलगीकरण केंद्र एक जून रोजी मराठी शाळेमध्ये सुरू करण्यात आले.
या अलगीकरण केंद्र सोबत"ताप उपचार केंद्र व आरटीपीसीआर, अँटीजेन टेस्टिंग सेंटरची या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना औषधे ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगामधून मोफत दिली जात असून औषधोपचारासाठी चार लाख रूपयांचा निधी खर्च होत आहे. या औषधाचे वितरण व नोंद सुद्धा सामाजिक भावनेतून गावातील खाजगी औषध विक्रेते करत असून ना नफा ना तोटा तत्वावर शंभर ते दिडशे प्रकारच्या औषधाचा पुरवठा करत आहेत.
ताप उपचार केंद्रामध्ये प्रा.आ.केंद्रांमधील एक आरोग्यसेविका,गावातील खाजगी डॉक्टर्स डॉ.आर. डी.पाटील, डॉ. महावीर पाटील, डॉ. इमरान देसाई, डॉ. सुरेखा आलमान, डॉ. अमोल चौगुले आदीसह १७ डॉक्टरांचे योगदान लाभले असून ते डॉ.देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली ताप उपचार केंद्र चालवत आहेत. सर्व खाजगी डॉक्टर यांचे दवाखान्यात येणारे तापाचे रुग्ण या ठिकाणी पाठवून त्यांची तपासणी करून तात्काळ अँटीजेन किंवा आरटीपीसीआर तपासणी करून घेत आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास तात्काळ अलगीकरण केंद्राच्या शासन मार्गदर्शक सूचनेप्रमाणे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तपासणीमध्ये पल्स,बी.पी,ऑक्सिजनचे प्रमाण, जनरल तपासणी,रक्त लघवी तपासणी तसेच सहा मिनिटे चालून ऑक्सिजनचे प्रमाण मोजणे इत्यादी उपाययोजना करून जर रुग्णास गंभीर लक्षणे आढळल्यास संजय घोडावत कोव्हिड सेंटर किंवा आयजीएम रुग्णालयात प्रा.आ.केंद्राच्या रुग्णवाहिके- द्वारे मोफत पोहोचवण्याची सोय या ठिकाणी केली जाते.
सर्वपक्षीय समितीचे समन्वयक प्रा.राजगोंड पाटील, अमित पाटील, मुनीर जमादार, कपिल भोसले, गुरूनाथ नाईक, वकील प्रशांत पाटील, दीपक जाधव, प्रशांत तोडकर, अभिनंदन करके, सुदर्शन पाटील आदीसह सहकारी संस्था, विकास सेवासंस्था, तरूण मंडळे व मान्यवरांनी उपकेंद्रास लाख रुपयाची आर्थिक मदत केली आहे.या सेंटरमध्ये सध्या दररोज वैद्यकिय अधिकारी डॉ. देशमुख व एक खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांचे मदतीने उपचार होतात. आरोग्य सेवेमध्ये तीन प्रशिक्षित नर्स, एक आरोग्यसेविका, रोटेशन द्वारे एक औषध निर्माण अधिकारी,दोन लॅब टेक्निशियन, एक डेटा एन्ट्री ऑपरेटर, दोन ग्रामपंचायत कर्मचारी, दोन शिक्षक व ऍम्ब्युलन्सवर इंचलकरंजी एस टी आगाराचे वाहन चालक असे सेवाकार्य करीत आहेत.
रूग्ण बरे होण्याचा दर समाधानकारक
आज अखेर या अलगीकरण केंद्रामध्ये १४७ रुग्ण दाखल झाले असून १२o इतके रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. गंभीर लक्षणे असणारे १४ इतके रुग्णांना संदर्भ सेवा दिली आहे. तसेच या ठिकाणी आजपर्यंत २९७९ अँटीजेन चाचण्या व ६४३ आरटीपीसीआर तपासण्या केल्या आहेत. यामध्ये २६७ अँटिजन व ७ आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे त्यांच्यावर वेळीच या ठिकाणी उपचार केले गेले. त्यामुळे रुग्ण बरा होण्याचा दर समाधानकारक आहे.
रूग्णांनी मानले डॉक्टरांचे आभार
हेरले अलगीकरण केंद्रात गोरगरीब रुग्णांना वेळेत मोफत व गावातच उपचाराची सोय निर्माण झालेने बरे झालेल्या रुग्णांनी डॉक्टरांचे व आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानून सेंटरला उपयोगी विविध भेटवस्तू दिल्या. बऱ्याच रुग्णांनी आम्हाला कर्जबाजारी होण्यापासून व मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणल्याबद्दल हेरले कोव्हिड सेंटरचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली आहे.