शनि महात्म्य आणि त्याचा संदेश –
त्याची दृष्टी पडे जयावर ! करी तयाचा चकनाचूर !
अथवा कृपा करी जयावर ! तयासी सर्व आनंदच प्राप्त होय !!
दृष्टीचा ऐका चमत्कार ! जन्मला जेंव्हा शनैश्वर !
तेंव्हा दृष्टी पडली पित्यावर ! तेणे कुष्ठ भरला सर्वांगी !!
पित्याच्या रथी होता सारथी ! तो पांगुळा झाला निश्चिती !
अश्वांचिया नेत्रांप्रती ! अंधत्व आले तत्क्षणी !!
असे शनीचे वर्णन केले आहे शनी महात्म्यामध्ये. हे वर्णन वाचल्यावर कुणालाही शनी व शनीच्या साडेसातीची भिती वाटणे साहजीकच आहे. साडेसाती म्हणजे त्रास, साडेसाती म्हणजे अधोगती, साडेसाती म्हणजे नुकसान, साडेसाती म्हणजे आता काहीतरी वाईटच, भयंकर असे घडणार अशी भीती बऱ्याच लोकांच्या मनात येते. पण वरील वर्णनातील “अथवा कृपा करी जयावर ! तयासी सर्व आनंदच प्राप्त होय !! ” या ओळींकडे मात्र कोणाचे लक्ष जात नाही असे दिसते. शनी जेंव्हा एखाद्याला शुभ असतो तेंव्हा तो भरभरून देतो, कशाचीही कमतरता भासू देत नाही. व्यक्तीला नशीबाची नेहमी साथ लाभते. ही शनीची दुसरी बाजू आहे.
साडेसातीत शनी महात्म्य ही पोथी वाचण्याची प्रथा आहे, त्यामुळे साडेसातीचा त्रास कमी होतो असे समजले जाते. शनी महात्म्य ह्या पोथी मध्ये एक पौराणिक कथा सांगण्यात आली आहे. त्याचे प्रमुख पात्र आहे राजा विक्रम. या कथेत शनी राजा विक्रमाला साडेसातीत अनेक प्रकारच्या यातना भोगावयास भाग पाडतो. त्या सर्व यातना भोगताना सुध्दा राजाने आपला संयम, सत्वगुण व विवेक सोडला नाही. लोभ, लालच व कामविकार यांचा त्याग केला. राजा विक्रम हा शनि महात्म्याचे माध्यम आहे, कोणत्याही व्यक्तीने मस्तपणा, टिंगळ टवाळी, माज, गर्व, मत्सर हे कुठल्याही परिस्थितीत करू नये हेच या राजा विक्रमाच्या कथेच्या माध्यमातून शनि महात्म्यकारास सांगायचे आहे. यातून प्रत्येकाने हा बोध घेऊन आपले आचरण शुध्द व सात्विक ठेवावे, तरच साडेसातीची तीव्रता कमी होईल. केवळ पोथी वाचून काही होणार नाही.
साडेसाती म्हणजे मनाविरुध्द घडणाऱ्या घटनांचा काळ असा समज आहे पण वास्तविक पाहता शनीची साडेसाती ही व्यक्तीला सहनशील, धार्मिक, दानशील व कर्मशील बनवते. अशा वाईट काळातच माणसाची योग्य पारख होते. याकाळात व्यक्तीला आपल्या परक्याची जाणीव होते. स्वत:चे गुण दोष लक्षात येतात, गर्व हरण होते, अहंकार गळून पडतो. माणूसकीची जाणीव होते. एक माणूस म्हणून कसे जगावे याचे ज्ञान होते. अविचारांनी केलेल्या कामांची फळे साडेसातीत मिळताना दिसतात.
वरील विवेचनावरुन हे लक्षात येते की साडेसाती म्हणजे एक सत्व परीक्षाच असते. साडेसाती म्हणजे आपण केलेल्या कर्मांचे फळ मिळण्याचा कालखंड. जर आपण चांगले कर्म केले असतील तर साडेसातीच्या काळात भाग्योदय होईल, उत्कर्ष होईल, उच्च पद प्राप्ती होईल, आपण ठरवलेले ध्येय- लक्ष साध्य होईल आणि जर का वाईट कर्मे केली असतील अथवा हातून घडली असतील तर त्रास, नुकसान, अपयश सहन करावे लागेल, नोकरी व्यवसायात पिछेहाट होईल. मग या व्यक्तीनी अशा घटनानी खचून न जाता यातून काही बोध घ्यावा. इतकेच.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण वाचा