हेरले / प्रतिनिधी
सध्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ चे सहापदरी रस्ता बांधणीचे काम जलद गतीने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात पुल (ब्रिज) चे काम प्राधान्याने सुरू आहे.त्यामुळे जेथे पुलाचे चे काम सुरू आहे,त्याठिकाणी वाहतूक सेवारस्त्यावरुन सुरु केली आहे. त्याचबरोबर मुख्य महामार्ग व सेवा रस्ता रुंदीकरणाचे कामही सुरू आहे.विशेषतः सांगली फाटा ते शिये फाटा या परिसरात सेवा रस्त्याची रुंदी खडीकरण करून सपाटीकरण करून वाढविण्यात आली आहे. या सेवा रस्यावरून दोन्ही बाजूनी वाहतूक सुरू आहे. या भागातील औद्योगिक वसाहत, शोरूम,ट्रान्सपोर्ट, मार्बल ,फर्निचर दुकाने या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची वर्दळ प्रचंड मोठी आहे.विशेषतः सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत हा रस्ता शिरोली एमआयडीसीतील कंपन्याची जनरल सकाळची पाळी (शिफ्ट)सुटल्यांतर नागाव फाटा येथील चौकात चारही बाजूनी वाहने येत असल्याने वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. तसेच रस्ता आखूड झाल्याने वारंवार ट्रॅफिक जाम होत आहे.सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांस,पादचाऱ्यांना चालत जाणेही मुश्कील झाले आहे.तसेच सेवा रस्त्यावर सर्वत्र खडी विस्कटलेली आहे.यामुळे गाडी स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बऱ्याचवेळा नागाव गावचे पोलीस मित्र सागर जंगम हे वेळ मिळेल त्यावेळेस वाहतूक नियंत्रकाची भूमिका बजावून वाहतूक सुरळीत करण्यास मदत करत आहेत. त्यामुळे किमान सायंकाळी वाहन रहदारीच्या वेळी तरी शिरोली एमआयडीसी पोलिस अधिकारी किंवा हायवे पोलिसांनी वाहतूक नियंत्रक नेमावा,जेणेकरून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल,अशी मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांच्यातून होत आहे.
फोटो.....
नागाव फाटा येथे वाहनांची झालेली कोंडी.