कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.9/9/21
दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी शासन, न्यायालयीन स्तरावर तसेच रस्त्यावरची लढाई करावी लागणार असून पेन्शनचा प्रश्न सुटल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी प्रतिपादन केले. शिक्षक आमदार जयंत आसगावकर हे याप्रश्नासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
मुख्याध्यापक संघ, विद्याभवन कोल्हापूर येथे जुन्या पेन्शन योजनेबाबत आयोजित आढावा बैठकीत कार्याध्यक्ष बाबा पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ होते.
कृती समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील यांनी जुन्या पेन्शन बाबत
आतापर्यंत झालेले प्रयत्न व पुढील आंदोलनाबाबत माहिती दिली. पेन्शन योजनेत अडथळा ठरणारी १० जुलैची अधिसूचना रद्द करण्यासाठी विधानसभा अध्यक्षासह १८ मंत्री, १७ खासदार, १६३ आमदारांची पत्रे घेतली होती. या प्रयत्नामुळेच १० जुलैची अधिसूचना रद्द झाली.
यावेळी संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, कोजिमाशिचे संचालक शांताराम तौदकर, सुदेश जाधव (करवीर), अशोक पाटील (राधानगरी), प्रकाश पाटील (भुदरगड), बाबुराव पाटील (करवीर), श्रीधर गोंधळी, सुभाष पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी मुख्याध्यापक संघाचे व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर, संपर्कप्रमुख अशोक हुबळे, एम. आर. पाटील, सखाराम चौकेकर, श्रीकांत पाटील, बबन इंदुलकर, माजित पटेल, बाजीराव साळवी आदी उपस्थित होते. प्रारंभी स्वागत संघाचे सहसचिव अजित रणदिवे यांनी केले. तर आभार श्रीकांत पाटील यांनी मानले.
फोटो : विद्याभवन, कोल्हापूर येथे जुन्या पेन्शन योजनेबाबत आयोजित आढावा बैठकीत बोलताना बाबा पाटील सोबत सुरेश संकपाळ, मिलिंद पांगिरेकर, अशोक हुबळे, एम.आर.पाटील, श्रीकांत पाटील, बबन इंदुलकर आदी.
चौकट
जुन्या पेन्शनचा शब्द घेऊनच निवडणुकीतून माघार : बाबा पाटील
विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी करायची म्हणून प्रयत्न ठेवले होते. पण 'कोल्हापूरचा आमदार' करण्याच्या पालकमंत्र्यांच्या आवाहनानुसार माघार घेत असताना १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याबाबतचा शब्द दिल्याने माघार घेतल्याचे सांगून यासाठी शासनस्तरावर आम. जयंत आसगावकर यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी सांगितले.